Login

ऑड वाट (भाग-१४)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-१४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
आता जास्त काही लपवा लपवी करता येणार नाहीये हे दोघींनी ओळखलं होतं!

"तुम्ही बरोबर ओळखलं! आम्ही एका इंटरव्यू मध्ये खचून जाणारे नव्हतो! पण, त्या दिवशी आम्ही आमचा इंटरव्यू संपवला आणि ते थोड्याच वेळात निकाल सांगणार होते म्हणून वेटिंग रूम मध्ये इतर उमेद्वारांसोबत आम्ही बसलो होतो... ते सगळे शहरातले आणि व्यवस्थित इंग्लिश बोलता येणारे होते.... त्यांच्या एकमेकां सोबत बोलण्यावरून ते सगळे एकमेकांना ओळखत होते असं वाटलं!  आम्हाला दोघींना वाटलं जरा नवीन ओळख करून घेऊया म्हणून त्यांच्याशी आम्ही बोलायला गेलो... त्यांच्या बोलण्यावरून आम्हाला अंदाज आला की, यांना आपल्याशी बोलण्यात काही रस नाही म्हणून पुन्हा आम्ही दोघीच एका कोपऱ्यात जाऊन बसलो! तेव्हा त्यांच्या ग्रुप मधली एक मुलगी आमच्या इथे आली... आधी तर ती नीट बोलत होती... नाव, गाव आणि बेसिक माहिती तिने आम्हाला विचारली... त्यानंतर तिने बोलायला सुरुवात केली.... 'तुमच्या सारखे लोक गावातून येतात आणि मुंबई ची शोभा कमी करतात! धड कपड्यांचा चॉईस नाही, भाषा पण सो कॉल्ड चीप, इंग्लिश ची स्पेलिंग तरी येते का तुम्हाला?' हे ऐकून आम्हाला खूप वाईट वाटलं! असं वाटत होतं दोन कानाखाली माराव्या आणि सांगावं महाराष्ट्रात राहता ना आपली मातृभाषा बोलायची लाज वाटते का? पण, संस्कारांनी थांबवलं!" हेमा जड अंतःकरणाने सांगत होती.

"काय? पण, या वरून तुम्ही नोकरी न करण्याचा निर्णय का घेतला? तुम्ही दुसरा इंटरव्यू देऊन त्यांना दाखवून देऊ शकला असता ना?" पत्रकारांनी पुढचा प्रश्न केला.

"हो! नक्कीच करू शकलो असतो! पण, ते एवढं बोलून नाही थांबले... मी आणि निशा ने जेव्हा त्यांचा प्रत्येक मुद्दा हाणून पाडायला सुरुवात केली तेव्हा, त्यांनी भारतीय संस्कृती कशी कमी दर्जाची आहे हे बोलू लागले... अर्थात ते आम्हाला पटणारं नव्हतं! इतर देश आणि आपला देश यात त्यांनी तुलना सुरु केली! हे माझ्या मनाला खूप लागलं. त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ गेलं! इतक्यात आमचे इंटरव्यू चे निकाल आले... अर्थात आमचं सिलेक्शन झालं नव्हतं! त्या सगळ्या ग्रुप च सिलेक्शन झालं होतं! तिथून आम्ही निघालो, तेव्हा जाता जाता सुद्धा त्यांनी ऐकून दाखवलं, 'आधी क्लासी वागायला आणि बोलायला शिका आणि मग इथे या! अरे पण, तुम्हाला कुठे हे जमणार नाही का! तुमच्या सारखी गावठी लोक इथे न आलेलीच बरी.... येतात ते येतात वर कुठेही कसेही राहतात... गुड फॉर नाथिंग पीपल! आणि हो मगाशी जे काही सो कॉल्ड संस्कृती वैगरे बोललात ना ते सगळं useless आहे...'
           त्यांच्या या बोलण्याने आम्हाला खूप वाईट वाटलं! आपल्या भारत मातेचा अपमान ती मंडळी करत होती... साधं देशाशी एकनिष्ठ राहणं त्यांना जमत नव्हतं! मी असं नाही म्हणत बाकी देशाच्या संस्कृती तुच्छ आहेत पण, आपण आपल्या संस्कृती चा मान राखणार तेव्हा इतर देश राखणार ना? आज किती सहज आपण पाश्चात्य संस्कृती आत्मसाद केलीये मग आपली संस्कृती जपून तिचा सुद्धा विस्तार का नाही करायचा? ज्यात जे चांगलं आहे ते घेण्यात काय हरकत आहे?" हेमा पोटतिडकीने बोलत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते...

निशा ने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला शांत केलं आणि ती पुढे बोलू लागली; "त्यांच्या बोलण्याने मला खूपच त्रास झाला... आमचं आम्हाला माहित होतं आम्ही शिक्षण कसं पूर्ण केलं, आमच्या घरच्यांना आम्ही दोन घास कमी खाताना बघितलंय, आम्हाला कमी पडू नये म्हणून त्यांनी त्यांच्या ईच्छा मारल्यात, मुंबई ला सुद्धा आम्ही जात होतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात आम्हाला स्वप्न दिसत होती.... आपल्या मुलींमुळे आता आपण सुखात राहणार हे त्यांच्या डोळ्यात आम्ही पाहिलं होतं! त्यात तिकडे हे असं ऐकून घ्यावं लागलं... कारण काय तर फक्त आम्ही मराठी माध्यमात शिकलो, एका गावातून आलो आणि भारतीय संस्कृती चा सन्मान ठेवला म्हणून!"

"तेव्हाच मी ठरवलं आता जे काही करायचं ते गावात राहून! भारतीय संस्कृती मोठी करायला आणि तिचे महत्व पटवून द्यायला काय करता येईल याचा विचार माझ्या डोक्यात सुरु होता... पण, काहीही सुचत नव्हतं फक्त त्यांचे शब्द कानात घुमत होते; 'संस्कृती वैगरे सगळं useless आहे....' हेच त्यांचं विधान कसं खोटं करता येईल याचा विचार सतत सुरु होता... देवाला सुद्धा सांगून झालं, यातून आता तूच काहीतरी मार्ग दाखव. निशाला याचा एवढा त्रास झालेला बघून अजूनच त्यांच्या विचारां बद्दल माझ्या मनात राग निर्माण झालेला... हे मला कोणालाही बोलून दाखवायचं नव्हतं! कारण, म्हणतात ना आपल्या प्रत्येक रागामध्ये सुद्धा एक शक्ती असते ती मला कोणासमोर व्यक्त होऊन घालवायची नव्हती.... त्या शक्तीला मी स्वतः मधेच ठेवलं. त्याचाच हा आजचा परिणाम!" हेमा बोलत होती.

"पण, तरी तुम्ही अजून उत्तर नाही दिलं, हा टुरिस्ट चा व्ययसाय च का?" पत्रकारांनी तिला पुन्हा विचारलं.

"हो तेच सांगतेय! दुसऱ्या दिवशी जेनिका आणि जॉन हे रस्ता चुकून गावात आले... त्यांना इथलं सगळं आवडलं, त्यांनी कधी अनुभवलंच नव्हतं ना हे.... यातूनच मला हे सुचलं. तेव्हा मनात विचार आला, गोवा राज्य सुद्धा पर्यटनावरच जास्तीत जास्त चालतंय.. तर आपण सुद्धा हे का करू नये? कदाचित देवानेच त्या दिवशी त्यांना इथे पाठवलं! प्रसिद्ध शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी म्हणलंच आहे ना, 'सजग माणसाला कधी संधी शोधावी लागत नाही.' अगदी तसंच झालं!" हेमा म्हणाली.

"खरंच खूप छान! तुम्ही आत्ता पर्यंत एवढ्या विदेशी लोकांना भेटलात त्यावरून तुम्हाला काय वाटतं त्यांना आपल्या संस्कृती चा आदर आहे का?" पत्रकारांनी पुढचा प्रश्न केला.

"हो! किंबहुना आपल्या पेक्षा जास्त. आपण जिम, फास्ट फूड, पार्ट्या अश्या चैनीच्या गोष्टींचा स्वीकार केला आहे पण, त्या लोकांना योग, आयुर्वेद, भारतातील रूढी, परंपरा याचं महत्व पटतंय ते आत्मसद सुद्धा करतायत.... आज पर्यंत इथे जे लोक येऊन गेले त्यांनी थोडी तरी मराठी शिकलीच! जेनिका आणि जॉन हे दोघं तर तोडक्या मोडक्या का होईना पण, भारतात आल्यावर मराठीतच बोलतात... एवढंच नाही आम्ही अजून संपर्कात आहोत आमच्याशी ते मराठीतच बोलतात! जॉन दादांनी आम्हाला बहिणी मानलं आहे... त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं आणि मदत सुद्धा केली त्यामुळे आम्ही आज इथं पर्यंत आलो!" निशा म्हणाली.

दोघी जे काही सांगत होत्या त्यामुळे गावातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं! त्यांचा हा व्यवसाय सुरु करण्यामागची दुखरी बाजू आज सर्वांनी अनुभवली!

"या सगळ्या कामात तुम्ही काय काय शिकलात? यातून तुम्हाला काय काय मिळालं?" पत्रकारांनी विचारलं.

"आज आम्हाला वेगवेगळ्या देशाच्या लोकांना भेटायला मिळालं, त्यांच्या संस्कृती समजल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता आम्ही सराईत इंग्लिश सुद्धा बोलतो, जर्मन, फ्रेंच या सुद्धा भाषा थोड्या थोड्या येतात... 'अतिथी देवो भव' मध्ये जे येतात ते आमचंच कुटुंबं होतात... यामुळे आम्ही आज खूप माणसं सुद्धा कमावली आहेत जी आमच्यासाठी खूप महत्वाची आहेत! या सगळ्या बरोबर आमचा हेतू सुद्धा साध्य होतोय... भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय... शहरातल्या लोकांना सुद्धा गावच्या मातीची ओढ जाणवतेय..." निशा म्हणाली.

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या...

"या दोघींच्या व्यवसायामुळे गावात सुद्धा बदल झाले त्याबद्दल तुम्ही काही बोलू इच्छिता का?" पत्रकारांनी सरपंचांना विचारलं.

"हो का नाही! हेमा आणि निशा म्हणजे आमच्या गावच्या हिरा आहेत हिरा! या दोघींनी गावच्या प्रत्येकाला शिक्षण, स्वछता, एकजूट याचं महत्व पटवून दिलंय... प्रत्येक शेतकऱ्याने आज त्याच्या शेताचं मृदा परीक्षण करून योग्य ती पिकं लावली आहेत! दोघींच्या गांडूळ खत उपक्रमामुळे आमच्या गावचा सगळा भाजी पाला आणि पिकं नैसर्गिक पद्धतीने वाढलेली आणि आरोग्याला उत्तम अशी आहेत! या दोघींमुळे आज इथे प्रत्येकाला स्मार्ट फोन वापरून त्यांचा धंदा करता येतोय.... उत्पन्न वाढल्यामुळे शहरात पुरवठा झाल्यावर आम्ही विदेशात सुद्धा आमचा माल विकतोय... इथे आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण नगण्य आहे.... एवढंच नाही तर गावात ज्या महिला हातमाग, भरतकाम, पापड, लोणची असे लहान सहान काम करत होत्या त्या आज बाजूच्या गावातल्या स्त्रियांना हाताशी घेऊन त्यांचा माल आंतरराष्ट्रीय पातळीवर विकतायत... बाकी गावात येताना तुम्ही हिरवळ, स्वछता सगळं पाहिलंच आहे.... इथे आता विदेशी पर्यटक येतात म्हणून गावात येताना जो कच्चा रस्ता होता तो सुद्धा आता पक्का झालाय.... नशेच्या आहारी गेलेले लोक सुधारलेत, गावात एकही दारू च दुकान नाही, जे तरुण मुंबई ला जाण्याचा विचार करत होते ते सुद्धा आता गावासाठी काही करता येईल का बघतायत... अजून काय पाहिजे?" सरपंचांनी अभिमानाने सांगितलं.

"हो... खरंच खूपच छान आहे... हेमा, निशा तुम्ही आजच्या पिढीला काही सांगू इच्छिता का?" पत्रकारांनी विचारलं.

"फक्त एवढंच सांगेन, तुम्ही ज्या देशात जन्माला आलात त्या देशाचा, तिथल्या संस्कृतीचा सन्मान करा. जे चुकीचं आहे ते सुधारण्याचा प्रयत्न नक्की करा पण, जे चांगलं आहे ते आत्मसाद सुद्धा करा... तुम्ही कुठे शिकायचं किंवा नोकरी, व्यवसाय करायचा हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे पण, त्याचा उपयोग आपल्या देशाला कसा होईल हे सुद्धा बघा.... इतर देशांशी आपली तुलना करण्या आधी स्वतःच्या वागण्याची तुलना तिथल्या लोकांशी करा... सगळं काही सरकार तर करणार नाही ना? आपण सुद्धा काहीतरी जबाबदारी घ्या. आपल्या भारताचं वैशिष्ट्य म्हणजे, आपली एकजूट, एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांच्या जाती - धर्मांचा सन्मान! त्याला कधीही तडा जाऊ देऊ नका आणि नेहमी काळाबरोबर चालत रहा... जगात जे चांगले बदल होतात ते लवकर स्वीकारा.... कारण वेळ कोणासाठी थांबत नाही... वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करत राहणे आवश्यक आहे... " हेमा म्हणाली.

"मी एवढंच सांगेन, तुम्ही कितीही मोठे असलात, कितीही बुद्धिमान असलात तरी समोरच्याला बोलण्याने दुखवू नका... एक मेकांना सहाय्य करून मोठे व्हा! ओढायचंच असेल तर पाय नका ओढू, हात ओढून वर खेचा!" निशा म्हणाली.

सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला... सगळे आपापल्या घरी गेले...

"आज जेनिका दिदी आणि जॉन दादा असते तर बरं झालं असतं ना? त्यांना किती आनंद झाला असता..." निशा म्हणाली.

"हो गं! पण, असुदे आपण त्यांना व्हिडिओ कॉल करून सांगूया सगळं..." हेमा म्हणाली.

संध्याकाळी त्या दोघांना हि बातमी कळवली... जेनिका आणि जॉन सुद्धा खूप खुश झाले.... दुसऱ्या दिवशी लोकल पेपर मध्ये हि बातमी छापून आली.... आजू बाजूच्या गावांमध्ये सुद्धा आता आमगाव चा मान वाढला होता... हेमा आणि निशा मुळे त्यांना काम सुद्धा मिळत होतं! काही दिवसांनी हि बातमी देशाच्या सगळ्या न्यूज चॅनेल वर आली.... यामुळे अजूनच दोघींची प्रसिद्धी झाली... त्यांच्यामुळे बऱ्याच जणांना रोजगार मिळाला, भारताच्या परकीय गंगाजळीत चांगलीच वाढ होत होती... गावात सुद्धा हे समजल्यावर सगळे आनंदी झाले... एका छोट्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं ठरलं... जेनिका आणि जॉन ने व्हिडिओ कॉल द्वारे हे अनुभवलं आणि जेनिका ने हा लाईव्ह कार्यक्रम तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला...

"थँक्यू! तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आधार दिलात आणि आमच्या पाठीशी सुद्धा उभे राहिलात..." हेमा आणि निशा ने सगळ्यांचे आभार मानले...

'अतिथी देवो भव' आता फक्त उंच भरारी घ्यायला तयार होतं! हेमा आणि निशा ने ज्यांनी आपल्या संस्कृती ला नावं ठेवली त्यांना त्यांची चूक उमगली असेल याची आशा ठेवत होते... दुसऱ्या दिवशी हेमाच्या मोबाईल वर एक फोन आला...

"हॅलो! मी हेमा सोबत बोलतेय का?" समोरची व्यक्ती म्हणाली.

"हो! आपलं काही काम आहे का?" हेमा ने विचारलं.

"आपण इंटरव्यू च्या ठिकाणी भेटलो होतो... मी तुझा आणि तुझ्या मैत्रिणीचा अपमान केला त्या बद्दल सॉरी म्हणायला फोन केलाय..." ती मुलगी म्हणाली.

"तुम्ही आमचा नाही आपल्या संस्कृती चा आणि भाषेचा अपमान केला होतात... मला सॉरी बोलून काही होणार नाही..." हेमाने सडेतोड उत्तर दिलं!

"हो माहितेय! माझं चुकलं... मी आणि आमचे इतर सहकारी आता ऑफिस ची पिकनिक 'अतिथी देवो भव' मध्ये बुक करून आमची चूक सुधारणार आहोत." तिने सांगितलं.

"ठीक आहे... तुमचं स्वागत आहे...." हेमाने सांगितलं.

"पुन्हा एकदा सॉरी... लवकरच भेटू..." ती म्हणाली आणि फोन ठेवला.

हेमाने निशाला या बद्दल सांगितलं. दोघींना आता समाधान वाटत होतं! 'अतिथी देवो भव' आता मोठं होत चाललं होतं फक्त आणि फक्त एका प्रामाणिक हेतू च्या पायावर! आपली संस्कृती आणि आपुलकी जगभर पसरवणे...

समाप्त.
*************************
ऑड वाट लिहिण्याचं उद्दिष्ट म्हणजे आपल्या देशात बरेच ग्रामीण भाग आहेत! जेव्हा ग्राम विकास होईल तेव्हाच संपूर्ण देशाचा विकास होईल.... आपल्या देशातील विविधता मग ती वेष, अन्न, भाषा, धर्म आणि बरंच काही... हीच आपली खरी ताकद आहे.... याच्या जोरावर आपण नक्कीच प्रगती करू शकतो... छोट्या छोट्या गोष्टींचा मोठ्या रुपात व्यवसाय शक्य आहे! ऑड वाट म्हणजे एका व्यवसायाची ब्लु प्रिंट सुद्धा सिद्ध होऊ शकते... फक्त गरज आहे तुमच्यातल्या हिमतीची आणि संयमाची! हीच कथा लिहिण्याचं दुसरं कारण म्हणजे, जेव्हा आपल्याला नकारात्मक वाटतं तेव्हा जे काही आपण सकारात्मक पाहतो किंवा वाचतो त्याचा जास्त प्रभाव आपल्यावर पडत नाही कारण, आपण ती गोष्ट आपल्या आयुष्याशी जोडू शकत नाही म्हणून हा साधासा प्रयत्न! शेवटी जाता जाता एक सांगते; "आपण जोवर स्वतःहून हार मानत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही..."

तुम्हाला हि हेमा, निशा ची ऑड वाट कशी वाटली नक्की सांगा... तुमच्या आयुष्यात यामुळे थोडी जरी सकारात्मकता आली असेल तरी या कथेचं सार्थक होईल...

🎭 Series Post

View all