Login

ऑड वाट (भाग-१)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-१)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
****************************
"लांबचा प्रवास आहे बाळा... जरा जपून जा हं... बस मधून उतरल्या उतरल्या फोन करून कळव... मी तुझ्या फोन ची वाट बघतेय..." हेमाची आई; गोमती हेमाला सगळ्या सूचना करत म्हणाली. 

"हो आई! नको काळजी करुस. मी एकटी कुठे जातेय... निशा आहे की सोबत! आणि बस मध्ये बसवून द्यायला बाबा येतायत.... आम्ही दोघी जाऊ नीट..." हेमा आई ला समजावत म्हणाली. 

"हेमा.... अगं आवरलं का तुझं? निघूया का?" निशा ने दारातून हाक मारून विचारलं. 

"हो झालंच आहे... बस दोन मिनिटं... बाबा माझ्या फोन मध्ये बॅलन्स टाकायला गेलेत ते आले की निघूया..." हेमा म्हणाली. 

एवढ्यात हेमाचे बाबा आले.... "चला गं पोरींनो! निघूया का?" त्यांनी दारातूनच विचारलं. 

"अहो थांबा जरा.. दोघींच्या हातावर दही साखर देते..." हेमाची आई दही साखरेची वाटी घेऊन येत म्हणाली. 

तिने दोघींना दही साखर दिलं! दोघींनी देवाला नमस्कार केला आणि या उभयतांना सुद्धा नमस्कार करून सोबत न्यायचं सामान घेतलं. हेमाच्या बाबांनी दोघींना बस मध्ये बसवून दिलं... आता दोघींचा प्रवास सुरु झाला...
***********************
हेमा आणि निशा दोघी एका छोट्याश्या गावात राहणाऱ्या सामान्य मुली! दोघींची एका खोलीची घरं, उदरनिर्वाहासाठी हेमाचे आई - बाबा शेतीचं काम करायचे त्यांचा वडिलोपार्जित एक लहानसा जमिनीचा तुकडा होता आणि निशा ची आई मजुरी! तिचे बाबा तर १३ वर्षांपूर्वीच देवाघरी गेले होते... निशाचे बाबा गेल्यावर तिच्या आईनेच तिचा सांभाळ केला! दोघींच्या घरची परिस्थिती बेताचीच! दोघींनी हुशारीच्या बळावर स्कॉलरशिप मिळवून अर्थशास्त्र विषय घेऊन पदवी पर्यंतचं शिक्षण तालुक्याच्या गावी पूर्ण केलं.... आज त्या दोघींसाठी खूप महत्वाचा दिवस होता.... त्यांच्याच गावात राहणाऱ्या पण, सध्या मुंबईत स्थिरस्थावर झालेल्या पंकज दादाने त्यांना एका कस्टमर केअर कंपनीत इंटरव्ह्यू साठी जायला सांगितलं होतं.... आपल्याला सुद्धा आता मुंबई सारख्या शहरात जायला मिळणार, आपल्या आई - बाबांना सगळं सुख देता येणार म्हणून, दोघींनी इंटरव्ह्यू ची छान तयारी केली होती... बस मध्ये सुद्धा त्या फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूचाच विचार करत होत्या.... मुंबईत पोहोचल्यावर पंकज दादाने जो पत्ता पाठवला होता तो विचारत विचारत या दोघी ऑफिस मध्ये पोहोचल्या. बरेच उमेदवार तिथे आले होते... संपूर्ण दिवस तिथेच संपला.... पण, या दोघींचंही सिलेक्शन तिथे झालं नव्हतं.... थोड्या उदासीतच त्या पुन्हा बस स्टॉप वर आल्या.... 

"हेमा! आपण घरी गेल्यावर काय सांगायचं गं? एवढ्या आशेने इथे आलो होतो... चूक आपलीच आहे! आपण अजून अभ्यास करायला हवा होता..." निशा रडवेल्या सुरात हेमाला म्हणाली. 

"निशा आधी तू शांत हो! आपण आपला पूर्ण प्रयत्न केला ना? अगं आत्ताशी हि सुरुवात आहे... आज ना उद्या आपल्याला सुद्धा काम मिळेल... नको काळजी करुस!" हेमा निशाला समजावत म्हणाली. 

"तुझं सगळं पटतंय गं! पण, आई ला आता जास्त काम होत नाही... बाबा तर मी लहान असतानाच आम्हाला सोडून गेले... आम्ही दोघीच आता एकमेकींसाठी आहोत! आपण मुंबई सारख्या शहरात इंटरव्ह्यू ला जाणार म्हणून माझी आई आणि तुझे आई - बाबा किती खुश होते... त्यांनी सुद्धा काही स्वप्न बघितली असतील ना आपण निघताना? आपणच कमी पडलो कुठेतरी!" निशा म्हणाली. 

निशाच्या बोलण्यावरून तिला खूप त्रास होतोय हे हेमाच्या लक्षात आलं... एवढ्यात त्यांच्या गावाला जाणारी बस आली... दोघी बस मध्ये चढल्या.... मुंबई ला येताना जेवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता त्या पेक्षा जास्त आत्ता दुःख होतं! निशाला तर खूपच वाईट वाटत होतं... तिला अजून त्रास होऊ नये म्हणून हेमाने तिला कसंबसं झोपायला लावलं! ती सुद्धा मागे सीट वर डोकं ठेवून आज घडलेल्या सगळ्या घटनांचा विचार करू लागली..... तिच्या मनात एक वाक्य सारखं घुमत होतं; "तुम्हाला इंग्लिश नीट बोलता येत नाही.... सॉरी सध्या आम्ही तुम्हाला इथे काम देऊ शकत नाही.... जेव्हा डोमेस्टिक लेवल साठी कर्मचारी हवे असतील तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू...." 
            ती स्वतःच्याच मनाशी आता बोलत होती; "खरंच फक्त इंग्लिश सराईत पणे बोलता आलं नाही म्हणून असं होऊ शकतं का? आपण किती पटकन विदेशी संस्कृती आत्मसात केलीये.... सगळीकडे इंग्लिश गरजेचं झालंय.... पण, आमच्या सारख्या लहान गावातील लोकांनी काय करावं? घरात कोणी शिकलेलं नाही, गावात धड शाळा नाही... आहे ती मराठी! आम्ही मराठी माध्यमात शिकलो हे चूक आहे का? कोणतीही भाषा शिकायची झाली तर कोणी शिकवून ती कशी आत्मसाद करता येईल? त्यासाठी त्या भाषेचा लळा लागायला हवा.... एक आपुलकी वाटायला हवी... आपल्याशी त्याच भाषेत संवाद साधायला माणसं हवीत! इथे आम्ही दोघी इंग्लिश मध्ये बोललो तरी कोण चुकतंय हे कळणार कसं? नाही... काहीतरी करावंच लागेल... आपण जशी पाश्चात्य संस्कृती आपलीशी करतोय तशीच आता भारतीय संस्कृती सुद्धा मोठी केली पाहिजे.... देवा... आता तूच काहीतरी मार्ग दाखव..." हेमाच्या मनात द्वंद्वव सुरु होतं... एवढ्यात कंडक्टर ने वाजवलेल्या बेल ने तिची तंद्री तुटली.... त्या दोघींचा स्टॉप आला होता... हेमा ने निशाला उठवलं आणि दोघी उतरल्या... त्यांना घ्यायला हेमाचे बाबा आले होते.... 

"प्रवास कसा झाला? आणि मिळाली का नोकरी?" त्यांनी विचारलं. 

"प्रवास छान झाला...पण ते..." हेमा बोलता बोलता थांबली. 

"असुदे! कळलं मला... दोघी सुद्धा वाईट वाटून घेऊ नका.... आज नाही तर उद्या, हे नाही तर ते काहीतरी काम मिळेलच! असं समजा आज तुम्ही मुंबई ला फिरून आलात!" हेमाच्या बाबांनी दोघींना समजावलं. 

सगळेजण घरी पोहोचले.... निशा ने सुद्धा आई ला जे घडलं होतं ते सांगितलं... निशाच्या आई ने सुद्धा तिची समजूत काढली... त्या दोघी सुद्धा घरी गेल्या... रात्री बऱ्याच उशिरा हेमाला झोप लागली.... सकाळी जाग आली ते तिच्या बाबांच्या आवाजने... 

"हेमा! बाळा उठ आता... बघ पाहुणे आलेत!" तिच्या हाताला हलवून त्यांनी तिला उठवलं. 

हेमाने पटकन उठून अंथरुणाची घडी केली आणि बाहेर जाऊन तोंड धुवून आली... एक फॉरेनर जोडपं तिथे आलं होतं! 

"Hello! I'm Jenika and meet my husband Jon." जेनिकाने हात पुढे करत स्वतःची ओळख करून दिली. 

"Hello! I'm Hema.. and he is my father Bhupesh" हेमाने तिची आणि बाबांची ओळख करून दिली. 

आता पुढे काय बोलणार, हे इथे कसे आले आहेत हे इंग्लिश मध्ये विचारण्यासाठी हेमा मनातल्या मनात वाक्य रचत होती... एवढ्यात जॉन च बोलू लागला...

"आमी इते फिरायला आलो... रस्ता विसरलो..." तो फॉरेनर टोन मध्ये बोलला. 

"प्लिझ तुमी हेल्प करा... आमाला तुमचं व्हिलेज दाखवा..." जेनिका म्हणाली. 

या दोघांना थोडं फार मराठी येतंय म्हणून हेमा ला बरं वाटलं... 

"हो नक्कीच! तुम्ही बसा... चहा नाश्ता करा मग आपण जाऊ फिरायला..." हेमाने सांगितलं. 

घराबाहेर असणाऱ्या खाटेवर दोघं बसले... हेमा आई ला बोलवायला घराच्या मागे गेली... सकाळची वेळ म्हणजे आई विहिरीतून पाणी भरत असणार हे तिला माहित होतं! तिने जाऊन आई ला बोलावून आणलं... 

"नमस्कार! मी गोमती... हेमाची आई... तुम्ही थोडावेळ बसा मी पाच मिनिटात काहीतरी खायला आणते..." गोमती म्हणाली आणि घरात गेली. 

"हेमा! मला पण तुमचं किचन बघायचं आहे... इंडिया मदे without gas कूकिंग कसं करतात मला पहायचं!" जेनिकाने तोडक्या मोडक्या मराठीत तिची ईच्छा बोलून दाखवली. 

"हो का नाही... या ना.." हेमा तिला घरात घेऊन गेली. 

हेमाचे बाबा पाहुण्यांना गाव दाखवायचं म्हणून बैलगाडी ला बैल जुंपून ठेवायला जाऊ लागले... एवढ्यात जॉन म्हणाला; "तुमचं फार्म आहे का?" 

"इथं फार्म वैगरे नाही... आम्ही शेतकरी माणसं! असं इथे काही नसतं त्या साठी तुम्हाला शहरात जावं लागेल..." हेमाचे बाबा म्हणाले. 

निशा त्यांच्या घरीच येत होती... तिने हा संवाद ऐकला... ती पुढे येऊन म्हणाली; "काका! फार्म म्हणजे शेत... ते तुम्हाला शेत आहे का विचरतायत..." 

"असं का... मला वाटलं ते शहरात मोठी बाग असते ते म्हणतायत.. शेत आहे की! तुमचं खाऊन झालं की जाऊ शेतात... त्या साठीच बैलगाडी तयार करून येतो.. ए निशा! जरा थांब हा यांच्या सोबत..." हेमाचे बाबा म्हणाले. 

निशाने मानेनेच हो म्हणलं... ते बैलगाडी ला बैल जुंपायल गेले... 
**********************
घरात जेनिका सगळं न्याहाळत होती... तिच्या कॅमेरा मध्ये तिने सगळे फोटो काढून घेतले... हेमाची आई चुलीपाशी बसून चहा करत होती आणि नाश्त्याला थालिपीठाची तयारी करत होती... जेनिकाने ते सुद्धा फोटो काढून घेतले... 

"Can I also try this fu fu..." जेनिकाने हेमाच्या आई ला चुलीत फुंकणीने फुंकताना बघून विचारलं. 

"अ? काय म्हणाल्या गं या?" त्यांनी हेमाला विचारलं. 

"अगं आई त्यांना सुद्धा चूल वापरून बघायची आहे..." हेमाने समजावलं. 

"त्यांना सांग, नको! तुम्हाला झेपायचं नाही..." हेमाच्या आई ने नकार दिला. 

"No no aunty! सगळा जेपणार... जस्ट एकदा..." जेनिका म्हणाली. 

हेमाने सुद्धा आई ला खुणेनेच दे एकदा म्हणून सांगितलं. जेनिकाने सुद्धा चुलीत फुंकणीने फुंकर घातली... धुरामुळे तिला थोडा त्रास झाला पण ती हे सगळं एन्जॉय करत होती... अचानक तिने हेमाच्या हातात स्वतःचा कॅमेरा ठेवला... आणि म्हणाली; "Please click my pictures.."

"अहो पण मला नाही येत कॅमेरा वापरायला..." हेमा पुन्हा तिच्या हातात कॅमेरा देत म्हणाली. 

जेनिकाने तिला कॅमेरा बद्दल थोडक्यात शिकवलं... हेमाने सुद्धा तिचे फोटो काढले... जेनिकाने फोटो पाहिले... 

"Wow nice clicks... Your grasping power is so strong..." जेनिका म्हणाली. 

"थँक्यू" हेमा स्मित करत म्हणाली. 

"हेमा! जा त्यांना बाहेर चटई अंथरून दे... मी चहा नाश्ता घेऊन येते..." हेमाची आई म्हणाली. 

हेमाने चटई अंथरली... त्या दोघांना चटई वर कसं बसावं कळत नव्हतं! हेमाने त्यांना बसून दाखवलं... ते दोघं बसले.... जेनिका जॉन ला फोटो दाखवत होती... तोवर निशा ने हेमाला बाजूला घेतलं....

"काय गं कोण हे पाहुणे? सगळ्या गावात चर्चा पसरली आहे तुमच्या घरी विदेशी पाहुणे आलेत म्हणून..." निशा ने सांगितलं. 

"अगं ते रस्ता चुकलेत... पण, मला वाटतंय कदाचित देवाने दिलेला हा संकेत आहे... माझ्या डोक्यात एक कल्पना आहे..... सुरुवात आपण दोघी करू..." हेमा काहीतरी विचार करून म्हणाली. 

"काय? कसली सुरुवात? नीट सांग ना काहीतरी..." निशा ला काही न समजल्यामुळे तिने विचारलं. 

"ए पोरींनो या इकडे... खाऊन घ्या थोडं... पाहुण्यांशी पण बोला जरा.. त्यांना एकटं नको वाटायला..." हेमाच्या आई ने दोघींना बोलावलं. 

"हो आई आलेच! निशा, आत्ता चल... सगळं  सांगते नंतर... " हेमा म्हणाली. 

चहा नाश्त्या सोबत दोघी जेनिका आणि जॉन सोबत बोलत होत्या.... त्यांच्यात आता काहीही परकेपणा जाणवत नव्हता... या दोघींचं तोडकं - मोडकं इंग्लिश ते दोघं समजून घेत होते आणि त्यांचं मराठी या दोघी!

"हेमा! या गोल गोल फूड ला काय बोलतात?" जॉन ने विचारलं. 

"हे थालीपीठ आहे... हे पोट भरणीच तर असतंच शिवाय पौष्टिक सुद्धा! म्हणजे हेल्दी!" हेमा म्हणाली. 

 जेनिकाने थालिपीठाचे सुद्धा फोटो काढून घेतले... आणि हेमाला पुन्हा बोलायला लावून व्हिडिओ सुद्धा शूट केला... जॉन आणि जेनिका फॉरेनर असल्यामुळे त्यांना गावातल्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या... ते सगळं एन्जॉय करत होते... 

"चला आता आपण शेतात जाऊ..." हेमाचे बाबा सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर म्हणाले. 

सगळे आता शेतात जायला निघाले.... 
क्रमशः....
************************
हेमाच्या डोक्यात काय युक्ती आली असेल? देवानेच मार्ग दाखवला असं तिला का वाटलं असेल पाहूया पुढच्या भागात... 

🎭 Series Post

View all