ओढ तुझ्या प्रेमाची अंतिम

मी असा स्वार्थी होऊ शकत नाही
कथेचा पूर्वार्ध
गेल्या भागात आपण पाहिले की , ओवी राजला सर्व सांगते. राज राधाला फोन करून धीर देतो.
आता पाहू पुढे.

आई गेल्यावर राधा स्वतःचे कपाट उघडते. त्यात राजने दिलेले ग्रीटिंग कार्ड,चॉकलेटचे कागद. फ्रेंडशिप बँड. सारं काही जपून ठेवलं होतं.

प्रत्येक वस्तूवरून ती हात फिरवत होती.
कधी हसू येत होतं, तर कधी रडू.

राजची पहिली भेट. प्रोफेसर? आणि इतक्या कमी वयाचा. ओवी. मिस फायर. लायब्ररीत केलेला तास न तास अभ्यास. कॉलेजच्या कट्टयावर व्यतीत केलेले सुंदर क्षण. सारी डे होता तेव्हा कसा बघत बसला होता राज. प्रपोस डे ला दिलेलं गुलाब अलगद पडलं. तिने पटकन उचलले. सुकलेल्या गुलाबात अजूनही प्रेमाचा सुगंध तसाच होता. तिने गुलाबाला किस केला.
हातात फ्रेंडशिप बँड बांधले. त्या कॉलेजच्या पाच वर्षात जिथंही फिरायला गेली होती तेथून अनेक वस्तू गोळा करून आणल्या होता.
राजचा सहवास लाभला होता. किती गोष्टी होत्या की, त्या पाहिल्या तरी सगळंच जसच्या तसं आठवत होतं.

तिला ते सारं सोबत घेऊन जायचे होते.
तिने एक कॅरी बॅग घेतली.
त्यात सर्व वस्तू एक एक करून भरू लागली.

डोळ्यात पाणी वाहत होतं.
मन भरून आलं होतं.


रमेश, आई आणि बाबांशी बोलायला गेला.

"आई - बाबा मला वाटतं राधाचे लग्न कियांशसोबत नको करायला."

बाबा रागावले.

"रमेश, हे काय बोलतो आहे. दोन दिवसांवर लग्न आहे आणि लग्न मोडायची वार्ता करतो आहे. तुला समजतंय का काय बोलतो आहेस?"

"बाबा, मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे मी काय बोलतो आहे." तो वैदेहीकडे बघत म्हणाला.

"हो बाबा, हे लग्न नको करायला." वैदेही म्हणाली.

आईला टेंशन आलं.
"तुम्ही दोघेही काय बोलत आहात? समजतंय का? समाजात आपली इज्जत आहे. तोंडावर आलेलं लग्न मोडलं तर सगळेच नाव ठेवतील."

"आई, तुझ्यासाठी राधा महत्वाची आहे ना?" रमेश.

"हो माझ्यासाठी राधा महत्वाची आहे." आई

"मग तर झालं." रमेश.

बाबांनी आवाज चढवला

"रमेश, कोड्यात बोलू नको. जे आहे ते स्पष्ट सांग."

"आई- बाबा , खरंतर मी हे खूप आधीच सांगायला पाहिजे होते; पण अजूनही वेळ आहे. राधाला तिचा मित्र राज आवडायचा. दोघांनी सेटल झाल्यावर लग्न करायचे ठरवलं होतं; पण राजच लग्न त्याच्या मामाच्या मुलीशी करायचे वचन राजच्या आईने दिले त्यामुळे त्याने तिच्याशी लग्न केले. त्यामुळे राधा देखील आयुष्यात पुढे आली. कियांशचा विचार केला; पण काही महिन्यांपूर्वी राजची बायको प्रेग्नेन्सीमध्ये देवाघरी गेली. तीच बाळ वाचलं. तेव्हा पासून राधा पुन्हा राजची काळजी करू लागली. तिने कियांशला स्वीकारले नाही. ही तडजोड करते आहे. ती ओवीशी बोलत होती तेव्हा मी सगळं ऐकलं आहे. आई - बाबा मला वाटतं राधाने तडजोड म्हणून लग्न करू नये."

हे सगळं ऐकल्यावर आई बाबांना काही सुचेना.

बाबा म्हणाले,
"मी अश्या मुलाला माझी मुलगी कशी देऊ? नाही असं अजिबात होणार नाही."


"बाबा, माझं ऐका एकदा. राधाचा जीव फक्त आणि फक्त राजमध्ये आहे. ती राजसोबतच खुश राहील." रमेश.

"अजिबात नाही. मी ह्यासाठी तयार नाही."


"आई, तू तरी समजावून सांग बाबांना." रमेश हात जोडत म्हणाला.

"रमेश, कसं समजावू? माझ्या राधाचे लग्न असे आधीच लग्न झालेल्या मुलासोबत ? नाही रमेश ते मलाही पटत नाही."

"आई- बाबा, मी बोलू का ?" वैदेही म्हणाली.


"बोल वैदेही." आई.

"माझं कियांशशी बोलणं झालं आहे. खरंतर त्याला हे सगळं राधाने सांगितले आहे. राधाचे मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. राधा अजूनही राजच्या विचारात आहे. काही केल्या ती कियांशला एक्सेप्ट करू शकत नाहीये. त्याला राधा मनापासून आवडली होती; म्हणून तो इतके वर्ष थांबला होता; मगाशी त्याचा फोन आला तेव्हा त्याने सांगितले की, राधा माझ्यासोबत खुश राहणार नाही. लग्न न केलेलं बरं."

हे ऐकून राधाच्या आई बाबांचा चेहरा उतरला.

रमेश बोलू लागला.
"वैदेही जे सांगते ते खरं आहे. कियांशला कल्पना आली; म्हणून त्याने हा डिसीजन घेतला."


"असं कसं करू शकतो तो?" बाबा जरा रागातच म्हणाले.

"बाबा, त्याने समजुतदारपणा दाखवला आहे. राधा जर त्याच्यासोबत खुश राहणार नाही हे त्याला समजले; म्हणून त्याने लग्नाला नकार दिला तर त्यात चुकीचे काय?"


"हो बाबा मला कियांशने जो निर्णय घेतला तो पटला आहे. बाबा, कियांश माझा भाऊ आहे; म्हणून बोलत नाही तर एक स्त्री म्हणून मी राधाच्या बाजूने विचार करते आहे. समजा कियांश सोबत लग्न लावलं आणि परिस्थिती नाही सुधरली तर?
ना राधा खुश राहणार , ना कियांश.

दोघांचे आयुष्य उध्वस्त होणार. तसं होऊ नये वाटत असेल, तर आपण हे लग्न केंसल केलेलं बरं.


हे सारं बोलणं राधा ऐकत होती.

"माझी राधा त्या राजसोबत खुश राहील?" आई काळजीच्या सुरात म्हणाली.

इतका वेळ शांत बसलेली राधा आली.

"हो आई मी खुश राहील." राधा ठामपणे म्हणाली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.


बाबा म्हणाले, "राधा, पण राज.."

त्यांचे बोलणं पूर्ण होण्याआधी राधा म्हणाली.

"बाबा, मी खरंच खुश राहीन. राज चांगला मुलगा आहे. सगळं असं घडलं, नाहीतर मी तुम्हाला आणि आईला सांगणार होते. त्यादिवशी दादाने मला शपथ घालून विचारले. मी त्याला सगळं सांगितले.
कियांशला देखील सगळं माहीत आहे. खरंच मी राजसोबत सुखाने राहीन. मला काहीच नको, मला फक्त राज हवा आहे. आज दादा आणि वहिनी बोलले, त्यामुळे माझ्यात बोलण्याची ताकद आली. माझं मन खूप नाराज होतं. मी कियांशला फसवते आहे ही भावना त्रास देत होती; पण आई बाबा प्लिज तुम्ही ह्या लग्नाला तयार व्हा. राधा अगदी गयावया करत होती.


शेवटी आई बाबा तयार झाले.
राधाचा आनंद गगनात मावेना.

तिने लगेच राजला फोन लावला.
त्याला विश्वास बसेना.

त्याने त्याच्या आईला ही गोष्ट सांगितली.

आईने देवापुढे साखर ठेवली.

राजने विचार केला.

तो आईला म्हणाला,
"आई, हे लग्न शक्य नाही. मी असा स्वार्थी होऊ शकत नाही. राधाच्या प्रेमाचा मी दुरुपयोग करणार नाही."

"असं का बोलतो आहे राज." आई.

"मी बरोबर बोलतो आहे. मान्य आहे माझं प्रेम आहे राधावर. पहिली परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. मी एका मुलीचा वडील आहे आई. माझी जबाबदारी राधावर का? नाही असं अजिबात होणार नाही."

त्याने पुन्हा फोन केला.
हे सर्व राधाला सांगितले.


राधा काहीच बोलली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळीच राधा तिच्या आई- बाबा,रमेश,वैदेहीसोबत राजच्या घरी आली.

सर्वांना पाहून राज आश्चर्यचकीत झाला. राधा अशी अचानक घरी आलेली पाहून राजची आई देखील स्तब्ध झाली.


"राधा, तू?" राज.

"राज, अजून किती मला त्रास देणार आहेस?"

"राधा, प्लिज तू माझ्यासारख्या मुलाशी लग्न करून स्वतःचे आयुष्य नको उद्धवस्त करू मी हात जोडतो."

राधाचे डोळे पाणावले.

"राज, तुझ्या सारख्या मुलाशी? म्हणजे काय? राज माझं प्रेम अजूनही तसंच आहे. माझ्यासाठी तू तोच राज आहे. ज्याने माझ्यावर प्रेम केलं होतं. आपण पाहिलेली स्वप्न विसरला का राज?"

"राधा, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता मी एक वडील आहे. मला तुझ्यावर कसलेच ओझं नको. तू चांगली लाईफ डिसर्व करते."

"राज, मी दोन दिवसांवर अलेलं लग्न तुझ्यासाठी मोडलं आहे. मी तुला नाही विसरू शकत. माझं सुख तुझ्यासोबत आहे. राज, गेल्यावेळेस मी तुला जाऊ दिलं; पण आता नाही. तू माझा आहे आणि माझाच राहणार. मी फक्त तुझी बायको नाही तर ह्या पिल्लुची आई देखील म्हणून मी ह्या घरात पाऊल ठेवणार आहे. राज, आता नाही नको बोलू प्लिज."


बाळ जोरजोरात हसू लागलं.

जणूकाही तिने राधाला आई म्हणून स्वीकारले होते.

भरलेल्या डोळ्याने त्याने लग्नाला संमती दिली.

दोन दिवसाने राधा आणि राजचे लग्न झाले. ओवी, अमोल हो आणि कियांश देखील उपस्थित होते. सर्वांच्या डोळ्यात पाणी होते. राजचे आई बाबा देखील राधाचे मनोमन आभार मानत होते. राधाच्या आयुष्यात तिचा राज आला होता आणि राजच्या आयुष्यात त्याची राधा.

राधा आणि राजच्या प्रेमाची ओढ इतकी होती, की सरत शेवटी प्रेम जिंकलं.

राधा प्रेमिका म्हणून जिंकली होती; पण एक आई म्हणून तिने बाळाचा स्वीकार करून राजचे मन पुन्हा जिंकलं होतं.

राधाची मुलगी राधाला घट्ट बिलगून होती. आणि राज दोघींना भरल्या डोळ्यांनी पाहत होता. फोटोग्राफरने तो फोटो क्लीक केला.
एक आदर्श कुटूंब त्या फोटोमध्ये कैद झालं झालं होतं.

अंत भला तो सब भला.
समाप्त.

©®कथा लेखन - अश्विनी कुणाल ओगले.
तर वाचकहो आपली राधा आणि राज एकत्र आले. कसं वाटलं तुम्हाला. जर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आले असेल तर माझ्या लिखाणाला यश आले असे समजेन. संपूर्ण कथा वाचण्यासाठी धन्यवाद.
लवकरच भेटू नवीन कथेसह