Login

ऑड वाट (भाग-१२)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-१२)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
पाडव्याचा दिवस उजाडला.... सकाळी सगळ्यांनी लवकर उठून आवरून घेतलं! भूमीपूजनासाठी हेमाच्या आणि निशाच्या आई  ने मिळून नारळाच्या वड्या बनवल्या.... फुलं, हळदी कुंकू आणि श्रीफळ घेऊन सगळे निघाले. हेमा आणि निशा ने एकसारख्या पॅटर्न मध्ये साडीचा शिवून घेतलेला ड्रेस घातला होता, हेमा आणि निशाच्या आई ने लाडक्या लेकींनी घेतलेली नवी कोरी साडी नेसली होती, जेनिकाने प्लाझो आणि त्यावर कुर्ता घातला होता तर जॉन आणि हेमाच्या बाबांनी सदरा! मस्त गप्पा मारत मारत सगळे तिथे पोहोचले... 

"तुम्ही दोघांनी करा भूमिपूजन..." हेमाच्या आई ने जेनिका आणि जॉन ला सांगितलं. 

"नो! तुमी आनि निशा चा मॉम तुमी करा... Because तुमी दोगी या दोगिंना खूप सपोर्ट करता... तो तुमचा हक आहे..." जॉन म्हणाला. 

"अरे एक मिनिटं! आम्हाला पण विचारा ना आमचं मत..." निशा म्हणाली. 

सगळे दोघींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. 

"तुम्ही सगळ्यांनी मिळून पूजा करायची आहे..." हेमा म्हणाली. 

सगळ्यांनी मिळून तिथे पूजा केली... नारळाच्या बर्फी ने तोंड गोड केलं! त्यानंतर हेमा आणि निशा ने त्यांच्या डोक्यात जे सुरु आहे त्याबद्दल सगळ्यांना सांगितलं! जेनिका आणि जॉन ला खताचा प्लॅन विशेष आवडला. 

"गुड जॉब! असाच न्यू न्यू टेक्निक्स युज करून बिजनेस एक्सपांड करा..." जेनिका म्हणाली. 

हेमा आणि निशा ने एक स्मित केलं आणि थँक्यू म्हणाल्या. 

"चला आता, मी शेतात चाललोय संध्याकाळी लवकर घरी यायचं आहे ना... तुम्ही पण फिरा थोडावेळ आणि जा घरी..." हेमाचे बाबा म्हणाले. 

"हो बाबा!" हेमा म्हणाली आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. 

"मी सुद्धा घरी जातेय... मला नैवेद्याची तयारी करायची आहे... तुम्ही दोघी या नंतर..." हेमाची आई म्हणाली. 

"हो आई! आम्ही शेताच्या इथे ओस जागा होती तिथे केलेले बदल यांना दाखवून येतो..." हेमा म्हणाली. 

त्या दोघी घरी गेल्या. हेमा आणि निशा, जेनिका आणि जॉन ला घेऊन फुलझाडं दाखवायला गेल्या. त्या दोघींनी लावलेल्या गुलाब आणि मोगऱ्याच्या रोपांची छान वाढ झाली होती... कळ्यांनी प्रत्येक रोप बहरलं होतं!

"Nice! It's very beautiful place for photo shoot..." जेनिका म्हणाली. 

"हो! म्हणूनच हे तयार केलं आहे... शिवाय यामुळे जी फुलं येतील ती सुद्धा विकता येतील..." निशा म्हणाली. 

थोडावेळ सगळे तिथेच थांबले... थंडीमुळे पाना - फुलांवर छान दव पडलं होतं, एखाद्या मोत्या प्रमाणेच ते चमकत होतं! कॅमेराचे वेगवेगळे अँगल आणि लेन्स वापरून त्याचे खूप छान फोटो जॉन ने काढले.... फिरता फिरता दुपार होत आली होती... सगळे घरी आले. घरातून पुरण पोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, पापड, कुरडया या सगळ्याचा घमघमाट येत होता.... हेमाच्या आई ने नैवेद्याला ताट वाढलं! वरण भाताची एक मुद त्यावर तुपाची धार आणि तुळशीचं एक पान, दही भाताची एक मुद, पुरण पोळी, काकडीची कोशिंबीर, लिंबू, पापड, कुरडया, बटाट्याची भाजी, वाटीत कटाची आमटी या सगळ्यांनी ताट सजलं आणि देवाला नैवेद्य अर्पण केला!

"खूपच डिलिशिअस दिसते... हे काय काय बनवले आहे?" जेनिका ने विचारलं. 

हेमा ने तिला सगळं सांगितलं. जॉन ने ती बोलताना व्हिडिओ काढला आणि नैवेद्याच्या ताटाचा फोटो सुद्धा! 

"हेमा! यांना जेवायला वाढ मी तुझ्या बाबांना डबा घेऊन जाते..." हेमाची आई म्हणाली. 

"तुमी टिफिन देऊन या आपन सगले जेवू... आमी वेट करनार तुमचा साटी..." जेनिका म्हणाली. 

हेमाच्या आई ने खूप समजावलं पण पाहुणे काही ऐकेनात म्हणून ती पटकन जाऊन डबा देऊन आली... घरी आल्यावर पुन्हा सगळं अन्न गरम केलं आणि सगळे जेवायला बसले... पुरणपोळी बरोबर दूध आणि तूप सुद्धा घेतलं! मस्तपैकी सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. गोडाचं जेवण आणि त्यात चव खूप छान लागल्याने जरा दोन घास जास्तच पोटात गेले होते... हेमाच्या आई ने घरी केलेला मुखवास सगळ्यांना दिला! 

"आता जरा पडा... संध्याकाळी एक गंमत असेल.... जेनिका मी तुम्हाला तयार करेन हो!" हेमाची आई म्हणाली. 

सगळे थोडावेळ पडले... संध्याकाळच्या सुमारास हेमाच्या आई ने जेनिकाला उठवलं आणि छान काठा पदराची साडी नेसवून तयार केलं आणि स्वतःही तयार झाली! सगळं आवरे पर्यंत हेमाचे बाबा सुद्धा आले... हेमाने पाट आणि त्या भोवती रांगोळी काढून ठेवली होती.. हात पाय धुवून ते पाटावर बसले... हेमाच्या आई ने औक्षणाची तयारी केली होती... ती ओवळणीचं तबक घेऊन आली आणि हेमाच्या बाबांना ओवाळलं. 

"चल बाहेर! तुझी ओवाळणी वाट बघतेय..." हेमाचे बाबा म्हणाले. 

हेमाची आई आणि बाकी सगळे बाहेर आले... अंगणात त्यांनी एक छोटी घरगंटी आणून ठेवली होती... 

"हे काय? एवढं महाग का आणायचं काही? आता तुम्हाला उगाच याचा ताण येणार..." हेमाची आई म्हणाली. 

"नाही गं! काही ताण वैगरे नाही... मी वर्षभर थोडे थोडे पैसे साठवून आणली आहे... हेमाने मला मागच्याच वर्षी सांगितलं होतं, आई ला एक घरगंटी घ्यायची आहे... तेव्हा पासून मी थोडे थोडे पैसे साठवत होतो... कधी सोनं आणू नाही शकलो पण, निदान एवढं तरी..." हेमाचे बाबा म्हणाले. 

सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू तरळले.. हेमाच्या आई च्या चेहऱ्यावर सुद्धा एक समाधान उमटलं होतं! 

"चला आता... जेनिका दिदी तुम्ही जॉन दादांचं औक्षण करा..." हेमा म्हणाली. 

जेनिका ने हेमाच्या आई ने जसं सांगितलं अगदी तसं केलं... जॉन आपल्याला काही देईल याची जेनिका ला अपेक्षा नव्हती! कारण, त्यांना या बद्दल काही माहित नव्हतं! पण, जॉन ने त्याच्या खिशातून एक गिफ्ट काढलं आणि जेनिका ला दिलं! जेनिका फक्त चकित होऊन बघत होती... 

"एवढं चकित नका होऊ... मी त्यांना आधीच सांगितलं होतं सगळं!" निशा म्हणाली. 

"Ohh! मग आता मला पन बोल हे काय असता?" जेनिका ने विचारलं. 

हेमा ने आणि तिच्या आई ने तिला सगळं सांगितलं. जेनिका ने गिफ्ट उघडून बघितलं, त्यात सोन्याचं मंगळसूत्र होतं! जेनिकाला ते फार आवडलं. 

"I know, you like Indian jewellery! So, Nisha suggested me this!" जॉन म्हणाला. 

"हो! तुम्ही इथे आल्यावर भारतीय वेशभूषा करता तेव्हा तुम्ही हमखास मंगळसूत्र घालता म्हणून मी जॉन दादांना हे घ्यायला सांगितलं." निशा म्हणाली. 

सगळे आनंदी होते... छोटासा कार्यक्रम संपन्न झाला. सगळ्यांनी बाहेर फटाके उडवले खूप धमाल केली आणि रात्री जेवून झोपले! दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून झाल्यावर जॉन आणि जेनिका एकमेकांशी काहीतरी बोलत होते... जेनिकाने बाहेर जाऊन कोणाला तरी फोन केला आणि ती पुन्हा घरात आली... 

"Aunty! आपन आता भाऊबीज सेलिब्रेट करू शकतो?" जेनिका ने विचारलं. 

"हो! संध्याकाळ पर्यंत कधीही करता येते..." हेमाची आई म्हणाली. 

"ओके ग्रेट!" जेनिका म्हणाली. 

तिने जॉन ला जाऊन सांगितलं. हेमाला आणि तिच्या आई ला हे काय चाललंय कळत नव्हतं! पुन्हा ते एकमेकांशी बोलले आणि एका फोन वर बोलून त्यांनी हेमाला निशाला बोलवायला सांगितलं! हेमा निशाला घेऊन आली...

"आपन आताच भाऊबीज करतो! तुमचा साटी सरप्राईज आहे..." जॉन म्हणाला. 

"ओके! पण तयारी साठी थोडा वेळ तर द्या..." हेमा म्हणाली. 

"टिक आहे.. तुमी दोगी quickly रेडी रहा.... मी वेट करतो..." जॉन म्हणाला. 

निशा आणि हेमाने पटापट सगळी तयारी केली.. स्वतः सुद्धा नवीन कपडे घालून तयार झाल्या, ओवळणीसाठी तबक सजवलं आणि जॉन ला बोलावलं. आधी हेमाने आणि नंतर निशाने त्याचं औक्षण केलं! जॉन ने दोघींना एक लिंक पाठवली आणि ती ओपन करायच्या आधी बेसिक माहिती विचारली. 

"हे काय आहे? ओपन करू का?" हेमाने विचारलं. 

"हा आता करा ओपन.." जॉन म्हणाला. 

हेमा आणि निशा ने ती लिंक ओपन केली तर 'अतिथी देवो' भव ची एक छान वेबसाईट होती... एवढंच नाही तर त्याने त्यांचा बिजनेस लिगली रजिस्टर सुद्धा केला होता! साईट वर जी.एस.टी. नंबर आणि TAN नंबर सुद्धा त्यांना दिसले. 

"खरंच हे खूप छान सरप्राईज आहे! थँक्यू..." निशा म्हणाली. 

"जेवा आमी इतुन निगालो तेवा च डिसीजन केला होता तुमचा बिजनेस रजिस्टर करायचा आनि एक वेबसाईट develop करून ग्यायचा..." जेनिका म्हणाली. 

"येस! आफ्टर that तुमी दोगी आमचा गाईडन्स मागायला लागला यासाटी... मग आमाला समजला आमी राईट गिफ्ट देनार तुमाला..." जॉन म्हणाला. 

"अहो पण, एवढा खर्च का केलात? म्हणजे तुमचं गिफ्ट आम्हाला आवडलं त्यात काही शंकाच नाही पण तरी..." हेमा म्हणाली. 

"नाय मंजे तुमाला कसा साईट बनवून ग्यायचा आनि कसा बिजनेस रजिस्टर करायचा हे समजला नासता ना सो, we did it!" जेनिका म्हणाली. 

"यात एक स्पेशल फिचर पन ऍड केला... साईट वर जेवा पन बुकिंग होनार तेवा आदि बुकिंग करणारा पर्सन चा व्हेरिफिकेशन होनार! So, you can be protected from fraud!" जॉन ने सगळं समजावून सांगितलं. 

"खरंच तुमचे आभार कसे मानू समजत नाही... खूप केलंत तुम्ही आमच्यासाठी..." हेमा हात जोडून म्हणाली. 

"इंडिया मदे ब्रदर सिस्टर ची केअर करतो अनि तिला प्रोटेक्ट करतो ना? मग मी तुझा ब्रदर आहे It's my responsibility to protect you." जॉन हेमा ला समजावत म्हणाला. 

निशा आणि हेमा खूप खुश झाल्या. त्यांना जे करायचं होतं ते जॉन ने सहज करून दिलं होतं! हेमा आणि निशाला आता पटलं होतं, आपण पूर्ण मेहनत करण्यासाठी तयार असलो ना तर कुठून ना कुठून आपल्या सगळ्या समस्यांचं निवारण होतंच! 

"हेमा, निशा! माज्याकडे पन एक सरप्राईज आहे..." असं म्हणत जेनिका ने तिच्या पर्स मधून काहीतरी काढलं. 

"हे काय? नाही आम्ही हे नाही घेऊ शकत... प्लिझ! साईट आणि रजिस्ट्रेशन ठीक आहे पण हे नाही प्लिझ..." हेमा जेनिका तिच्या हातात दहा लाखांचा चेक देत होती तो बघून म्हणाली. 

"हो! हेमा बरोबर बोलतेय... आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचं आहे.... आमचं विश्व उभं करताना ज्या काही झळी बसतील त्या स्वतः अंगावर घेऊन स्ट्रॉंग व्हायचं आहे..." निशा ने सुद्धा हेमाच्या बोलण्याला सहमती दर्शवली. 

"I like your spirit! I know तुमी चेक गेनार नाय... But, take this as a loan... मला हलूहलू रिटर्न करा... You both are new in this field! तुमचा बिजनेस पन new आहे... या स्टेज ला बँक लोन नाय मिलत... तुमाला आता त्या प्लेस वर बेसिक कन्स्ट्रक्शन साटी युज होईल..." जेनिका म्हणाली. 

जेनिका आणि जॉन ने जेव्हा त्या दोघींना आणि त्यांच्या पालकांना समजावलं तेव्हा कुठे त्यांनी चेक घेतला.

"हे बघ बाळा! त्यांना तुमच्यावर विश्वास आहे म्हणून त्यांनी एवढी मोठी मदत तुम्हाला केली आहे... तुम्हाला आता स्वतःला सिद्ध करायचं आहे.... जे मनापासून काहीतरी करायचा प्रयत्न करतात त्यांना प्रत्येक प्रश्नावर काही ना काही उपाय मिळतो... देवाने हि एक संधी दिली आहे असं समजून आता जोमाने कामाला लागायचं आणि आमच्या सगळ्यांची मान गर्वाने उंच करायची...." हेमाच्या बाबांनी दोघींना समजावलं. 

क्रमशः.... 
**************************
आता खऱ्या अर्थाने हेमा आणि निशाच्या व्यवसायाला वेगळे वळण आले आहे... त्या दोघींना आता या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करून स्वतःला सिद्ध करायचं आहे... त्या आता कश्या पद्धतीने हे सगळं करतील पाहूया पुढच्या भागात... त्यांच्या कल्पकतेने पुढे गावात खूप बदल होणार आहेत! ते काय असतील आणि गावावर त्याचे काय परिणाम होतील हे जाणून घेण्यासाठी सोबत रहा... आजचा हा भाग कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा. 

🎭 Series Post

View all