ओघळ नवे -जुने

गोष्ट तिची आणि त्यांची
समोर साड्यांचा ढीग पडला होता आणि आराधनाला त्यातली नेमकी कुठली साडी निवडावी हेच कळत नव्हतं. तिचा नवरा समीर आणि सेल्समन दोघे आळीपाळीने आधी एकमेकांकडे, मग तिच्याकडे पाहत होते.
"अगं, किती वेळ? म्हणूनच मी तुझ्याबरोबर खरेदीला येत नाही." समीर वैतागून म्हणाला.

"असु दे ओ. एकतर दोन वर्षातून एकदा साडी घेणार आणि वर गडबड करणार! " आराधनाने पुन्हा त्या ढिगात हात घातला अन् एक साडी बाहेर काढली.
"ह..ही घेते."

"नक्की ना? नाहीतर घरी गेल्यावर बदलून आणायला मी पुन्हा इथं येणार नाही." समीर सुटकेचा निःश्वास टाकत म्हणाला.
तशी आराधनाने मान हलवली.
"बरं, मग आता आई आणि ताईसाठी साडी घे."

हे ऐकून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
'त्यांना का म्हणून? आजवर एकाही सणाला ना ताईंनी काही दिलंय, ना आईंनी! सगळे सणवार माझ्या माहेरच्या लोकांनी केले. आपली सून म्हणून यांना माझ्यासाठी कधी काही घ्यावं वाटलं नाही?' मनातल्या मनात बोलत आराधनाने पुन्हा त्या साड्या विस्कटल्या आणि फारसा विचार न करता दोन साड्या निवडून तिने बाजूला काढल्या. समीरच्या मागोमाग ती काऊंटरपाशी आली. बिल भागवून दोघे बाहेर आले.

"इथून पुढं मी तुझ्यासोबत खरेदीला अजिबात येणार नाही. हवं तर आईला घेऊन जात जा." समीर गाडीवर बसत म्हणाला.

"हो तर.. तुमची आई माझ्यासोबत कुठंही येत नाही. त्या आल्या तर नुसत्या कोपऱ्यात बसून राहिल्या असत्या. नाहीतर आपल्या लेकीशी फोनवर बोलत बसल्या असत्या. तुम्हाला माहिती आहे ना, आमचं फारसं जमत नाही ते!" आराधना हळू आवाजात म्हणाली.

"बरं बरं, आता इथं सुरू नको होऊ." समीरने गाडी सुसाट पळवली. येताना आराधनाने सासुबाईंनी आजवर आपल्याला कसं वागवलं, हा पाढा परत एकदा वाचला.

आठ वाजून गेले असल्याने घरी येऊन तिने पट्कन खिचडी टाकली. सासुबाई अजून देवळातून आल्या नव्हत्या.
'यायला कधी इतका वेळ होत नाही त्यांना!' आराधना काळजीने सारखी दरवाजाकडे वाकून बघत होती. तिने साठे काकूंना फोन लावला. पण तिथूनही काही उत्तर आलं नाही.
"आई कधीच फोन घेऊन जात नाहीत. वेळ होणार तर घरी सांगायला नको का? आम्ही उगीचच काळजी करत बसायची. अहो, साठे काकूंच्या घरी जाऊन बघून येता का?"

"येईल गं ती. तू नको काळजी करू." मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेला समीर म्हणाला.

"हो. येतील ना. पण तोवर जीवाला घोर लागून राहिल, त्याचं काय? आई यांची..आणि काळजी आम्हाला."

"तुझी कोणीच नाही का ती?"

"आहे ना. म्हणून तर काळजी वाटते."

"या बायकांचं मन म्हणजे विचित्र आहे. कधी एकमेकींचा रागराग करतील, एकमेक वाद घालतील तर कधी एकमेकींची काळजी करतील याचा नेम नाही." समीर जायला निघाला इतक्यात जिन्यात पावलांचा आवाज ऐकू आला. करुणा ताई सावकाश जिना चढून येत होत्या.

"आई, कुठे होतीस इतका वेळ? आत्ता तुलाच बघायला बाहेर पडत होतो मी." समीर पुढे होत म्हणाला.

"अरे, देवळात जरा त्यांचा तोल गेला. मी सावरलं. पण जरा मुका मार लागल्यासारखा वाटतो. तू बघ जरा." साठे बाई मागून येत म्हणाल्या.

"काय झालं? तरी मला वाटलंच. आईंना यायला इतका वेळ होत नाही कधी. बघू, जास्त लागलं का?" आराधना पट्कन पुढे होत म्हणाली. तिने आधार देत सासुबाईंना वर आणलं. सोफ्यावर बसवत पाणी दिलं आणि खिचडीचे ताट पुढे करत त्यांना जणू दमच भरला, "हे सगळं संपवा. मग हातावर स्प्रे मारून देईन."

करुणा ताईंनी काही न बोलता सगळी खिचडी संपवली. साठे काकूही खिचडीचे दोन घास खाऊन घरी गेल्या. मग आराधनाने सासुबाईंच्या हातावर स्प्रे मारला आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली. गादी नीट करून, काही लागलं तर हाक मारा. असं सांगून त्यांच्या अंगावर पांघरूण घालून ती बाहेर आली.

समीर आराधनाची लगबग पाहत राहिला. 'घरी येताना आराधना आईला किती बोलत होती! आणि आता काहीच घडलं नसल्यासारखी तिची काळजी घेते आहे. तसं आराधनाचं काही चुकत नाही. पण आई नेहमी तिच्याशी नीट वागली तर फार बरं होईल. मग कोणाच्याच डोक्याला टेन्शन राहणार नाही.'

या इतक्या वेळात आराधने दोनदा सासुबाईंच्या खोलीत वाकून पाहिलं.

"अहो, उद्या सकाळी डॉक्टरांना फोन करा. हात जरा जास्तच सुजला आहे आणि पायावरही सूज वाटते. आई काहीच बोलत नाहीत. नाहीतर एरवी कित्ती बोलतात! बहुतेक घाबरल्या असाव्यात. त्या आणखी घाबरतील म्हणून मी त्यांच्यापुढे काही बोलले नाही. पण आठवणीने डॉक्टरांना फोन तेवढा करा."

बोलता बोलता आराधना आवरायला स्वयंपाकघरात गेली. 'आपण उगीचच विचारांना ताणून धरतो. आईंना काही झालं तर किती घालमेल होतेय आपली. भले, त्या कशाही वागू देत. मात्र त्यांच्याशिवाय आपला संसार अपूर्ण आहे हेच खरं.'

ताईंनी सुद्धा कधी आपल्याशी जवळीक साधायचा प्रयत्न केला नसला, पण आपण तरी तसा प्रयत्न कधी केला? त्यांनी अंतर ठेवलं म्हणून आपणही त्यांच्यापासून दूरच राहिलो. विचारात तिने आपल्या नणंदेला फोन लावला. घडलेली हकीकत तिच्या कानावर घातली.

"हे बघ, मला काही तिकडे यायला जमणार नाही. खूप कामं आहेत गं. तू मात्र आईकडे लक्ष ठेव." नणंदेने हात वर केले.

'एरवी लहान -सहान बाबतीत माहेरी येणारी हीच का ती नणंद?' आराधनाला प्रश्न पडला.
"ताई, तुम्ही इकडे यावं म्हणून मी फोन केला नाही. उद्या मला काहीच सांगितलं नाही असं म्हणू नका म्हणजे झालं." आराधना पहिल्यांदाच आपल्या नणंदेशी स्पष्ट बोलली. तिने फोन ठेऊन दिला.

'आज लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच सासुबाईंना काहीतरी झालं. फार मेजर नाही. पण काळजी वाटावी असं. पण काहीही होवो, आपण सासुबाईंना अंतर द्यायचं नाही. त्या कशाही वागल्या तरीही.. नाहीतरी त्यांना आपल्याविना आहे तरी कोण? शेवटी नणंद काही माहेरच्या गोष्टीत लक्ष घालणार नाही. जोपर्यंत सर्व सुरळीत असेल तोपर्यंत तिची ये-जा राहणार. मात्र गरज असल्यावर ती आपल्या पाठीशी उभी राहणार नाही हे मात्र नक्की.'

स्वयंपाक घर आवरून आराधना खोलीत आली. मगाशी घेतलेल्या साड्यांच्या पिशव्या बेडवर तशाच पडल्या होत्या. तिने एक -एक पिशवी उघडून त्यातल्या साड्या थोड्या उलगडून पाहिल्या. त्यातली नणंदेची साडी बाजूला ठेवली. सासुबाईंना नेमकी कोणती साडी द्यावी? दुकानात नकळत हाताशी आलेली कॉटनची साडी तिने हातात घेतली. आपण ठरवून ही साडी निवडली नव्हती. कदाचित अबोध मनात आईंना काय आवडतं, हा विचार सुरू असावा म्हणून ही साडी निवडली गेली. तिच्या ओठांच्या कक्षा काहीशा रुंदावल्या.

विचार करता करता आराधना सासुबाईंच्या खोलीत डोकावली. त्या जणू तिची वाट पाहत असल्यासारख्या जाग्या होत्या. खुणेनेच त्यांनी तिला आपल्या जवळ बसायला सांगितले. आई आता काय बोलतील? या उत्सुकतेने आराधना त्यांच्याकडे बघू लागली. पण करुणा ताईंच्या डोळ्यात आलेले अश्रू तिला खूप काही सांगून गेले. तिने सोबत आणलेली कॉटनची साडी सासुबाईंच्या जवळ ठेवली आणि "ही तुमच्यासाठी आणली आहे." इतकंच म्हणाली.

"तुझ्यासाठी साडी आणलीस की नाही?" मगाचपासून सासुबाई पहिल्यांदाच बोलल्या. त्यांनी तिचा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. काही हातावर ओघळत होते तर काही साडीवर! आराधनाला वाटलं हे अश्रू जणू आपल्याला सांगतायत, आपणच आहोत दोघी एकमेकींसाठी. जुनं सगळं विसरु आणि नवीन सुरुवात करू. तिने करुणाताईंच्या हातावर प्रेमभराने हात ठेवला. तशा त्या मंद हसल्या. जणू या प्रेमाच्या स्पर्शाला दोघीही असूसलेल्या होत्या आणि अगदी याच क्षणापासून सासू आणि सुनेच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती, असं म्हणायला काही हरकत नाही. दोघींच्या डोळ्यांत काही ओघळ नवे तर काही जुने भासत होते.

समाप्त.
©️®️ सायली धनंजय जोशी.