ओढ तुझ्या प्रेमाची भाग १९

"राधा, तुला माझी शपथ आहे" स्वताच्याआ डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला.
पूर्वार्ध गेल्या भागात आपण पाहिले की, राजचे लग्न होते आणि राधा देखील कियांशसोबत लग्न करणार असते. राजची बायको वंदना सातवा महिना लागल्यावर माहेरी जाते. आता पाहू पुढे.

राजला त्याच्या मामाचा फोन येतो. ते सांगतात की, वंदनाचे पोट अचानक दुखत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आणले आहे.


राज देखील ताबडतोब गावी निघाला.
तिथे गेल्यावर त्याला समजले की, वंदनाने प्रिमॅच्युअर बाळाला जन्म दिला होता. मुलगी झाली होती. ती देखील खूप सिरीयस होती.

राजला जसे पाहिले तसे वंदनाने डोळे बंद केले.
जणूकाही राजलाच पाहण्यासाठी ती अजून जिवंत होती. तिने जगाला निरोप दिला होता.

ही खबर जशी सर्वांना समजली तशी रडारड सुरू झाली.

राजला तर विश्वासच बसत नव्हता की, वंदना जग सोडून गेली आहे.

बाळाला देखील काचेच्या पेटीत ठेवलं होतं.
तीच काय वंदनाची शेवटची निशाणी होती.

बाळाच्या जीवाचे रक्षण व्हावे म्हणून सतत प्रार्थना करत होते.


राजचा संसार सुरू होण्याआधीच संपाला होता.

वंदनाने खूप जीव लावला होता.

तिचा स्वभाव गोड होता. हे असं काही होईल वाटलं देखील नव्हतं.

त्या लहानग्या जीवाला तर कल्पना देखील नव्हती की, तिने आईला गमावले आहे.
तो इवलासा जीव जगण्यासाठी धडपडत होता.

राजचा जीव टांगणीला लागला होता.

फार निराश झाला तो.

पुढे सर्व अंधकार होता.

त्याची आई देखील खचून गेली; कारण पोराचे हाल तिला बघवत नव्हते.
ती स्वतःला दोषी समजत होती.
लग्न करायची राजची ईच्छा नव्हती.

तिच्या डोक्यात तेच फिरत होते.

कसं होणार पोराचे. संपूर्ण आयुष्य पुढे आहे.

हळुहळु मुलीची तब्येत सुधारली.

डिस्चार्ज देण्यात आला.

गावारून निघतांना राज फार हळवा झाला होता.

वंदनाने खूप स्वप्न सजवली होती.

ती त्याला म्हणाली होती,

"जेव्हा मी बाळाला घरी आणणार तेव्हा छान विडिओ शूट करूया. गोड आठवण कायम जपून ठेवणार."

ते आठवून राजला रडू येत होतं.

वंदना गेली आणि तिची स्वप्नही.

गोड आठवणी नाही; पण कटू आठवणी कायम त्रास देणार होत्या.

ही गोष्ट जेव्हा अमोलला समजली तेव्हा तो राजला भेटायला आला.

त्यालाही फार वाईट वाटले.

कमी वयात हे सारं घडून गेलं होतं.

त्याचे सांत्वन करत तो म्हणाला, "राज, बाळासाठी तुला आता सावरायला पाहिजे."

"अमोल, काय होऊन बसले. वंदना सोडून गेली. ह्या बाळाची काय चूक? आई काय असते हे समजण्या आधीच देवाने हिरावून नेले. सहन होत नाही."

तो त्याच्या लेकीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला.


अमोलला त्याची अवस्था बघवत नव्हती.

काय म्हणून सांत्वन करणार?

राजचा संसार सुरू होण्याआधीच संपला होता.

त्याच्या आईला फार काळजी वाटत होती.

इथे अमोलकडून ही खबर राधाला जशी समजली, तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली.


'देवा! हे काय घडलं? माझ्या राजच्या वाट्याला का हे दुःख.'

ती राजचा विचार करून अस्वस्थ झाली.

तिला काहीच सुचेना.

कियांशशी रोज बोलायची; पण जशी खबर समजली तशी ती निराश झाली. त्याच्याशी बोलतांना लक्ष दुसरीकडेच असायचे.

तिचं कशातच मन लागेना.

ओवीसोबत ती राजला भेटायला गेली.
राधाला बघून राजच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

राजच्या मांडीवर तो इवलासा जीव पाहून राधाच्या काळजाचे पाणी झाले.

त्याच्या आईची अवस्था देखील फार वाईट होती.


ओवी बोलू लागली, "राज, आता विचार करू नको. पुढे आयुष्य आहे ते बाळासाठी जगावं लागणार."

राज शांतच होता.

राधा स्वतःचे अश्रू लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती.

राधाला असं वाटत होतं, राजच्या डोळ्यातील पाणी पुसावे. त्याला उराशी कवटाळून धीर द्यावा.

हे शक्य नव्हतं.

राधाचं खरं प्रेम होता राज.
ती त्याला दुःखात पाहूच शकत नव्हती.
त्याच्या वाट्याला असे दुःख आले होते की, कायम त्याच्या सोबतीला राहणार होते.

"राज, काळजी घे." राधा निघताना इतकंच म्हणाली.

राजच्या घरातून बाहेर आल्यावर ओवी म्हणाली,
"राधा, तू काहीच बोलली नाहीस?"

"ओवी, कसं बोलू मी राजशी? मला त्याची अवस्था पाहवत नव्हती. खरं सांगू का ओवी?
राजने जेव्हा मला सांगितले होते की, त्याचे लग्न वंदनाशी व्हावं म्हणून आईने वचन दिले आहे,तेव्हा देखील इतका त्रास झाला नव्हता जितका आज होत आहे. मी राजला असं पाहू शकत नाही. ते इवलसं बाळ, त्याची काय चूक आहे? किती त्या वेदना,दुःख राजच्या नशिबी.
इतके दिवस वाटत होतं, कमीत कमी तो त्याच्या संसाराला लागला आहे,पण आता जो त्याला त्रास होत आहे तो बघवत नाही."


"राधा, बरोबर आहे तुझं. राजला असं बघू वाटत नव्हतं. असं व्हायला नको होते. त्याच्या संसारात तो रमला असता; पण हे काय होऊन बसले."


इतके दिवस राजपासून दूर पळणारी राधा, आता मात्र राजच्या विचारात राहू लागली.

कियांशकडे देखील दुर्लक्ष करू लागली.

राधा खूपच शांत राहू लागल्यामुळे घरातील सगळ्यांना तिची काळजी वाटू लागली.

रमेशने विचार केला, एकदा राधासोबत बोलून बघावं.

सुट्टीच्या दिवशी राधा बेडरूममध्ये बसली होती.राजचेच विचार डोक्यात होते.


"राधा, चल आज बाहेर फिरायला जाऊया."

"दादा, नको आज मूड नाही. तू आणि वहिनी जाऊन या."


"राधा, काही प्रॉब्लेम आहे का? सतत विचारात असते?"

"नाही दादा." नजर चोरत म्हणाली.

"दादाला नाही सांगणार का?"

"खरंच दादा काही प्रॉब्लेम नाही."

रमेशला माहीत होतं राधाला कसं बोलतं करायचे.


त्याने तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला,"तुला माझी शपथ आहे राधा. सांग काय झालं आहे?"

क्रमशः

अश्विनी कुणाल ओगले.

आता रमेशने स्वतःची शपथ दिली आहे. राधा खरं काय ते सांगेल? पाहू पुढच्या भागात.


🎭 Series Post

View all