"आम्ही तर स्पष्ट बायोडाटा मध्ये लिहिले आहे, आमच्या मुलीला परदेशातीलच स्थळ हवे आहे. त्याबाबतीत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही."
" अहो पण उषाताई, भारतातल्या भारतात जर एखादे चांगले स्थळ आले तर कशाला हातचे घालवता? आपल्याकडे काय चांगल्या मुलांची कमी आहे का?"
"अजिबात नाही हो कुसुमताई, आम्ही याबाबतीत तडजोड करणार नाही म्हणजे नाही. आणि काय कमी आहे आमच्या शितलमध्ये? अगदी नक्षत्रासारखी आहे, चांगली शिकलेली आहे, सर्व कलागुणांमध्ये अगदी अग्रेसर आहे. का येणार नाही तिला परदेशातील स्थळ?"
" अहो मी कुठे म्हणाले येणार नाही? पण भारतातले आले आणि अतिशय चांगले आले तर बिघडले कुठे?"
"बिघडले कुठे म्हणजे? आमची एक हयात या घरातच गेली. या देशाच्या सोडा, पण राष्ट्राच्या बाहेर आम्ही कुठे गेलो नाही. आमच्या यांनी परदेश फिरवायची हौस कधी पूर्णच केली नाही, पण मी माझे लेकीच्या बाबतीत असे होऊ देणार नाही. तिला बघतानाच परदेशातील स्थळ बघणार. तिला नाही मी पूर्ण आयुष्य इथेच सडू देणार. बाहेर राहिली की आरामात राहील नवऱ्यासोबत. कोणाची कटकट नाही, फार काही बंधने नाहीत, प्रत्येकाची इच्छा असतेच तशी आमचीही आहे. सोडा, तुम्हाला नाही कळणार." असे म्हणून उषाताई घरी निघून गेल्या.
त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून कुसुमताई मनातल्या मनात म्हणाल्या," काय होणार उशाचे कोण जाणे."
तर या उषाताईंच्या मुलीचा, म्हणजे शीतलचा लग्नासाठी बायोडेटा काढून चार महिने झाले होते. त्या बायोडाटामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले होते,' की परदेशातील मुलाला जास्त प्राधान्य दिले जाईल. बाकी आमच्या फार काही अपेक्षा नाहीत.'
मध्यंतरी त्यांना महाराष्ट्रातीलच एक स्थळ आले होते, मुलगा चांगला डॉक्टर होता. देखणा होता. कोणतीही बंधने लावणारा नव्हता. त्याने शीतलला पर्सनली सांगितले होते," की तू तुला हवे ते लग्नानंतर करू शकतेस."
पण उषाताईंनी "आम्हाला परदेशातीलच मुलगा हवा" म्हणून परस्पर त्या मुलाला नकार कळवला होता. त्यामुळे मध्यस्थी सुद्धा जरा बिचकूनच स्थळ आणत होते.
शितल सुद्धा आईच्या शब्दाबाहेर नव्हती. तिलाही कुठेतरी परदेशाचे आकर्षण होतेच. उषाताई दिवस रात्र इंटरनेटवर परदेशातील फोटो बघत बसायच्या. कधी इंग्लंड, कधी अमेरिका, कधी नेदरलँड, कधी कॅनडा आणि लेकीला तिथे पाठवायची स्वप्न बघत बसायच्या. तिच्यामागे कधीतरी आपल्यालाही जायचा योग येईल असे म्हणून मनातल्या मनात हुरळून जायच्या.
शितलचे बाबासुद्धा त्या दोघींना समजावायचे," अगं उषा, स्थळ माहितीतले आणि चांगले असलेले बरे. आणि आपल्या देशात असेल तर आपल्याला कधीही शितलकडे जाता येते. तिची ख्यालीखुशाली विचारता येते. पण परदेशामध्ये तू कसे जाणार आहेस लगेच उठून? तिला काही हवे नको असल्यास कसे जायचे सांग बरे?"
"तुम्ही गप्प बसा. तुम्हाला काय कळतंय? मला एक ठेवले आहे या गावातच. कधी कुठे घेऊन जायचा योग आला नाही तुम्हाला. आणि आता शितलला संधी मिळते आहे तर तेही डोळ्यात खुपते आहे तुमच्या. ते काही नाही मी सगळीकडून कॉन्टॅक्ट जुळवून आणून दाखवेल आणि शीतलला सुयोग्य परदेशातील स्थळ आणणार म्हणजे आणणारच."
त्यांच्या अशा बोलण्यामुळे शितलचे बाबा त्यांच्यासमोर काहीही बोलायला धजत नसत. त्यांनी पत्नीच्या अशा स्वभावामुळे दोन्ही हात वर केले होते.
मनासारखे स्थळ बघता बघता एक वर्ष उलटले. या एक वर्षात त्यांच्या ओळखीची चांगली सुस्थळे आली होती. जी शितलच्या बाबांसहित घरच्या सर्वांना पसंत पडली होती. पण शितलच्या आईचे एकच टुमणे होते की आम्हाला परदेशातीलच मुलगा हवा बाकी काही नको.
त्यांच्या अशा मागणीमुळे बरीच स्थळे त्यांनी नाकारली होती. आणि आता समाजात सुद्धा त्यांची चर्चा चालली होती की यांच्या घरी स्थळ घेऊन जाऊन कोण अपमान करून घेईल? त्यापेक्षा नकोच .
आता एकाचे दोन वर्ष होत आले तरीही उषाताईंचे आणि शितलचे मत बदललेले नव्हते. उषाताईंनी शितलचे सर्व मॅरेज ॲपवर रजिस्ट्रेशन केले होते. शादी डॉट कॉम पासून ते प्रत्येक मॅट्रिमोनी ॲपपर्यंत शितलचे अकाउंट होते.
त्या ॲपवर सुद्धा कित्येक मुलांनी शीतलला स्वतःहून विचारले होते पण फक्त ते भारतात राहतात म्हणून शितलने नकार दिला होता .
शितल आणि उषाताईंनी अजिबात हार मानली नव्हती. त्या अजूनही या आशेवर होत्या की काही झाले तरी आम्हाला अगदी सुयोग्य परदेश स्थळ मिळणार.
शितलचे बाबा त्या दोघींना सांगून सांगून थकले होते. तरीही त्या दोघी त्यांनाच उलटे बोलायच्या," की तुम्हाला मुलगी कुठेही दिली तरी फरक पडत नाही. तुम्हाला शितल डोक्यावरच ओझं वाटते. म्हणून तिच्या अपेक्षांचा तुम्ही विचारच करत नाही आहात. तिला जसे स्थळ हवे तसे आणणे आपली जबाबदारी आहे. कुठेही तिला लग्न करून द्यायला आपण काय तिचे वैरी नाही."
त्यांचे असे निर्वाणीचे बोलणे ऐकून शितलचे बाबा वैतागून जायचे. चारचौघात त्यांना उठता बसता विचारले जायचे की अजूनही शितलचे लग्न का जमत नाही आहे. कुठल्या तोंडाने ते त्यांना सांगणार की अतिशय बावळट अपेक्षा मायलेकी घेऊन बसल्या आहेत.
आणि एके दिवशी शीतलला शादी डॉट कॉमवर एका मुलाचा मेसेज आला आणि त्याने तिला लग्नाबद्दल विचारले. तिने त्याची प्रोफाइल चेक केली तर तो कॅनडामध्ये राहायचा. तिला आकाश ठेंगणे झाले. ती पटकन आईला सांगायला गेली.
काही दिवस त्या मुलाशी इंटरनेटवर बोलल्यानंतर त्यांनी एकमेकांची भेट घ्यायचे ठरवले. तो मुलगा रीतसर शितलच्या घरी आला . त्याने शितलच्या आई बाबांना विश्वासात घेतले आणि सांगितले की,
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा