ओढ तुझ्या प्रेमाची भाग २

तो पुन्हा पाठी वळून बघत होता आणि मिस फायर म्ह्णून बोलत होता. वागण्यात समंजस आणि दिसायला देखणी राधा, तिला खूप मुलांनी प्रपोस केलं होतं पण तिला एकही आवडला नव्हता. राज मात्र आज मनात बसला होता.
ओढ तुझ्या प्रेमाची भाग २

पूर्वार्ध.
गेल्या भागात आपण पाहिले की, राधा आणि ओवी कॉलेजला गेल्या होत्या. तिथे राज नावाचा मुलगा प्रॉफेसर बनून सर्वांना चिडवत होता. राधाला त्याने तिचे नाव विचारले तितक्यात मॅडम आल्या. ओवीला राग आला. तिने त्याच्या हातावर फटका मारला. राधा तिला समजावत होती. राजला राधाचा समंजसपणा भावाला. आता पाहू पुढे.


राधाचं गोड वागणं राजला फार आवडलं. ज्या पद्धतीने ती ओवीला शांत करत होती ते पाहून राजला राधा कशी आहे हे सहज लक्षात आले.
ओवीचा नाकावरचा राग पाहून तर त्याला हसू येत होतं.

कॉलेजमधून तो बाहेर पडला. खिशात हात घालून हळूहळू पावलं पुढे टाकत चालला होता.
अमोलने त्याला पाहिले.

"राज, थांब जरा." अमोल.

राज थांबला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होते.

"राज क्या बात है? इतकं हसू कशासाठी?" अमोल.

"काही नाही रे ते ओवीचा राग पाहून हसू येतंय. काय भडकली माझ्यावर."

"ओहह! तो विचार करतो आहेस?" अमोल.

"हम्म.." राज.

"आज जे केलं ते ठीक आहे; पण पुन्हा तिच्या नादाला लागू नको. डेंजर दिसतेय ती. तिचा अवतार पाहून मी देखील घाबरलो. ह्या मुलींचा भरवसा नसतो. कधी काय वागतील काही पत्ता नाही." अमोल.

"अमोल, तू ना खरंच जाम घाबरट आहेस. विनाकारण घाबरतो. काय करणार ती? धुसफूसच करणार." खांदे उडवत राज म्हणाला.

"बरं मी घाबरट?" अमोल.

"हो आहेसच घाबरट. इतकं काही होत नाही. आपले कॉलेजचे दिवस आहेत. मस्त एन्जॉय करायचे. असं करत राहिलो ना तर अर्थ काय कॉलेजला. अमोल, मला ना कॉलेजच लाईफ मस्त जगायचे आहे. जेव्हा माझी नातवंड होतील ना तेव्हा त्यांना माझे किस्से ऐकवायचे आहे." राज अगदी मनापासुन बोलत होता.

अमोलला ते ऐकून हसू आले.

राजने त्याच्या खांद्यावर हलकेसे थोपटले.
"हसतोय काय? खरंच स्वप्न बघावीत आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न देखील."

"राज, तुझी बातच निराळी. सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करणारा आहेस. अगदी युनिक आहेस मित्रा. इथे अभ्यास करायचे कसे हे टेंशन आणि तू तुझ्या नातवंडापर्यंत पोहोचला."
अमोल.

"तुला माहीत आहे का अमोल आपलं फ्युचर किती सुंदर असेल? कसं असेल? हे सारं विचार केला ना तरी भारी वाटतं रे. मला आवडतं स्वप्नांमध्ये रमायला आणि जगायलाही. लाईफ फार अनप्रेडिक्टेबल आहे. पुढे काय होईल हे आपल्या हातात नसतं, मात्र आपलं भविष्य खूप छान असेल हा विचार मनाला नेहमीच ऊर्जा देत राहतो नाही का?" राजच्या डोळ्यात खूप स्वप्न होती.

"राज, ते ठीक आहे. पण आता सध्या अभ्यास देखील आहे पुढ्यात त्याचे काय?" अमोल.

"अमोल, इतकं टेंशन घ्यायचे नाही. गो विथ दी फ्लो माय फ्रेंड."

"तू ना राज एक अजब रसायन आहे. तुला कोणत्याही गोष्टीच टेंशन नसत." अमोल.

"अमोल, टेन्शन कोणाला नसतं? टेन्शन सर्वांनाच असतं. तुला काय वाटतं मला काहीच टेन्शन नाही का? मलाही टेंशन आहेच. मनात खूप सारे नकारात्मक विचार. त्याच्याशी सतत भांडत असतो; पण माहिती आहे का? सतत तेच जर मी डोक्यात घेतलं ना तर माझं श्वास घेणं देखील मुश्किल होऊन जाईन." राज.

अमोल राज असं बोलणं ऐकून चकित व्हायचा ; कारण त्याला नेहमीच वाटायचं राजच्या आयुष्यात काहीतरी नक्कीच घडत आहे; पण तो सांगत नाही. तो समस्येपासून दूर पळत आहे की, त्याला हसत हसत सामोरे जात आहे हेच कळत नव्हतं.

तितक्यात राजला समोरून राधा आणि ओवी येताना दिसल्या. राज पुन्हा मस्करीच्या मूडमध्ये आला. तो अमोलला इशारा करत म्हणाला, "बघ ना मिस फायर आणि मिस कोल्ड येत आहेत."

अमोलला कल्पना होती. हा नक्कीच आता पुन्हा काहीतरी करणार किंवा त्या दोघींना काहीतरी बोलणार. अमोल त्याला खेचतच पुढे घेऊन गेला आणि म्हणाला " ए बाबा मी तुझे हात पाय जोडतो. आता बस आज ऑलरेडी खूप काही करून बसला आहेस. तुझ्यामुळे एक दिवस मी सुद्धा ह्या पोरींचा मार खाईन. चल लवकर." तो राजला खेचतच पुढे घेऊन जाऊ लागला.

राधाची नजर राजवर गेली. तो त्या दोघींनाच पाहत होता.

राधाच्या चेहऱ्यावर हास्य आले. राजची नजर राधावर गेली आणि तो देखील हसू लागला. आणि तो लिप्सिंग करतच मिस फायर असे म्हणाला. अमोलने त्याची मान पकडली आणि पुढे केली. तरी तो पुन्हा मागे वळून पाहत होता. राधाला तर स्वतःच हसू आवरत येत नव्हतं.

ओवी तिला म्हणाली "काय ग काय झालं? कधीपासून हसते आहेस."

राधा इथे तिथे पाहत म्हणाली "काही नाही ग असंच. राधाला माहीत होतं राज बद्दल बोलले तर पुन्हा ती चिडेल, म्हणून ती गप्प बसली.

राधाला न जाणे का त्याचा अवखळपणा खूप आवडला. घरी गेली तरी तिच्या डोक्यात राजचेच विचार येत होते.

राधा येऊन सोफ्यावर बसली. एक ग्लास पाणी प्यायली. तिला राजचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता आणि नकळतपणे तिच्या चेहऱ्यावर हास्य येत होते. सारं काही आठवून तिला भारीच वाटत होतं.

राधाला पाहून तिची आई लता म्हणाली,

"राधा, काय ग आल्यापासून तुला बघते आहे किती हसते आहेस. कॉलेजमध्ये काही झालं का?

राधा म्हणाली, "हो ग आई एका मुलाने ना छान गंमत केली. ब्लॅकबोर्ड समोर येऊन उभा राहिला. आम्हाला वाटलं प्रोफेसरच आहे. वय तर लहानच दिसत होतं; पण त्याने स्वतःची ओळख मी अकाउंटचा प्रोफेसर आहे अशी केली आणि बरोबर त्याने मला उठवलं आणि नाव विचारले. तितक्यात मॅडम आल्या, तो जाऊन स्वतःच्या जागेवर बसला."

हे ऐकून लताला फार हसू आले. काय ग तुम्ही आजकालची पोर बिनदास्त वागता, नाहीतर आम्ही बोलायला देखील घाबरायचो. मोठ्या माणसांचा आमच्या मनात वेगळाच दरारा होता."

"आई, हो गं. मला ना तेच विचार करून हसू येत आहे आणि जास्त करून ओवीचं वागणं मला आठवतंय."

लता म्हणाली, "ओवी, तिने काय केलं बरं? "

"आई, तुला माहित आहे ना किती गरम डोक्याची आहे ती? राज सॉरी म्हणायला आला, तर तिने त्याच्या हातावर चक्क फटका दिला तेही जोरात आणि खूपच चिडली होती. ओवी पण ना खरंच. आई तिला ना राग जास्त आला; कारण राजने मला माझं नाव विचारलं म्हणजे प्रोफेसर बनून माझं नाव विचारलं."

"अच्छा असं तर. ओवी लहानपणापासूनच अशी आहे. तिला जर कोणी काही बोललं तर एखाद वेळेस खपवून घेते; पण तुला कोणी काही बोललं तर तिला ते सहन होत नाही. शेवटी जिवाभावाची मैत्रीण आहे तुझी."

राधा गालातल्या गालात हसत होती.
आई म्हणाली "बरं दोन घास खाऊन घे आणि आपल्याला जरा बाहेर जायचं आहे मार्केटमध्ये.

राधा म्हणाली, "ठीक आहे आई."

आईशी बोलून झाल्यावर देखील राधा विचारात गर्क होती. कधी नव्हे ती आज एका मुलाचा इतका विचार करत होती. दिसायला देखणी, वागण्यात समंजस असल्यामुळे तिला शाळेत अनेक मुलांनी प्रपोज केलं होतं; पण तरीही कोणी तिच्या मनात भरलाच नाही आणि आज मात्र राज तो असा मनात फिरत होता बस रे बस. न जाने का काही केल्या त्याचा विचार जाता जात नव्हता. त्याचे पाठी वळून बघणं पुन्हा चिडवणं. अगदी लहान मुलासारखं त्याचे वागणं तिच्या मनात भरलं होतं. ही प्रेमाची सुरवात होती का?
क्रमशः