ओढ तुझ्या प्रेमाची भाग १२

आई बाबा इतका मोठा निर्णय तुम्ही मला न विचारल्याशिवाय कसा घेऊ शकता?
ओढ तुझ्या प्रेमाची. भाग १२

गेल्या भागात आपण पाहिले की, राधाचा भाऊ रमेश तिला तिचं लग्न बाबांच्या मित्राच्या मुलासोबत ठरवलं आहे असं सांगतो. राधाला यावर विश्वास बसत नाही, ती आई बाबांशी बोलायला येते; तेव्हा आई रमेशला म्हणते सांगितलं का राधाला? हे ऐकून तिला अजूनच राग येतो. आता पाहू पुढे.

राधा धुसफुसतच सोफ्यावर बसली आणि आईला म्हणाली,"हे काय लावलं आहे आई- बाबा? इतका मोठा निर्णय असं तुम्ही लोक कसे घेऊ शकता?."

आई-बाबांनी एकमेकांकडे पाहिले.

" राधाला अचानक काय झालं?"
रमेश शांतपणे सगळं ऐकत होता.
आई म्हणाली, "राधा, आज ना उद्या हे करावं तर लागणारच."

राधा चिडूनच आईला म्हणाली,"आई पण माझं मत विचारात घेतल्याशिवाय तुम्ही असं कसं करू शकता?"

बाबा तिचा राग शांत करत म्हणाले, "हे बघ राधा अजून काही ठरलं नाही. आता फक्त मुलगी बघायला जायचं आहे."

' मुलगी बघायला जायचं आहे ? मग दादा येऊन असं का म्हणाला? अच्छा तर तो माझी मस्करी करत होता.'

राधाने रागातच त्याला पाहिले.
रमेश जोरजोरात हसू लागला. राधाला आता अजून राग आला.
ती त्याला म्हणाली , "दादा, तू हसतो काय आहेस?"

रमेश म्हणाला, "राधा, मी मघाशी जे पण येऊन तुझ्याशी बोललो ते सारं खोटं होतं. मी अशीच तुझी मस्करी करत होतो."

राधा त्याच्या दिशेने धावतच गेली, तो आईपाठी लपला.

"या दोघांचं कसं व्हायचे, अजूनही लहान पोरागत वागतात."

आई बाबाकडे पाहत म्हणाली.

"दादा, पुन्हा जर अशी मस्करी केलीस ना तर बघ मग मी काय करेन." राधा चिडक्या स्वरात म्हणाली.

आई म्हणाली, "आता तुम्हा दोघांचं लग्नाचं वय झालं आहे; तरी पण लहान मुलांसारखे भांडत राहणार आहात का?"

"आई ,तुला काय बोलायचं आहे, त्याला बोल. काय पण येऊन बडबड करत होता." राधा त्याला चिमटा घेत म्हणाली.

आईने विचारलं "काय म्हणाला तो?"

तो नुसता दात काढत उभा होता आणि राधाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आनंदीत होत होता.एकही संधी सोडायचा नाही राधाला सतवायची. लहान होती राधा; पण तोच लहान असल्यागत वागायचा.

"त्यालाच विचार तू, काय म्हणाला ते?
रमेश जीभ बाहेर काढून चिडवत होता.

आई बाबा दोघांची मस्ती पाहून एकमेकांकडे बघून हसत होते. राधा आणि रमेश बहीण भाऊ कमी आणि मित्र-मैत्रिणी जास्त होते. राधाच्या आईने संस्कारच तसे दिले होते. दोघांचे नाते खूप मजबूत होते.

एकमेकांची सतत मस्करी करणं, थट्टा करणं हे चालूच राहायचं ; पण तितकाच जीव देखील होता. अगदी खायला काही आणलं तर राधा आवर्जून त्याच्यासाठी बाजूला काढून ठेवायची. भावाचं देखील पान तिच्याशिवाय हलत नव्हतं.

"बरं दादा मला मुलीचा फोटो दाखव. बघू तरी कशी दिसते?"

तो पुन्हा तिला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाला, "मी नाही दाखवणार तुला फोटो. तु मला चिमटा काढलास ना. जा मी रागावलो आहे तुझ्यावर."


"आला मोठा रागवणारा. एक तर चुकी केलीस ते केलीस आणि वरून आता रागवायची नाटके करतो. चल पटकन दाखव फोटो. मला बघायचा आहे."

तो काही केल्या फोटो दाखवत नव्हता.

" आई, सांग ना दादाला किती सतावतो बघ मला." राधा म्हणाली.

"दादा,दाखव ना मुलीचा फोटो" राधा.

"बरं मी मुलीचा फोटो दाखवणार ; पण एक अट आहे." रमेश आईला डोळा मारत म्हणाला.

"आता कसली अट?" राधा.

"माझ्यासाठी तू छान पावभाजी बनवणार आहेस आणि तेही आत्ताच्या आत्ता." रमेश.

"हे चांगलं आहे तुझं. अट घालतो आहेस. किती भाव खातो आहेस. नुसतं मुलीचा फोटो दाखण्यासाठी तू माझ्याकडून आधी पावभाजी करून घ्यायला बघतो आहेस. ठीक आहे मी पावभाजी करणार; पण मी आजच्या आज मुलीचा फोटो मात्र बघणार." असं म्हणत ती किचनमध्ये गेली.

राधा जशी किचनमध्ये गेली तसं रमेश आईला म्हणाला, "आई आज तुला सुट्टी बरं का? आता मस्त आराम कर. अजून काय ऑर्डर द्यायची तर दे तिला. आज ती काही नाही म्हणणार नाही बघ." रमेश

"किती लबाड आहेस तू, खरच खूप सतावतो तिला." आई त्याच्या पाठीवर हलकसं थोपटत म्हणाली." आई.

राधाला हे सर्व ऐकल्यावर जीवा जीव आला. दादासाठी मुलगी बघायला जायचे होते. विचार करू लागली.

'दादा खरंच असं सांगून गेला, मला तर विश्वासच बसेना आणि असेही फक्त मला राजचे व्हायचे आहे. माझ्या आयुष्यात राज शिवाय मला कोणीही नको आहे.'

तीने छान पावभाजी बनवली.
घरभर सुगंध पसरला होता.
रमेश पहिला घास तोंडात घालणार, तोच तिने त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाली,
"दादा, मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं, आता पहिला फोटो दाखव आणि मग जेव."

" राधा, काय हे आधी जेवण तर करू दे."

" नाही म्हणाले ना, आधी फोटो." राधा.

"बरं बाई."

त्याने मोबाईल मधील मुलीचा फोटो तिला दाखवला. खूप छान दिसत होती.

"वा! दादा मुलगी छान दिसते आहे. मस्तच , मला तर आवडली वहिनी." राधा फोटो झुम करत म्हणाली.

"ओ मॅडम आताच वहिनी वहिनी करू नका. आधी बघून तर येऊ दे. रमेश.

"हम्म." राधा.

" बरं आता तरी खाऊ की नको?" रमेश.

राधाने स्वतःच्या हाताने त्याला घास भरवला.
"सांग कशी झाली आहे पावभाजी?" राधा त्याच्या उत्तराची वाट बघत होती.

त्याने मुद्दाम तोंड वाकडं केलं.

"नाही बरोबर का?" राधा.

"एक दम फर्स्ट क्लास झाली आहे." रमेश.

"तू ना दादा खरंच."

सगळे हसू लागले.
क्रमशः

अश्विनी कुणाल ओगले
कथेचा वापर youtube किंवा कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल.



🎭 Series Post

View all