ऑड वाट (भाग-११)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
दुसऱ्या दिवशी सगळे लवकर उठले... जेनिका आणि जॉन येणार म्हणून हेमा आणि निशा खूप उत्साहात होत्या... संध्याकाळ पर्यंत ते पोहोचणार होते तोवर घराला लायटिंग, आकाश कंदील आणि बाकी सजावट करून घ्यायची होती.... हेमाची आई घरातलं बघत होती तोवर हेमाने आणि तिच्या बाबांनी मिळून हि सजावटीची कामं केली!
"आई! मी निशाकडे जाऊन येते... तिला काही मदत हवी असेल तर बघते..." हेमा आई ला सांगून निशाच्या घरी गेली.
"झाली तुझी तयारी?" हेमा निशाच्या घरात जात म्हणाली.
"हो! आता फक्त एवढं कंदील लावलं की झालं सगळं! बरं दे मी लावते... आणि तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे...." हेमा म्हणाली.
हेमाने आकाश कंदील लावलं आणि निशा ला स्वतः पणती भोवती ठेवायला केलेले कागदाचे डिजाईन्स दाखवले....
"छान आहेत गं हे! असं वाटतंय की पणती भोवती रांगोळी काढली आहे..." निशा म्हणाली.
"थँक्यू! चल आता आपण शेताकडे जाऊया.... भूमीपूजन सुद्धा करायचं आहे तर तिथे पुन्हा काही पसारा झाला असेल तर आवरावा लागेल..." हेमा म्हणाली.
"हो! मग आता आपण जातोच आहोत तर तो खताचा टब पण ठेऊन येऊया तिथे..." निशा म्हणाली.
"बरं! घे तो टब आणि चल..." हेमा म्हणाली.
दोघींनी त्या जमिनीवर जाऊन बघितलं! तिथे सुद्धा थोडी तयारी करून त्या पुन्हा घरी आल्या. कामात संध्याकाळ झाली! हेमा आणि निशा जेनिका आणि जॉन ला आणायला गेले...
"तुमचं आमगावात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत!" हेमा म्हणाली.
गप्पा मारत मारत ते गावात आले... सगळ्या घरांना केलेलं लायटिंग, बाहेर रांगोळ्या, पणत्या, वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे आकाश कंदील, लहान मुलांची दिवाळी च्या आधी पासूनच फटाके फोडण्याची घाई... या सगळ्याने गाव अगदी उजळून निघालं होतं!
"Wow! What's an look... Really, Diwali is the festival of light...." जॉन ते समोरचं मनमोहक रूप पाहून म्हणाला.
"हे अजून काही नाही... उद्या पासून दिवाळी ला खरी सुरुवात होईल... तेव्हा बघा काय काय मजा असते ते...." हेमा म्हणाली.
सगळे हेमाच्या घरी आले... हेमाच्या आई ने भाकर तुकडा ओवाळून टाकला... सगळे आत गप्पा मारत बसले.... गप्पांच्या ओघात रात्र झाली सुद्धा!
"चला, आज लवकर जेवून लवकर झोपायचं आहे... उद्या नरक चतुर्दशी आहे... सूर्योदयाच्या आधी उठून अभ्यंग स्नान करायचं आहे..." हेमाची आई पानं घेत म्हणाली.
"अब्यांग सन मंजे?" जेनिका ने विचारलं.
"अभ्यंग स्नान! म्हणजे सकाळी सूर्य उगवण्याच्या आत उठून अंघोळ करायची... उद्या दिवाळी चा पहिला दिवस, 'नरक चतुर्दशी'! असं म्हणतात, जो कोणी उद्या सूर्योदयाच्या आत उठून अंघोळ करत नाही तो नरकात जातो.. उद्याच्या अंघोळीची मजाच वेगळी असते... आत्ता सगळं सांगून मजा नको घालवायला... उद्या तुम्हीच अनुभव घ्या..." हेमा म्हणाली.
"हो! तुम्हाला अनुभवताना खूप मजा येईल... आत्ता एवढंच लक्षात ठेवा, उद्या सकाळी सहा च्या आत उठावं लागेल..." निशा म्हणाली.
"ए पोरींनो आता बास... त्यांना जेवू दे शांतपणे... तुम्ही पण जेवा..." हेमाची आई म्हणाली.
जेवणं झाल्यावर हेमाच्या बाबांनी अंगणात मधोमध शेकोटी तयार केली... बाहेर बऱ्यापैकी थंडी पडली होती... हेमाने शेकोटी भोवती अंथरूण घातलं! हेमाच्या आई ने नुकत्याच नवीन शिवून आणलेल्या गोधड्या पांघरायला दिल्या... मस्त ऊब होती त्या गोधड्यांची... जेनिका आणि जॉन ला गोधडी अंगावर घेतल्या घेतल्या खूप छान झोप लागली... दुसऱ्या दिवशी हेमाच्या आई ने बंबात पाणी गरम करत ठेवलं आणि हेमा, जेनिकाला उठवलं! छान पैकी सुगंधी तेल त्यांना लावलं! अंघोळ करताना उटणं लावलं आणि ओवाळलं! त्यांचं आवरून झाल्यावर हेमाच्या बाबांना उठवून त्यांना तेल लावून अंघोळ घातली.... जेनिकाला जॉन ला तेल लावून उटण्याने अंघोळ घालायला सांगितली! सगळे मस्त पैकी नविन कपडे घालून तयार झाले... सगळ्यांचं आवरल्यावर हेमाने दारात छान रांगोळी काढली, जेनिका ने त्यावर पणत्या मांडल्या! अजूनही बाहेर अंधार होताच! निशा सुद्धा तिचं आवरून आली... दोघींनी 'शुभ दिपावली' करून मोठ्यांना नमस्कार केला....
"बाथ करताना ऑइल आनि सॅन्ड का लावला?" जेनिका ने विचारलं.
"ती सॅन्ड नव्हती! त्याला उटणं म्हणतात... दिवाळीच्या वेळी थंडी पडलेली असते मग त्वचा मऊ राहावी म्हणून अंघोळीच्या आधी तेल लावतात आणि उटण्याने अंघोळ करतात... यामुळे त्वचा फाटत नाही आणि मऊ राहते... हे या मागचं शास्त्रीय कारण आहे..." हेमा ने सांगितलं.
"ग्रेट! मनून तुमाला मोईश्चर क्रिम ची गरज नाय पडत! तुमाला आदि पासून त्याचा सोल्युशन माहित आहे..." जॉन म्हणाला.
"बरोबर! चला आता एक फटाक्यांची माळ लावूया.... अजून कोणी उठलेलं दिसत नाहीये... आपल्या आवाजाने उठतील सगळे आणि आपण पैज जिंकू!" निशा म्हणाली.
निशा सोबत माळ घेऊनच आली होती... सगळ्यांनी मिळून माळ लावली... त्याच्या आवाजाने सगळ्यांच्या घरच्या लाईट लागल्या... अजून थोडावेळ फुलबाजी, भुईचक्र, अनार असे फटाके फोडून सगळे एन्जॉय करत होते...
"निशा! तू कोणता बेट बदल बोलली मगाशी?" जेनिका ने विचारलं.
"आम्ही ना सगळे मिळून पैज लावतो, 'कोण सगळ्यात आधी उठून अंघोळ करून फटाके फोडतं!' आणि दरवर्षी आम्ही दोघीच जिंकतो! त्या बद्दलच म्हणलं." निशा ने सांगितलं.
"Wow! किती लिटिल थिंग्स मदे हॅपी असता तुमी..." जॉन म्हणाला.
"हा साधेपणाच तर भारताला एकजूट ठेवतो... आज दिवाळी आहे पण, तुम्हाला सगळ्या धर्माचे लोक ती साजरी करताना दिसतील... एकमेकांच्या घरी जाणं, एकमेकांमध्ये सामील होणं इथे तुम्हाला पाहायला मिळेल..." हेमा म्हणाली.
"चला आता गप्पा नंतर.. देवळात जाऊन येऊया आणि मग फराळ करू..." हेमाचे बाबा म्हणाले.
सगळेजण गावातल्या देवळात जायला निघाले... निशाची आई सुद्धा सोबत आली... सकाळची प्रसन्न वेळ, वातावरणातील थंडी, सागळ्यांच्या घराबाहेर रांगोळ्या, पणत्या लायटिंग ने सजलेली घरं! सगळंच खूप मनमोहक होतं! देवळात सुद्धा भली मोठी संस्कार भारती रांगोळी, त्यावर मांडलेल्या पणत्या छोट्या छोट्या कागदाच्या आकाश कंदिलांनी भरलेलं देऊळ खूप छान वाटत होतं! जेनिका आणि जॉन ने त्या सगळ्याची क्षणचित्र टिपली... सगळे आत गेले धूप आणि उदबत्त्यांच्या सुगंधात अजूनच प्रसन्नता जाणवली... दर्शन झाल्यावर दोन मिनिटं सगळे तिथे शांत बसले... आणि नंतर प्रसाद घेऊन निघाले... घरी जाता जाता 'आमच्याकडे फराळाला या हं' अश्या आमंत्रणं देत - घेत घरी पोहोचले... फराळाचा नैवेद्य देवाला अर्पण करून झाला... हेमाच्या आई ने एका मोठ्या ताटात सगळ्यांना फराळ काढला...
"चला... सगळ्यांनी गोल करून बसा..." हेमाची आई ताट घेऊन येत म्हणाली.
चकली, मक्याचा आणि साध्या पोह्याचा चिवडा, बेसनाचे आणि रव्याचे लाडू, करंजी, अनारसे, कडबोळ्या, गोड आणि खाऱ्या शंकरपाळ्या, शेव या सगळ्या पदार्थांनी ताट सजलं होतं! जेनिका ने त्याचे फोटो काढून घेतले...
"Waw! एवडा डिश? All looking very tempting and testy..." जॉन म्हणाला.
"करा सुरुवात..." हेमाची आई म्हणाली.
सगळे एकाच ताटातून खात होते... हेमाने प्रत्येक पदार्थाविषयी त्यांना सांगितलं! दोघांनी सगळ्या पदार्थांची चव घेतली... अगदी आवडीने त्यांनी फराळाला सुरुवात केली....
"आमाला tomorrow पन हाच ब्रेकफास्ट पाहिजे..." जेनिका म्हणाली.
"हो हो! आता दिवाळी संपेपर्यंत हेच!" हेमा म्हणाली.
फराळ करता करता हेमा आणि निशा ने त्यांना भूमीपूजनाचं सुद्धा सांगितलं.
"ग्रेट! आमचा कडे पन एक गिफ्ट आहे तुमाला देयला... मी सर्च केला होता भाऊबीज ला ब्रदर सिस्टर ला गिफ्ट देतो.... तेवा तुमाला ते देनार.." जॉन म्हणाला.
"चला आता तुमचं चालू दे... मी शेतात जातो... संध्याकाळी लवकर येतो मग आपण सगळे मिळून फटाके उडवू या..." हेमाचे बाबा म्हणाले.
सगळं आवरल्यावर हेमा आणि निशा पाहुण्यांसोबत संपूर्ण गावात फिरत होते.... प्रत्येकाच्या दाराबाहेरची वेगवेगळी रांगोळी, वेगळी सजावट या सगळ्यांचे फोटो काढत हे फिरत होते... या सगळ्यात दुपार झालीच! पुन्हा सगळे घरी आले... जेवणं झाली आणि सकाळी लवकर उठल्यामुळे सगळ्यांना झोप आली होती... मस्तपैकी एक डुलकी सुद्धा झाली... संध्याकाळी पुन्हा अंगणात व्यवस्थित झाडून नवीन रांगोळीची तयारी सुरु झाली!
"मला पन करायचं!" जेनिका म्हणाली.
"हो चालेल ना! हे बघा, हि रांगोळी अशी घ्यायची आणि काढायचं! या पुस्तकात बघून काढूया आपण..." हेमा म्हणाली.
जेनिका आणि हेमा ने मिळून १२ ठिपक्यांची रांगोळी काढली, त्यात छान रंग भरले आणि दिव्यांनी सजावट केली... हे सगळं करताना जॉन ने दोघींचे फोटो आणि व्हिडिओ काढले...
"हेमा! जरा ये ना रांगोळी काढायला मदत करु ना माझी..." निशा हेमाला बोलवायला आली..
जेनिका ने तिकडे सुद्धा रांगोळी काढायला मदत केली...
"हे रंगोली का करतात इते? आमी लास्ट टाइम आलो तेवा पन होता पन छोटा होता.." जॉन ने विचारलं.
"रांगोळी मुळे प्रसन्न तर वाटतंच! पण, पूर्वी जेव्हा गावात खूप साप यायचे तेव्हा त्यांच्या पासून रक्षणासाठी रांगोळी कामी यायची.. एखादा साप रांगोळी वर गेला की त्याच्या त्वचेला रांगोळी चिकटायची आणि तो पुढे यायचा नाही त्यामुळे दारासमोर रांगोळी असतेच असते!" हेमा म्हणाली.
"यात पन साइंटिफिक रिजन... किती स्टडी आहे या मदे..." जॉन म्हणाला.
"हो मग! जे काही भारताच्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलं आहे त्या मागे नक्कीच काही ना काही कारणं आहेत!" निशा म्हणाली.
निशाच्या अंगणात रांगोळी झाल्यावर सगळे बाहेर आले... तोपर्यंत हेमाचे बाबा सुद्धा शेतातून आले... सगळ्यांनी मिळून फटाके उडवले आणि बाहेर फिरून सुद्धा आले.... आत्ता संध्याकाळचं दृश्य तर डोळे दिपवणारं होतं! सगळीकडे उजेड, वेगवेगळ्या लयीत चमकणारं लाइटिंग खूप छान वाटत होतं! लहान मुलांची फटाके उडवण्याची घाई... कोणाचा अनार उंच उडतो ते बघणे, भुईचक्रात पाय टाकून पण, सावध पणा बाळगून त्यात उड्या मारणे आणि मोठ्या पोरांचं हातात माळ पेटवून ती उडवणे... सगळी गंमत सुरु होती...
"Really very amazing! We take right decision to come India during Diwali." जेनिका समोरचं दृश्य बघत म्हणाली.
"चला आता... उशीर होतोय... जेवून घ्या उद्या लक्ष्मी पूजन आहे संध्याकाळी! सकाळी तयारी करावी लागेल..." हेमाची आई म्हणाली.
सगळे आवरून झोपले... दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी लाह्या, बत्तासे आणून ठेवले... हेमा आणि निशा ने त्यांना लक्ष्मी पूजनाविषयी माहिती सांगितली दिवस तर तयारीत गेला... संध्याकाळी हेमाचे बाबा आल्यावर पूजा झाली! पाच बायकांना बोलावून हळदी कुंकू सुद्धा झालं!
"उद्या आता पाडवा आहे... आपण भूमी पूजनाला जातोय..." हेमा म्हणाली.
"येस! आपन लवकर सगला तयारी करू..." जॉन म्हणाला.
बोलता बोलता रात्रीचं जेवण झालं! सगळे शेकोटी आणि मायेची ऊब असलेल्या गोधडीत गुडूप झाले...
क्रमशः....
****************************
उद्या आता भूमिपूजन होणार आहे... हेमा आणि निशा ला भाऊबीज म्हणून जॉन काय गिफ्ट देणार असेल? हेमा आणि निशाचा व्यवसाय आता नवीन वळणार जाणार आहे... हळूहळू या निर्णयामागचं कारण सुद्धा उलगडेल.... आता पुढे काय होईल पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा