Login

ऑड वाट (भाग-१०)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-१०)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
हेमाच्या मनातलं अर्ध वादळ तरी शांत झालं होतं! जरी पावसाळ्याला अजून अवकाश असला तरी तिथे साधंसं घर बांधायला सुद्धा बराच खर्च येईल त्यासाठी पैश्याची कशी व्यवस्था करता येईल याचा विचार ती करत होती. 

"हेमा! चल आता जेवायला... आज रात्री लवकर झोप सगळं काही नीट होईल..." हेमाची आई तिला काळजीत बघून म्हणाली. 

"अगं पण कसं? मान्य अजून हातात थोडा वेळ आहे पण, रक्कम फार मोठी आहे गं!" हेमा म्हणाली. 

"तू हा व्यवसायाचा निर्णय घेतलास तेव्हा जसं तुला आपोआप सगळं सुचत गेलं तसंच होईल काहीतरी... नको काळजी करुस... थंड डोक्याने विचार कर.... तो पर्यंत जर अजून काम मिळालं तर पैसे सुद्धा जास्त मिळतील... मग आपण सरपंचांशी बोलून बघूया त्यांच्या ओळखीने कुठे सवलतीत पैसे मिळाले तर काम होईल..." हेमाच्या आई ने तिला समजावलं. 

हेमाने फक्त होकारार्थी मान हलवली. 

"चल आता... नोकरी नाही करणार असा निर्णय घेऊन स्वतःचं विश्व उभं करायचा प्रयत्न करणारी मुलगी अशी कशी खचून चालेल?" हेमाच्या आई ने ती अजून उदासाच आहे हे पाहून तिला समजावलं. 

"तुला कुठे माहितेय हा निर्णय का घ्यावा लागला ते... फक्त एका इंटरव्यू मध्ये हार मानणारे आम्ही नव्हतो! पण, असो... जे झालं ते चांगलंच झालं..." हेमा मनात म्हणाली. 

"ए हेमा! कुठे हरवलीस..." हेमाची आई तिला विचारात गढलेलं पाहून म्हणाली. 

हेमा काही नाही म्हणून जेवायला गेली... झोपायच्या आधी हेमाच्या आई ने तिला डोक्याला तेल लावून दिलं! ती आईच्याच मांडीवर डोकं ठेऊन झोपली. तिला झोपलेलं पाहून हेमाच्या बाबांनी मागची सगळी कामं आवरली आणि हळूच तिचं डोकं उशी वर ठेऊन सगळे झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळं आवरून हेमा तयार होऊन बसली... 

"चल हेमा! तयारी झाली आहे ना?"निशा बोलवायला आली...

हेमा हो म्हणत निशा आणि तिच्या आई बरोबर ती जमीन बघायला गेली.... हेमाच्या शेताच्या बाजूलाच थोड्या अंतरावर ती जमीन होती... 

"बघा पोरींनो, हा एवढाच काय तो तुकडा आहे जमीनीचा! यात तुम्हाला जे करता येईल ते करा... मी आता निघते... पुन्हा कामावर पोहोचायला उशीर झाला तर मजुरी कापली जायची..." निशा ची आई म्हणाली. 

"चालेल आई! आता आम्ही बघतो काय करता येईल ते..." निशा म्हणाली. 

निशाची आई कामाला गेली... दोघी थोडावेळ जमीन बघत होत्या... सहज लहान लहान तीन खोल्या करता येतील आणि शिवाय थोडी जागा राहील एवढी जमीन होती! बरेच दिवस तशीच पडीक असल्यामुळे तिथे फार गवत आणि लहान लहान झाडुरं उगवली होती...

"निशा! चल आपण कामाला लागू... जमीन नीट स्वच्छ करून घ्यावी लागेल..." हेमा म्हणाली. 

दोघींनी दिवसभर मेहनत करून जमीन स्वच्छ केली... 

"हे बघ, इथे सहज लहान लहान तीन खोल्या होतील आणि जी जागा रिकामी राहील तिथे आपण शेण, शिळे अन्न, भाज्यांचा कचरा वापरून खत निर्मिती करूया... खताला चांगला भाव पण मिळेल आणि आपल्याला उत्पन्नाचं अजून एक साधन सुद्धा!" हेमा म्हणाली. 

"आता शोभतेयस तू खरी हेमा! कधीही न डगमगता सगळ्या समस्यांवर तोडगा काढणारी आणि जिद्दीने सगळं निभावून निणारी... चालेल! आपण सगळी माहिती काढूया..." निशा हेमाला पुन्हा उत्साहात पाहून म्हणाली. 

सगळं करता करता संध्याकाळ झालीच होती... उद्या दिवाळीची तयारी करायची आणि खताविषयी सुद्धा माहिती काढून सगळी व्यवस्था करायची असं ठरवून दोघी हेमाच्या घरी आल्या. 

"जेनिका दिदींना आपण आत्ताच निमंत्रण देऊया का? म्हणजे मग त्यांना ऑफिस मधून सुट्टी घ्यायला पण बरं पडेल..." निशा म्हणाली. 

"हो! थांब करूया आपण फोन..." हेमा म्हणाली. 

हेमा ने जेनिका ला फोन लावला पण समोरून काही उत्तर आले नाही... 

"त्या फोन उचलत नाहीयेत गं! बहुतेक बीजी असतील... आपण उद्या बघूया..." हेमा ने निशाला सांगितलं. 

ती सुद्धा ठीक आहे म्हणाली आणि स्वतःच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून हेमाने शेण खत, गांडूळ खत या विषयी माहिती शोधून ठेवली... काहीही खर्च न करता किंवा कमीत कमी खर्चात कसं सगळं होईल हे ती शोधत होती... या वरचा थोडा अभ्यास झाल्यावर बाकी कामं उरकून ती निशाची वाट बघत बसली... 

"चल हेमा! दुकानात यादी देऊन येऊ आणि मग मी काही नवीन गोष्टी ठरवल्या आहेत त्या सांगेन तुला..." निशा म्हणाली. 

दोघी दुकानात जाऊन दिवाळीसाठी जे सामान लागेल त्याची यादी देऊन आल्या... अर्ध्यातासात सामान घरी येईल असं दुकानदाराने सांगितलं! दोघी घरी आल्या. 

"बोल काय सुचलंय तुला?" हेमाने विचारलं. 

"आपण दिवाळीत फराळ, फटाके या बरोबर अजून एक उपक्रम करू शकतो... जे कुटुंबं येणार आहे त्यांच्या हस्ते आपण वृक्षारोपण करून घेऊया... हे पर्यावरणाला सुद्धा चांगलं आहे! यामुळे नर्सरी चालवणाऱ्या आजोबांना सुद्धा थोडं अजून उत्पन्न मिळेल... रोप लावल्यावर तिथे त्या कुटुंबाचं नाव पण लिहायचं... म्हणजे ते जेव्हा जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांना मोठं झालेलं झाड पाहता येईल... स्वतःच्या हाताने लावलेलं झाड कसं मोठं झालंय हे बघायला येण्यासाठी ते पुन्हा आपल्या 'अतिथी देवो भव' मध्ये रजिस्टर सुद्धा करतील.. आणि विचार कर ना, जेव्हा त्यांना स्वतः लावलेल्या झाडाची फळं किंवा फुलं मिळतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद असेल..." निशा ने एका दमात सगळं सांगितलं. 

"मस्त! छान कल्पना आहे... यामुळे आपण पर्यावरणाचं रक्षण करणार आहोत हि भावना सुद्धा त्यांच्या मनात निर्माण होईल..." हेमा ने सुद्धा सहमती दर्शवली. 

"चला म्हणजे या दिवाळी पासून आपल्या उपक्रमात अजून एकाची भर झाली! अरे हा खताचं काय करायचं? माहिती काढलीस का?" निशा ने विचारलं. 

"हो! सगळी माहिती काढली आहे... आता एखादा मोठा जुना टब शोधून त्यात आपण भाज्यांचे देठ, शेण सगळं साठवून खत करूया..." हेमा म्हणाली.

"माझ्या घरी पडलाय एक जुना टब... आपण पुन्हा शेतात जाणार तेव्हा ते सगळं करू... आत्ता दिवाळी च्या तयारी ला लागू..." निशा म्हणाली.

"हो चालेल! माझ्याकडे आकाश कंदील बनवायचं सामान आहे... यंदा आपण घरीच आकाश कंदील बनवूया आणि जुन्या पणत्या आहेत त्यांना रंग देऊन नव्या करूया..." हेमा म्हणाली.

"मी पण घरून जुन्या पणत्या आणि रंग घेऊन येते... संध्याकाळी लागूया तयारीला..." निशा म्हणाली. 

"हम्म! ऐक ना, जेनिका दिदींना मी पुन्हा फोन ट्राय केला होता पण, आता त्यांचा फोन लागत नाहीये..." हेमा काळजीच्या सुरात म्हणाली. 

"अगं नको काळजी करुस! त्या कामात असतील.... वेळ मिळाला की करतील फोन..." निशा म्हणाली. 

या सगळ्यात दुपार झाली होती... त्यांनी सकाळी दिलेल्या सामानाच्या यादी प्रमाणे सामान सुद्धा घरी आलं! निशा हेमाला बाय करून दुकानदारा बरोबर घरी गेली... हेमाने  सगळं सामान तपासून व्यवस्थित काढून ठेवलं. 

"हेमा! सामान आलंय ना गं? दहा दिवसांवर दिवाळी आली आहे..." हेमाची आई घरात येत म्हणाली. 

"हो आई! आत्ताच आणून दिलंय.... आपण आता जेवूया आणि मग तू मोजून मला सगळं काढून दे... आज भाजणी साठी धान्य धुवून ठेवूया आणि उद्या भाजून दळून आणू!" हेमा म्हणाली. 

"हो! ते भाजणीचं मी बघते... तू रांगोळी, आकाश कंदील आणि पणत्या त्याचं बघ... संध्याकाळी जे काही हवंय ते जाऊन घेऊन ये... निशा ला पण विचार तिला सुद्धा काही आणायचं असेल तर दोघी बरोबर जावा.." हेमाची आई म्हणाली. 

"आकाश कंदील आणि पणत्या आम्ही घरी करतोय... उद्या किंवा परवा जाऊन रांगोळीचे रंग घेऊन येऊ..." हेमा म्हणाली. 

हेमाच्या आई ने बरं म्हणलं... दोघींनी जेवून घेतलं! आज मागची सगळी आवरा आवर हेमा ने केली... तोवर हेमाच्या आई ने धान्य धुवून वाळत घातलं... संध्याकाळी निशा घरी आली... दोघींनी मिळून छान आकाश कंदील बनवला... त्यातच आज सगळा वेळ गेला! 

"मी आता उद्या येते तेव्हा आपण पणत्यांचं बघू...  आणि संध्याकाळी लाडवासाठी डाळ आणि भाजण्या दळायला टाकू तेव्हा मग येता येता थोडी खरेदी करू..." निशा म्हणाली. 

"हो चालेल!" हेमा म्हणाली. 

पुन्हा दुसऱ्या दिवशी सगळं ठरल्याप्रमाणे झालं! त्यानंतर दिवाळीच्या तयारीत दोघी खूपच व्यस्त झाल्या.... असेच तयारीत दिवस सरत होते.... परवा वर दिवाळी आली सुद्धा!

"हेमा! अगं तू अजून मोबाईल बघितला नाहीयेस का?" निशा तिच्या घरी अचानक येत म्हणाली. 

"नाही! वेळच झाला नाहीये आज मोबाईल कडे बघायला... का? काय झालं?" हेमा ने विचारलं. 

"हे बघ... जेनिका दिदी आणि जॉन दादांनी बुकिंग केलंय... ते उद्याच इथे येतील आणि दिवाळी संपल्यावर जाणार आहेत!" निशा हेमाला मोबाईल दाखवत म्हणाली. 

"खरंच! अरे तुला आठवतंय, जेनिका दिदी आपल्याला सरप्राईज देणार असं बोलल्या होत्या... त्यांना हेच सरप्राईज द्यायचं असणार म्हणून त्यांनी आपला फोन सुद्धा उचलला नाही..." हेमा उत्साहात म्हणाली. 

एवढ्यात समोरून जॉन चा फोन आला... 

"हॅलो! आमी Tomorrow तिते येतो... फॉर दिवाली!" तो म्हणाला. 

"हो! आम्ही आत्ताच पाहिलं! तुमचं स्वागत आहे... आणि तुम्ही इथे आल्यावर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे..." हेमा म्हणाली. 

"अरे! ग्रेट! We also have surprise for you!" जॉन म्हणाला. 

"काय? म्हणजे तुम्ही येणार हे सरप्राईज नव्हतं?" निशा म्हणाली. 

"नो! हे डिफ्रंट... आमी तिते आलो की सांगनार काय ते..." जॉन म्हणाला.

त्यानंतर अजून थोड्या गप्पा झाल्या आणि दोघींनी फोन ठेवला. इतक्यात निशाची आई आली... 

"निशा चल की घरी.... संध्याकाळी पुन्हा बाहेर जायचं म्हणतेयस ना? मग आत्ताच कामं नको उरकायला?" ती म्हणाली. 

"हो आई येतेय... चल..." निशा म्हणाली. 

तिने हेमाच्या कानात संध्याकाळचं लक्षात ठेव म्हणून सांगितलं आणि गेली. 

"काय गं हेमा तू सुद्धा आम्हाला बाहेर जायचं म्हणाली आहेस! कुठे जातोय आपण? तुम्ही दोघींनी काहीतरी ठरवलं आहे ना!" हेमाच्या आई ने विचारलं. 

"हो! पण, ते संध्याकाळी कळेल... बाबांना मी आज शेतातून लवकर या सांगितलंय.... ते आले की आपण निघणार आहोत!" हेमा म्हणाली. 

दिवसभरात राहिलेलं सगळं आवरून संध्याकाळी सगळे बाहेर पडले. 

"तू आई ला काही सांगितलं नाहीयेस ना?" हेमा निशाच्या कानात कुजबुजली. 

"नाही..." निशा म्हणाली. 

"ए काय कुजबुज चालली आहे? आता तरी सांगा कुठे जायचंय!" निशा ची आई म्हणाली. 

हेमा आणि निशा काहीच बोलल्या नाहीत! थोड्याच वेळात सगळे एका दुकानाबाहेर आले! 

"चला आता... तुम्हाला जे कपडे आवडतील ते इथून घ्या..." हेमा म्हणाली. 

"हेमा! चल घरी... मला काही नकोय... मागच्या वर्षीच घेतलेले आहेत नवीन कपडे... शिवाय जेनिका ताईंनी सुद्धा एक साडी दिली आहेच की! तुझ्या बाबांना घे काय ते.. त्यांनी घेतलं नाहीये काही..." हेमाची आई म्हणाली.

"नाही आई! दरवर्षी तुम्ही मला कपडे घेता... या वर्षी सुद्धा घेतले आणि स्वतःला का नाही... आणि मला काय सांगतेस मागच्या वर्षी घेतलंय... गेल्या चार वर्षात तुम्ही दोघांनी काहीही नवीन कपडे घेतले नाहीयेत! आम्हाला कशाला लागतायत नवीन म्हणून दरवेळी टाळलं! पण आता नाही... जर तुम्ही घेणार नसाल तर मी सुद्धा माझा ड्रेस परत करून येते.. मला पण नको... आम्ही दोघींनी पहिल्या कमाईतून तुम्हाला काही आणलं नव्हतं! आता अनायसे  दिवाळी आहेच तर घ्या ना नवीन कपडे!" हेमा आई ला समजावत म्हणाली. 

निशाची आई सुद्धा नाहीच म्हणत होती... कसंबसं दोघींनी त्यांना समजावून सांगितलं आणि आत खरेदीला गेल्या. दोघींचे पालक स्वस्तातले कपडे बघत होते... हेमा आणि निशा ने फक्त एकमेकींकडे बघितलं आणि डोळ्यांनी काहीतरी खाणाखुणा केल्या. 

"आई, बाबा, मावशी तुम्ही जरा तिथे बघता का काही आवडतंय का!" असं म्हणून हेमाने त्यांना दुसरीकडे पाठवलं.

ते तिघं तिथे गेल्यावर निशा आणि हेमाने त्यांच्यासाठी कपडे निवडले! चांगल्यातल्या दोन दोन साड्या आणि हेमाच्या बाबांसाठी दोन छान सदरे! ते घेऊन दोघींनी बिल सुद्धा भरलं...

"आई! हे बघ झाली खरेदी... चला..." निशा म्हणाली. 

"काय? बघू काय घेतलंय..." निशा ची आई कपड्याची पिशवी मागत म्हणाली. 

"ते घरी गेल्यावर आत्ता काही नाही..." हेमा ने सुद्धा तिच्या हातातली पिशवी मागे धरली. 

त्यांना कसंबसं समजावून आईस्क्रिम खात खात सगळे घरी आले... खरेदी सुद्धा पाहिली... पहिल्यांदा ते थोडे रागावले पण, पोरींनी स्वकमाईतून हौसेने केलंय म्हणून त्यांना मायेने जवळ सुद्धा घेतलं! हेमाच्या आई ने दोघींची मीठ मोहरीने दृष्ट काढली... संपूर्ण घर आनंदाने भरलं होतं! 

क्रमशः.....
***************************
उद्या आता जेनिका आणि जॉन येणार आहेत... त्यांना काय सरप्राईज द्यायचं असेल? हेमा आणि निशा ला लागणाऱ्या पैश्यांचा बंदोबस्त कसा होईल? पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. 

🎭 Series Post

View all