ओढ तुझ्या प्रेमाची भाग २२

मेहंदीमध्ये माझं नाव आहे ना?
कथेचा पूर्वार्ध.
गेल्या भागात आपण पाहिले की, कियांश आणि राधाचा परिवार शॉपिंग करायला जातो.
राधा अजूनही राजच्या विचारात होती. कियांश तिला रिक्वेस्ट करतो की, राजच्या विचारातून बाहेर ये. लग्नाला एकच महिना राहिला होता.
आता पाहू पुढे.

सगळ्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. अवघे चार दिवस होते लग्नाला.

राधाचा मेहंदीचा कार्यक्रम होता.
ओवी देखील आली होती. राधा खुश नव्हती हे तिलाही कळत होतं.

मेहंदी काढून झाल्यावर ओवी आणि राधा दोघी रुममध्ये गप्पा मारायला निघून गेल्या.
खरंतर ओवीकडे तिला मन मोकळं करायचे होते.

बेडरूमध्ये आल्या आल्या ती ओवीच्या गळ्यात पडली आणि रडू लागली.

ओवीने तिचे डोळे पुसले.

"राधा, प्लिज रडू नको."

"ओवी, मला राजची खूप आठवण येत आहे. मी त्याला काही केल्या विसरू शकत नाही. मला खूप त्रास होत आहे."

ओवीला देखील वाईट वाटत होतं.
ती तरी काय करणार होती.

"ओवी, मी खूप प्रेम केलं आहे. त्याचे लग्न झाले आणि मी स्वतः दूर झाले. तुला माहीतच आहे ओवी. त्याने मला अंगठी दिली होती. मी त्या अंगठीचा स्वीकार केला नाही; कारण मला असं वाटत होतं त्या अंगठीवर फक्त आणि फक्त वंदनाचा अधिकार आहे. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं म्हणूनच मी त्याचा मार्ग मोकळा केला. त्याला खूप त्रास झाला होता. त्याने नवीन आयुष्य सुरू केले.ते ही माझ्याशिवाय. त्याला मी खूप इग्नोर केलं. मला इतकंच वाटत होतं, त्याचे लग्न झाले आहे , तर एक जोडीदार म्हणून त्याने त्याच्या बायकोशी एकनिष्ठ राहावे. मी जर त्याच्या आयुष्यात राहिले असते, तर खूप प्रॉब्लेम झाले असते. आमचं नातं फक्त मैत्रीचे नव्हते; प्रेमाचे होते. ओवी, वंदनाचे असे कळल्यावर मला फार त्रास झाला. होतो आहे आणि पुढेही होत राहणार. माझा राज एकटा पडला आहे. खूप एकटा. खूप हळवा आहे तो.
माहीत नाही तो कसं सावरणार? मला तोच विचार सतावत आहे. माझं कशातच लक्ष नाही. आई, बाबा, रमेश दादा सगळे मी जाणार म्हणून दुखी आहेत; पण मी राजचं कसं होईल ह्या विचारात आहे. ओवी, मला त्रास होत आहे.
असं वाटतंय मी कियांशला फसवत आहे. लग्न माझ्यासाठी प्रिय गोष्ट होती. दुसऱ्या प्रमाणे माझ्याही खूप अपेक्षा होत्या. राज आयुष्यात आला तेव्हापासून फक्त आणि फक्त त्याचा विचार केला. माझं लग्न त्याच्याशीच होणार हे मनाने केव्हाच स्वीकारले होते. खूप स्वप्न होती. प्रत्येक क्षणात, माझ्या श्वासात फक्त राज होता. ओवी, मला वाटतं पुढेही तो माझ्या मनात राहणार. आता मी ज्या अवस्थेतून जात आहे ती अवस्था फार वाईट आहे. मनात राज असतांना मी कियांशचा स्वीकार करूच शकत नाही. कधीच नाही. ही फक्त तोडजोड आहे.
खरंतर कियांश माझ्यापेक्षा चांगली मुलगी डिसर्व करतो, मझ्यासारखी भूतकाळात गटांगळ्या खाणारी मुलगी त्याच्या आयुष्यात नको आहे. त्याला वर्तमानात राहणारी, त्याच्यासारखी मुलगी पाहिजे. मी त्याचे आयुष्य का दावणीला लावू? त्याची काय चूक? तो खूप चांगला आहे. मी असं वाईट कसं वागू शकते? ते पण अश्या व्यक्तीशी जो माझ्या मनाची काळजी घेतो, मला समजून घेतो. ओवी, मला सांग मी चुकीचं वागते आहे का? मी कियांशसोबत लग्न करते आहे तो चुकीचा निर्णय आहे का? प्लिज सांग मला. तू माझी चांगली मैत्रीण आहे. तू माझ्याशी खोटं बोलणार नाही. प्लिज सांग."

"खरं सांगू का राधा. तू चुकीचा निर्णय घेतला आहे. "

"खरंच मी चुकीचा निर्णय घेतला आहे. मला हे थांबवायला पाहिजे. मला माझ्या आयुष्यात राज पाहिजे. माझं प्रेम माझ्या आयुष्यात पाहिजे. मी त्याच्यासोबत खुश राहणार. तू बरोबर बोलते आहेस."

मी आताच आई ,बाबा आणि दादाला सांगते.

ती दोन मिनिटं शांत बसली.

तिच्या डोक्यात विचार आला.

"ओवी, मी इतकी कशी स्वार्थी होऊ शकते? नाही मी असं नाही करू शकत. आई ,बाबा, दादा सगळे खुश आहेत. वैदेही वहिनीदेखील खुश आहे. मी अशी मुलगी नाही."

"राधा, शांत हो तू पॅनिक नको होऊ."

राधा रडायला लागली.

"ओवी, मी तडफडते आहे. आज मला समजतंय राजवर देखील असाच प्रसंग आला होता. कुटुंब की प्रेम? त्याने कुटूंबाला प्राधान्य दिलं. ओवी, मी पण तेच करणार. मी अशी वाहवत जाणार नाही. राज जेव्हा माझ्या आयुष्यातून गेला तेव्हा मी जगले. आताही जगेल. कियांश खूप प्रेम करतो. जीव लावतो. खूप जीव लावतो. तो माझ्यासाठी वेडावला आहे."

ओवीला राधासाठी वाईट वाटत होतं.
निर्णय घेताना तिला फार त्रास होत होता.
ओवी जितकं राधाला ओळखत होती, त्यावरून तिला अंदाज आला होता की, ती स्वतःच्या प्रेमाचा त्याग करेल. शेवटी राधा ओवीला म्हणाली.

"ओवी, राजला मॅसेज दे. तू तुझ्या मुलीसाठी स्वतःला सावर. आई नेहमी म्हणते वाईट वेळ कायम राहत नाही. राजची वाईट वेळ नक्कीच निघून जाईल."

राधाला कियांशचा मॅसेज आला.
"हाय बायको मेहंदी झाली का काढून? माझं नाव लिहिलं आहे ना? मेहेंदीचा फोटो पाठव."

"ओवी,बघ कियांशचा मॅसेज. मला म्हणतो मेहंदीमध्ये माझं नाव लिहिलं आहे ना?" ती हसली, त्या हसण्यात एक दुःख लपलं होतं.

"राधा, काय चालू आहे तुझं? चार दिवसांवर लग्न आहे. स्वतःला किती त्रास करून घेत आहेस."

"ओवी, त्रास करून नाही घेत गं. मला त्रास होत आहे. जाऊ दे आता त्रास नाही करून घेणार. चल माझ्या मेहंदीचा फोटो कियांशला पाठव. तो वाट बघतोय."


ओवीने मेहंदीचा फोटो काढला आणि राधाने तो कियांशला पाठवला.

राधाच्या मेहंदीमध्ये कियांशचे नाव लिहिले होते ; पण मनात राजचे नाव कोरले होते. त्याचे काय?

क्रमशः

अश्विनी कुणाल ओगले.



🎭 Series Post

View all