Login

ऑड वाट (भाग-१३)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-१३)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
हेमा आणि निशाची जबाबदारी अजून वाढली होती... घरातल्यांच्या अपेक्षा, गावकऱ्यांच्या अपेक्षा आणि काल परवा ओळख झालेल्या जेनिका, जॉन चा विश्वास या सगळ्याला सार्थ ठारायचं होतं! 

"हेमा! What happened? एवडा कोनता विचार करते?" जेनिका ने हेमाला विचारात गढलेलं पाहून विचारलं. 

"नाही! काही नाही... आमच्या नवीन उपक्रमाप्रमाणे तुम्हाला आम्ही संध्याकाळी वृक्षारोपणासाठी नेणार आहोत! त्याचाच विचार चालला होता..." हेमा म्हणाली. 

"Nice idea! Tree plantation, ग्रेट!" जॉन म्हणाला. 

भाऊबीजेच्या कार्यक्रमात दुपार झालीच होती... सगळ्यांनी जेवून घेतलं.... 

"हेमा! I know, मी लास्ट मिनीट ला बोलते but, मला इतुन जाताना ते दिवालीचा सगला items ऑर्डर करायचा होता... भेटेल का?" जेनिका ने थोडं कचरत विचारलं. 

"हो का नाही! मला माहित होतं तुम्ही फराळाची ऑर्डर देणार म्हणून मी गावातल्या आजींना सांगून ठेवलंच होतं! त्यांनी एक किलोची ऑर्डर तयार केली आहे... आज आपण त्यांच्याकडून घेऊन येऊ..." हेमा ने सांगितलं. 

"थँक्यू हेमा! यालाच बोलतात रिअल बिजनेस मॅन! सॉरी सॉरी... बिजनेस वूमन! कस्टमर काय मागनार हे तुला already माहित होता!" जेनिका म्हणाली. 

हेमा आणि निशा ने एक गोड स्माईल दिली.... त्यानंतर जॉन ने हेमा आणि निशा ला साईट कशी हँडल करायची, त्यावर reviews कसे अपलोड करायचे आणि बाकी बरीच माहिती समजावून सांगितली. हे सगळं झाल्यावर हेमा, निशा ने पुढे काय काय करायचं ठरवलं आहे ते सांगितलं! त्या दोघींच्या कल्पना आणि या दोघांच्या सल्ल्याने त्यात वेगवेगळे बदल झाले.... आता दोघींना आत्मविश्वास आला होता आपण हे करू शकणार आहोत! या सगळ्या कामात दुपार संपली! संध्याकाळी सगळे आधी नर्सरी असणाऱ्या आजोबांकडे गेले.... जेनिका आणि जॉन ने एक पेरू चं आणि एक चाफ्याच्या फुलांचं रोप घेतलं! शेतात आल्यावर त्यांनी ती रोपं स्वतःच्या हाताने लावली... निशा आणि जेनिका ने तिथे एका काठीला पुठ्ठा लावून त्यावर जॉन आणि जेनिका चं नाव लिहिलं आणि तिथे बांधून ठेवलं! 

"Waw! Next time आमी येनार तेवा हे ट्री मोटे जालेले बगणार.." जेनिका म्हणाली. 

"हो नक्कीच! चला आता आपण आज्जींकडून फराळ घेऊन मग घरी जाऊ..." निशा म्हणाली. 

सगळे एका आजींच्या घरी आले.... आजींनी सुद्धा आधी मायेने त्यांना थोडं खाऊ घातलं आणि मग फराळ दिला... आजींना त्यांचं मानधन देऊन थोड्या गप्पा झाल्या आणि सगळे निघाले. दुसऱ्या दिवशी रात्री पाहुणे परत जाणार होते म्हणून हेमाच्या आणि निशाच्या आई ने मिळून त्यांच्यासाठी घरीच बाकरवडी आणि ठेपला बनवून ठेवला! फटाके उडवून आज सुद्धा सगळ्यांनी खूप मजा केली.... दुसरा दिवस सगळा तयारीत गेला... संध्याकाळी गावातून मुंबई ला जाणारी बस होती त्यातून दोघं जाणार होते.... प्रथे प्रमाणे हेमाच्या आई ने जेनिका ची ओटी भरली... 

"चला आता आमी येतो..." जॉन म्हणाला. 

"अरे वा लक्षात आहे की तुमच्या येतो म्हणायचं!" हेमाची आई म्हणाली. 

"येस! Because आमाला इतुन जायचं मन नाय होत... असा फीलिंग येत की आपन own house leave करतो!" जेनिका थोडी इमोशनल होत म्हणाली. 

"असं जाताना रडायचं नाही... हे तुमचं माहेर आहे समजा... दरवर्षी आपली भेट होणारच आहे!" हेमा तिला समजावत म्हणाली. 

"चला चला, आवरलं का?" हेमाच्या बाबांनी बाहेरून विचारलं. 

"हो... आलोच...." हेमा म्हणाली. 

हेमा आणि निशा ने दोघांना नमस्कार केला! जेनिका आणि जॉन ने सुद्धा सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला आणि ते निघाले... त्यांना बस मध्ये बसवून सगळे परत आले.... असेच दिवस चालले होते.... साईट आणि लिगल रजिस्ट्रेशन मूळे हेमा आणि निशा ला बरंच काम मिळत होतं! दोघींनी सरपंच्यांच्या मदतीने त्या ओस जागेवर लहान लहान चार खोल्या बांधून घेतल्या होत्या... या दोघींमुळे गावात बरेच बदल झाले होते.... गावातील सगळी मुलं यांच्याकडे बघून शिक्षणावर लक्ष देत होते त्यामुळे सगळ्या गावाच्या या लाडक्या लेकी झाल्या होत्या! दर महिन्याला हेमा आठवणीने जेनिका ला पैसे ट्रान्सफर करत होती.... त्यांच्यात आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ कॉल वरून बोलणं होत होतं! 
एकदा दोघी अश्याच कामाच्या बोलण्यात गर्क असताना हेमा आणि निशाची आई तिथे आली... 

"खरंच पोरींनो, तुम्ही स्वतःला सिद्ध करताय... आम्हाला वाटलं होतं हे सगळं थोडे दिवस टिकेल पण नाही! तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहिलात!" निशाची आई म्हणाली. 

"अगं आई असं काय करतेस! लहानपणापासून आम्हाला एखादं काम हातात घेतलं तर ते पूर्ण करायचंच हेच शिकवलं ना तुम्ही... त्याचंच हे फळ आहे..." निशा म्हणाली. 

"हो! पण आई, मावशी तुमच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं! जर, तुम्ही आम्हाला हे करायलाच दिलं नसतं तर आज आम्ही इथपर्यंत येऊ शकलो नसतो..." हेमा म्हणाली. 

"बास बास! आम्ही इथे तुमचं कौतुक करायला आलो आणि तुम्ही आमचंच कौतुक करा..." हेमा ची आई म्हणाली. 

"जे खरं आहे ते आहे..." हेमा म्हणाली आणि निशाने सुद्धा सहमती दर्शवली. 

हेमाच्या आई ने मायेने त्यांच्या पायावर एक चापटी मारली... 

"चला तुम्ही तुमचं काम करा..." निशाची आई म्हणाली आणि दोघी बाहेर गेल्या. 

********* दोन वर्षांनंतर *********

"ए ते तिकडे नीट माळ लाव रे.... अरे हे काय करतोयस, हे इथे टेबलावर अंथर आणि त्यावर हि फुलदाणी ठेव... लवकर आवरा रे सगळं..." सरपंच जातीने सगळीकडे लक्ष घालून गाव सजवत होते... 

"ओ सरपंच साहेब! इथली कामं होतं आली पण, उत्सव मूर्ती आहेत कुठे?" एका गावकाऱ्याने विचारलं. 

"त्यांना कुठं काय माहितेय... मी त्यांनाच बोलवायला जातोय आता..." सरपंच म्हणाले. 

आमगाव ला सर्वोत्कृष्ट गाव म्हणून आज पुरस्कृत करण्यात येणार होतं! या सगळ्याला हेमा आणि निशा चा मोठा हातभार आहे म्हणून त्यांना यातलं काहीही न सांगता सरप्राईज देण्याचं पंचायत समिती ने ठरवलं होतं आणि हेमा, निशा च हा पुरस्कार स्वीकारणार हे एकमताने ठरलं होतं! शासनाकडची काही माणसं आणि मीडिया सुद्धा गावात येणार होते! त्याचीच हि गडबड सुरु होती.... रात्रभर जागून सगळ्यांनी गाव सजवलं होतं! 

"भुप्या! लवकर बाहेर ये...." सरपंच दारातून ओरडून म्हणाले. 

हेमा आणि तिचे आई - बाबा नाश्ता करत होते... 

"काय ओ काय झालं? सरपंच एवढे का ओरडत आलेत?" हेमाच्या आई ने विचारलं. 

"चल बाहेर जाऊन बघू..." हेमाचे बाबा म्हणाले. 

सगळे उठून दारात आले.... 

"काय ओ काय झालं?" हेमाच्या बाबांनी विचारलं. 

सरपंच काहीही न बोलता निशा च्या दारात जाऊन तिला हाक मारायला लागले.... 

"ए हेमा! तुम्ही दोघींनी काही केलं नाहीये ना? काही गडबड झालीये का?" हेमाच्या आई ने काळजीने विचारलं. 

"नाही गं आई..." हेमा ने सांगितलं. 

एवढ्यात निशा, तिची आई आणि सरपंच आले...

"चला सगळ्यांनी ग्रामपंचायतीत..." सरपंच म्हणाले. 

"का? काही केलंय का या पोरींनी?" निशाच्या आई ने विचारलं. 

"हो! खूप मोठं केलंय... तिकडे गेल्यावर समजेल तुम्हाला...." सरपंच म्हणाले आणि पुढे चालू लागले... 

हेमा, निशा आणि दोघींचे पालक आता चिंतेत होते... गावातून चालताना फुलांनी सजवलेलं गाव बघून सगळे चकित झाले होते... सगळे ग्रामपंचायतिच्या बाहेर आले... 

"काही कार्यक्रम आहे का गावात? कुणी येणार आहे का?" निशाच्या आई ने विचारलं. 

"येणार आहे नाही आलेत!" सरपंच म्हणाले. 

सगळे एकमेकांकडे बघत होते.... कोणाला काही अंदाजच आला नाही... 

"हेमा आणि निशाची च आम्ही वाट बघत होतो..." एक गावकरी म्हणाला. 

सरपंचांनी सगळ्यांना हकीकत सांगितली... हेमा आणि निशाच्या आई च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले... आपल्या मुली दोन वर्षात एवढ्या मोठ्या झाल्या, त्यांच्यामुळे गावाला पुरस्कार मिळतोय म्हणून त्यांचं उर गर्वाने भरून आलं! 

"चला चला हेमा, निशा तुम्ही तिथे स्टेज वर बसायचं..." सरपंच म्हणाले आणि त्यांना घेऊन स्टेज वर गेले... 

मीडिया आणि सरकारी अधिकारी सुद्धा आले... त्यांचं स्वागत झालं... अधिकाऱ्यांनी सरपंचांना पुरस्कार स्वीकारायला सांगितला! 

सरपंच स्टेज वर आले आणि बोलू लागले; "खरंतर मी सरपंच जरी असलो तरी आमच्या गावाला हा पुरस्कार हेमा आणि निशा मुळे मिळतोय... गावातील स्वछता, साक्षरता, वृक्षारोपण हे या दोघींमुळे वाढलं आहे... एवढंच नाही तर बदलत्या काळानुसार बेसिक इंटरनेट चा वापर करायला सुद्धा प्रत्येक गावकरी या दोघींमुळे शिकला! त्यामुळे या पुरस्काराच्या खऱ्या मानकरी हेमा आणि निशा आहेत! गावाच्या वतीने त्या हा पुरस्कार स्वीकारतील." 

सगळ्यांनी जोरात टाळ्यांचा कडकडाट केला! प्रत्येकाला आज या दोघींचा अभिमान वाटत होता... त्यांच्या आई - बाबांचं अभिनंदन सुरु होतं! हेमा आणि निशा तिथे आल्या... अधिकाऱ्यांनी एक सन्मान पत्रक, चषक आणि पन्नास हजारांचा चेक त्यांच्या हवाली केला. 

मला जरा बोलायचं आहे असं म्हणून हेमाने बोलायला सुरुवात केली; "हा सरपंच काकांचा मोठेपणा आहे त्यांनी आम्हाला हा पुरस्कार स्वीकारायला सांगितला! पण, सगळ्या गावाचा हा हक्क आहे... आज प्रत्येक गावकरी आमच्या पाठीशी आहे, आपल्या गावाला सुंदर, सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवायचं या सगळ्यांनी सुद्धा मनावर घेतल्यामुळे हे शक्य झालं! यात आम्हाला सरपंच काकांनी सुद्धा खूप मदत केली आहे... जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांच्या मदतीची गरज पडली तेव्हा तेव्हा त्यांनी खंबीर राहून आम्हाला मदत केली आहे.... प्रत्येक वेळी जनजागृती करताना आमच्या बरोबर प्रत्येक घरात आले आहेत आणि म्हणूनच हे शक्य झालं!" 

पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला! 

"असं ऐकिवात आहे की तुम्ही दोघी टूर चा व्यवसाय करता! त्याच्या अंतर्गत परदेशी पर्यटक सुद्धा इथे येतात... असं काय आहे इथे ज्यामुळे ते इकडे आकर्षित होतायत?" मीडिया मधल्या लोकांनी प्रश्न केला. 

"जास्त काही नाही! गावातला साधेपणा, आपुलकी आणि आपली भारतीय संस्कृती! आम्ही हा व्यवसाय याच तत्वावर सुरु केला! भारताची संस्कृती जी पूर्वापार चालत आली आहे, प्रत्येक गोष्टीला काही ना काही शास्त्रीय कारण सुद्धा आहे ती सातासमुद्रा पार घेऊन जाणे!" निशा म्हणाली. 

"मस्त कल्पना आहे.... त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला दिसतायत पण, हि कल्पना तुम्हाला सुचली कशी? म्हणजे गावातून लोक नोकरीच्या शोधात शहरात जातात किंवा गावात शेती किंवा पारंपरिक विणकाम, भरतकाम हे करतात पण, तुम्ही हा जगावेगळा व्यवसाय करताय त्या बद्दल थोडक्यात सांगा ना!" पत्रकारांनी पुढचा प्रश्न केला. 

निशाने बोलायला सुरुवात केली; "तुम्ही म्हणताय अगदी तसंच आम्ही सामान्य जीवन जगत होतो... मुंबई ला जाऊन एका कस्टमर केअर कंपनी मध्ये इंटरव्यू पण दिला आणि तिकडूनच आमच्या या ऑड वाटेची सुरुवात झाली! आम्ही मराठी माध्यमात शिकलो आहोत त्यामुळे सराईत इंग्लिश बोलता आलं नाही आणि आमचं रिजेक्शन झालं! तिथे मी पूर्णपणे हिंमत हरली होती... या सगळ्या परिस्थितीतून मला हेमाने बाहेर काढलं आणि या 'अतिथी देवो भव' ची मूळ संकल्पना तिच्याच डोक्यात आली." 

"पण, एका इंटरव्यू मध्ये नापास झाल्यावर इतकं का खचलात? तिथे काही अजून घडलं होतं का?" पत्रकारांच्या नजरेने हे बरोबर हेरलं होतं! 

हेमा आणि निशाने आधी फक्त एकमिकांकडे बघितलं! सगळ्यांमध्ये आता कुजबुज सुरु झाली... 

क्रमशः....
************************
आता उलगडा होणार आहे हेमा आणि निशाच्या बाबतीत मुंबईत काय घडलं होतं! या दोन वर्षात अजून उपक्रम जे दोघींनी हाती  घेतले ते सुद्धा समोर येतील आणि या सगळ्यात गावावर त्याचा कसा सकारात्मक बदल झाला हे सगळं पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all