ओढ तुझ्या प्रेमाची भाग १०

वा! मस्त लव्ह स्टोरी आहे, सगळं प्लांनिंग करून चाललं आहे.
गेल्या भागात आपण पाहिले की, राधाची आई भावुक होते; कारण तिचं माहेर दुरावलं होतं. आणि तिने राधा आणि राकेशवर असे संस्कार केले होते की, दोघेही एकमेकांची साथ कधीच सोडणार नव्हते. भावा बहिणीची साथ किती महत्त्वाची आहे हे तिला चांगलंच माहित होतं.
आता पाहू पुढे.

राज खुश होता ; कारण त्याने ठरवलं होतं या वाढदिवसाला राधाला मनातलं बोलायचं. बघता बघता दिवस सरले, राधाचा वाढदिवस आला. नेहमीप्रमाणे बरोबर रात्री बाराच्या ठोक्याला राजने तिला मॅसेज केला. मनातल्या मनात म्हणत होता, 'राधा, मी तुला आज प्रपोज करणारच आहे.'

राधा देखील ह्या वाढदिवसाला इमोशनल झाली होती; कारण हे शेवटचं वर्ष होतं आणि आता पुढच्या वर्षी कोण कुठे असणार माहित नव्हतं. राधाने सकाळीच आई बाबांचा आशीर्वाद घेतला. राकेशने राधाला छानसा ड्रेस गिफ्ट म्हणून दिला होता. राधा तोच ड्रेस घालून कॉलेजला गेली होती. खूप सुंदर दिसत होती. आज तिचा चेहरा खुलून दिसत होता. राधा आणि ओवी दोघी राज आणि अमोलची वाट बघत होत्या.

ओवी म्हणाली,"राधा, आज खूप गोड दिसते आहेस. ड्रेस तर फारच सुंदर आहे."

राधा म्हणाली,"हा दादाने गिफ्ट केला आहे."

ओवी म्हणाली "मस्तच चॉईस आहे. खूपच छान दिसतेय तू. आज काही राजचं खरं नाही."

राधा लाजली. तिचे डोळे राजलाच शोधत होते. इथे राज आणि अमोल चालतच येत होते. अमोल म्हणाला, "राज, आज शांत का बसला आहेस?"

राज म्हणाला,"शांत नाही रे मनात खूप खळबळ आहे. राधाशी बोलायचं आहे ना? आज मला माहित नाही का? थोडीशी भीती वाटते आहे."

अमोल म्हणाला,"घाबरू नकोस जे पण मनात आहे बोलून मोकळा हो."

राजला देखील कधी एकदाच राधाला बघतो आहे असं झालं होतं. तोही पटपट पावलं टाकत पुढे निघाला होता. कॉलेजमध्ये एन्ट्री मारली, राधाला पाहिलं. खूप गोड दिसत होती. त्याने राधासाठी कॅडबरी आणली होती आणि छान गिफ्ट आणलं होतं. राधाला पाहिलं तसं तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राधा."

"थँक्स" राधा म्हणाली.

राजने तिला ते गिफ्ट दिलं. दोघेही एकमेकांना डोळे भरून पाहत होते.

राज म्हणाला, "राधा, मला काहीतरी बोलायचं आहे."

राधाचे हार्ट बीट्स वाढले होते. अमोल आणि ओवी समजून गेले दोघेही एकमेकांसोबत बोलत पुढे निघून गेले.

राज बोलू लागला," राधा, खूप दिवस विचार करत होतो, तुझ्याशी बोलावं आणि आज तुझा वाढदिवस यापेक्षा चांगला दिवस काय असेल? राधा लक्ष देऊन ऐकू लागली.

राज म्हणाला, "राधा, तू मला खूप आवडते."

दोघांच्या श्वासाची गती वाढली होती. राजला पुढे काय बोलावं सुचत नव्हतं. त्याचे हात पाय गार पडले होते.
राधाच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होता होईना. कसं बसं त्याने नजर वर केली. पाहतो तर राधाचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती खूप खुश दिसत होती.

" राज, किती वेळ घेतला हे वाक्य बोलायला? मी फार वाट पाहत होते या दिवसाची."


"खरंच राधा? " तो चमकून म्हणाला.

"हो राज." राधा .

दोघे एकमेकांना फक्त पाहत होते. काय बोलावं काही सुचत नव्हतं.राधाच्या मनासारखं झालं होतं. राजने तिला प्रपोज केलं होतं.

तो राधाला म्हणाला,"राधा, मला तू आवडते ;पण तुला मी आवडतो का?"


"हो राज खूप आवडतो ; म्हणून तर त्या दिवशी मी प्रणवला सरळ नाकार दिला ;कारण मला तू आवडतो आणि मला माहित होतं की, तुला मी आवडते त्यासाठी मी तुला येऊन खोटं बोलले की प्रणवने मला प्रपोज केला आहे आणि मी त्याला वेळ मागितला आहे; कारण मला तुझ्या मनातलं बाहेर काढायचं होतं." ती किंचित हसत म्हणाली.


" राधा,त्या दिवशी जेव्हा प्रणव तुझ्याशी बोलायला आला; तेव्हा मला फार वाईट वाटलं. असं वाटलं मी तुला गमावतो की काय? ते मला सहन झालं नाही. माझं मन कशातच लागत नव्हतं. मला असं वाटत होतं तू त्याला सरळ नकार द्यावा."


"राज त्याला नकार दिला ;पण माझी इच्छा होती की, आज जसं तू माझ्याशी बोलला आहे तसं बोलावं. त्यासाठी मी तुला खोटं बोलले."


राज म्हणाला,"राधा,लग्न करशील माझ्याशी?"

राधाचे डोळे भरून आले होते, "राज, मलाही तुझ्याशी लग्न करायचं आहे." गालावर ओघळणारे अश्रू पुसत ती म्हणाली. आज दोघांनी प्रेम कबूल केलं होतं.

दोघांना पुढे काय बोलावं सुचत नव्हतं. राजचे प्रपोज करणं हे राधाच मोठं गिफ्ट होतं, त्यापेक्षा मौल्यवान तिच्यासाठी काय असणार.

खरंतर राधाने त्याला ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं होतं त्याच दिवशी राज मनात भरला होता. त्याचा नटखट स्वभाव, सारं काही तिला आवडू लागलं होतं. मैत्री, सहवास आणि त्यामुळे फुलत जाणार प्रेम. ती कधी प्रेमात पडली हे तिची तिलाच कळलं नाही; पण इतकं जरूर होतं हे प्रेम खरं होतं.

राजलाही तिचा समजूतदारपणा खूप आवडला होता. तिचं वागणं, स्वभाव, बोलणं सारे काही मनात घर करून गेलं होतं आणि त्यात दोघेही एकमेकांना समजू लागले. राधा त्याच्या मनामध्ये भरली हे त्याची त्याला कळलं नाही.

राज आणि राधासाठी खूप खास दिवस होता.

दिवस कधी निघून गेला कळलंच नाही.

घरी जात असताना ओवीने राधाला विचारले, " राधा, राज तुला काय बोलला हे तुम्हाला काही सांगितलं नाहीस"

"तू प्रॉमिस कर हे तू कोणालाही सांगणार नाही. " राधा.

"नाही सांगणार." ओवी.

"ओवी, राजने मला प्रपोस केलं." राधा.

"काय." ओवी जोरात ओरडली.

"अगं, माझी आई हळू ना." राधा आजूबाजूला पाहत म्हणाली.

"राधा, काय मस्त गं. फायनली तुझ्या मनासारखं झालं." ओवी तिचा गोलगोल फिरवत म्हणाली.

"हो ओवी, मी खुश आहे गं. माझ्या मनासारखं झालं." राधा.

"आता पुढे काय?" ओवी.

"आम्ही दोघांनी ठरवलं आहे की, स्वतःच्या पायवर उभं राहिलं की, घरच्यांना सांगायचे." राधा.

"वा! भारी लवस्टोरी आहे हा. सगळं मस्त प्लांनिंग करून चाललं आहे. राधा, मी खूप खुश आहे तुझ्यासाठी." ओवी.

ओवी खरंच राधासाठी खुश होती. राधा पहिल्यांदा प्रेमात पडली होती, खऱ्या प्रेमात. राज देखील चांगला मुलगा होता. इतके वर्ष कॉलेजमध्ये सोबत राहून तो कसा आहे समजलं होतं. तो नक्कीच योग्य जोडीदार होईल ही खात्री ओवीला होती.

राज आणि राधा दोघांनी मिळून ठरवलं होतं; पण तसंच घडेल काय?
क्रमशः

कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करण्यास परवानगी नाही. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.


🎭 Series Post

View all