Login

ओढ भाग १

ओढ भाग १
ओढ
भाग १

"काही माणसं आयुष्यातून कायमची निघून जातात असं आपल्याला वाटतं, पण त्यांची घरं आणि त्या घरांच्या भिंती मात्र आपला पिच्छा सोडत नाहीत..." तिने स्वतःशीच पुटपुटत दीर्घ श्वास घेतला.

गावातील तो जुना बंगला आजही तसाच उभा होता. काळाच्या ओघात आजूबाजूला काँक्रीटची जंगले उभी राहिली होती, पण या वाड्याच्या भिंतींनी मात्र आजही तोच इतिहास आणि तोच ओलावा जपून ठेवला होता. मानसीने वाड्याच्या पायरीवर पाऊल ठेवले आणि तिला जाणवले की तिचे पाय जड झाले आहेत.

समोरच्या अजस्त्र लोखंडी काळ्या दरवाजाकडे पाहताना तिच्या डोळ्यांसमोर वीस वर्षांपूर्वीची चित्रे तरळून गेली. एकेकाळी हा दरवाजा तिच्यासाठी आनंदाचं, हक्काचं आणि प्रेमाचं प्रवेशद्वार होता. पण आज ?

आज तो एखाद्या बंदिस्त रहस्या सारखा, अवाढव्य आणि अनोळखी वाटत होता. काळजाची धडधड इतकी तीव्र झाली होती की, तिला छातीवर हात ठेवावा लागला. तिला स्वतःचेच ठोके कानात घुमल्या सारखे वाटत होते. तिने आपल्या साडीचा जरीचा पदर सावरला, पण हाताचा थरकाप थांबण्याचे नाव घेत नव्हता.

त्या थरथरत्या बोटांनी जेव्हा तिने जून्या पद्धतीच्या पितळी बेलचे बटण दाबली, तेव्हा त्या शांत वाड्यात घुमलेला तो ट्रिंग-ट्रिंग आवाज तिच्या काळजाचा थरकाप उडवून गेला.

काही क्षण शांततेत गेले. आतून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. कडी वाजली, दरवाजाचा कोळसा सरकला आणि जसा दरवाजा उघडला, तसे समोर उभ्या असलेल्या रीमाच्या हातातली तांब्याची कळशी गळून पडता पडता वाचली.

" मानसी ताई ? तुम्ही ? खरंच तुम्ही आहात ? "

रीमाचा आवाज अविश्वासाने आणि आनंदाच्या संमिश्र लाटेने कापत होता. तिचे डोळे विस्फारले होते, जणू समोर एखादं स्वप्न उभं असावं.
मानसीने आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवर एक फिकट, केविलवाणे हास्य आणले आणि संथ आवाजात म्हणाली,

" हो रीमा, मीच आहे... काय गं !  इतकी बदलले का मी ? की हे पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावरच्या या वयाच्या रेषां मुळे मला ओळखणं कठीण झालंय ? "

रीमाने पटकन स्वतःला सावरले, पण तिचे डोळे पाणावले होते. तिने दरवाजा पूर्ण उघडला आणि आदराने बाजूला होत म्हटलं,

" ओळखलं कसं नाही ताई ? या डोळ्यांतली ती माया आजही तशीच आहे. पण... पण या उंबरठ्यावर तुमची सावली पुन्हा कधी पडेल, याची आशा आम्ही खरं तर सोडूनच दिली होती. वीस वर्ष... कमी नसतात ताई."

आशा... या शब्दाने मानसीच्या काळजात जणू धारदार सुरी खुपसली गेली. तिने काहीच उत्तर दिले नाही. ती मुकाट्याने आत आली.

लिव्हिंग रूममध्ये पाऊल ठेवताच तिला त्या वास्तूचा तोच जुना, परिचित गंध जाणवला.जुनं लाकूड, उदबत्तीचा आणि पुस्तकांचा संमिश्र वास.
पण वातावरणात एक प्रकारचा बोझडपणा होता. ती लिव्हिंग रूमच्या मध्यभागी आली आणि तिथल्या जुन्या कार्पेटच्या दुमडलेल्या कोपऱ्यात तिचा पाय अडकला. तोल गेल्यामुळे ती जोरात अडखळली.

" सांभाळून ताई ! "

म्हणत रीमाने तत्काळ पुढे झेप घेतली आणि मानसीला दोन्ही हातांनी घट्ट सावरलं.
त्या एका स्पर्शाने, त्या एका क्षणाने मानसीच्या स्मृतींचे जणू एखादे जुने धरणच फुटले. काळ एका झटक्यात वीस वर्ष मागे सरकला.
तिला जाणवले की ती पुन्हा तरुण झाली आहे, तिच्या अंगावर तीच आवडती जांभळी साडी आहे आणि याच जागी, याच सतरंजीवर ती अशीच अडखळली होती. तेव्हाही तिला सावरण्यासाठी दोन खंबीर हात असेच पुढे आले होते. पण ते हात रीमाचे नव्हते... ते हात अनिकेतचे होते !

तिने क्षणभर डोळे घट्ट मिटून घेतले. तिला तो परिचित स्पर्श जाणवला, तो उबदारपणा आठवला. तिच्या कानात अनिकेतचा तो खोल आणि आश्वासक आवाज स्पष्ट घुमला,

" वेडी आहेस का गं ? इतकी घाई कशाची ? घाबरू नकोस मानसी, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तोपर्यंत तुला या जगात कोणीच पडू देणार नाही. आज सावरलंय ना, तसंच आयुष्यभर तुला प्रत्येक संकटात सावरत राहीन, हे माझं वचन आहे ! "

मानसीने डोळे उघडले तेव्हा समोर अनिकेत नव्हता. समोर होती ती फक्त रीमा, जिच्या नजरेत काळजी आणि संभ्रम होता. पण अनिकेतच्या त्या शब्दांचा प्रतिध्वनी आजही त्या भिंतींमध्ये जिवंत होता. मानसीला वाटले, जणू अनिकेत याच खोलीत कुठेतरी लपून तिला बघतोय.

" काय झालं ताई ? तुम्ही ठीक आहात ना ? " रीमाने काळजीने विचारलं.

मानसीने दीर्घ श्वास घेतला आणि सोफ्यावर बसत म्हणाली,

" काही नाही गं रीमा... फक्त काही जुन्या जखमांना आणि आठवणींना वेळ कधीच भरून काढत नाही, हेच आठवत होतं...