ओढ तुझ्या प्रेमाची भाग ४

तू पाहिलं नाहीस का ? तो किती बदलला आहे. Love Is Beautiful Feeling
ओढ तुझ्या प्रेमाची भाग ४

गेल्या भागात आपण पाहिले की, राज आणि राधा दोघेही एकमेकांचे फ्रेंड्स होतात. ओवी पहिल्यांदा राजला फार तीरसटपणे बोलते; पण राधा तिची समजूत घालते. असेही राधाला राजची मैत्री हवी होती. आता पाहू पुढे.

राधा, राज, ओवी आणि अमोल चौघांची चांगलीच गट्टी जमते. मैत्री झाल्यापासून चौघेही लेक्चर नंतर एकत्रच कॅम्पसमध्ये, कॅन्टीनमध्ये असायचे. अगदी स्टेशनवर जाताना देखील चौघे एकत्रच असायचे. ओवी जी राजवर खूप भडकत होती आता मात्र तिला राजची सोबत आवडू लागली होती. राजचं मस्करी करणं, त्याचं बोलणं, वागणं सारं काही आवडू लागलं होतं. त्याच्या वागण्यात आपलेपणा होता.

राज ओवीला तर मिस फायर म्हणूनच बोलवायचा. मिस फायर म्हणून बोलवलं की, जी ओवी आधी चिडायची, आता मात्र तिला फार हसू यायचं. त्याने तिचा नंबर देखील मिस फायर म्हणूनच सेव्ह केला होता. वेगळाच होता राज. राधाला तर राज आयुष्यात आल्यापासून वेगळीच भावना येत होती. सगळं छान वाटत होतं. ती खूपच खुश राहू लागली. राजच काही वेगळं नव्हतं, त्याला राधासारखी एक गोड मुलगी मैत्रीण म्हणून लाभली होती. समजदार होती. तिला राग येणं हा प्रकार नव्हता माहीत. प्रत्येक गोष्ट समजून घेणारी आणि सर्वांना आपलंसं करणारी राधा त्याच्या मनात भरत चालली होती. एकमेकांच्या सहवासामुळे दोघेही अजूनच प्रेमात गुरफटत चालले होते. प्रत्येक क्षणी राजच्या डोक्यात राधाचेच विचार सुरू असायचे. राधाच बोलणं, हसणं सारं काही त्याला हवहवसं वाटत होतं. तिच्यासोबत असताना त्याला खूप बरं वाटायचं. असं वाटायचं की, तिच्या सोबतच राहावं तिच्यासोबत बोलत रहावं. माहित नाही काय जादू होती राधामध्ये? राज तिच्याकडे ओढला गेला होता.

राधाला पाहिलं की, राजचे डोळे चमकायचे. एक वेगळाच उत्साह यायचा. आता ओवीच्याही हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं की, राजला राधा आवडू लागली आहे आणि राधालाही तो आवडू लागला आहे.


एक दिवस ओवी राधाला म्हणाली, "राधा, राज तुझ्या प्रेमात पडला आहे ग आणि तू देखील ना."

राधा हे ऐकून लाजली. हे तर तिच्या मनातलं होतं.

"माहीत नाही ओवी हे प्रेम आहे की काय? पण मला राज माझ्यासोबत असला की खूप बरं वाटतं. त्याचा सहवास, त्याचे माझ्यासोबत असणं, त्याचे बोलणं सारं काही आवडतं. त्याच्यात काय जादू आहे माहित नाही? मला माहित नाही हे काय आहे? पण इतकं जरूर माहित आहे की, हे मला पाहिजे." राधा.


"अगं वेडाबाई हे प्रेमच आहे. तुला काय वाटतं मला कळत नाही? मी तुला लहानपणापासून ओळखते. तुझ्या डोळ्यात जे राजसाठी दिसतं ते प्रेमच आहे. मी तुला असं कधीच पाहिलं नाही. तुझ्यात खूप बदल झाला आहे राधा आणि तो केवळ राजमुळे. राज जेव्हा तुझ्या अवतीभवती असतो तेव्हा तुझा चेहरा बघण्यासारखा असतो. किती खुश असते तू त्याच्यासोबत आणि तो देखील तुझ्यासोबत किती खुश असतो. मला नेहमी चिडवत राहतो मिस फायर आणि तुझ्याशी बोलताना किती अदबीने बोलतो. माझी मस्करी बरोबर करतो ;पण तुझी मस्करी अजिबात करत नाही. कारण त्याला तुझा स्वभाव आवडतो. तुझं समजून घेणं, तुझं गोड बोलणं, तुझं गोड वागणं ह्याच्या तो प्रेमात पडला आहे, म्हणूनच तर असा वागतो ना?"

राधाला ऐकून बरं वाटत तर होतं तरी पण ती ओवीला म्हणाली, "ओवी खरंच असं तुला वाटतं का, की राज माझ्या प्रेमात पडला आहे? का फक्त हे आकर्षण आहे? प्रेम आणि आकर्षण याच्यामध्ये मला गल्लत करायची नाही."

ओवी म्हणाली, "राधा, हे आकर्षण मुळीच नाही. हे आकर्षण कसं असू शकते? तू पाहिलस जेव्हा तू त्याच्याशी बोलते तेव्हा किती मन लावून सारं काही ऐकत असतो. तुझ्यासोबत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता दिसते. तू जेव्हा कॉलेजला येत नाही तेव्हा तो फार अस्वस्थ होतो. त्याची नजर केवळ तुलाच शोधत असते. प्रत्येक वेळी त्याच्या विचारात, बोलण्यात तूच असते. हे आकर्षण कसं असू शकतं राधा? जो मुलगा इतका खट्याळ होता, थट्टा मस्करी करणं त्याला आवडायचं; मात्र तू पाहिले तो किती बदलला आहे ? त्याचं वागणं पहिल्यासारखं राहिलंच नाही. मला तर तो राज आठवतो जो पहिल्यादिवशी प्रॉफेसर बनून मस्करी करत होता. आता मात्र हे सारं बंद झालं आहे. का माहीत आहे?

"का" राधाने गालातल्या गालात हसून विचारले.

"कारण तो तुझ्यात हरवला आहे. तुझ्याशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नाही, सुचत नाही."
ओवी.

ओवी जेव्हा हे सगळं बोलत होती, तेव्हा राधाला राजचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता आणि खरंच जे देखील ती बोलत होती अगदी तसंच होतं. राज बघता बघता खूप बदलला होता. त्याच्या वागण्यात, स्वभावात बराच फरक झाला होता तो केवळ राधामुळे. आणि राधा ते सारं काही अनुभवत होती.

आता राज आणि राधा दोघांना कळलं होतं हे प्रेम आहे. पुढे काय होणार? दोघे प्रेमाची कबुली देतील? की अजून वाट पाहतील?

क्रमशः

अश्विनी कुणाल ओगले.

🎭 Series Post

View all