ओढ तुझ्या प्रेमाची भाग ९

आपल्या जवळच्या माणसांची साथ असेल तर कितीही मोठं संकट आलं तरी त्यातून आपण बाहेर पडतो
पूर्वार्ध
ओढ तुझ्या प्रेमाची भाग नऊ गेल्या भागात आपण पाहिले की राधा घरी आल्यावर खुश असते कारण; तिने राजला खरं काय ते सांगितले होते. तिच्या भावाची आणि तिची थट्टा मस्करी चालली होती. ते पाहून आई भाऊक झाली आणि दोघांना नेहमी असेच सुख रहा हे सांगितले. आता पाहू पुढे.


राकेश आई-बाबांना आणि राधाला बाहेर जेवायला घेऊन जाणार होता. राकेश आणि राधा तयारी करायला रूममध्ये निघून गेले. इथे राधाची आई हळवी झाली, हे जेव्हा तिच्या वडिलांनी पाहिले तेव्हा त्यांनी विचारले.

ती बोलू लागली, "माझी खूप इच्छा आहे जे ज्या सुखापासून मी वंचित राहिले त्या सुखापासून माझी राधा वंचित राहू नये. आजही तो दिवस मला आठवतो. किती सहजपणे माझा भाऊ मला बोलून गेला होता, तू माझ्यासाठी मेली आहेस. लहानपणापासून एकत्र वाढलो, आई-वडिलांचे संस्कार, एकमेकांविषयी असलेलं प्रेम, जिव्हाळा, सारं काही एका क्षणात तो विसरला होता. इतका मोठा गुन्हा केला होता मी? आजही मला तो दिवस आठवला की, फार वाईट वाटतं.

प्रत्येक मुलीसाठी माहेर म्हणजे विसाव्याचे ठिकाण असतं. मी मात्र त्या माहेराला कायमचे मुकले. राग, द्वेष बस हेच माझ्यासाठी होतं का?"


राधाचे वडील तिच्या आईला समजावत म्हणाले, "हे बघ तू कितीही विचार केला तरी, ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याच्यात बदल करणे काही शक्य नाही. विचार केला तर तुला त्रास होणार आहे. झालं गेलं सारं काही विसरून पुढे जायचं आपण ठरवलं आहे."


ती डोळ्यातील पाणी टिपत म्हणाली, "झालं गेलं विसरता येतं का? खरंच विसरता येतं? आजही जशाच्या तशा गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. मनाने लग्न केलं हा खरंच खूप मोठा गुन्हा आहे का? सर्व नाती लांब गेली. दुरावले मी. स्त्रीला खरंच कधी समाजात मान सन्मान मिळतो का? वाटलं होतं तुमच्याशी लग्न झालं की, मी सारं पाठचं विसरेल; पण तुमच्याही आईने मला नेहमीच हीन दर्जाची वागणूक दिली. प्रेम विवाह केला होता तो केवळ मीच केला होता का? तुम्ही पण माझ्या सोबतीला होताच ना? मग मीच कशी गुन्हेगार ठरले? सर्वांच्या डोळ्यात मीच वाईट ठरले?"

एक सुस्कारा टाकत ती म्हणाली "खरंच आपण इतके वाईट असतो की, आपला स्वीकार कोणीच करू नये? आपलं मन कोणीच समजू नये? मी खूप दुखावली आहे. सारं काही आठवलं तरी, आज तितक्याच वेदना होतात. असं वाटतं आपण आयुष्यात खूप पुढे आलो आहोत, जगतो आहोत; पण एक क्षण येतो आणि आरसा दाखवून जातो. त्या वेदना, दुःख सारं काही जसेच्या तसे माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. आजही मी स्वतःला प्रश्न विचारते, मी खरंच गुन्हा केला आहे का? राधाचे वडील तिची अवस्था समजत होते. त्यांनाही माहित होतं की, तिने किती भोगलं होतं. किती जरी प्रयत्न केला तरी लोकांची मानसिकता बदलणे आपल्या हातात नाही समजून गेले होते, त्यामुळे त्यांनी कधीच तिला दुखावलं नाही. नेहमी तिच्या बाजूने उभे राहिले. आज मात्र तिच्या मनाची होणारी घालमेल ते समजत होते. खूप वर्षानंतर आज जुन्या आठवणी काढून ती जणू स्वतःचं मन मोकळं करत होती. त्यांना माहीत होतं की, तिच्या मनाला झालेले जखम खूप खोल आहे. कधीतरी बोलून मन मोकळं झालं तर, तिला नक्कीच बरं वाटेल; म्हणून आज ते तिला बोलू देत होते.


ती पुन्हा बोलू लागली, "तुम्हाला माहित आहे राकेश आणि राधा या दोघांचं संगोपन करताना मी एक खबरदारी घेतली,ती म्हणजे काहीही झालं तरी त्या दोघांमधील जिव्हाळा, प्रेम कायम राहिले पाहिजे. परिस्थिती कशीही असली तरी एकमेकांना साथ दिली पाहिजे. हीच तर ताकद असते, हीच एक आशा असते जी आपल्याला कायम जिवंत ठेवते.
आपल्या जवळच्या माणसांचा हात आपल्यापाठी असला की, कितीही मोठं संकट येऊ देत, आपण त्यातून बाहेर पडतो. नाहीतर आपल्या माणसांनी साथ सोडली ना तर क्षुल्लक गोष्टीतही आपण पराजित होतो. माझ्या मुलांनी आनंद असो वा दुःख त्यात एकजुटीने सामील होऊन एकमेकांचा आधार बनावं."

सारं बोलून झाल्यावर तिने राधाच्या वडिलांचा हात पकडला आणि म्हणाली, "तुम्ही माझ्या सोबत तटस्थ उभे राहिला, नेहमी माझी बाजू घेतली. प्रत्येक वेळी मला समजून घेतलं, कदाचित त्यामुळे मी जगू शकले. तुमचे खरंतर उपकार आहे. नाहीतर मी कोणत्या स्थितीत असते देवजाणे."

त्याने तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, "वेडी आहेस का माझे आभार मानते. तुझा नवरा आहे मी, ते माझे कर्तव्य होते. यापुढेही माझी साथ कायम आहे."

"हो मला तुमच्यावर पूर्ण विश्वास होता आणि आहे." राधाची आई.


"आता आपण आत्ताच क्षण जगूया बायको. जे झालं ते झालं, आपल्याला फक्त आता पुढे बघायचं आहे. पुढे आपलं खूप सुंदर जग आहे आता एका नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे राकेश राधा दोघांचं लग्न, नातवंड हे सारं अनुभवायचे आहे. रडण्याचे दिवस गेले फक्त सुखी, आनंदी आयुष्य जगायचे आहे. त्यात तुझी साथ हवी आहे. मला काय पाहिजे? माझी बायको आणि मुलं खुश आहे हेच मला पुरेसे. माझ्या परिवारात माझं सुख."

क्रमशः

अश्विनी कुणाल ओगले
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.



🎭 Series Post

View all