ओढ तुझ्या प्रेमाची भाग २१

राधा राजला विसरेल?

कथेचा पूर्वार्ध

गेल्या भागात आपण पाहिले की ,राधा राजबद्दल रमेशला सांगते. तिचा होणारा नवरा कियांश तिला सरप्राईज देतो. तो तिला म्हणतो भूतकाळ विसरून तू संसारात प्रवेश कर. आता पाहू पुढे

राधाचे मन कशातच लागत नव्हते. दुविधेत होती.

पहिलं मन
' कियांश किती प्रेम करतो, त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसते. त्याचेही म्हणणे बरोबर आहे,पाठचं विसरून पुढे जायला पाहिजे.'

दुसरं मन.

'राधा, खरंच तू राजला विसरशील? त्यानेही तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं. जीवापाड प्रेम केलं होतं. एकटक पाहत बसायचा. त्याची नजर तुझ्याच शोधात असायची.'

पहिलं मन

'त्याने साथ दिलीच नाही, तो गेला . त्याने स्वतःचा विचार केला. त्याने लग्न केलं.'

दुसरं मन
'त्याला लग्न करायचे नव्हते. आईने शपथ घातली होती. तसं नसतं केलं तर आईने जीवाचे बरं वाईट केलं असतं.'

पहिलं मन
'राधा, त्याने तुझा विचार केला नाही. त्याने आईला महत्व दिलं.'

दुसरं मन.
'जो आईला महत्व देतो तो नक्कीच चांगला व्यक्ती असतो. राज स्वार्थी झाला असता; पण त्याने स्वतःचं मन मारले.'


पहिलं मन.
'जो खरं प्रेम करतो तो कधीच सोडून जात नाही. राज तुला सोडून गेला ते पण कायमचा. त्याने तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. सत्य हेच आहे की, तो तुला सोडून गेला आहे. आता त्याचा विचार करू नको. कियांश खूप चांगला मुलगा आहे. तो तुला खुश ठेवणार.'

दुसरं मन

'राज, माझ्यावर आजही प्रेम करतो. त्याचं प्रेम खरं होतं हे मला माहित आहे.'

पहिलं मन

'जर प्रेम खरं होतं तर तो तुझ्या आयुष्यात का नाही?'


दुसरं मन

'तो माझ्या आयुष्यात आताही येऊ शकतो.'

पहिलं मन
'मग कोणी थांबवलं आहे?"

तोच आई आली.

"अगं राधा झाली का तयार? तुझ्या साड्यांची शॉपिंग करायची आहे."


"हो आई लगेच पाच मिनिटात येते."

आई राधाला पाहत होती.

"आई काय झाले." राधा.


आईचे डोळे पाणावले.

"राधा, पुढच्या महिन्यात तू जाशील. तुझी खूप आठवण येईल."


"आई, काय गं नको रडू ना. प्लिज." आईचे डोळे पुसत म्हणाली.


"मी काही खूप लांब चालले नाही.
तासाभरात मी इथे पोहोचेल.'


"राधा, आता जशी चोवीस तास माझ्यासोबत असते तशी नसणार. तुझा संसार असणार,नवीन माणसं त्यांनाही तुला वेळ द्यावा लागणार. सगळ्या मुली अश्याच म्हणतात; पण एकदा लग्न झालं की, त्यांचे एक वेगळे विश्व तयार होते,त्या विश्वात माहेरची माणसं असतात आणि त्यात सासरच्या माणसांचे पण स्थान असते. राधा, मला माहीत आहे तू सगळं छान हॅन्डल करशील."


आईचं सारं ऐकून राधालाही गहिवरून आलं.
लहान मुलीगत ती आईला घट्ट बिलगली आणि रडू लागली.


रमेश आणि वैदेही आले.

दोघी रडत होत्या ते पाहून रमेश आणि वैदेही दोघांच्या डोळ्यात पाणी आले.


"आई, काय हे अजून महिना आहे राधाच्या लग्नाला. आता पासून सराव सुरू केला का?"

रमेश वातावरण हलकं व्हावं म्हणून बोलत होता.


सगळे हसू लागले.

वैदेही म्हणाली
"कियांश शॉपमध्ये केव्हाचा येऊन बसला आहे. राधा खूप घाई झाली आहे त्याला."

राधाने डोळे पुसले.
"वहिनी, झाली माझी तयारी."


कियांशने आधीच ठरवलं होतं,सगळं मॅचिंग घ्यायचं. राधा म्हणेल तेच कपडे घ्यायचे.

राधा तिच्या परिवारासोबत आली.
तिला पाहून कियांश खुश झाला.
कियांशचे आई बाबा देखील आले होते.

राधाने पिंक कलरचा ड्रेस घातला होता. हलकासा मेकअप केला होता. गोड दिसत होती.

जिथे राधा बसली होती तिथे कियांश येऊन बसला.

वैदेही म्हणाली,
"आत्या, कियांश आमचा झाला बरं का?"

सगळेच हसू लागले.
आत्या म्हणाली,
"बरं, कियांश तुमचा तर राधा आमची झाली."

राधाच्या आई आणि बाबा दोघांच्या डोळ्यात पाणी आले.

लहानपणापासून लाडात वाढलेली राधा आता खऱ्या अर्थाने दूर जाणार होती.

राधा आता सासरी जाणार ह्या विचाराने रमेश देखील भावनिक झाला होता.

राधाच्या आवडीच्या साड्या घेतल्या, कियांशने त्यावर मॅचिंग असे आऊटफिट घेतले.

राधा वरवर हसत होती; पण मनातून इतकी खुश नव्हती.

शॉपिंग झाल्यावर, कियांश राधाच्या आई बाबांना म्हणाला "राधासोबत डिनरला जाऊ शकतो का?"

त्यांनी होकार दिला.

राधा नाहीच म्हणणार हे त्याला माहित होतं; म्हणून त्याने तिला न विचारता आई बाबांना विचारले.


कियांश गाडी चालवत होता आणि छान रोमँटिक गाणी लावली होती.

राधाचे तर अजिबात लक्षच नव्हतं.
खूप शांत होती.

कियांशने विषय काढला.
"राधा, तुझ्या मनासारखी झाली ना शॉपिंग?"

"हो छान झाली शॉपिंग."

राधा शांत आहे पाहून कियांशने गाडी थांबवली. तरी तिचे लक्ष नव्हते.

त्याने राधाचा हात हातात घेतला तेव्हा ती भानावर आली.

"कियांश, गाडी का थांबवली?"

"तुझ्याशी बोलायचे आहे म्हणून गाडी थांबवली. राधा, मी बघतो आहे, तुझं अजिबात लक्ष नाही. तुला कशातच इंटरेस्ट नाही. मला असं वाटतंय की तू अजूनही राजच्या विचारात आहे."


"कियांश, मी प्रयत्न करते आहे; पण सतत डोक्यात विचारांचे चक्र सुरू असते. काहीच समजत नाही बघ. मला फार त्रास होत आहे. कियांश मला माफ कर, माझ्या वागण्यामुळे तुला त्रास होत आहे."


"राधा, तुझ्या विचारांमुळे फक्त मला त्रास होत नाही तर, तुलाही होत आहे. असं किती दिवस विचार करणार. तुला त्यातून बाहेर पडावं लागणार. फक्त एकच महिना आहे लग्नाला. तुला माहीत आहे ही जी वेळ आहे ती खूप प्रिशियस आहे. पुन्हा पुन्हा ही वेळ मिळणार नाही. हे क्षण सुंदर आहेत. आपली शॉपिंग, आपल्या गप्पा ह्या सारं आठवणीत राहणार. तुझ्याकडूनही मला तसा रिस्पॉन्स पाहिजे. प्लिज राधा,राजच्या विचारातून बाहेर ये प्लिज."


"कियांश मी पूर्ण प्रयत्न करणार." राधा.


दोघेही जेवायला गेले.
कियांश राधाला एकटक पाहत होता.
पुन्हा त्याच्या एकटक पाहण्यात तिला राजचा भास होता. सगळीकडे फक्त आणि फक्त राज.

एक महिना होता लग्नाला.

काय होईल पुढे?
राधा राजला विसरेल?


क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले