Login

न्याय...

न्याय
सेकंड इनिंग
न्याय

दोन महिन्यापूर्वी लग्न झालेली रुचि माहेरपणाला आलेली असल्यामुळे सविताताईंची धावपळ सुरू होती. आपल्या लेकीला अगदी कुठे ठेवू नि कुठे नको असे त्यांना झालेले होते.

"अगं स्वरा आज रूचिच्या आवडीचे काकडीचे थालीपीठ बनव बरं"

सविताताईंनी हॉलमधूनच किचनमध्ये असलेल्या आपल्या सुनेला स्वराला आवाज दिला.


"हो आई. बनवते लगेच.

"आणि त्याच्यासोबत छान पैकी रायता बनव."

"हो आई"

म्हणत स्वराने काकडी धुवून किसायला घेतली.


सविता ताईंना दोन अपत्य रुचि व रोशन. दोघांचीही लग्न पंधरा दिवसाच्या अंतराने झालेली. सविता ताईंचा घरात भयंकर दरारा. सारखी त्यांची सुनेच्या मागे भूनभून सुरू असायची.

रोशनची पत्नी स्वरा. एक शांत स्वभावाची सहनशील मुलगी. रोशन मात्र सर्वगुणसंपन्न. सतत मित्रांमध्ये राहणे, रात्री उशिरापर्यंत मित्रांबरोबर पत्त्यांचा डाव कुटत बसणे. एवढेच त्याला माहित.

आपल्या पत्नीकडे त्याचे अजिबात लक्ष नसायचे. रांधा वाढा उष्टी काढा. हाच स्वराचा दिनक्रम. सुमितरावांना म्हणजे स्वराच्या सासऱ्यांना स्वराकडे पाहून वाईट वाटायचे. पण आपल्या पत्नी पुढे त्यांचे काही चालत नव्हते.

" झालीत कां गं स्वरा थालीपीठं"

सविताताईंनी स्वराला आवाज दिला.

"हो आई झालीच आहे."

"आई तु नां तुझ्या सुनेला लाडावून ठेवली आहे. किती हळू करते ती कामं." मला तर केव्हाची भूक लागली आहे. किती वेळ होऊन गेला.

"अगं रूचि वेळ लागणारच नां थोडा."

"केव्हाची एकटीच किचनमध्ये आहे स्वरा."

सुमितराव मध्येच बोलले.

"अहो सारखा सारखा सुनेचा कैवार घेऊ नका."

माझ्या पोरीला किती भूक लागली आहे. सविताताई म्हणाल्या.

स्वराचे लग्न झाल्यानंतर हीच रोजची परिस्थिती. आता तर लाडक्या ननंद बाईचं आल्या होत्या. स्वराला वाटायचं आपल्या नवऱ्याला तरी निदान थोडी जाणीव असायला हवी होती. स्वरा अगदी निरागस मुलगी. माहेरी त्या तिघी बहीणी.स्वरा सर्वात मोठी. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात रोज कटकटी असायच्या. तरीही तिच्या आईने तिन्ही मुलींना शिकविले. चांगले संस्कार दिले.

एके दिवशी जवळच्या नातेवाईकाने स्वरासाठी एक स्थळ सुचविले. मुलगा शेती करतो. पण शेती, राहते मोठे घर, शिवाय सासरी लहान कुटुंब. दोघेच बहीण भाऊ आणि आई-वडील. म्हणून तिच्या आईने स्वराच्या लग्नाचा निर्णय घेतला.

स्वरा आईच्या शब्दाबाहेर नव्हती. मात्र सासरी आल्यावर खरी परिस्थिती तिला माहिती पडली. आई वडिलांच्या हाताबाहेर गेलेला रोशन शेतातही फारसा जायचा नाही. सतत बाहेर मित्रांच्या गराड्यात. रात्रीही तो बराच उशिरा घरी यायचा. मात्र तरीही स्वरा अगदी मुकाट्याने हे सर्व सहन करत होती.

तिला सासरी आलेल्या नंणंदेचा हेवा वाटायचा. आपल्याला तर माहेरही नाही. सतत दारू पिऊन आईच्या अंगावर, बहिणीच्या अंगावर हात उगारणारे वडील. सतत भांडणं, शिवीगाळ. जावं तर कुठे? आणि सासरी अशी परिस्थिती. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर.

तिला नेहमी वाटायचं आपल्याच नशिबात कां असं? लग्नानंतर तरी आपलं आयुष्य बदलेल असं तिला वाटल होतं. तोच एक आशेचा किरण असेल आपल्या जीवनातला असं ती मनात म्हणायची.

पण इथे मात्र वेगळंच पाहायला मिळत होतं. मुळातच सहनशील असलेल्या स्वराने कधीही नवऱ्याजवळ काहीही बोलून दाखवले नाही. त्याच्याजवळ बोलण्याचा प्रश्नच कुठे होता म्हणा. त्याचं विश्वचं वेगळं होतं. खरंच मुलांवर चांगले संस्कार होणं किती गरजेचं असतं. नाही कां? असो.

चला कामाला लागलं पाहिजे. आपण विचार केल्याने भोग थोडीच टळणार आहे. असे म्हणत स्वरा कामाला लागली.
"अगं स्वरा, उद्या तुझी नणंद तिच्या सासरी जाणार आहे. माझ्या जावयासाठी आवडीचे पदार्थ करून दे तिच्यासोबत."

काय काय सामान लागेल ते तुझ्या सासऱ्यांना सांग. ते आणून देतील.

"हो आई."

म्हणत स्वराने मन लावून छान पैकी बेसन वडी, चिवडा, खोबरा लाडू हे सर्व पदार्थ करून दिले. दुसऱ्या दिवशी रुचि आपल्या सासरी गेली. असेच दिवस जात होते. स्वराच्या संसार वेलीवर युगच्या रूपाने एक गोंडस फुल उगवले होते. युगच्या देखभालीत तर आता दिवस कमी पडायचा तिला. आताशा सुमितरावांची तब्येत ठीक राहत नव्हती. सविता ताईंच्या स्वभावात मात्र तसूवरही फरक पडत नव्हता. आपली बायको अशी. मुलगा असा. त्यांना वाटायचे आपल्या नंतर आपल्या सुनेचे कसे होणार? त्यांच्या डोक्यात वेगळचं विचार चक्र चालू होतं.

एक दिवस सुमितरावांनी एका वकिलाकडून मृत्युपत्र तयार करून घेतलं. त्यात त्यांच्या नावे असलेली सर्व जमीन स्वराच्या नावावर करून दिली. निदान तेवढाच तिला न्याय मिळेल. मात्र ही गोष्ट त्यांनी आपल्या बायकोपासून सुद्धा लपवून ठेवली होती.

युग आता मोठा झाला होता. तो शाळेत जाऊ लागला होता. त्याच्या शाळेची तयारी करून देणे, त्याचा अभ्यास घेणे अशा कामांची यादी आता वाढली होती. युग मुळातच अभ्यासात हुशार. दहावी बारावी सुद्धा तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.

आपल्या मुलामध्ये ती आता उद्याची स्वप्ने पाहत होती. अशातच एके दिवशी क्षुल्लक तापाचे निमित्त होऊन सुमितराव आजारी पडले. आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. स्वराला आधार हरवला. ती खूप दुःखी झाली.

सविता ताईंना तर आता रान मोकळे झाले होते. पती निधनाचे दुःख तर त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात नव्हते. एके दिवशी वकील सुमितरावांनी केलेले मृत्युपत्र घेऊन त्यांच्या घरी आले. सर्वांसमोर त्यांनी ते मृत्युपत्र वाचून दाखवलं.

सविताताई तर घरीच घेरीचं येऊन पडल्या. रोशनच्या पायाखालची जमीन सरकली.

"काय बाबांनी सर्व जमीन स्वराच्या नावाने केली?"

त्याचा विश्वास बसेना. पण हे खरं होतं. मात्र याचा एक फायदा झाला. सविताताईं व रोशन स्वराशी नीट वागू लागले. स्वराने आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात ठेवले. एवढ्या मोठ्या जमिनीची मालकीण होऊनही स्वराने आपला नम्र स्वभाव सोडला नाही.

शेतातच एक मोठा बंगला बांधायचे तिने ठरवले. शेतीची सर्व सूत्रे तिने आपल्या हाती घेतली. शेतीमध्ये पिकांचे वेगवेगळे प्रयोग करून आधुनिक शेती करायची तिने ठरवले. त्यामुळे शेतीत उत्पन्नही चांगले मिळू लागले.

सविताताईंची तर जणू दातखिळीच बसली होती. आपल्या सासुबाईंनी आपल्याला किती छळले याचा विचारही स्वराने कधी मनात आणला नाही. ती नेहमीसारखीच प्रेमाने आपल्या सासूबाईंशी वागत होती.

रोशनही आता शेतीमध्ये रस घेऊ लागला. आता आपल्या पत्नीचा त्याला अभिमान वाटला लागला होता. आपल्या पत्नीने खूप काही सहन केले. आपण तिच्यासाठी कमी पडलो. अशी अपराधीपणाची भावना रोशनच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे स्वराप्रति त्याचे वागणे अजिबात बदलले होते. तिच्याबद्दल प्रेमाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली होती.

स्वराच्या संसाराची सेकंड इनिंग आता सुखात सुरू झाली होती. स्वरा खूप खुश होती. उशिरा का होईना पण आपल्याला न्याय मिळाला असे ती मनोमन म्हणत होती आणि परमेश्वराचे आभार मानत होती.
सौ. रेखा देशमुख