ऑड वाट (भाग-५)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
जेनिकाशी जेव्हा फोन वर बोलणं झालं तेव्हा भारतात रात्र होती.... बराच उशीर झाला होता...
"हेमा! मी उद्या लवकर येते इथे.... आपल्या हातात तीन दिवस आहेत आपल्या पहिल्या गेस्टच्या जय्यत स्वागताच्या तयारी साठी..." निशा म्हणाली.
"हो... मला तर आज रात्री झोपच लागणार नाहीये... आपण ना काय काय सुचतंय ते उद्या बोलूया... दोघींच्या कल्पना मिळून छान काहीतरी करू..." हेमा सुद्धा आनंदी होऊन म्हणाली.
"चल मग बाय.... उद्या भेटूच!" निशा उठून दाराजवळ जात म्हणाली.
दुसऱ्या दिवशी दोघींनी घरात सुद्धा सांगून ठेवलं... घरात जे जे छोटे बदल करता येतील ते करायचं ठरलं! थोडी आवरा आवरी, पाहुणे आल्यावर अंथरायच्या चटया, गोधड्या, जेवणाचे मेन्यू सगळं काही ठरवलं!
"निशा! मी काय म्हणतेय, आपण एकदा शेतात जाऊन येऊ... आपल्या गेस्ट ना कुठे कुठे घेऊन जायचं, कुठे त्यांना चांगलं फोटो शूट करता येईल, कुठे त्यांना जवळून पक्षी पाहायला मिळतील सगळं नीट प्लॅनिंग करून लिहून ठेवूया... म्हणजे त्यांना आपल्याला दरवेळी काहीतरी नवीन दाखवता येईल आणि त्यांना खूप आनंद होईल...." हेमा म्हणाली.
"हो चालेल! जे इतर टुरिस्ट करत नाहीत आपण ते करणार... आणि आपण त्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात जे खेळ खेळता येतील ते सुद्धा खेळूया... जे भारतात आधी खेळले जात होते... म्हणजे बघ, आपण शेतातल्या वडाच्या झाडांच्या पारंभ्या वापरून झोके करूया, बिट्ट्या गोळा करून त्या खेळायला शिकवूया, सागरगोटे सुद्धा खेळू शकतो आपण! एवढंच नाही तर भोवरा सुद्धा त्यांना खेळायला शिकवू शकतो..." निशा म्हणाली.
"हो चालेल ना नक्कीच! यात सगळेच खूप एन्जॉय करतील अगं आणि भारतातील जे जुने खेळ आता शहरातल्या आपल्या पिढीतल्या मुलांना सुद्धा माहित नाहीयेत त्यांना सुद्धा कळतील..." हेमा म्हणाली.
"मी अजून एक सांगू का? यामुळे शेतात कामात मदत होईल..." निशा ने विचारलं.
"अगं विचारतेस काय? बोल ना..." हेमा म्हणाली.
"आपण, शेतात जी कामं रोज करतो, ती या विदेशी लोकांसाठी नवीनच ना! मग त्यांना सुद्धा आपण हि कामं दाखवून करायला सांगू शकतो... जसं जेनिका दिदी आणि जॉन दादा करत होते अगदी उत्साहाने तसंच हे सगळे सुद्धा करतील..." निशा ने तिच्या डोक्यात जे सुरु होतं ते बोलून दाखवलं....
"हो! ते तर आपण त्यांना सांगायची गरजच पडणार नाही... शेतात इतर शेतकऱ्यांना काम करताना बघून ते स्वतःच सगळं करणार..." हेमा म्हणाली.
"ते आहेच! चल, आता आपण जाऊया ना शेतात? पुढची तयारी करायला..." निशा म्हणाली.
"हो हो चल..." हेमा म्हणाली.
दोघी रस्त्याने जाता जाता सगळ्या पायवाटेचे सुद्धा नीट निरीक्षण करत होत्या... रस्त्याच्या कडेला उमललेली फुलं, दुर्वा सगळं पाहत दोघी चालत होत्या.... त्यांना भारतात जी पिकं येतात, झाडं असतात त्या बद्दल सुद्धा व्यवस्थित माहिती द्यायची हे सुद्धा ठरलं! दुपार पर्यंत दोघींनी जवळ जवळ सगळं व्यवस्थित लिहून ठेवलं आणि पुन्हा घरी आल्या.
"काय गं झाली का पाहुण्यांच्या स्वागताची तयारी?" हेमाच्या आई ने विचारलं.
"तशी झालीये बघ... आता फक्त हे तोरण एवढं पूर्ण करून दाराला लावायचं आहे... बाकी गावात आम्ही पाहुणे येणार आहेत म्हणून सांगितलं आहेच! सगळे त्यांना आपल्याच घरातलं समजून आपुलकीने भेटायला येतील, त्यांचं स्वागत करतील आणि त्याच आपले पणाने निरोप सुद्धा देतील... हेच तर आपल्या भारतात विशेष असतं ना? कोणाकडेही पाहुणा आला तरी त्याचं सगळं आपुलकीने करायचं! हाच संदेश या निमित्त त्यांना मिळेल..." हेमा म्हणाली.
"बरं... चालू दे तुम्हा दोघींचं! मला विश्वास आहे तुम्ही जे कराल ते पाहुण्यांना नक्की आवडेल... मला पण एक सुचतंय सांगू का?" हेमाच्या आई ने विचारलं.
"अगं सांग ना... जेवढं आपल्याला नाविन्य ठेवता येईल तेवढं छानच आहे..." हेमा म्हणाली.
"पाहुण्यांना सकाळी लवकर उठवायचं आणि त्यांच्या कडून व्यायाम म्हणून सूर्य नमस्कार, योगासनं असं सगळं करून घ्यायचं! जेवणाच्या आधी सुद्धा 'वदनी कवळ घेता..' म्हणून दाखवायचं... आणि हळूहळू त्यांना सुद्धा शिकवायचं! जेवढं शिकतील तेवढं शिकतील... शेवटी तीच आपली संस्कृती आहे ना!" हेमाची आई म्हणाली.
"हो मावशी! खरंच खूप छान कल्पना दिलीत तुम्ही! यामुळे त्यांचा व्यायाम पण होईल आणि भारताची पूर्वापार चालत आलेली योगासनांची माहिती, अन्न म्हणजे परमेश्वर हे विचार सुद्धा पोहोचवायला सोपं जाईल..." निशा एकदम उत्साहित होत म्हणाली.
"चला आता पटकन जेवून घ्या आणि मग तुमच्या कामाचं चालू दे!" हेमाची आई त्या दोघींना ताटं घेत म्हणाली.
"हो चालेल... पण, बाबांना डबा देऊन येऊ का आधी?" हेमाने विचारलं.
"नको! तुम्ही दोघी जेवा... मी चालली आहे शेतात... त्यांच्या बरोबरच जेवते मी..." हेमाच्या आई ने सांगितलं.
"चालेल..." हेमा म्हणाली.
दोघींनी जेवायला बसल्या... जेवता जेवता सुद्धा त्यांच्या याच कामाच्या गप्पा सुरु होत्या.... आता दोन दिवस राहिले आहेत, काही तयारी बाकी आहे का? काही आणायचं आहे का? याच्या विचारात दोघींनी जेवणं आटोपली...
"ए... जेनिका दिदी ना फोन कर ना... आपण काय काय तयारी केली हे त्यांना सांगूया... त्यांचं मत पण मिळेल आपल्याला...." निशा म्हणाली.
"थांब जरा... तिथे आत्ता किती वाजले असतील काय माहित... रात्र असेल तर?" हेमा म्हणाली.
"बरं... मग, त्यांना मेसेज करून ठेव ना... त्या करतील फोन..." निशा ने एक पर्याय सुचवला.
"हा हे चालेल... एक मिनीट लगेच करते मेसेज..." हेमा मोबाईल हातात घेत म्हणाली.
"Hello didi! We want to share our planning with you... Plz call when you are free.." हेमा ने मेसेज केला..
पुन्हा दोघी त्यांच्या कामाला लागल्या. निशा तोरण करत बसली आणि हेमाने तोवर घरताली कामं करायला सुरुवात केली... सगळी कामं होता होता दोन ते तीन तास गेले... निशा ने तोरण सुद्धा पूर्ण केलं!
"हेमा! हे बघ... कसं वाटतंय?" निशा ने हेमाला तोरण दाखवत विचारलं.
"मस्त... छान बनवलं आहेस... जा दाराला लावून टाक..." हेमा म्हणाली.
क्रोशा वर्क ने केलेलं ते तोरण खूपच छान दिसत होतं! गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन, हिरव्या रंगाने केलेलं पानांचं डिजाईन या मुळे त्याला अजूनच शोभा आली होती... निशा ने ते दाराला लावलं! मापात पण एकदम परफेक्ट झालं होतं...
"वा! मस्त... छान दिसतंय...." हेमा तोरणाकडे बघत म्हणाली.
दोघी मिळून एक एक काम हातावेगळं करत होत्या. आता दोघी फुलं, झाडं, भारतीय खेळ याची माहिती त्यांना समजेल अशी सांगता आली पाहिजे म्हणून तयारी ला लागल्या. एवढ्यात हेमाचा फोन वाजला. जेनिका ने फोन केलेला होता..
"Hello! Good morning! तुमी कसे आहात?" जेनिका ने विचारलं.
"इथे Good evening आहे... आणि आम्ही मस्त मजेत आहोत..." हेमा म्हणाली.
"Ohh ya! या टाइम डिफ्रेन्स वरून आटवला, Wilson family आज इंडिया मदे गेला असेल..." जेनिका म्हणाली.
"काय? अहो पण ते तर तीन दिवसांनी येणार म्हणाले..." हेमा टेन्शन मध्ये येत म्हणाली.
"Chill! Chill! Don't worry... तिते ते after 3 days नि येनार but, जेट लॅग मुले एन्जॉय कमी नको सो, ते एका हॉटेल मदे तांबणार..." जेनिका ने हेमाला शांत करत सांगितलं.
"नशीब! तुम्ही तर घाबरवलंच मला... बरं, आम्ही दोघींनी जी तयारी केली आहे ती तुम्हाला दाखवायची आहे आणि काही प्लॅंनिंग सांगायचं आहे..." हेमा म्हणाली.
"असा गाबरून नाय जायचा... आता तुमी दोगी Business Women होनार ना! जसा situation येनार तसा तुमाला quick decision गेता आला पाहिजे... होईल तुमाला पन प्रॅक्टिस! All the best!" जेनिका दोघींना समजावत म्हणाली.
निशा आणि हेमा ने मिळून जेनिका ला सगळं सांगितलं. जेनिका ला सुद्धा त्यांची सगळी तयारी आवडली. जेनिकाशी बोलणं झाल्यावर दोघींना आता निश्चिन्त वाटत होतं!
"चला! आपलं अर्ध टेन्शन गेलं... मी आता निघते घरी... दिवा लावायचा आहे सात वाजत आलेत!" निशा हेमाच्या घरातून निघत म्हणाली.
"हो.. उद्या सुद्धा आपण लवकर भेटू... शेतात तयारी करायची आहे खेळाची... आणि मृदा परिक्षणाचे रिपोर्ट्स पण आलेत! गुलाब, मोगरा अशी फुलं आपण लावू शकतो असं सांगितलं आहे त्यांनी... तर त्याची रोपं आणायला सुद्धा किती खर्च येईल ते बघूया..." हेमा विचार करत म्हणाली.
निशा हो हो करत निघाली. दोन मिनिटात हेमाचे आई - बाबा सुद्धा आले.... त्यांनी सुद्धा त्यांच्या तयारीची चौकशी केली.... हेमाने सगळं सांगितलं आणि आई च्या मदतीला गेली.... रात्रीची सुद्धा जेवणं झाली, बाकी कामं सुद्धा उरकली... हेमा ने अंथरूण घातलं... विचारा विचारातच ती झोपली...
दुसऱ्या दिवशी निशा आली... हेमाने घरातलं थोडं काम आवरलं आणि दोघी शेतात जायला निघाल्या.
"ऐक ना! माझ्या कडे खाऊ साठी दिलेले पाचशे रुपये आहेत... त्यात जेवढी रोपं येतील तेवढी घेऊया..." हेमा म्हणाली.
"चालेल! माझ्याकडे तीनशे रुपये आहेत! एक काम करू ८०० ची घेऊया रोपं! शेतात छान पैकी दिसायला छान दिसतील अशी मांडणी करून लावूया हा..." निशा म्हणाली.
"हो! म्हणून तर आधी शेतात जायचं आहे... तिथे थोडी तयारी करून मग जाऊया खरेदीला." हेमा म्हणाली.
क्रमशः.....
************************
हेमा आणि निशा आता रोपं खरेदी करून शेतात लावणार आहेत... निसर्गाच्या सानिध्यात खेळता येतील अशा खेळांची तयारी आणि आता दोनच दिवसात पाहुण्यांचे आगमन... त्यांचे स्वागत सगळे गावकरी कसे करतायत पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा