न्याय.

About Justice

"अगं,माधुरी, आपली परी कुठे आहे गं? घरात दिसत नाही कुठे?"

परीच्या वडिलांनी घरात येताच आपल्या बायकोला विचारले.

"अहो, परी तिच्या मैत्रिणीकडे खेळायला गेली.आजच परीक्षा संपली ना. 'मैत्रिणीकडे खेळायला
जाऊ का?' असे तिने विचारले मला.म्हणून मी पाठवले तिला.तिची मैत्रीण पण येत असते ना आपल्या घरी आणि जास्त दूर पण नाही आहे तिचे घर जवळच आहे."

माधुरी नवर्‍याला असे सांगून स्वयंपाकाला लागली.


बराच वेळ झाला;तरी परी घरी आली नाही म्हणून परीचे वडील बायकोला म्हणाले,
"अगं, बराच वेळ झाला... परी आली नाही अजून? तू जाऊन घेऊन ये तिला."

परीला जाऊन बराच वेळ झाला होता आणि अजून ती आली नव्हती.म्हणून माधुरीलाही काळजी वाटू लागली आणि ती लगेच परीच्या मैत्रीणीच्या घरी गेली.
तिथे गेल्यावर कळाले की, परी तिच्या घरी आलीच नाही. दुसर्‍या मैत्रिणीकडे गेली असेल असे माधुरीला वाटले म्हणून ती तिच्या माहितीतील सर्व मैत्रिणींकडे जाऊन पाहून आली.परी कुठेच नव्हती.
रडत रडत घरी आली आणि 'परी तिच्या कोणत्याच मैत्रिणीच्या घरी गेलीच नाही.' असे नवर्‍याला तिने सांगताच...तो अगोदर तिच्यावरच ओरडला,'तू का पाठवले तिला ?'

दोघांनी शेजारीपाजारी,आजूबाजूला 'परी तुमच्याकडे आली आहे का?परीला पाहिले का? ...' असे विचारायला सुरुवात केली. या दोघांसोबत ते लोकही परीचा सगळीकडे शोध घेऊ लागले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवून आले.

माधुरी तर एकसारखी रडत होती. तिच्या नवर्‍याच्या चेहऱ्यावर भीती व चिंता दिसून येत होती. परीच्या काळजीने त्याच्याही डोळ्यातून पाणी येत होते. आजूबाजूचे लोक त्यांना धीर देत होते. नातेवाईक,
मित्रमंडळी,शेजारी सर्वजण परीला शोधत होते; पण परी कुठेच नव्हती.

पोलिसांनीही परीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परीच्या घरापासून सुरुवात करुन,आजूबाजूचा सर्व परिसर व्यवस्थित तपासू लागले.खूप प्रयत्नांनंतर.. एका जुन्या व काही वर्षांपासून बंद असलेल्या घराच्या मागच्या बाजूला परी बेशुद्धावस्थेत पोलिसांना दिसली.तिची स्थिती पाहून, तिच्यासोबत काहीतरी घडले होते. हे पोलिसांना जाणवले.परीला हाॅस्पिटलमध्ये पाठवून तिच्यावर उपचार सुरू केले व मेडिकल
चेकअपही केले आणि पोलिसांना जसे दिसून आले तसेच झाले होते परीसोबत. परी तर सापडली होती;पण तिची शारिरीक व मानसिक स्थिती आणि तिचे वय पाहता तिच्यासोबत असे कृत्य कोणी केले . हे ती सांगू शकत नव्हती. हे कृत्य कोणी केले ? याचा शोध पोलीस करू लागले. जिथे परी सापडली होती; तिथे आजूबाजूला काही माहिती मिळते का? पुरावे सापडतात का? हे ते पाहत होते. तेव्हा चौकशी करताना एका बाईने सांगितले की, "मी एका माणसाला त्या घराच्या बाहेर पडताना पाहिले होते. मला वाटले काही काम असेल त्याचे; पण त्या मुलीसोबत असे झाले आणि ती मुलगी त्या घराच्या मागे सापडली म्हणून त्या व्यक्तीवर माझा संशय गेला."

त्या बाईने सांगितलेले ऐकून पोलिसांना केससंबंधी काहीतरी सुगावा लागला होता.घटनेचा दिवस, वेळ वगैरे सर्व गोष्टी त्या बाईने दिलेल्या माहितीशी जुळत होते. पोलिसांनी त्या माणसाचे बाईने वर्णन केले तसे स्केचही बनवले व त्या माणसाचा शोध घेऊ लागले.
परीच्या आईवडिलांना ते स्केच दाखवले; पण ते त्याला ओळखत नव्हते. पोलिस त्या माणसाचे स्केच सर्वीकडे दाखवत तपास करत होते. काही लोकांनी त्याला ओळखले व त्याच्याविषयी सांगितले की, "साहेब हा माणूस काही काम करत नाही,दारू पिऊन इकडेतिकडे फिरत असतो. बायकोशी भांडत असतो. ती बिचारी लोकांकडे घरकाम करते आणि हा रिकामा फिरत असतो. यानेच केले असेल असे कृत्य."
एवढी माहिती सांगून त्याचे घरही पोलिसांना दाखवले.
त्या बाईनेही 'हाच होता तो.' असे सांगितल्यावर,पोलीसांनी त्या माणसाला अटक केली.तेव्हाही तो दारूच्या नशेत होता.

दुसर्‍या कोणत्याही व्यक्तीवर संशय आला नाही व सर्व साक्षी,पुरावे त्या माणसाच्या विरोधात होते म्हणून पोलिसांनी त्याच्या विरोधात आरोपपत्रही बनवले व केस कोर्टात गेली.
काही केसेसमध्ये आरोपी आपला गुन्हा कबूल करतात; तर काही केसेसमध्ये आरोपी आपल्या गुन्ह्याची कबुली देत नाही. या केसमध्ये तो माणूस आपला गुन्हा कबूल करत नव्हता आणि आपण निर्दोष आहोत. हेही त्याला पटवून देता येत नव्हते. त्यामुळे त्याच्या विरोधात सर्व साक्षी,पुरावे असल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवला गेला व तुरुंगवासाची शिक्षाही झाली.


काही महिन्यांनी, त्या माणसाची बायको रमा , ज्या घरी काम करायची; त्या मालकीणबाईची मैत्रीण मालकीणबाईला भेटायला घरी आलेली होती. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असताना, रमाचा व तिच्या नवर्‍याचा विषय निघाला. ती मैत्रीण वकील होती; त्यामुळे तिने पूर्ण केस व्यवस्थित ऐकली व त्यावर अभ्यासही केला. त्या माणसाने गुन्हा कबूल केलेला नसतो आणि त्याच्या बायकोलाही वाटते की, तिचा नवरा दारु पिणारा आहे,तिच्याशी भांडणारा आहे;पण असे कृत्य कधीच करणार नाही.
त्या मैत्रीणीला तिचे मन सांगत होते किंवा तिच्या कायद्याच्या अभ्यासानुसार तिला कळत होते की,तो माणूस खरा गुन्हेगार नाही.

तिने ती केस पुन्हा ओपन करून तपास करण्याविषयी कोर्टात अर्ज वगैरे करून परवानगी घेतली. केसची नव्याने तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना दिले गेले.


पुन्हा सर्व सुरुवातीपासून अभ्यासले गेले.त्या माणसाची ओळख सांगणार्‍या बाईला शोधले;पण ती अगोदरच्या ठिकाणी राहत नव्हती. खबरींकडून तिचा शोध घेतला गेला. लोकांकडे घरकाम करणारी बाई अचानक श्रीमंत कशी झाली? याचे आश्चर्य वाटले. तिने काहीतरी खोटेनाटे सांगण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांकडे तिची सर्व कुंडली शोधली होती. तिला खरे काय? हे सांगावेच लागले.

त्या दिवशी ती नेहमीप्रमाणेच काम करून घराकडे जात होती. तेवढ्यात तिचे लक्ष त्या बंद घराकडे गेले; तर तेथून तिच्या मालकीणबाईचा मुलगा घाबरत येताना दिसला व याने काहीतरी केले आहे.याचा तिला संशय आला. तिने तर त्याला पाहिलेच होते;पण त्यानेही तिला पाहिले आणि कुठेही ,काहीही न सांगण्याची धमकी दिली. आरोपी लवकर पकडला गेला तर आपल्या मुलाला काही होणार नाही. असा विचार मुलाच्या आईवडिलांनी करून त्या बाईला दुसर्‍याच कोणाचेही नाव घेण्यास सांगितले व खूप पैसे देवून तिचे तोंड बंद केले. दारू पिऊन इकडेतिकडे फिरणाऱ्या माणसाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला आणि तेच वर्णन तिने पोलिसांना सांगितले. इतर लोकांनीही त्याच्याबद्दल वाईटच सांगितले त्यामुळे तिचे काम सोपे झाले व केस लवकर सुटली. असे पोलिसांना वाटले.

यासारख्या अशा अनेक घटना समाजात घडत असतात. कायद्यात साक्षी,पुरावे या गोष्टी पाहिल्या जातात;पण काही वेळेस पैसा,ताकद यांच्या जोरावर साक्षी,पुरावे विकत घेतले जातात,बदलले जातात; त्यामुळे खरा अपराधी समाजात बिनधास्तपणे वावरत असतो आणि गरीब,लाचार व निरपराध व्यक्ती त्याने न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगत असतो.
खरा गुन्हेगार तर कोर्टाच्या शिक्षेपासून सुटतो;पण देवासमोर आणि आपल्या मनासमोर त्याला कन्फेशन द्यावेच लागते...त्याने गुन्हा केला आहे,असे. त्यातून तर सुटू शकत नाही ना? कधी ना कधी कर्माचे फळ त्याला भोगावेच लागते.

प्रत्येक केसमध्ये या केसप्रमाणे
होईलच ..असे नाही.
रमाच्या मालकीणबाईची मैत्रीण वकील होती आणि ती आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक होती व 'कायदा अपराधी लोकांना शिक्षा देण्यासाठी असतो; पण एकाला न्याय देताना दुसर्‍या निरपराध व्यक्तीवर अन्याय होऊ नये.' असे तिचे मत होते. त्यामुळेच तर तिने प्रयत्न केले आणि कोर्टाने पोलिसांना आपले कर्तव्य चोखपणे बजावण्यास सांगितले. पहिल्या वेळी पोलिसांकडून सखोल चौकशी झाली नाही.अनेक त्रुटी राहिल्या; पण नंतर व्यवस्थित व चोख काम केल्याने खरा गुन्हेगार पकडला गेला व निरपराध व्यक्ती सुटला.

कोर्टात त्या मुलाने,त्याच्या आईवडिलांनी व खोटी साक्ष देणाऱ्या
बाईने, या सर्वांनी आपल्या कडून झालेल्या गुन्ह्याची कबुली दिली. कन्फेशन दिले. त्या गुन्ह्यासाठी कोर्टाने त्यांना शिक्षाही दिली. अगोदर शिक्षा झालेल्या माणसाला दारू न पिणे व बायकोला त्रास न देणे. असे कडक शब्दांत सांगण्यात आले व पोलिसांकडून,कोर्टाकडून न्याय देण्यात चूक झाली, त्यासाठी त्याची माफीही मागितली. कोर्टाकडून तपास करणार्‍या पोलिसांना आपले काम व्यवस्थित करण्यासंदर्भात व अशी चूक पुन्हा होऊ नये. अशी समज देण्यात आली.
पोलिसांसाठी तर प्रत्येक केस ही फक्त एक केस असते,गुन्हेगाराला शोधणे व अटक करणे त्यांचे काम;पण त्यांच्या बेजबाबदार कामामुळे व चुकांमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकते.


जिच्यावर अन्याय झाला होता ती मुलगी हळूहळू नाॅर्मल होत होती.

न केलेल्या गुन्ह्यासाठी पोलिस कोठडीची हवा खाऊन आलेला माणूस आता व्यवस्थित वागू लागला होता.

कोर्टात साक्षीदार, पुरावे खोटे असू शकतात. कन्फेशन देणारे चुकीचे असू शकतात; पण देवाच्या
दरबारात खोटेपणा चालत नाही. उशीराने का असेना;पण न्याय प्रत्येकाला मिळत असतो.


समाप्त
नलिनी बहाळकर