ओढ तुझ्या प्रेमाची भाग १३

राधा, मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे ज्या दिवशी माझ्या नावाचे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालणार.
ओढ तुझ्या प्रेमाची भाग १३
पूर्वार्ध.

गेल्या भागात आपण पाहिले की, राधाचा भाऊ रमेश तिची मस्करी करतो की, तिचं लग्न ठरवलं आहे.सगळे रमेशला मुलगी बघायला जाणार असतात. आता पाहू पुढे.

राधाने ही गोष्ट राजला सांगितली. तिच्या आयुष्यात जे देखील घडत होतं, ते सर्वात आधी राजला समजले पाहिजे असं तिला वाटायचे.

राजही मनोमन विचार करु लागला. 'मी देखील असंच राधाला बघायला जाणार. सारं काही घरच्यांच्या संमतीने होणार. माझी राधा. माझं पहिलं प्रेम.'

राधा फार खुश होती; कारण तिच्या लाडक्या भावाच्या आयुष्यात आता त्याची हक्काची बायको येणार होती. तिची वहिनी.

दुसऱ्या दिवशी राधा आणि तिचे कुटुंब मुलगी बघायला गेले.

मुलगी फोटोपेक्षाही प्रत्यक्षात सुंदर दिसत होती. वैदेही नाव होते.
राधा, रमेशचा चेहरा पाहत होती.
त्याचा चेहरा बघून वाटतच होतं त्याला मुलगी पसंत आहे.

वैदेहीच्या घरच्यांनी चांगला पाहुणचार केला.
रमेश आणि वैदेहीला प्रश्न विचारले.

रमेशची नजर तीच्यावरून बाजूला होत नव्हती.
वैदेहीच्या आई वडिलांना देखील रमेश आवडला होता. वैदेही देखील स्मितहास्य देत होती.

तिलाही पाहून वाटत होतं की, रमेश तिला आवडला. का नाही आवडणार?

होताच रमेश आवडण्यासारखा. जी मुलगी त्याच्याशी लग्न करेल ती फार सुखी राहील.

राधाने तर मनोमन तिला वहिनी म्हणून स्वीकारले देखील.

घरी जात असताना, राधा म्हणाली,
"आई, दादा आणि वहिनीची जोडी खूप छान दिसेल ना?"

रमेश गालातल्या गालात हसत होता, ते राधाने आईला इशाऱ्यानेच दाखवलं.

सर्वांना समजलं की, रमेशला वैदेही आवडली आहे.

"आई, मी काय म्हणते वहिनी आवडली आहे हे सांगूया का?" राधा रमेशकडे पाहतच म्हणाली.

"नको राधा इतकी काय घाई नाही. मला वाटतं रमेशला इतकी काही आवडली नाही वैदेही." बाबा म्हणाले.

"बाबा, मला आवडली आहे वैदेही." रमेश ओघात बोलून गेला.

आता तो शांतच बसला.

"बघितलं बाबा, मी म्हणाले होते की, दादाला वहिनी आवडली आहे."

सगळे हसू लागले.

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर राधाने राजला वैदेही आवडल्याचे सांगितले.
राधाची बडबड चालू होती.
राज मन लावून ऐकत होता. किती गोड दिसते राधा. तिच्या रुपाकडे पाहत बसावं अशीच होती.

"राज, मी काय बोलते आहे लक्ष आहे का तुझं?"

"हो बोल ना." राज.

"बरं, आज ओवी आणि अमोल देखील आला नाही. खूप कंटाळा आला आज." राधा.

"खरंच? राधा माझ्यासोबत कंटाळा आला का?" राज चेष्टा करत म्हणाला.

"नाही रे तसं नाही." राधा.

"मग कसं?"तो पापणी खाली न पाडता बोलत होता.

राधा लाजली. ती इथे तिथे पाहू लागली.
त्याने तिचा हात अलगद हातात घेतला. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली. अंगावर शहारे आले.

राजला आज माहीत नाही काय झाले होते.
तो त्याच्या भावनांवर कंट्रोल करू शकत नव्हता.

राधाने स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडवला.

राज भानावर आला.
'हे काय मी वेड्यासारखं वागतो आहे.'

"सॉरी राधा." राज हळूच आवाजात म्हणाला.

राधा काहीच बोलली नाही.

दोघेही शांत बसून होते.

फार असहज वाटत होते.

"राज, मी जाऊ का? उशीर झाला आहे." चेहऱ्यावर आलेले केस कानामागे करत ती म्हणाली.

"राधा, सॉरी ना. माझ्यावर रागावलीस का? प्लिज जाऊ नको. पुन्हा असं कधीच करणार नाही." राज तोंड बारीक करून म्हणाला.

त्याला असं पाहून राधाला हसू आले.

"राज, नाही मी तुझ्यावर रागावली नाही. मला जरा काम आहे घरी,म्हणून जाते आहे."
ती त्याला समजावत म्हणाली.

"थोडावेळ बस ना. प्लिज." राज.

राज इतका अग्राह करत होता. तिचाही पाय निघता निघत नव्हता.

"बरं फक्त दहा मिनिटं बसणार." राधा पुन्हा बसत म्हणाली.

राजच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली.

"राधा, आता तू नणंद होणार. तुझा वेगळाच रुबाब असणार." राजने बोलायला सुरुवात केली.

"नाही रे, माझ्यासाठी ती वहिनी नावासाठी असेल. खरंतर ती माझी बहिणीच असणार. रुबाब कशाला पाहिजे? ती पण तर आपल्या घरातली होऊन जणार."

"तुझ्या ह्याच स्वभावाच्या प्रेमात पडलो आहे मी राधा." राज पाटकन बोलून गेला.

राधाने ते ऐकले. तिला हे ऐकून खूप बरं वाटलं.

"राधा, कॉलेजच्या पहिल्या दिवशी ओवी कसली भडकली होती? तू मात्र किती शांत होती." राज बोलत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती.

"राज, माझी आई नेहमी म्हणते आपली खरी संपत्ती आपली माणसं असतात. त्यांना जपलं पाहिजे. मला असं पटकन कोणावर राग करता येत नाही. रागात माणूस काहीही बोलून जातो. एका क्षणात आलेला राग, मजबूत नाती नेहमीसाठी तोडून टाकतो. राज तुला विश्वास बसणार नाही,मी लहानपणी फार रागीष्ट होते. दादाने मला चिडवलं तरी इतकं चिडायचे. त्याच्या अंगावर वस्तू फेकायचे. एकदा असंच त्याने मला चिडवलं होतं, तेव्हा मी रागाच्या भरात त्याच्या अंगावर कैची भिरकावली. नेमकी ती त्याच्या पायाला लागली. त्याच्या पायातून रक्त येऊ लागले. ते पाहून मी फार घाबरले. दादा रडायला लागला. आई आली, तिने पाहिले. दादाच्या जखमेवर हळद लावली. रक्त थांबलं. लागलं होतं दादाला;पण मीच रडत होते. आईने ते पाहिले. ती मला काहीच बोलली नाही. मी शांत बसले. थोड्यावेळाने आई आली. मला मांडीवर बसवले. माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितले.
"राधा, तुझ्या रागामुळे रमेशला काय झाले पाहिलेस ना? राग हा असाच असतो. रागात बोललेले शब्द, रागात केलेली कृती केवळ त्रासच देऊ शकते. तुला कितीही राग आला तरी स्वतःवर कंट्रोल करता आला पाहिजे. राग हा शत्रू आहे. आपलं नुकसान करतो हे कायम लक्षात ठेव." त्या दिवसापासून मी माझा राग कमी करू लागले. कितीही राग आला तरी मी काही बोलत नाही. कोणतीही कृती करत नाही. रागाला मी माझ्यापासून खूप लांब ठेवते."

"किती छान पद्धतीने हाताळली आईंनी सिच्युएशन." राज.

"हो ना. आई अशीच आहे गोड. तिने कधीच आमच्यावर हात उचलला नाही. नेहमी प्रेमाने समजावले. माझी आई माझी मैत्रीण आहे. सगळं काही मी तिला सांगते." राधा.

"माझ्याबद्दल सांगितले? " राज.

"हो सांगितले, तू माझा चांगला मित्र आहेस." राधा.

तिला राजच्या बोलण्याचा ओघ समजला नाही.

"फक्त मित्र?" राज.
राधाच्या डोक्यात आता प्रकाश पडला.

ती पण त्याला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाली.

"हो फक्त मित्र आहेस, तर तेच सांगणार." राधा न समजल्याच्या अविर्भावात बोलत होती.

राजचा चेहरा उतरला.

"राज, आपलं काय ठरलं आहे. जेव्हा आपण आपल्या पायावर उभं राहू तेव्हा घरी सांगायचे. तोपर्यंत तू माझा मित्रच." राधा.

हे ऐकून त्याचा चेहरा खुलला.

"बरं राज आता मी जाते. मला घरी जरा काम आहे. बाय." राधा खांद्यावर बॅग ठेवत म्हणाली.

"बाय राधा." राज.

राधा निघून गेली.

राज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मनातच बोलू लागला.
'राधा, तुझ्या प्रेमाची ओढ ही वेगळी आहे. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे ज्या दिवशी मी तुझ्या गळ्यात माझ्या नावाचे मंगळसूत्र घालेल.'

क्रमशः

कधी येणार तो दिवस?

वाचत राहा ओढ तुझ्या प्रेमाची.
कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.