Login

वांझोटी भाग २

Story Of Childless Lady
वांझोटी (भाग - २)

कथा पुढे --


डोळे उघडले तर वासंती दवाखान्यात होती. जवळच्या मॅटरनिटी होम मध्ये तिला ऍडमिट केलं होतं. ग्लुकोज चढत होती. नवरा तिच्यावर प्रचंड रागावलेला होता. त्याने डॉक्टरला सांगितलं होतं की “आजकाल ही झोपेतच दचकून उठते, वारंवार ओरडते आणि माझी झोप खराब करते. आज तर हद्द झाली, घराच्या बाहेर जाऊन जोरात ओरडली. कॉलनीतील सगळे लोक जागी झाले होते आणि आमच्या घरासमोर मोठा तमाशा झाला. तिथे काहीच नव्हतं, ज्याच्यासाठी ती ओरडली. काय पाहिलं ते पण सांगत नाही. तुम्ही तिला थोडी समज द्या.”

"आम्ही बोलतो त्यांच्याशीअसं होतं कधी कधी." असं सांगून डॉक्टरानी सासू-सासर्‍यांना आणि नवऱ्याला घरी जाण्यास सांगितलं.

“फक्त एक जण हिच्या जवळ थांबा. संध्याकाळपर्यंत मी तिला घरी पाठवते.”

वासंतीला प्रचंड अपराधी भावना आली होती, तिची आई बाजूलाच बसलेली होती. डॉक्टरांच्या हे लक्षात आलं होतं की हिला दिवस गेले असावेत पण ज्या प्रकारे ती बेशुद्ध होऊन पडली होती ते थोडं अनैसर्गिक होतं. त्यामुळे पूर्ण तपासणी केल्याशिवाय अंदाज बांधणे योग्य नाही असं त्यांना वाटलं.

सासू आणि नवरा परत गेल्यानंतर वासंतीने आईला विश्वासात घेऊन गेल्या महिनाभरात पडलेली स्वप्न आणि त्याचे वर्णन ऐकवलं. ते सगळं ऐकताना आईच्या अंगावर दोन वेळा काटा आला. . घसा कोरडा पडला.
हे असं माझ्या मुलीच्या बाबतीत का होते या चिंतेने रडायला लागल्या पण त्यांनी हिम्मत ठेवली. त्यानंतर तिने पाळी चुकून आठ दिवस झाले हेही सांगितलं त्यामुळे त्यांच्या मनात एक आशेचा किरण जागला. पूर्वीसारखेच गर्भपात होत राहिले तर सासरची लोक हिला सोडून तरी देतील किंवा मुलाचे दुसरे लग्न लावतील याची आईला खूप भीती होती.

समाजभान आणि लोकांच्या मतांनी दबलेली, कमी शिकलेली आई मुलीच्या बाबतीत खूप चिंतित झाली.
तिच्या आईशी डॉक्टर सविस्तर बोलल्या, आईंच्या बोलण्यातून सविस्तर परिस्थिती त्यांच्या लक्षात आली.
तेव्हा डॉक्टर म्हणाल्या की,” तीन महिने होईपर्यंत तिला काही त्रास होऊ नये यासाठी मी गोळ्या लिहून देते. फक्त तुम्ही काळजी घ्या आणि तिला भिऊ नको असं सांगा. अशा दिवसांमध्ये अशी स्वप्न पाहणे योग्य नाही. ती काहीतरी चुकीचा विचार करते आहे ज्यामुळे असे नकारात्मक स्वप्न तिला पडत आहेत. त्यामुळे देवाचं नाव घेणे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे, चांगली पुस्तके वाचणे वगैरे करता येईल. हवा असेल तर दोन महिन्यांनी गर्भसंस्कार वगैरे लावून टाका.”

संध्याकाळी वासंतीला घरी परत आणलं गेलं. पण हे सारं स्वप्नांचं सत्य कळल्यापासून आई बेचैन होती. खूपच घाईत वासंतीच्या घरून आई निघाली आणि स्वतःच्या घरी न जाता अंधार पडल्यावरती झपा झप पावलं टाकत त्यांच्या जुन्या ओस पडलेल्या भाड्याच्या घराकडे जाऊ लागली. त्या जुन्या घराच्या मागच्या बाजूला एक जुने वापरात नसलेलं स्मशान होतं. आई भेदरलेल्या अवस्थेत तिथे पोचली होती. लांबून पाहिलं स्मशानाच्या फाटकाजवळ कुणीच नाही. गंजलेलं फाटक उघडलं तर आवाज येईल म्हणून त्यांनी लांबूनच पहायचं ठरवलं. त्या दबल्या पावलांनी फाटकापर्यंत गेल्या आणि एका ठिकाणी त्यांची नजर रुळली. तिथे काहीच हालचाल नव्हती आणि ते झाड देखील तसच होतं. त्या पांढऱ्या फुलांचा सुगंध सर्वत्र पसरला होता. निश्चिंत होऊन वासंतीची आई घरी परतली.

दोन-चार दिवस गेले असतील, कॉलनीमध्ये सासूबाईंच्या ओळखीत वासंतीच्या मैत्रिणीच्या घरी बारसं होतं. तिच्या आईला देखील आमंत्रण होतं. संध्याकाळच्या वेळी सासूबाई तयार होऊन निघाल्या, अनिच्छेने तिलाही चल म्हणाल्या. तशी तिची कुठेच बाहेर जाण्याची इच्छा नव्हती पण केवळ त्यांच्या आग्रहाखातर ती त्यांच्यासोबत गेली.
तिथे कॉलनीतल्या बऱ्याच मैत्रिणी जमल्या होत्या. इकडची तिकडची चर्चा चालू होती. लहान बाळाचं नाव ठेवल्यानंतर प्रत्येक जण त्या संताने खेळणाऱ्या बाळाला मांडीवर घेवू इच्छित होती आणि काहीजणी फोटो काढू इच्छित होत्या.

बाळ इतकं गोंडस होतं की वासंतीची पण इच्छा झाली की पटकन बाळाला मांडीवर घ्यावं, आपणही त्याला मांडीवर झुलवावं, त्याच्या त्या गोऱ्या गोऱ्या गालांना हात लावावा.
असा विचार करून तिने हात पुढे केला पण पटकन मैत्रिणीची सासू त्या बाळाला घेऊन गेली आणि हळूच मैत्रिणीला म्हणाली,”काही कळतं की नाही तुला? तिच्याकडे नको देऊ आपलं बाळ, वांझोटी आहे ती!”

‘वांझोटी ‘हा शब्द तिच्या कानात गरम शिसं ओतल्याप्रमाणे पडला. लग्नाला पाच वर्षे झाली होती. दोन तीन वेळा गर्भपात झाला होता पण मूल झालं नाही म्हणजे वांझोटी कशी काय?
त्यानंतर तिला तिथे थांबावं वाटलं नाही आणि ती जगाची उठली पण सासूने डोळ्याने इशारा केल्यामुळे ती शांत बसली.

जेवतेवेळी सासू थोडी रागातच होती. तिने सासूच्या हातात ताट आणून दिलं , त्यावेळी सासूने खुर्ची तिच्याजवळ सरकवली आणि दबक्या आवाजात म्हणाली, “एवढ्यासाठी सांगत होते वामनला, मनावर घे. एक लेकरू होऊ दे. पण नाही. तुम्हाला काय करायचं करा. पाच वर्ष झाले लग्नाला. बघा सोनालीकडे, दीड वर्षात त्यांच्या घरी पाळणा हलला. आमचंच नशीब फुटकं.”

वासंतीचे डोळे अश्रूंनी काठोकाठ भरलेले होते.

“ते वांझोटी म्हणाले त्यात त्यांची काही चूक नाही.”

“ पण सासुबाई आता तर फक्त पाच वर्षेच झालीत, “

“ मग काय, म्हातारपणी मूल होऊ द्यायचं का? हे बघ असं सगळं इथे बोलण्यापेक्षा काल डॉक्टरकडे गेली होतीस ना मग सगळी तपासणी करून घ्यायला हवी होती.”

“ पण सासुबाई काल शक्तीच नव्हती मला आणि . . . तपासण्यासाठी दोघांना जावं लागत असतं. . डॉक्टर मॅडम म्हणाल्या.” ती हळूच बिचकत बोलली.

“तो का म्हणून येईल? तो काही येत नसतो.तू वांझोटी तर तुझी तपासणी तू करून घे, जे काय दोष आहे ते तरी कळेल.” त्या इतक्या खालच्या स्वरात बोलल्या की तिला अपमानास्पद वाटलं.

वासंतीची आई बाजूलाच बसलेली होती. त्यांना कळालं की त्या मुद्दाम टोमणे मारताहेत पण आता असलेली बातमी कशी सांगणार? डॉक्टर तीन महिने थांबा म्हणाल्या होत्या.

शिकलेल्या वासंतीला सासूबाईंचं बोलणं रुचलं नाही. ती परत निघणार होती इतक्यात तिचं लक्ष गेलं कोणीतरी बाळाला मांडीवर घेतलं होतं आणि त्यात त्या दुपट्याचा रंग तसाच होता जसा तिने स्वप्नात पाहिला होता.

आता मात्र त्या मांडीवर झोपलेल्या बाळाला बघून अचानक तिला ते स्वप्नात पाहिलेलं जखमी बाळ आठवलं. कुत्री झेप घेताहेत असं समजून, तिने जणु त्या बाळाला वाचवण्याच्या आकांताने पटकन त्याला स्वतःजवळ ओढले. मैत्रीण घाबरून गेली आणि तिची सासू ओरडून म्हणाली,” या वांझोटीला इथे आणलंच कशाला? सांगितलं होतं ना लांब ठेवायचं. . तुम्हीत ऐकत नाही!”

आता वासंतीच्या आईला राहवलं गेलं नाही आणि ती जोरात ओरडली,”माझ्या लेकराला वांझोटी म्हणायचं काम नाही. असतो कुणाचा पाळणा उशीरा त्यात काय? आणि दोष काय बाईतच असतो काय ? पुरुषात देखील असू शकतोच की.”

या अचानक आलेल्या वाक्याने वासंती आणि आलेल्या स्त्रिया तर आश्चर्यात पडल्याच पण वासंतीच्या सासूबाईंना त्यांच्या मुलाचा अपमान जिव्हारी लागला.

“बोलतांना भान ठेवा विहिणबाई, आपल्याच जावयाची नाचक्की करताय हे कळतं का? असली वांझ पोरगी आमच्या गळ्यात बांधली घाईघाईने, आम्ही पण रुपावर भाळलो होतो. या वर्षभरात गोड बातमी नाही आली तर आम्ही बघू काय करायचं ते.” असं तावातावाने बोलून त्या निघून गेल्या. आता पटकन वासंतीने देखील तिथून काढता पाय घेतला. तिची आई देखील थोडावेळ थांबून, शांत होवून घरी गेली.

*********

क्रमशः

स्वाती बालूरकर, सखी
०१.०३.२५

अष्टपैलू स्पर्धेसाठी कथा
(अष्टपैलू स्पर्धेसाठी कथा)

🎭 Series Post

View all