ओढ तुझ्या प्रेमाची भाग १८

त्याच्या आयुष्यात एक वळण आलं.
ओढ तुझ्या प्रेमाची भाग १८

पूर्वार्ध.
गेल्या भागात आपण पाहिले की, राज राधाला सांगतो आईने मामाच्या मुलीसोबत लग्न करावे म्हणून वचन दिले होते. आता पाहू पुढे.

राधाला अजूनही विश्वास बसत नव्हता की, हे असं झालं आहे. ओवी तिला आवाज देते ती थांबते.

"काय मग झालं का तुझ्या राजशी बोलून."

राधाचे डोळे लाल झाले होते.

राधा काहीच बोलली नाही.

"राधा,अगं काय हे? रडते आहेस."

"काय करू ओवी मी सांग ना?" राधा रडक्या सुरात म्हणाली.

"राधा, काय झाले?"
राधाने सर्वकाही ओवीला सांगितले.
ते ऐकून ओवीला फार वाईट वाटले.
तिचं सांत्वन कोणत्या शब्दात करावे हे तिला सुचेना.

ती देखील शांत बसली.

ओवीला राधासाठी फार वाईट वाटत होतं. ओवीने दोघांचे प्रेम पाहिले होते. राज आणि राधा दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे.


तिथे अमोलला राजने सर्वकाही सांगितले होते.
राज आणि राधा ह्यांचे नाते पुढे जाईल ह्याची शाश्वती नव्हती.

सगळं काही अचानक घडलं.

राधा आणि राज दोघे आता एकमेकांशी बोलत देखील नव्हते. राजला अपराधीपणा वाटत होता.

राधा देखील नाराज राहू लागली.

बघता बघता वार्षिक परीक्षा आल्या.
कॉलेजचा शेवटचा दिवस होता.

राज आणि राधा एकमेकांशी बोलण्यासाठी आतुर झाले होते.

राज आला.
"राधा, मला बोलायचे आहे."


"बोल राज."


"राधा, आज आपला कॉलेजचा शेवटचा दिवस. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच तू मला खूप समजदार वाटली, तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. बघ ना तुझ्या ठिकाणी दुसरी मुलगी असती तर तिने मला जाऊ दिलं नसतं; पण तू हे सगळं ऐकून सारं सहज स्वीकारले. ना कसला हट्ट ना काहीच. तुझ्यासोबत जे क्षण होते ते फार सुंदर होते राधा. माझ्या प्रत्येक विचारात तू होती आणि राहशील; पण तू माझ्यापासून दुरावणार हे मला सहन होत नाहीये. मला माहित नाही मी वंदनाला माझ्या मनात जागा देऊ शकतो की नाही; पण तुझं स्थान कायम अबाधित राहील. राधा, तू तुझ्या आयुष्यात खुश राहा. तू देखील चांगला मुलगा बघून आयुष्यात पुढे जा."


राधाला काहीच बोलवत नव्हतं.

"राज, तू देखील खुश राहा."


राजने हात मिळवण्यासाठी हात पुढे केला.

राधाने स्वतःचा हात हातात दिला.

राजने हात घट्ट पकडला.

डोळे मिटले.

मनातच राधाला म्हणाला, "लव्ह यु राधा."

त्याने खिशातून अंगठी काढली आणि राधाच्या हातात दिली.

"राज हे काय आहे?"

"राधा, ही खास तुझ्यासाठी मी घेऊन ठेवली होती."

राधाने ती अंगठी पाहिली.

"राज, खूप छान आहे अंगठी; पण आता ह्यावर माझा अधिकार नाही. आता ह्या अंगठीवर वंदनाचा अधिकार आहे."

तिने पुन्हा ती अंगठी परत दिली.


ती चुकीचं बोलतच नव्हती.

"राज, तुझ्या आणि वंदनाच्या नात्यात मी कुठेच नको. सुखाने संसार कर. काळजी घे राज."

असं बोलून राधा निघून गेली. तिला राजचा चेहरा बघवत नव्हता.

राजने ती अंगठी हातात घट्ट पकडली आणि रडू लागला.

अमोल येऊन त्याचे सांत्वन करू लागला.

"राज, शांत हो. सावर स्वतःला."

"कसं सावरू अमोल? राधासोबत किती स्वप्न पाहिली होती. हे काय होऊन बसले?"

"राज, जे आहे त्याचा लवकरात लवकर स्वीकार कर. असं करत राहिला तर त्रास होईल तुला."


"होऊ दे त्रास अमोल. असं वाटतं जीव गेला तरी चालेल; पण राधाशिवाय मी नाही जगू शकत."


ती भेट शेवटची ठरली.

राधाने मन घट्ट केलं होतं. राजचा विरह सहन होत नव्हता,तरीही आता जगावं लागणारच होते.

राज देखील तिच्या विचारात असायचा.

आईने दिलेल्या वचनामुळे हतबल झाला होता.
राज राधाला मॅसेज,कॉल करण्याचा प्रयत्न करायचा; पण तिने त्याच्याशी कॉन्टॅक्ट तोडला होता.


संपर्कात राहिली तर अजून त्रास होईल.

तिने एकदा मेसेज केला राजला.

"राज, संपर्कात राहिलो तर अजून त्रास होईल. तुलाही आणि मलाही. संपर्क न केलेला बरा."
हे टाईप करत असताना तिचे हात थरथरत होते.

ईच्छा तर नव्हती त्याच्यापासून दूर जायची;पण नियतीने तो डाव मांडला होता. विस्कटून कसं चालणार?

राजचा मॅसेज, मिस कॉल सारं काही सुखवणारं होतं आणि त्याचक्षणी त्रास देणारं होतं.

राधाने तटस्थ भूमिका घेतली होती.

त्याच्या मार्गात तिला थांबायचे नव्हते.

कारण त्याचा मार्गच वेगळा होता आणि तिचाही मार्ग खूप वेगळा होता.


राधा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. राजही उत्तीर्ण झाला.

राधा चांगल्या कंपनीत कामाला लागली. पुढचं शिक्षण तिने शिकत असतांना घेतलं.


राज देखील कामाला लागला.


बराच काळ लोटला.

दोघेही एकमेकांच्या संपर्कात नव्हते.


ओवी आणि अमोल एकमेकांच्या संपर्कात होते.
त्यामुळे ओवी राजबद्दल राधाला सांगायची आणि अमोल राधाबद्दल राजला सांगायचा.

वैदेही आणि रमेशचे लग्न छान पार पडले.
वैदेही घरात रुळली.

राधाचा समंजसपणा, स्वभाव सारं काही जवळून पाहत होती.
वर्ष लोटले आणि वैदेहीने रमेशकडे राधाच्या लग्नाचा विषय काढला.

कारण रमेश आणि वैदेहीच्या लग्नाच्या वेळेस राधा कियांशच्या मनात भरली होती.


कियांशने ठरवलं होतं लग्न करणार तर राधाशी.

वैदेही देखील राधाला जवळून पाहत होती.

राधा गुणी, संस्कारी मुलगी होती.

आपल्या भावाला अशी छान मुलगी भेटली तर त्याचे आयुष्य मार्गी लागेल.


रमेशने राधाला लग्ना बद्दल विचारले.

राधाने कियांशला पहिले होते. चांगला मुलगा होता.


राधाने रमेशकडे वेळ मागितला.


राधासाठी तर राज सर्वस्व होता.

आज ना उद्या लग्न तर करावं लागणारच.

कधी नव्हे ते तिने राजला फोन केला.

राधाचा कॉल आलेला पाहून तो खुश झाला.


"राज, कसा आहेस?"

"मी बरा आहे राधा. तू कशी आहेस?"

"मी पण मजेत."

"राज, माझ्यासाठी स्थळ आलं आहे ."


राजला वाईट वाटलं; पण त्याचे एक मन म्हणाले 'राधाला देखील आयुष्यात पुढे जाण्याचा अधिकार आहेच. असेही माझ्यात किती दिवस गुंतून राहणार.'

राजचे मन गहिवरून आले.

"राधा, तू कियांशचा विचार कर. चांगला मुलगा आहे. माझं देखील पुढच्या महिन्यात लग्न आहे."

"खुश रहा, आनंदी राहा. काळजी घे."

असं म्हणत तिने फोन ठेवून दिला.


खऱ्या अर्थाने राधा आणि राज एकमेकांच्या आयुष्यातून जाणार होते.

चार दिवसाने रमेशला तिने कियांशसोबत लग्न करण्यासाठी होकार कळवला.

आई, बाबा, रमेश, वैदेही सगळे खुश झाले.

कियांश देखील खुश झाला.


एक वर्ष ऑफिसच्या कामानिमित्त त्याला बाहेर जायचे होते. राधाचेही शिक्षण चालू होते. वर्षभरानंतर लग्नाची तारीख फिक्स केली गेली.

कियांश राधाला आवर्जुन फोन करायचा.
तिच्या आवडी निवडी सारं काही जाणून घ्यायचा.


एक दिवस राधाने कियांशला राजबद्दल सांगितले.

तिला नात्यात परदर्शकता हवी होती.

कियांशने देखील सारं काही ऐकलं.

"राधा, राज फार नशीबवान होता की, तुझ्यासारखी मुलगी त्याच्या प्रेमात पडली."


"कियांश, खरंतर मी नशीबवान होते की त्याच्या सारख्या मुलाने माझ्यावर प्रेम केले होते. एक व्यक्ती म्ह्णून तो खूप चांगला होता. त्याला कोणाचे दुःख बघवत नव्हते. खूप स्वप्न रंगवली होती आणि असे झाले."


राधा आणि कियांश एकमेकांना समजू लागले.
कियांशचा स्वभाव फार छान होता. तो राधाला समजून घ्यायचा.


कियांशच्या रुपात एक मित्र भेटला होता.

राजचे पंधरा दिवसांवर लग्न होते.

पुन्हा राधाने फोन केला.

"राज, तुला खूप खूप शुभेच्छा. खुश राहा, आनंदी राहा. हा शेवटचा फोन आहे आपला. त्यानंतर मला वाटत नाही की, मी तुझ्याशी बोलू शकेल."

भरलेल्या डोळ्यांनी राधाने फोन कट केला.

राजही उदास होता.


राजचे लग्न झाले.


त्याने वंदनासोबत संसाराला सुरवात केली.
राधाला विसरुन जाणं सोप्प नव्हतं. ह्रदयाच्या कप्प्यात अजूनही राधाचे स्थान होते.


वंदना त्याला खूप जीव लावायची.
वंदना त्याला आपलंसं करण्याचा खूप प्रयत्न करायची. त्यालाही समजायचे.

थोड्या महिन्याने वंदनाला आई होण्याची चाहूल लागली. सात महिने पूर्ण झाल्यावर ती आईकडे गेली.

सगळं सुरळीत चालू असताना एक गोष्ट घडली.

राजच्या आयुष्यात एक वळण आले.

काय असेल हे वळण?

क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले