Login

वांझोटी भाग ३

Story Of A Childless Lady

वांझोटी (भाग - ३ )
कथा पुढे -

आई घरी आली घरी पण तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. सात वर्षांपूर्वी समाज मान्यतापोटी का असेना पण स्वतःच्या निर्णयाने दाबलेल्या इतक्या मोठ्या गोष्टीला आता पुन्हा तोंड फुटेल की काय ? असं वाटत होतं. आता हे जे घडतं आहे त्यासाठी कुणी मांत्रिक शोधावा की दुसरी काही तरी ग्रह शांती करावी की डॉक्टरांच्या इलाजावरती आशा ठेवावी? काय करावं? काहीच कळत नव्हतं.

बारशाच्या त्या घरामध्ये हिला वांझोटी म्हणू नका असं बोलल्यानंतर सगळ्यांच्या संशयित नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या, हे त्यांना कळालं होतं. पण ते म्हणण्यामागं तसं कारण होतं जे फक्त त्यांना आणि त्यांच्या स्वर्गवासी झालेल्या आईलाच माहीत होतं.


आपल्या लेकराच्या भवितव्यासाठी अशा लपवलेल्या गोष्टी या प्रकारे कुणासमोर येतील असं त्यांना देखील वाटलं नव्हतं आता या क्षणी काय करता येईल ती वांझोटी नाही हे मला जरी माहीत असलं तर दुसऱ्यांनी विश्वास कसा ठेवायचा ? त्यांना तर हेच दिसत आहे की लग्न होऊन पाच वर्ष झालेत पण हिला गर्भ राहत नाही आणि एक दोन वेळा दिवस गेले तरी विनाकारण गर्भपात झाला होता.

देवा समोर दिवा लावून त्या बसल्या खऱ्या, देवावर विश्वास ठेवावा की करणीवरती? याक्षणी याचाही निर्णय घेता येत नव्हता. डोळ्यातून अश्रु वाहू लागले आणि मन भूतकाळात गेलं.

17 - 18 वर्षाची कोवळी सुंदर , सुडौल पोर, वसंतात जन्मली म्हणून ठेवलेलं नाव वासंती ! ती मैत्रिणींसोबत बाजूच्या गावी जत्रेला गेली होती आणि जंगलात रस्ता हरवली होती. म्हणजे मैत्रिणींसोबत रात्री परत येता येता लघुशंकेला म्हणून गेली आणि कितीतरी वेळ ती आलीच नाही मैत्रिणी घाबरून शोधायला लागल्या बराच वेळ शोधल्यानंतर ही सापडली नाही तेव्हा त्या अतिशय घाबरलेल्या अवस्थेत वासंतीच्या आईकडे आल्या होत्या आणि 'ती हरवली की तिला कुठल्यातरी शक्तीने जंगलात खेचले की काय? की तिला चकवा लागला आणि ती जंगला बाहेर नाही आली' असं सांगितलं होतं .

त्या रात्री गावात जास्त बदनामी होऊ नये म्हणून आईने वेळ सावरून नेली होती. "हरवते कशाला, येईल ती परत. आम्ही तिला आत्ताच घेऊन येतो, जंगलाच्या पलीकडे नातेवाईक राहतात तिकडे गेली की काय?" असं काहीतरी सांगून मुलीना परत पाठवलं होतं.

आई आणि त्यांचा एक विश्वासु गडी माणूस कंदीलाच्या उजेडात जंगलात शोधायला गेले होते. आई प्रचंड घाबरलेली होती आणि त्या क्षणी मुलीच्या इज्जतीची जास्त काळजी होती. ही गोष्ट गावात कळाली तर बदनाम होईल, पुढे लग्न ठरण्यासाठी समस्या निर्माण होतील या विचाराने खूप हिम्मत एकवटली होती.

तिला आजही ती भयानक रात्र पुन्हा पुन्हा आठवत होती. जेव्हा शोधता शोधता जंगलामध्ये एका लिंबाच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत वासंती सापडली होती. तिचे कपडे आणि अवतार पाहून हे कळायला वेळ लागला नाही की कुण्या भामट्यांनी तिचा गैरफायदा घेतला की ही भारावून कुणासोबत तरी मर्जीने गेली? काहीच माहित नाही. ती तिथे बेशुद्ध अवस्थेत पडलीय हे एका वेड्या माणसाने सांगितलं होतं. ती त्या जंगलातच सापडली होती पण वासंतीला जंगलात नेमकं काय झालं काहीच आठवत नव्हतं. झपाटल्यासारखं काहीतरी झालं होतं. कुण्या आत्म्याने झपाटलं की कुणीतरी याच्यावर करणे केली हे त्यांना कळत नव्हतं रूपाने इतकी सुंदर आणि गोड असणारी मुलगी पटकन कुणाच्याही नजरेत भरायची काय बुद्धी सुचली आणि हिला जत्रेला पाठवलं असं देखील वाटायला लागलं.


ती फक्त शून्यात नजर लावून बसायची. दुर्दैव तर तेव्हा उद्भवलं जेव्हा दोन महिन्यांत उलट्या सुरू झाल्या आणि मग आई मात्र घाबरली.

बारावी झालेली होती , फर्स्ट इयरचं कॉलेज देखील बुडाले.
तिचे वडिल अतिशय शिस्तीचे होते. तब्येत बरी नाही मी उपाय करते आहे असं आईने सांगितलं होतं. वडिलांची नोकरी दूर दुसऱ्या गावी होती. एरवीच ते आठ पंधरा दिवसाला एकदा यायचे . दैव योगाने या सगळ्या वेळी आणखी एका सहकाऱ्याच्या जागी त्यांना आठ नऊ महिन्यासाठी लांब गावी ड्युटीवर जावे लागले. आईने देवाचे आभार मानले. त्यांच्यापासून लपवून आईने मुलीची काळजी घेतली.

मुद्दाम जुन्या भाड्याच्या घरी तिच्या आईच्या तब्येतीचे कारण सांगून वर्षभर राहायला गेल्या. गर्भपात करणं शक्य नव्हतं, तिच्या जीवाला धोका होता. मुलीला पोटावरती गरोदरपणाच्या खुणा दिसू नये, म्हणून किती झाडपाला, औषध आणून लावायच्या. वासंतीला भानच नव्हतं. तशात तिने मुलाला जन्म दिला आणि आईने ते मूल मेलं असं सांगितलं, मनावर दगड ठेवून स्मशानात त्या मुलाची विल्हेवाट लावली होती, त्याच्यावर पांढऱ्या फुलांचे रोपट त्यांनीच तर लावलं होतं. नेमकं त्या रात्री परत येताना तोच जंगलात भेटलेला वेडा त्यांचा पाठलाग करीत होता. पण वेडाच आहे त्याला काय कळतं म्हणून आईने दुर्लक्ष केलं होतं.

क्रमशः

स्वाती बालूरकर, सखी
दिनांक ०१.०३.२५
(अष्टपैलू स्पर्धेसाठी कथा)

🎭 Series Post

View all