ओढ तुझ्या प्रेमाची भाग ५

"जीवापाड प्रेम करते, तर तू त्याला का छळते आहेस? " एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर."
ओढ तुझ्या प्रेमाची भाग ५
पूर्वार्ध गेल्या भागात आपण पाहिले की, राधाला ओवी सांगते की, राज तिच्यावर प्रेम करतो आणि ती देखील त्याच्या प्रेमात पडली आहे हे तिच्या वागण्यावरून दिसत आहे.
आता पाहू पुढे.

बघता बघता कॉलेजचे चार वर्ष कसे निघून गेले समजलंच नाही. या चार वर्षाच्या काळामध्ये राधा, राज यांची मैत्री दृढ झाली होती. खरं तर ती मैत्री नव्हती हे दोघांनाही माहीत होतं; पण कबुली मात्र त्यानेही दिली नव्हती आणि तिनेही.

राधा विचार करू लागली की, कॉलेज संपलं की, राजला आपण रोज पाहू शकत नाही. राजची देखील तीच अवस्था होत होती. हे वर्ष संपूच नये असं वाटत होतं. शेवटचं वर्ष म्हणून आता कॅम्पसमध्ये वेळ घालवणे बंद झालं होतं. कॉलेज संपलं की, सगळेच क्लाससाठी लगेच निघून जात, ह्या सर्वांमध्ये राजदेखील नाराज राहू लागला. हातातून काहीतरी निसटून जात होतं.

कॉलेजमधील प्रत्येक दिवस हा वेगळाच होता ; कारण येणारा प्रत्येक दिवस हा विरहाची जाणीव करून देत होता. ओवीला राधाची तगमग कळत होती.

एक दिवस कॉलेज झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले होते. तितक्यात वर्गातील एक मुलगा प्रणव आला आणि राधाला म्हणाला, "राधा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे."

राधा म्हणाली "बोल ना प्रणव."

"राधा, मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे." तो राजकडे पाहत म्हणाला.

राधाने राजकडे पाहिलं. राजला खूप राग येत होता. त्याच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होतं की, तिने प्रणव सोबत जाऊ नये.

राधा पुन्हा प्रणवला म्हणाली,"प्रणव, तुला काय बोलायचं असेल ते इथेच बोल. मी तुझ्यासोबत येणार नाही."

ओवी आणि अमोल तिथेच होते, आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलं होतं की, प्रणवला काय बोलायचं आहे?

' हा राधाला प्रपोज तर करणार नाही ना ?'
हा विचार राजच्या मनाला स्पर्शून गेला.

तो देखील जरा रागातच उठला आणि प्रणवला म्हणाला "प्रणव, तुला जे बोलायचं असेल ते इथेच बोल." राधा तुझ्या सोबत येणार नाही.

'राधाशी बोलत असताना या राजला काय झालं?' ह्या विचाराने तो राजवर भडकून बोलला.

"मी राधाशी बोलतोय तुझ्याशी नाही, तू मध्ये पडू नकोस.'

प्रकरण हाताबाहेर चालले आहे हे दिसताच राधा लगेच राज, प्रणव दोघांना शांत करत म्हणाली, "प्लीज तुम्ही दोघ भांडू नका. प्रणव ठीक आहे मी येते. चल तुला काय बोलायचं आहे ते बोल."


राधा येण्यासाठी तयार झाली हे ऐकताच प्रणवने विजयी मुद्रेने राजकडे पाहिलं.

तो ज्या पद्धतीने राजला पाहत होता त्याचा राधाला प्रचंड राग आला होता. का राग येणार नाही? राजवर ती मनापासून प्रेम करत होती आणि राजशी असं कोणीही वागलेलं तिला खपणार नव्हतं.

राज तोंड पाडून बसला होता. अमोल त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावू लागला,
" हे बघ राज तुला माहित आहे ना आपली राधा कशी आहे? त्याने काहीही बोललं तरी ती त्याला रिस्पॉन्स देणार नाही. तुला कसा पाहत होता? म्ह्णून तिला राग आला."

राजने हाताची बोट आवळली. माहित नाही त्याला इतका राग का येत होता? त्याला दिसतच होतं प्रणव राधावर प्रेम करतो. त्याची नजरच सांगत होती, त्यामुळे आज चक्क येऊन राधाशी इतकं काय महत्त्वाचं बोलणार होता? याची कल्पना आल्याने त्याला अजूनच राग येत होता आणि ओवी हे सगळं पाहत होती.

ओवीला हे सगळं पाहून मनातल्या मनात फार हसू येत होतं. राधासाठी किती व्याकुळ होत आहे. खरंच हा खूप प्रेम करतो राधावर.

राधा कधी येत आहे याची तो वाट पाहत होता. प्रणवकडे तो रागानेच पाहत होता. थोड्यावेळाने राधा आली. तो पटकन राधाकडे गेला आणि विचारले, " काय म्हणत होता प्रणव ? काय इतकं महत्त्वाचं बोलायचं होतं?."

राधा तर राजचा चेहरा निरखून पाहू लागली. त्याला इतकं अस्थिर झालेलं तिने कधीच पाहिलं नव्हतं. नेहमीच रीलेक्स मोडमध्ये राहणारा राज आणि आजचा राज ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता.

त्याचा अवतार पाहून तिला मनात कुठेतरी खूप बरं वाटत होतं. किती प्रेम करतो? जीव लावतो? इतकं सारं डोळ्यात दिसतं आणि ह्याला बोलायला काय होतं कळेना? हाच विचार करत असताना पुन्हा तो म्हणाला,
" राधा सांग ना काय इतकं महत्त्वाचं बोलायचं होतं? समोर का नाही बोलला?"

आतापर्यंत ओवी आणि अमोल दोघेही आले होते. ते देखील ऐकायला उत्सुक होते.

"राज, प्रणव माझ्यावर खूप प्रेम करतो हेच सांगायला मला आला होता आणि त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे हे त्याने सांगितले."

हे ऐकून तर राजचा चेहरा पूर्णपणे उतरला.

पुढे काय त्याला ऐकू वाटत नव्हतं.

मनात विचार करू लागला
'माझ्या राधाला प्रपोज करायची हिंमतच कशी झाली? त्याला दिसू नये माझ्या डोळ्यातलं प्रेम? मी किती प्रेम करतो राधावर. मूर्ख कुठला. असं कसं करू शकतो तो. त्याला मी सोडणार नाही.

ओवी म्हणाली "राधा, मग तू काय म्हणाली त्याला?".

आता राधा काय बोलते आहे हे ऐकण्यासाठी सर्वांनी कान टवकारले.

मी त्याला म्हणाले, "मी आत्ताच काही बोलू शकत नाही. मला वेळ पाहिजे, त्यावर तो म्हणाला "मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. मला विश्वास आहे तू मला होकारच देशील.

ती ओवीकडे पाहत म्हणाली,

"ओवी त्याच्या डोळ्यात खरंच मला प्रेम दिसलं. खूप प्रेम करतो तो माझ्यावर. तो मला म्हणाला अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तो माझ्या प्रेमात पडला आहे. प्रत्येक क्षणी मी त्याच्या डोक्यात असते आणि मी त्याच्या आयुष्यात यावं हेच त्याचं स्वप्न आहे."

हे सार ऐकून तर राजच्या अंगाचा तिळपापड झाला होता. त्याच्या डोळ्यात अंगार दिसत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आले.

तो अमोलला पटकन म्हणाला "अमोल, मला महत्त्वाचं काम आहे मी जातो. तो राधाला काहीच न बोलता लगेच निघून गेला. त्याने एकदाही राधाकडे पाहिले नाही, मात्र राधा त्याला निरखून पाहत होती. त्याचे प्रत्येक हावभाव टिपत होती. अमोलही निघून गेला. राधा हे सगळं पाहून हसू लागली.

ओवी तिला म्हणाली, "अग हसते काय आहेस? तू किती दुखावलं त्याला? असं का केलंस तू? खरच प्रणवला असं सगळं म्हणालीस का ?

राधा म्हणाली, अगं हो हो तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देते, जरा श्वास घेऊ दे. मी नाराज आहे राजवर, जर प्रणव मला प्रपोज करू शकतो, तर हा का नाही? आणि तुलाही माहित आहे की, मला राज आवडतो. ऍक्च्युली मी प्रणवला नाही म्हणून सांगितले आहे. मी काही त्याला वेळ मागितला नाही. मी फक्त राजसमोर हे बोलले. मगाशी जे पण मी सांगितलं ते सगळं खोटं होतं. हो प्रणवने मला प्रपोज केलं इतकच काय ते खरं ; पण मी त्याला सरळ नाही म्हणाले आहे."

ओवी "राधा, तुला माहित आहे जेव्हा तू प्रणव सोबत गेली तेव्हा राजची काय अवस्था झाली होती ? त्याला खूप राग आला होता.

राधा म्हणाली, " ओवी , फक्त राग करून उपयोग काय ग? मनातल्या भावना मनातच ठेवल्या तर कळणार तरी कश्या? किती वाट पाहू मी?"


ओवी " तू का वाट पाहतेस? तू तुझ्या मनातलं बोलून मोकळी हो?"

"नाही मी अजिबात बोलणार नाही, माझी इच्छा आहे की, राजने पहिलं बोलावं मी तर होकारच देणार आहे त्याला."

ओवी "बरं तू त्याला होकारच देणार आहेस मग त्याला का छळते आहेस?"

राधा म्हणाली "ओवी, खूप छान वाटतं जेव्हा त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसतं. जेव्हा प्रणवला माझ्याशी एकांतात बोलायचं होतं तेव्हा राजची काय अवस्था झाली होती हे मी डोळ्याने पाहिलं. आपल्यावर कोणी प्रेम करतं, आपल्यासाठी त्याच्या जीवाची घालमेल होते ही भावना खूप सुखावणारी आहे आणि यु नो एव्हरीथिंग इज फेअर इन लव अँड वॉर."


ओवी यावर हसू लागली आणि म्हणाली,
" तू ना राधा खरंच प्रेमात पडल्यापासून वेगळीच झाली आहे. प्लीज त्याला इतका त्रास देऊ नको आणि समज त्याला खरंच असं वाटलं की, प्रणवसाठी तुझ्या मनात प्रेम आहे तर मग काय? कदाचित त्याला जे बोलायचं असेल ते बोलणार नाही.

राधा म्हणाली, "ओवी, मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे. राज नक्कीच मला एक दिवस त्याच्या मनातील प्रेम बोलून दाखवणार. हे सारं मी करते आहे ते केवळ त्याच दिवसासाठी."

" मानलं राधा तुला, तुझी ही आयडिया मला फार आवडली." ओवी.

राधा गालात हसत होती.

क्रमशः

राधाने जे केलं त्याचा परिणाम काय होईल बरं?
पाहू पुढच्या भागात.

कथा लेखन अश्विनी कुणाल ओगले.



🎭 Series Post

View all