ओढ तुझ्या प्रेमाची भाग २३

आठवणी आणि वस्तू अजब रसायन
कथेचा पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले, की राधाचा मेहंदीचा कार्यक्रम असतो. तिची खास मैत्रीण ओवी देखील येते. राधा तिच्याशी बोलते. राधाच्या बोलण्यावरून ओवीला कळून येतं की ती खूप टेंशनमध्ये आहे.

ओवी, राजला फोन करते. राधासोबत जे बोलणं झालं ते सांगते.

राजला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं.

राधा आजही माझ्या विचारात आहे.

तिचं लग्न होत आहे आणि ती खुश नाही , मीच जबाबदार आहे.
प्रेम सुखद भावना.
एकेकाळी, दोघांनी किती प्रेम केलं होतं. एकमेकांना वचन दिले होते. आयुष्यभर साथ देणार.

सारे क्षण त्याला आठवले.
टचकन डोळ्यात पाणी आले.
त्याची लहानगी मुलगी बाबाच्या डोळ्यावरून अलगद हात फिरवत होती, जणू काही ती बाबांचे अश्रू पाहू शकत नव्हती.

राधाला इतका त्रास होत असताना तो शांत कसा बसू शकतो?

त्याला रहावलं नाही.
त्याने राधाला फोन केला.

राजचा फोन आला पाहून ती खुश झाली; तिने फोन उचलला.

राज बोलू लागला.

"राधा, ओवीने मला सगळं सांगितले आहे. प्लिज राधा तू तुझ्या आयुष्यात पुढे जा. तू कसलंही ओझं मनावर ठेवू नको. राधा प्रेम म्हणजे काय मिळवणं हेच असतं का? नाही राधा तसं नसतं. कियांश तुला नक्की खुश ठेवणार. तू छान संसार करशील."

राधा प्रत्येक शब्द मन लावून ऐकत होती.
तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.

ती खूप रडत होती. तिचा हुंदका त्याला स्पष्ट ऐकू येत होता.


"राधा, मी काहीच देऊ शकलो नाही. मी तुझी साथ सोडली."

राधा त्याला थांबवत म्हणाली,
"राज, तू माझी साथ सोडली नाही, परिस्थिती तशी आली म्ह्णून तू माझ्या आयुष्यातून गेला. तू प्लिज असं बोलू नको. जर आईंनी वचन दिलं नसतं तर आज तू माझ्यासोबत असता. माझ्या शेवटच्या श्वासासोबत तू माझ्यासोबत असता राज. राज मला फार वाईट वाटतंय. मी तुला विसरू शकत नाही,कियांशला पूर्णपणे स्वीकारू शकत नाही. काल मी ओवीकडे व्यक्त झाले. राज का असं झालं? आपण का नाही सोबत राहू शकलो. खऱ्या प्रेमाला परीक्षा का द्यावी लागते राज?"

ती पुन्हा हुंदके देत रडू लागली.

राजची अवस्था तशीच झाली होती.
त्यालाही काही बोलवत नव्हतं.

"राधा, आता भूतकाळ मागे सोड आणि नव्याने सुरवात कर." आवंढा गिळत तो म्हणाला.

"राज, तू भूतकाळ मागे सोडला? आपलं प्रेम? सारं काही विसरून पुढे जाता येतं का?"


"राधा,विसरता येत नाही; पण सतत तेच आठवून त्रास होणार. राधा, माझी मुलगी माझी जबाबदारी आहे. माझी दुःख,वेदना सारं मनात ठेवून मी संगोपन करतो आहे. करावं लागणार. पर्याय नाही. कधी कधी मन कितीही दुखी असलं तरी बुद्धीला दुखी,निराश करून चालत नाही. रडावसं वाटतं; पण हसावं लागतं. सगळंच मनासारखे घडत नाही राधा. आपण नियतीच्या इशाऱ्यावर चालतो,असं म्हण नियती जसा फासा टाकेल तसं पाऊल उचलावं लागतं. आपल्या हातात काहीच नसतं. आपलं भविष्य आधीच लिहून ठेवलं आहे. राधा, तू कियांशसोबत नव्याने जग. नवीन स्वप्न, आशा सारं काही नवीन.
वेदनेशिवाय भूतकाळात काहीच ठेवलं नाही,
राधा, कधी निवांत बसलो की, कॉलेजचे सारे दिवस आठवतो. तुझ्यासोबत जे क्षण जगलो ते आठवतो. बस तोच काय आनंद. तेच जगायचे दिवस होते. ना कसलं ओझं, स्वप्नांचा पाठलाग करणारं वय आणि त्यावेळेस तू माझ्या आयुष्यात येणं. हे सारं आठवतो. पुन्हा ते क्षण जगतो. मनाच्या कुपीत पुन्हा जपून ठेवतो. राधा, तुला माझी काळजी वाटते. मी एकटा पडलो आहे असं तुला वाटतं का? नाही असा काही विचार करू नको. मी एकटा नाही, आई आहे माझ्यासोबत. वंदनाची निशाणी आहे माझ्याकडे. तुझ्या गोड आठवणी आहे. ह्या सर्वांसोबत मी खरंच जगेल. मी आता शिकलो आहे राधा स्वतःला धीर द्यायला. तू देखील पुढे जा. तू तुझ्या संसारात रमली की, माझ्याही डोक्यावर जे ओझं आहे ते जाईन. माझ्याच विचारात नको राहू प्लिज. मी जगेल आणि तूच म्हणाली ना वाईट वेळ कायम राहत नाही. ही वेळ लवकरच निघून जाईल.

मी जगायला शिकलो आहे. तू देखील माझ्याशिवाय जगायला नक्कीच शिकशील."

राधाला आईने आवाज दिला.

"जा राधा, नवीन आयुष्य आनंदाने जग. माझी काळजी करू नको. मी ठीक आहे. काळजी घे."

"तू पण काळजी घे राज." जड अंतकरणाने तिने फोन ठेवला.

तिला पूर्ण खात्री होती, की राज जे पण बोलत होता ते फक्त आणि फक्त तिचं समाधान करण्यासाठी.

त्याच्याशी बोलून झाल्यावर तिला खूप शांत वाटलं.

सारे विचार थांबवले.
प्रवाहासोबत जायचं तिने ठरवलं. प्रवाहाविरोधात गेलं तर मला त्रास होईल आणि माझ्या घरच्यांना हे तिचं मन म्हणत होतं.

तिला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता.
रात्र झाली होती.

आई तिची बॅग भरण्यासाठी आली होती.

लग्न झाल्यावर कोणतं सामान घेऊन जायचे ते सर्व बाजूला काढत होती.

किती तन्मयतेने सारं भरत होती.
"राधा, ही तुझी छोटी बाहुली इथेच ठेऊ का? तुझी आवडती बाहुली. कायम तुझ्यासोबत ठेवायची." बाहुलीच्या केसावर अलगद हात फिरवत म्हणाली.

आई आणि राधा दोघींचे डोळे काठोकाठ भरले.

किती तो हळवा क्षण.

अश्या अनेक वस्तू होत्या ज्यांच्याशी आठवणी जोडल्या होत्या.

वस्तू आणि आठवणी अजब रसायन.

दोन दिवस बाकी होते लग्नाला.

त्या भिंती, त्या वस्तू जिथे राधाचे अस्तित्व होते ते सारं राधाला आणि घरच्यांना रडवत होतं. घराचा प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक वस्तू राधाच्या अनेक आठवणींची ग्वाही देत होता.


क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.


🎭 Series Post

View all