ओढ तुझ्या प्रेमाची भाग १४

काय समजते स्वतःला
राधा आणि राज सुंदर दुनियेत होते, प्रेमाच्या दुनियेत. राजचा विचार मनातून जाता जात नव्हता. राधा घरी गेली तेव्हा तिला समजले की, वैदेहीला रमेश पसंत आहे.

आई फार खुश होती. रमेश कामाला गेला होता. वैदेहीच्या वडिलांनी रमेशच्या बाबांना फोन करून सांगितले होते.

"आई, वैदेही वहिनीच्या घरून होकार आला आहे हे मी दादाला सांगणार." राधाच्या डोक्यात वेगळाच प्लान होता.

रमेश कधी येतो आहे ह्याची ती वाटच पाहत होती.

तिने राजला फोन करून सांगितले. तो देखील खुश झाला होता.

राधा तर तिच्या दादासाठी खूप खुश होती. आनंद गगनात मावत नव्हता.

"दादाचे लग्न ठरले तर इतकी खुश आहेस, ज्या दिवशी मी लग्नाला मागणी घालेल तेव्हा काय करशील राधा?" राज.

राधाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली चढली.
ती काहीच बोलली नाही.

तिला आईने आवाज दिला.

"बरं, राज मी फोन ठेवते आई आवाज देते आहे."

"थांब ना राधा, मला काहीतरी बोलायचे आहे." राज.

"बोल पटकन."

"बोलू."

"हो, बोल."

"राधा, आय लव्ह यु."

तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य आले.

"तू पण बोल." राज.

"काय?"

"हेच, जे मी आता बोललो."

"काय म्हणाला."

"नाही ऐकलं?" राज.

"नाही."

"खरंच?" राज

"चल मी फोन ठेवते, आई बोलवते आहे.

असं म्हणत तिने फोन ठेवून दिला.

तिच्या ह्रदयाची धडधड वाढली होती.

मनातच म्हणाली, 'राज, आय लव्ह यु टू; पण तुझ्यासमोर बोलायची हिम्मत होत नाही.'


पुन्हा आईने आवाज दिला.

"हो आले आई."

ती पळतच गेली. पाहते तर रमेश आला होता.

आईकडे पाहत डोळे मिचकावले. आईला ईशारा केला की, काहीच बोलू नको. आई समजून गेली नक्कीच काही तरी ती करणार आहे. आईनेही मान डोलवली.

रमेश येऊन बसला नाही तोवर राधा बोलू लागली.

"काय कमी नाही माझ्या दादामध्ये. तिच्या सारख्या छप्पन पोरी मिळतील." रमेशला आवाज जाईल इतक्या जोरात ती आईशी बोलत होती.

राधाचे पूर्ण लक्ष रमेशकडे होतं.

हे ऐकताच तो राधाजवळ आला.

"काय झाले राधा?"

"दादा, वैदेही काय समजते स्वतःला? इतकीही काही सुंदर नाही. तुझ्यात काही कमी आहे का? मला तर आश्चर्य वाटतं तिने तुला नकार दिला."

हे ऐकताच रमेशचा चेहरा उतरला.
राधा आईकडे पाहून ओठ दाबत हसू लागली.

"दादा, सोड तिचा विषय आपण दुसऱ्या मुली बघूया. तुझ्यासाठी मुलींची लाईन लावते की नाही बघ. स्वतःला काय समजते ती, अप्सरा लागून गेली की काय? आली मोठी शहाणी. तुला नाही म्हणाली दादा ती तुला. मला तर फारच राग आला आहे; पण जाऊ दे आपण दुसरी मुलगी बघूया."


रमेशला खूप वाईट वाटत होतं, हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं.

आई तिला हळूच म्हणाली, "राधा, पुरे गं. त्याचा चेहरा बघ किती उतरला आहे."

"आई, थांब ना. त्यादिवशी मला किती सतवलं होतं ह्याने. आज मी काही आलेली संधी सोडणार नाही."

"तुम्ही बहीण भाऊ एक से बढकर एक आहात." आई मान हलवत म्हणाली.

"रमेश, जा फ्रेश हो जेवण तयार आहे."

"हो आई." रमेश.

हे सगळं ऐकून तो नाराज झाला होता आणि राधा मात्र चांगलीच मजा घेत होती.

बाबा देखील आले.

सगळे जेवायला बसले.

बाबांना खबर नव्हती, राधाने रमेशची फजिती केली होती.

रमेशला पाहिले तसं बाबा म्हणाले. "रमेश, आपला होकार कळवू का?"

रमेशला काहीच कळेना. तितक्यात राधा आली.

"कोणाला होकार कळवायचा आहे?" रमेशने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले.
राधा समजून गेली.

बाबा आईकडे बघत म्हणाले. "तू सांगितले नाही रमेशला की, वैदेहीच्या घरच्यांकडून होकार आला आहे?"

"काय?" रमेश मोठ्याने बोलला.

"तुम्ही तुमच्या लेकीला विचारा एकदा." आई.

राधा जीभ चावत म्हणाली, "दादा, मी गंमत केली."

"राधा, थांब आता तुला बघतो." असं म्हणत तिच्या दिशेने पळाला.

राधा आईच्या पाठीमागे लपली.

"बाबा, ही मला म्हणाली वैदेहीने नकार दिला आहे." कमरेवर हात ठेवुन तो म्हणाला.

"दादा, तू पण तर केली होती माझी मस्करी, आज मी पण केली मस्करी फिट्टूस."

वैदेहीकडून होकार आल्याने रमेश खुश झाला होता.

खरंतर सगळेच खुश झाले होते. त्याला वैदेही फार आवडली होती.

"दादा, वहिनी आल्यावर आम्हाला विसरू नको हा."

आई म्हणाली, "राधा, पुरे गं. आल्यापासून त्याला चिडवते आहेस."

"आई, तू अशीच बोलणार, तुला तर तोच आवडतो. लाडाचा लेक आहे तुझा." राधा मुद्दाम आईला बोलत होती.

"हो पापा की परी, आहेच माझा गुणी बाळ."

"आई, तुझं बाळ आता मोठं झालं आहे. आता वहिनी आली की दादा वहिनीचा होणार."

हे राधा मस्करीत बोलली ; पण आईच्या डोळ्यात पटकन पाणी आले.

ते पाहून राधा आणि रमेश दोघांना वाईट वाटलं.

"सॉरी आई. मी सहज बोलले."

"राधा, हे आनंदाचे अश्रू आहेत. आपल्या मुलांचा संसार सुरू होणार आहे ह्या भावनेने मन भरून आले."

बाबा वातावरण हलकं व्हावे म्हणून म्हणाले.

"सासूबाई, आता पासून रडणार का आता?"

सगळेच हसू लागले.

एकमात्र होतं सगळेच खुश होते.

क्रमशः
कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.




🎭 Series Post

View all