ओढ तुझ्या प्रेमाची भाग २०

तिला कॉलेजचा शेवटचा दिवस आठवला
ओढ तुझ्या प्रेमाची भाग २०

कथेचा पूर्वार्ध.
गेल्या भागात आपण पाहिले की, राजची बायको वंदना बाळाला जन्म देते आणि देवाघरी जाते. ही गोष्ट राधाला समजल्यापासून नाराज राहू लागते. रमेश तिच्याशी बोलतो. ती सगळं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही असे सांगते. रमेश स्वतःची शपथ घालतो.

रमेशने शपथ घातली म्हंटल्यावर राधाला खरं बोलणं भाग होतं. तिच्यासाठी दादा प्रिय होता.

राधाचे डोळे पाणावले.


"राधा, जे काही असेल ते सांग; पण प्लिज मनातून सगळं बाहेर काढ. तू अशी उदास झालेली बघवत नाही."

"दादा, तू राजला ओळखतो ना? माझा मित्र."

राधाने अनेकदा राज,अमोल बद्दल त्याला सांगितले होते.

"हो तुझ्या कॉलेजमध्ये होता तो ? अमोल, ओवी,राज आणि तू असा तुमचा चौघांचा ग्रुप होता."

"हो दादा तोच राज."

"त्याचे काय झाले?" रमेशने उत्सुकतेपोटी विचारले.

"दादा, त्याचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. बायको प्रेग्नेंट होती. सातव्या महिन्यातच तिला त्रास झाला. त्यात ती ऑफ झाली. मुलगी वाचली."

"अरे देवा! फारच वाईट झाले."

"दादा, आज मी त्याला भेटायला गेले होते फार वाईट वाटलं." राधा डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली.


"राधा, जास्त विचार करु नको. राज सावरेल थोड्या दिवसात." तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.


"दादा, मी आजवर सगळ्या गोष्टी सांगितल्या; पण एक गोष्ट नाही. मी तुला सांगणारच होते ;पण सगळं इतक्या लवकर घडलं की मी काहीच सांगू शकले नाही."

"कोणती गोष्ट?" रमेश.

"दादा, मला राज आवडायचा. त्यालाही मी आवडायचे. आम्ही दोघांनी सेटल झाल्यावर लग्न करायचे ठरवलं होतं; पण..."

राधा शांत बसली..

"पण काय राधा?" रमेश.


"दादा, राजच्या आईने त्याला शपथ घातली की, लग्न करायचे तर त्यांच्या भावाच्या मुलीशी वंदनाशी. त्यामुळे आमच्या दोघांचा नाईलाज झाला. दादा, मी त्याच्या आयुष्यातून बाहेर पडले ते कायमचे. कियांशसोबत लग्न करायचे ठरवलं.जेव्हा पासून राजच्या आयुष्यात हे घडलं आहे तेव्हापासून कशातच मन लागत नाहीये."

असं बोलून ती रडू लागली.


रमेशला राधासाठी फार वाईट वाटत होतं.

"राधा, जे झालं त्यात बदल करता येणार नाही. तुला माहितीये ना आई काय बोलते वाईट वेळ एक ना एक दिवस निघून जाते. राज पुन्हा नव्याने जगणार. त्याच्यासोबत त्याची मुलगी आहे. ती त्याला जगण्याचे बळ देईल. विश्वास ठेव."


राधाला धीर तर आला होता; पण तरीही राजचा चेहरा सतत डोळ्यासमोर येत होता.

कियांशचा फोन आला.

"राधा, काय हे किती वेळा फोन केला; पण तू फोन उचलत नाही. मॅसेजचा रिप्लाय नाही. सगळं ठीक आहे ना?"

"कियांश, राजची बायको देवाघरी गेली."

"ओहह नो.. फार वाईट झालं. तू भेटली का राजला?"

"हो मी भेटून आले. ठीक आहे मी नंतर बोलते कियांश. बाय." राधाने फोन ठेवला.


कियांशला राधाच्या वागण्यात फार बदल जाणवत होता. तो भावनिकरित्या तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, ती मात्र राजच्या विचारात होती. कियांशला वाटत होते की, राजच्या विचारातुन तो तिला बाहेर काढेल; पण तसं होत नव्हतं. त्याला राधा खूप आवडली होती.

कोणत्याही परिस्थितीत ती त्याला पाहिजे होती. त्यासाठी तो काहीही करायला तयार होता.

बघता बघता दिवस सरले.

कियांशला राधाशी लग्न कधी होते ह्याची ओढ होती.

राधा मात्र जैसे थे अशीच तिची अवस्था.

राधा कामावरुन घरी आली, बघते तर काय कियांश आला होता.


कियांश तिला पाहून खूप खुश झाला.
राधाने फक्त स्माईल दिली.

"कियांश, असं अचानक?"

"मी विचार केला माझ्या होणाऱ्या बायकोला सरप्राईज द्यावं."

कियांश तिला पाहून भलताच खुश झाला होता.

वैदेही देखील खुश झाली होती.

ती म्हणाली,
"कियांश, तू आणि राधा जाऊन बाहेर फिरून या."

वैदेहीला वाटत होतं, कियांशसोबत राधा जितका वेळ देईल तितकं दोघांमध्ये छान नातं तयार होईल.


रमेशचं पूर्ण लक्ष राधाकडे होतं.
ती खुश दिसत नव्हती.

राधा आणि कियांश बाहेर फेरफटका मारत होते.

"राधा, आज डिनर करूया?"

"आज नको, नंतर कधीतरी."

कियांशने तिचा हात अलगद हातात घेतला.

तिला असहज वाटले.

तिने पटकन हात बाजूला काढला.


कियांश प्रयत्न करत होता जवळ जाण्याचा आणि राधा दूर जात होती.


"राधा, एक विचारू?" कियांश.

"हो विचार?" राधा.

"मी तुला आवडतो ना?" कियांश.

"हो." राधा.

"फक्त हो?" कियांश.

"कियांश, मला तू आवडतो."

ती हसत म्हणाली.

"बरं, मी आवडतो. त्याचे कारण?"

"कियांश, तू फक्त प्रश्न विचारणार आहेस का?"

"हो तसंच समज. माझ्या प्रश्नाचे उत्तर दे."

"बरं, उत्तर हवं आहे तर सांगते. तू समजदार आहेस. ऐकून घेतो. माझा छान मित्र आहे. चांगला व्यक्ती आहेस."

"पुरे राधा, किती तारीफ. इतकं मी नाही ऐकू शकत. बरं तू डोळे बंद कर."


"का?"

"राधा, कर ना डोळे बंद." तो म्हणाला.

राधाने डोळे बंद केले.

त्याने खिशातून अंगठी काढली आणि राधाला डोळे उघडायला सांगितले.

पाहते तर काय तो गुडग्यावर बसला होता.

"कियांश हे काय आहे?" ती आजूबाजूला पाहत म्हणाली.

"राधा, आय लव्ह यु. लग्न करशील माझ्याशी?"

राधाला काहीच सुचत नव्हते.

"बोल राधा, लग्न करशील माझ्याशी?"

कियांश फार आशेने बोलत होता.

राधाने होकारार्थक मान हलवली.

त्याने पटकन रिंग तिच्या बोटात घातली.

"थँक्स अ लॉट राधा."

त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

"राधा, कॉफी?"

"चालेल."

दोघे कॉफी शॉपमध्ये गेले.

राधाला तो दिवस आठवला जेव्हा कॉलेजचा शेवटचा दिवस होता आणि राजने तिच्यासाठी अंगठी घेतली होती, तिने ती नाकारली होती.

ओवीने तिला सांगितले होते, राज खूप रडला होता.

तो विचार करून तिला फार वाईट वाटत होतं.

राधा विचारांच्या तंद्रीत आहे हे पाहून कियांश म्हणाला,
"राधा, हॅलो कुठे हरवली?"

"कुठेच नाही. बोल ना तुझं काम कसं चालू आहे?"

"फार वाईट काम चालू आहे."

"का?"

"माझ्या विचारात तूच असते, कुठेच लक्ष लागत नाही."


"कियांश, तू ना खरंच." राधा हसली.

"राधा, हसताना खूप गोड दिसते. अशीच हसत राहा."


"हम्म."

"राधा, मला माहित आहे तुझ्या विचारात राज असतो; पण राधा सतत तू त्याचा विचार करत राहिली तर तुला त्रास होणार. आपलं लग्न होणार. आपला संसार सुरू होणार. एक विनंती होती राधा, राजच्या विचारातून बाहेर पड प्लिज."


"कियांश, मी प्रयत्न करते आहे. मला माहित आहे तू मला समजून घेत आहेस. मला थोडा वेळ लागेल."

"राधा, पुढच्या महिन्यात लग्न आहे. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तू माझ्या आयुष्याचा भाग होणार आहे, तेव्हा मला असं वाटतं तू तुझा भूतकाळ पाठी सोडून माझ्यासोबत यावं. ते ओझं मनावर घेऊन येऊ नको. आय हॉप तुला समजलं असेल मला काय म्हणायचे आहे."

"कियांश, मी प्रयत्न करेन."

क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.

खरंच राधाच्या प्रयत्नांना यश मिळेल? राजच्या विचारातून बाहेर पडेल? पाहू पुढच्या भागात.