ओढ तुझ्या प्रेमाची भाग ८

प्रेम करणारा नवरा, सोन्यासारखी मुलं असतांना काय दुःख होतं?
ओढ तुझ्या प्रेमाची
भाग ८

गेल्या भागात आपण पहिली की राज उदास झाला होता. राधाला कल्पना येते. तिला कल्पना येते की प्रणवने प्रपोस केलं म्हणून तो नाराज आहे. ती त्याला सांगते की तिने त्याला नकार दिला आहे. आता पाहू पुढे.


"काय गं राधा सांगितले ना त्याला?" ओवी.
"हो गं सांगितले. त्याला असं मी पाहू शकत नाही. किती नाराज झाला होता?" राधा.

"बरं, केलंस सांगितले तू. खुश झाला ना तो?" ओवी.

"हो ना त्याचा उतरलेला चेहरा अगदी खुलला बघ. मला वाटलंच त्याला त्या गोष्टीचे वाईट वाटले होते." राधा.

********************

राजला सांगितले म्ह्णून तिला बरं वाटत होतं. चेहऱ्यावर हास्य होते. त्याचा दुखी चेहरा तिला बघवत नव्हता. दोन दिवस नीट बोलला देखील नव्हता. त्याचे न बोलणे, त्याच्यात झालेला बदल तिला सहन होत नव्हते; पण आज तिला बोलल्यामुळे हलके वाटत होते.

राज मनोमन खूप खुश झाला.

'अमोल बरोबर बोलला होता राधा त्याला नाही म्हणणार. मग ती त्यादिवशी असं का म्हणाली की मी त्याला वेळ मागितला आहे? असो महत्वाचे आहे ती त्याला नाही म्हणाली. राधा तुझा वाढदिवस मी खरंच स्पेशल करणार. खूप स्पेशल तुला मी माझ्या भावना सांगणार आहे. खूप वर्ष झाले तुला सांगावं म्हणतो पण नाही जमलं. आता धीर एकवटून बोलणार. मला विश्वास आहे तू हो म्हणशील. राधा, तू मला खरंच खूप आवडते. कॉलेजच्या अगदी पहिल्या दिवशी तू माझ्या मनात भरली. तुझ्यासाठी ज्या भावना आहेत त्या वेगळ्याच आहे. माझ्या सोबत तू मला पाहिजे. कायम हवी आहेस. तुझी ओढ लागली आहे राधा, एक वेगळीच प्रेमाची ओढ. तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. माझ्या विचारात तूच असते. वेड लावलं राधा तू. खरंच तुझ्यात एक जादू आहे. अशी जादू जी मनाला भुरळ घालते. मंत्रमुग्ध केलं आहेस तू. माझं अस्तित्व विसरलो आहे राधा.

**********************************

राधा घरी आली. ती खुश होती.
"राधा, काय गं आज खूप खुश?" आई.

"हो आई असंच." राधा.

"बरं, अभ्यास कसा चालू आहे?" आई.

"एकदम मस्त." राधा.

"बरं, फ्रेश हो मी चहा करते." आई किचनमध्ये जात म्हणाली.

राधा तिच्या विचारात हरवली.

राजचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.

मनातच बोलत होती.
' राज, कधी बोलणार तू माझ्याशी? किती वाट पहायला लावणार आहेस? वेडा आहेस तू. तुला मी पाहिजे; पण बोलायचे नाही. असं कसं चालेन? मी आई बाबांना तर एका मिनिटात मनवेल, तू आधी माझ्याशी बोल तरी.'

पुन्हा तिचं मन म्हणू लागलं.
'तू त्याच्या बोलण्याची काय वाटत पाहते आहे? तूच बोल.'

ती आरशात स्वतःला न्याहाळत होती.
कशी दिसेल माझी आणि राजची जोडी? स्वतःलाच प्रश्न विचारत होती. स्वतःच्या विश्वात. लाजत होती.

जेव्हापासून राजच्या प्रेमात पडली होती ती वेगळी वागत होती. ओवी बरोबर बोलत होती.
राधा बदलली आहे.

आतुरता होती तो आयुष्यात यायची.

आईने तिला आवाज दिला. ती पटकन खाली आली.

आईसोबत चहा पित होती.

तोच तिचा दादा राकेश आला.

"राधा, काय म्हणत आहे कॉलेज?"

"एकदम मस्त." राधा चहाचा घोट घेत म्हणाली.

राधाला आठवलं रक्षाबंधन येत आहे.

"दादा, ह्यावेळी माझं गिफ्ट भारी पाहिजे बरं का? आता तू कामाला जायला लागला आहेस."

राकेश तिला चिडवत म्हणाला.

"तुला काय करायचे गिफ्ट? आता तू काय लहान आहेस का?"

"आई, बघ ना ?" राधा आईकडे पाहत म्हणाली.

"तुम्ही बहीण भाऊ काय करायचे ते करा. मला मध्ये नका घेऊ." आई हसत म्हणाली.

राकेश तिला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाला.

"सांग तुला किती पैसे पाहिजे. १०, २०, का ५० रुपये?"

"बस इतकेच?" राधा.

"बरं १०० रुपये. आता इतकंच काय ते देऊ शकतो." तो हसत म्हणाला.

ती तोंड फुगवून बसली.

"काय गं राधा? तोंड फुगवून बसली?" मस्करी करतोय तो." आई.

"हो आई मला माहित आहे. असंही मला काहीच नको आहे. त्याची कायम साथ हवी बस हेच हवं."

"आई, पाहिलंस माझी लहान बहीण आता समजदार झाली आहे. आधी लहान होती तेव्हा राखी बांधायच्या आधी मी गिफ्ट आणलं की नाही हे पाहायची आणि आता किती मोठ्या गोष्टी करते." राकेश.


"दोघेही असेच राहा कायम एकमेकांची सोबत करा." आईच्या डोळ्यात पाणी आले.

राकेश आणि राधा एकेमकांकडे पाहू लागले.

राकेशने आईच्या खांद्यावर हात ठेवला. राधाही आईच्या जवळ गेली.

"आई, इतकं का बरं भावनिक होते? आम्ही दोघे असेच कायम सोबतीला असणार."

राधा देखील म्हणाली.

"हो आई आम्ही दोघे सोबतीला असणार."

"मुलांनो, आई वाडीलांसारखं प्रेम करणार कोणी असेल, तर भाऊ आणि बहिण. आई वडिलानंतर बहिणीला भावाची आणि भावाला बहिणीची भक्कम साथ असेल तर त्याहून मोठी गोष्ट काय?" ती डोळे पुसत म्हणाली.

तितक्यात राधाचे वडील आले.

शूज काढत म्हणाले
"काय झालं माझ्या बायकोला? सर्वांना रडवणारी आज स्वतःच रडते आहे."

सगळेच हसू लागले.

"बाबा, असं माझ्या आईला काही बोलायचे नाही. माझी आई खूप गोड आहे." राधा.

"बरं, पापा की परी मी काही बोलत नाही. एक ग्लास पाणी आणून दे जरा." बाबा.

"आई, चल आता मूड फ्रेश कर आणि तयार हो. बाबा तुम्हीही तयार व्हा" राकेश.

"का बरं? कुठे जायचे आहे?" आई.

"हो आज बाहेर जेवायला जाऊया." राकेश.

"कशाला बाहेर ? मी बनवते जेवण." आई.

"अजिबात नाही. आज बाहेर जेवायचे म्हणजे बाहेर. जेव्हा बघावं तेव्हा किचनमध्ये असते. आज माझा पगार झाला आहे तर माझ्याकडून जेवण." राकेश.

राकेश काही ऐकणार नव्हता.

"बायको, हा काही ऐकणार नाही. त्याने ठरवलं आहे तर जावच लागणार. आलिया भोगासी असावे सादर." बाबा.

"बाबा, तुम्ही ना?" राकेश हसत म्हणाला.

राधा बाबांना पाण्याचा ग्लास देत म्हणाली, "बाबा, बोलण्यात तुमचा हात कोणीही पकडू शकत नाही." राधा.

"राधा, हे सगळं मी माझ्या गुरूकडून शिकलो आहे." बाबा.

"गुरू?" राधा.

"माझी गुरू तुझी आई." बाबा हसत म्हणाले.

राधा आणि राकेश हसू लागले.

"तुम्ही पण ना, खरंच काहीही बोलता." आई .

"बरं चला पटकन तयार व्हा आता."

राकेश आणि राधा रुममध्ये गेले.
राधाची आई भावनिक झाली होती.
बाबा तिच्याजवळ गेले. हात पकडत म्हणाले ,
"काय गं काय झाले का रडत होती?"

"काही नाही, राकेश आणि राधाचे बोलणे ऐकून मन भरून आले. सोन्यासारखी मुलं आहेत आपली.

राधा आणि राकेश दोघेही समजदार आहेत.
त्यांना इतकंच म्हणाले, एकमेकांना नेहमी साथ द्या."

राधाच्या आईच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळले.

जुनी खपली नव्याने वहावी असेच झाले होते.

ते तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले,

"अगं, झालं ते झालं अजून किती स्वतःला त्रास करून घेणार आहेस?"

तिचे भरलेले डोळे खूप काही सांगून जात होते.
प्रेम करणारा नवरा, सोन्यासारखी मुलं असतांना काय असं दुःख होतं?

क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.



🎭 Series Post

View all