ओढ तुझ्या प्रेमाची भाग १७

नियतीच्या मनात हेच होतं
कथेचा पूर्वार्ध

गेल्या भागात आपण पाहिले की, राज गावी गेला होता ते राधाला माहीत नव्हतं. तो असा अचानक न सांगता गेला म्हणून राधा नाराज होती. आता पाहू पुढे.

कॉलेजला जाण्याची इच्छाच नव्हती; पण परीक्षा जवळ आल्या होत्या, म्हणून जाणं गरजेच होते.
काल किती छान मूड होता आणि आज.
तिला राजची काळजी वाटत होती. पहिल्यांदाच असे झाले होते.


ती तयार होऊन आली.
तिचा उतरलेला चेहरा पाहून आईने विचारले, "राधा, बरं वाटत नाही का?"

"आई, मी ठीक आहे." राधा
"राधा, परीक्षेचे टेंशन अजिबात घेऊ नको. नेहमीप्रमाणे तू छान मार्क काढशील."

आई डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

"नाही गं आई मी अजिबात विचार करत नाही. असाही माझा अभ्यास झाला आहे."

"बरं, आज आम्ही वैदेहीच्या घरी जाणार आहोत. लग्नाची तारीख फिक्स करायला." आई.

"ठीक आहे आई. मला तर यायला जमणार नाही. आज जास्त वेळ क्लास आहे."

राधा काल खूप खुश होती आणि आज आईला आज जाणवत होतं आज ती नाराज आहे.

रमेश आला. नेहमीप्रमाणे तो तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. आज मात्र ती जास्त काहीच बोलली नाही.


ती निघून गेली.

"आई, आज राधाला काय झाले? शांत दिसत होती?"

"माहीत नाही काय झाले? तरी तिला मी म्हणाले, अभ्यासाचे टेंशन घेऊ नको. परीक्षा जवळ येत आहेत म्हणून की काय जास्त विचार करते आहे असं वाटतं."

"आई, मला चांगलं माहीत आहे, ती परीक्षेचं अजिबात टेंशन घेत नाही. खूप हुशार आहे."
चहाचा घोट घेत तो म्हणाला.

"बरं, रमेश तुझ्या लक्षात आहे ना, आज वैदेहीच्या घरी जायचे आहे. त्यांच्या ओळखीचे ब्राह्मण आहेत ते लग्नाची तारीख सांगणार आहेत."

"हो आई आहे लक्षात, मी लवकर कामावरून घरी येईन, आपण सगळे जाऊया."

"तुला सांगायचे राहून गेलं, राधाला यायला जमणार नाही म्हणाली."

"का तिला जमणार नाही? ती आपल्यासोबत पाहिजे."

लगेच त्याने राधाला फोन लावला.

"राधा, तू आमच्यासोबत वैदेहीकडे यायचे आहे."

"दादा, खरंच खूप अभ्यास आहे. आज नाही जमणार."

"ते मला माहीत नाही. तुला यायचे आहे." असं म्हणत त्याने फोन ठेवला.

राधाला माहीत होतं ती गेल्याशिवाय रमेशही जाणार नाही.

"रमेश, तिला जमणार नसेल तर राहू दे."

"आई, असं कसं राहू दे? बहीण आहे माझी ती माझ्यासोबत मला पाहिजे. तिला जमणार नसेल तर नंतर कधीतरी जाऊया. "

"नको तसं करायला, चांगल्या गोष्टीना उशीर नको. जाऊया आजच."

इथे राधा कॉलेज सुटल्यावर लायब्ररीमध्ये येऊन बसली.

ओवी देखील सोबतीला होती.

ओवी पाहत होती राधा शांतच होती.

"राधा, काय गं किती शांत बसली आहेस. राजच आहे का तुझ्यासाठी सर्वस्व? आम्ही काहीच नाही का?"

ओवीच्या बोलण्यामुळे राधाची तंद्री भंग झाली.

"नाही गं ओवी तसं काही नाही."

"तसंच आहे राधा, कालपासून बघते आहे मी, तू शांतच झाली आहेस. राज येईलच चार दिवसात. किती विचार करते आहेस. पुरे आता."

राधा काहीच बोलली नाही.

"राधा, क्लासचा टाईम झाला. निघुया?"

"हो" राधा.

ओवी आणि राधा क्लासला गेल्या.

खरंतर राधाचे तिथेही लक्ष नव्हतं.
घरी गेली.

आई,बाबा आणि रमेश तयार होऊन बसले होते.
राधाचीच वाट बघत बसले होते.

"राधा, जा पटकन फ्रेश हो आणि तयार होऊन ये."

राधा रुममध्ये जाऊन तयार झाली.

तिचा चेहरा अजूनही उरलाच होता.

"राधा, काय झालं?" रमेश.

"काही नाही दादा." राधा.

"मग हसरा चेहरा ठेव." रमेश.

राधाने गोड स्माईल दिली.

वैदेहीच्या घरी पोहोचल्यावर तिच्या घरच्यांनी छान पाहुणचार केला.

रमेश आणि वैदेही दोघेही एकांतात बोलण्यासाठी गेले.

इथे राधा, आई आणि बाबा होते.

राधा अजूनही राजच्या विचारात होती.

त्याने मेसेजचा रिप्लाय दिला की, नाही सतत पाहत होती.

वैदेहीची आत्या नीलम देखील होती.

निलमला राधा खूप आवडली.
निलमचा मुलगा कियांशसाठी देखील स्थळ बघणं चालू होते.

तो एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता.

राधाच्या आईशी तिला तेच बोलायचे होते.

निलमने तिला बाजूला बोलवले.

"ताई, मी सरळ मुद्द्याचे बोलते. माझा मुलगा आहे , त्याचे नाव कियांश आहे. तो चांगल्या कंपनीत कामाला आहे. आम्ही त्याच्यासाठी मुलगी बघतो आहोत. मला तुमची राधा खूप आवडली. बघा तुम्हाला जर पटत असेल तर बघण्याचा कार्यक्रम करुया."

हे असं पटकन नीलम बोलली त्यामुळे राधाच्या आईला काही सुचलं नाही.

"राधा, आताशी शेवटच्या वर्षाला शिकत आहे. तिला तिच्या पायावर उभे राहायचे आहे. आताच तिच्या लग्नाचा विचार नाही." राधाची आई.

निलमच्या मनात राधा भरली होती.

ती म्हणाली, "आम्हाला अशी घाई नाही. आम्ही थांबायला तयार आहोत. राधाला, कियांश जर पसंत पडला आणि कियांशला राधा तर आपण थांबू शकतो."

"नीलम ताई, मी घरी विचारून कळवते."


लग्नाची तारीख फिक्स केली गेली.

घरी आल्यावर राधा रुममध्ये निघून गेली.

तिला कल्पना नव्हती, की तिच्यासाठी स्थळ आलं आहे.


आईने रमेश आणि तिच्या बाबांना सांगितले.

रमेशने कियांशचा फोटो बघितला होता.
दिसायला हॅन्डसम होता आणि सेटल होता. वैदेहीनेच त्याला सांगितले होते.

"आई, कियांश दिसायलाही छान आहे आणि चांगल्या हुद्द्यावर आहे. विचार करायला हरकत नाही. हो पण राधा स्वताच्या पायावर उभी राहिली की, मग तिच्या लग्नाचे बघावे असे मला वाटते. हो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिला तो आवडला पाहिजे."


एकदाचे चार दिवस निघून गेले.

राधा फार खुश होती. गेल्या गेल्या त्याला जाब विचारणार हे मनोमन ठरवले होते.

ती लवकरच कॉलेजला गेली. क्लासरुममध्ये गेली, पाहते तर राज आला होता.

कधी कॉलेज सुटतं ह्याची वाट पाहत होती.
एकदाचे सगळे लेक्चर झाले.

नेहमीच्या ठिकाणी सगळेच जमले.
राजही होता.

ओवी राधाला चिडवत होती.

अमोल, राज शांत होते.

नक्कीच काहीतरी घडलं आहे असं राधाला मनातून वाटत होते.

अमोल आणि ओवी लायब्ररीत गेले.

राधा आणि राज दोघेही एकमेकांना पाहत होते.

राजचा चेहरा फार उतरला होता.

राजला काय झालं होतं ?

राधानेच बोलायला सुरवात केली.
"काय हे राज? तू एकदाही मला सांगितले नाही की तू गावाला चालला आहे?."

राज मान खाली करून उभा होता.

तो काहीच बोलत नव्हता.

"राज, मी तुझ्याशी बोलते आहे. बोल काहीतरी."

राजला काहीच बोलवत नव्हते.

राधाला काळजी वाटू लागली.

"राज, सगळं ठीक आहे ना?" तिने त्याचा हात पकडत विचारले.

"कसं सांगू राधा?" राजचा कंठ दाटून आला.

"राज, जे काही असेल ते मला सांग प्लिज."

"राधा, कसं सांगू तुला? माझ्या मामाला ह्रदय विकाराचा झटका आला होता; म्हणून आम्ही गावी गेलो. आईचा मामावर खूप जीव. मामाला दवाखाण्यात नेहण्यात आले. मामाला ब्लॉकेज दाखवले. हार्टची सर्जरी करण्यास सांगितले. ऑपरेशन करायला जाण्याआधी मामाने आईला स्वतःची ईच्छा बोलून दाखवली."

"काय ईच्छा बोलून दाखवली?" राधा.


"राधा, मामाची ईच्छा होती की मामाच्या मुलीचे वंदनाचे लग्न माझ्याशी व्हावं."

हे ऐकताच राधाचा चेहरा उतरला.

राजला पुढे बोलवेना.


"राधा, भावनेच्या भरात आईने मामाला वचन दिले की, माझं लग्न मामाच्या मुलीशी करणार."

हे ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी आले. पाया खालची जमीन सरकली.

"राधा, मी आईला सांगितले की, मला तू आवडते;पण आईने माझं ऐकलं नाही. ती म्हणाली मी मामाला वचन दिले आहे. तू जर वंदनाशी लग्न केलं नाही तर मी माझ्या जीवाचे बरं वाईट करेन. राधा, आई हट्टाला पेटली आहे, मला काहीच सुचेना."

राधासाठी हा खूप मोठा धक्का होता.
राजवर मनापासून प्रेम केलं होतं आणि असं अचानक काही होईल वाटलं देखील नव्हतं.
ती फार दुःखी झाली.

बराच वेळ ती शांत बसली.

त्या दुःखात देखील तिने राजचे सांत्वन केले.
तिला सर्व बोलायला जड जात होते.


"राज, मी तुझ्यासोबत खूप स्वप्न सजवली होती.
तुझ्याशिवाय मी आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही. हे सर्व ऐकून मला काय बोलावं सुचेना. मला माहित आहे तू कात्रीत अडकला आहेस. राज, फार वाईट वाटतंय. रडून घ्यावं असं वाटतंय. राज हेच आपल्या नशिबी लिहिले होते. तुला असं वाटत असेल मी हे सगळं सर्व सहज एक्सेप्ट कसं काय करू शकते. ह्याचे कारण तुझं प्रेम आहे. तुला त्रास झालेला मला बघवणार नाही. आईचे वचन तू पाळ. आपलं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आणि राहील."

"राधा, मी तुझा अपराधी आहे. अनेक स्वप्न दाखवून मी माघारी फिरतो आहे. मला माफ करशील?"

"राज, तुझी काहीच चूक नाही. तू वाईट वाटून घेऊ नको. तू मला खूप प्रेम दिलं. आपलं मानलं. जे घडतंय,होतंय ते तू जाणूनबुजून नाही करत. तू कसा आहेस हे मला माहित आहे. तू असा विचार करू नको. कधी माझी गरज लागली तर हक्काने सांग."

दोघांचे अश्रू अनावर झाले होते.

बोलायची हिम्मत होत नव्हती.

"काळजी घे राज." राधा निघून गेली.

राज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मनोमन माफी मागत होता.


नियतीने डाव मांडून ठेवला होता. इतकं प्रेम केलं होतं. स्वप्न सजवली होती, एका क्षणात सारी स्वप्न कोसळली.

कर्मश:

अश्विनी कुणाल ओगले.


🎭 Series Post

View all