ओढ तुझ्या प्रेमाची भाग १५

"मुलं मोठी होतात आई कधीच मोठी होत नाही."

ओढ तुझ्या प्रेमाची. भाग १५
गेल्या भागात आपण पाहिले, की राधा रमेशला चिडवत असते. वैदेहीकडून रमेशला होकार असतो; पण राधा त्याला चिडवते. शेवटी बाबांकडून रमेशला कळतं वैदेहीने होकार कळवला आहे. आता पाहू पुढे.

आजची सकाळ काही वेगळीच होती. सूर्याची कोवळी किरणे आणि सकाळची ताजी हवा. राधाला ओढ लागली होती कधी एकदा कॉलेजला जाते आणि राजला भेटते.

ती पटकन तयार झाली. आज तिने तीचा आवडता सफेद रंगाचा ड्रेस घातला होता. राधाला वेस्टर्न कापड्यापेक्षा, ट्रेडीशनल कपडे आवडायची. क्लचर लावून बाकीचे केस मोकळे सोडले होते. हलकासा मेक अप केला होता. पिंक लीप ग्लॉस लावला होता. डोळ्यात हलकसं काजळ लावलं. ती आरशात स्वतःला पाहत होती, विचार करत होती राजला मी अशीच आवडते ना. एकदा म्हणाला होता तुझ्यावर सफेद रंग खूप खुलुन दिसतो. वेडाबाई, सारं काही राजसाठी. तिच्या विचारात केवळ तोच होता.
आवडता परफ्युम मारला. पुन्हा एकदा आरशात स्वतःला न्याहाळले. खूपच गोड दिसत होती.

किचनमध्ये गेली तर पाहते आईने आज मस्त अप्पे केले होते.

राधाला आईने पाहिले तसे ती म्हणाली, "राधा, आज खूप गोड दिसते आहे. काही कार्यक्रम आहे का कॉलेजमध्ये?."

"नाही आई, खूप दिवस झाले हा ड्रेस घातला नव्हता, म्हणून मी आज घातला. चांगला दिसतोय ना आई?"

"हो गं खूप छान दिसतो आहे." आईने तिला दृष्ट लागू नये म्हणून कानामागे डोळ्यातील काजळ लावलं.

"राधा, गरम गरम खाऊन घे बरं." असं म्हणत आईने तिच्यासमोर नाश्ता ठेवला.

राधाची नजर आईच्या पिंक शिफॉन साडीवर गेली.

"आई, खुप छान दिसतेय गं साडी. केव्हा घेतली?"

"ही साडी फार जुनी आहे गं. आठवत नाही कधी घेतली."

राधाही उठली आणि तिने आईला कानापाठी काजळ लावलं.

"काय गं राधा, मला म्हातारीला कोणाची नजर लागणार आहे."

"आई, तू आणि म्हातारी? काहीही बोलते. तू तर माझी संतूर मॉम आहे."

"पुरे गं कौतुक." आई पदर खोचून पुन्हा कामाला लागली.

"आई, काय मस्त झाले आहेत गं अप्पे. एक नंबर."

"पोटभरून खा राधा."

राधाच्या चेहऱ्यावर गोड हास्य होते. ती रमेशसाठी खूप खुश होती.
वेगळाच आनंद होता.

"आई, मी खूप खुश आहे दादासाठी. मला वैदेही वहिनी तर त्याच वेळेस आवडली होती. आतूनच वाटत होतं की ती, होकारच देईल."

"हो राधा, मलाही वैदेही फार आवडली. वैदेही आणि रमेशची जोडी खूप छान दिसेल." ती फार भावुक झाली.

तितक्यात रमेशही तयार होऊन आला. त्याच्या चेहऱ्यावर देखील आनंद ओसंडून वाहत होता.

"आई, नवरदेव आले बघ." राधा मुद्दाम त्याच्याकडे पाहत म्हणाली.

"आई, बघ कशी चिडवते आहे मला. तू दिलेला ब्रेकफास्ट कमी पडला बघ. मला चिडवल्यावरच राधाचे पोट भरणार."

"दादा, मी ही संधी सोडणार नाही. मी तुझं असंच डोकं खात राहणार आहे."


"माझं डोकं खाण्यापेक्षा, तू पण शिकून घे जेवण कसं बनवायचे, सासरी गेलं की कामाला येईन."

" दादा, मला वाटलंच होतं असंच काहीसं बोलणार तू."

"मी काहीही चुकीचं बोललो नाही."

आईने रमेशसाठी देखील प्लेट आणली.
त्या दोघांची नेहमीप्रमाणे मस्ती चालू होती.

ती मात्र राधा आणि रमेशसाठी भावुक झाली.
बघता बघता मुलं कधी मोठी झाली कळलंच नाही. रमेशचं लग्न होईल आणि थोड्या दिवसाने राधाही सासरी जाईल.
तिचं मन ह्या विचाराने भरून आलं.

डोळे भरून आले; पण लगेच तिने डोळे पुसले.
राधा आणि रमेशने पाहिले की, तिच्यासाठी उदास होतील.

"आई, माझं झालं खाऊन. हो आणि तू पण खाऊन घे."

"राधा, मी करेन गं नाश्ता. तू कॉलेजला गेली की उपाशी राहू नको. टिफिन खाऊन घे. कॉलेज , क्लास करत थकून जाते. कधी कधी टिफिन तसाच आणते." आई काळजीपोटी म्हणाली.

"आई, खाईन गं मी. बरं चल जाते मी, नाहीतर उशीर होईल." राधा पायात सँडल घालत म्हणाली.

"राधा, कितीवेळा सांगितले आहे जाते नाही तर येते म्हणावं गं." आई.

"सॉरी आई .येते मी. राधा जीभ चावत म्हणाली.

पुन्हा रमेशकडे पाहत म्हणाली,
"बाय नवरदेव."


राधा कॉलेजला गेली आणि रमेशही ऑफिसला गेला.

आई मात्र अजूनच भावुक झाली होती.
बाबा देखील फ्रेश होऊन आले.
तिला असं शांत बसलेलं पाहून ते समजून गेले ती उदास आहे.

"काय झाले. आज उदास दिसते आहेस?" ते तिच्या बाजूला बसत म्हणाले.

दीर्घश्वास घेत ती म्हणाली.
"मुलं किती लवकर मोठी झाली. आपल्या रमेशचं लग्न होईल. राधाही थोड्या दिवसाने सासरी जाईल."

बाबा देखील हळवे झाले.
त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"ही पिल्लं कधी मोठी झाली कळलंच नाही. आता ते त्यांच्या विश्वात राहतील. आपण त्यांच्या विश्वात असू का?"

"का असा विचार करते आहे? आपली दोन्ही मुलं खूप छान आहेत. त्यांना तू छान वळण लावलं आहे. संस्कार दिले आहे."

आज तिचं मन भरून आलं होतं.
"मुलं मोठी होतात; पण आई कधीच मोठी होत नाही. माझी तर एकच ईच्छा आहे रमेश आणि राधा दोघेही त्यांच्या आयुष्यात खुश राहावे.
एका आईला काय हवं असतं? मुलांच्या सुखात तिचं सुख."

बाबा तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले,
"तू काळजी करू नको. सगळं छान होईल. वैदेही देखील चांगली मुलगी आहे. दोघेही छान संसार करतील. आपल्या राधालाही आपण छान मुलगा शोधुया. जो तिला सुखी ठेवेल."

बाबांच्या बोलण्याने तिला बरं वाटत होतं; पण तरीही आईचं काळीज ते. एकदा भावुक झाली की, भूतकळात जाते.

राधाचे आई बाबा, तिच्यासाठी मुलगा शोधण्याची चर्चा करत होते. त्याना अजून माहीत नव्हतं राधाने आधीच आयुष्याचा जोडीदार म्हणून राजला निवडले होते. राधा सांगेल का आई बाबांना?

काय होईल पुढे?
वाचता राहा ओढ तुझ्या प्रेमाची.

कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.



🎭 Series Post

View all