Login

नूतन एक संघर्ष ( भाग ४ )

नूतन नावाच्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी
विषय - कथामालिका कौटुंबिक

नूतन एक संघर्ष ( भाग ४ )

साठे गेल्यानंतर जवळपास एक महिना मी घराबाहेर पडले नाही. पुढे काय ? हीच चिंता मनाला भेडसावत होती. एकतर चार महिन्यांची गरोदर त्यात नवरा कायमचा दूर गेलेला. ज्या काळात नवऱ्याने काळजी घ्यावी असे वाटते तोच माझी साथ सोडून गेलेला. आई, बाबा, दादा यांनी मला त्यावेळी पूर्णतः साथ दिली. त्यांनी मला समजावून सांगितले की, आता दुःख करत बसू नकोस. ऑफिसला जा. त्यानिमित्ताने चार माणसात गेले की दुःख कमी होईल. कामामध्ये गुंतशील तर कसले विचार मनात येणार नाहीत म्हणून मी पुन्हा ऑफिसला जाऊ लागले.

त्रेपन्न वर्षांपूर्वीचा तो काळ. माझे थोडेफार पोट दिसू लागले होते. त्या काळात नवरा गेल्यावर सौभाग्यलेणे कोणी परिधान करत नसत त्यामुळे लोकांच्या घाणेरड्या नजरा आणि टोमणे टाळण्यासाठी मी अंगभर पदर घेऊन ऑफिसला जात असे. कसे दिवस ढकलले असतील ते माझे मलाच माहीत.

दादाच्या लग्नाला एक महिना राहिला होता. वहिनीकडची लोकं खूप टेन्शनमध्ये आलेली. त्यांना वाटलं की, घरात नुकतीच वाईट घटना घडली आहे तर लग्नाची तारीख पुढे ढकलतात की लग्न करायचे रद्द करतात अशी भीती त्यांना वाटत होती कारण दोन्ही घरातल्या पत्रिका छापलेल्या आणि नातेवाईकांना वाटण्यास सुरुवात देखील केलेली. त्याकाळी प्रत्येक नातेवाईकांच्या घरी जाऊन पत्रिका द्यावी लागायची त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या दोन - तीन महिने आधी कुलदेवतेला पत्रिका ठेऊन पत्रिका वाटाव्या लागत. माझ्या आईने वहिनीच्या आईवडिलांना सांगितले की, तुम्ही कुठलीही काळजी करू नका, लग्न अगदी ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावर होईल. माझं लग्न काही थाटामाटात झाले नसल्याने आईला दादाचे लग्न खूप छान पार पाडायचे होते.

दादाच्या लग्नाची घरात धामधूम सुरू झाली. वहिनीला शालू, मंगळसूत्र याची खरेदी झाली. नातेवाईकांकडून दादाचे केळवण केले गेले. मानापानाचे कपडे आणि भांडी आणण्यात आली. बुंदीचे लाडू करण्यासाठी घरी आचारी बोलावला गेला. कित्येक किलोने बुंदी पाडली गेली. जवळचे नातेवाईक आठ दिवस आधीपासूनच राहायला आलेले त्यामुळे घराला लग्नघराचे स्वरूप प्राप्त झाले होते. लग्नाच्या आदल्या दिवशी दादाला हळद लावण्यात आली. वहिनीचा सख्खा मामा मुंबईत असल्याने वहिनीचे वऱ्हाड कोकणातून मुंबईत उतरलेले. वहिनीला उष्टी हळद पाठवण्यात आली. सवाष्णींना बांगडया भरण्यात आल्या. पुरणावरणाचा स्वयंपाक करून सवाष्णी पूजल्या. ग्रहमख, व्याहीभोजन, सीमंतपूजन अगदी साग्रसंगीत झाले आणि ठरलेल्या मुहूर्तावर दादाचे लग्न झाले. दादाच्या लग्नातले जेवण अतिशय सुग्रास होते. कित्येक वर्षे दादाच्या लग्नातल्या जेवणाची लोकं तारीफ करत होती. माझ्याकडे पाहून जवळच्या नातेवाईकांना खूप वाईट वाटत होते पण आईने सगळ्यांना बजावून ठेवलेले की, माझ्याकडे कोणीही कसलाही विषय काढायचा नाही ज्याने करून मला मानसिक त्रास होईल. माझ्या पोटातले बाळ मला बुंदीचा लाडू खायला उत्तेजित करत होते त्यामुळे दादाच्या लग्नातले बुंदीचे लाडू मी मनसोक्त खाल्ले. लग्न खूपच थाटामाटात झाले.
संध्याकाळी रिसेप्शनला तेव्हा कोकाकोला ठेवला होता. एक मात्र खंत वाटत होती की, मी करवली म्हणून लग्नात मिरवू शकले नाही. वहिनीकडची मंडळी लग्न पार पडेपर्यंत घाबरलेलीच होती. लग्न पार पडल्यावर निर्धास्त झाली.
माप ओलांडून वहिनीने आमच्या घरी प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली. वहिनीच्या माहेरची लोकं पूजा झाल्यावर आपल्या गावी परतली. दादाच्या लग्नाचा अल्बम आला. फोटोग्राफरने सगळ्या विधींचे अतिशय सुंदर फोटो काढले होते. त्या काळी ब्लॅक अँड व्हाइट जरी फोटो असले तरी ते पाहायला खूप मज्जा वाटत असे. दादा आणि वहिनीचा जोडा अगदी दृष्ट लागण्यासारखा दिसे. दोघे फिरायला घराबाहेर पडले तर त्या दोघांना बघायला कॉलनीतले लोकं गॅलरीमध्ये येऊन उभे राहायचे.

खरंतर आपली मुलगी तरुणपणी विधवा होऊन देखील आईने मनावर दगड ठेऊन दादाच्या लग्नाचे कार्य पार पाडले होते. त्या काळात हा किती मोठा निर्णय घेतला असेल आईने. तेव्हा इतके काही समजायचे वय नव्हते माझे पण आत्ता आईच्या खंबीरपणाचे अतिशय कौतुक वाटते.

पहिलंवहिलं बाळ उदरात वाढत होतं पण बाळाचे वडील हयात नसल्याने माझे डोहाळजेवण वगैरे कोडकौतुक काहीच झाले नाही. नववा महिना संपायच्या आधी आठ दिवस बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या. मी जिथे नाव घातलेले त्या हॉस्पिटलमध्ये मला घरच्यांनी नेले. खूपच कळा येत होत्या आणि मी एका मुलीला जन्म दिला. बाळ एकदम लख्ख गोरे होते. अगदी त्याच्या वडिलांचा रंग घेतला होता बाळाने. नर्सने माझ्या मुलीला हातात दिल्यावर मात्र इतके दिवस साठवलेले अश्रू मी थोपवू शकले नाही. साठेंना पहिली मुलगी हवी होती आणि आज मुलगी जन्माला आलेली पण साठे तिला बघायला हयात नव्हते. त्या छोट्याश्या जीवाचे आता मीच आईवडील होते. आता तिच्या भविष्यासाठी मला हार मानून चालणार नव्हते. एकटीने मला माझ्या मुलीला घडवायचे होते. तसे माझे आईबाबा, दोन भाऊ आणि वहिनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते पण लेकीला हक्काचे वडील मी देऊ शकणार नव्हते.

बाळाचे बारसे वगैरे काहीच केले नाही. पाळण्यातल्या बाळाच्या कानात वहिनीने चांगला मुहूर्त बघून नाव ठेवले \" वृंदा.\" वृंदा आजी - आजोबा, दोन मामा आणि मामीच्या छत्रछायेखाली वाढू लागली. सगळ्यांची अतिशय लाडकी. कोणी तिला रडून देखील ध्यायचे नाही अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सगळे तिला जपत. संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आले की मात्र वृंदा मला सोडत नसे. आई नाहीतर वहिनीच्या मांडीवर खेळत बसलेली असली तरी मला पाहिल्यावर माझ्याकडे झेप घ्यायची. मला तिला लगेच दुधाला घ्यावे लागायचे. आई मग बोले, " जावयाचं पोर हरामखोर हो ! आम्ही दिवसभर करतो हिचं प्रेमाने पण तुला पाहिलं की आम्हाला विसरून जाते हो ही लबाड." आई तिच्यासाठी गरमागरम मुगडाळीची पातळ खिचडी करून भरवत असे. फॅरेक्स ती आवडीने खात असे त्यामुळे तिने छान बाळसे घेतले. आम्ही तिला लाडाने \" फॅरेक्स बेबी \" बोलायचो.

प्रसाद वयाने लहान असल्याने वहिनीच्या मागे \" वहिनी, वहिनी \" करून फिरत असे. वहिनी देखील प्रसाद वयाने लहान जरी असला तरी त्याला भाऊजी असे संबोधे. प्रसाद लहानपणापासून खूप धडपड्या स्वभावाचा होता. मित्रांना घेऊन कुठे पतंग करून विक कुठे आकाशकंदील करून विक असे त्याचे उद्योग चालू असायचे. लहानपणापासून त्याला अर्थार्जनाची सवय लागली. त्याची शाळा आणि अभ्यास सांभाळून.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग

🎭 Series Post

View all