Login

वांझोटी भाग ४

Story Of A Childless Lady
वांझोटी (भाग - ४)

कथा पुढे -
लेखिका स्वाती बालूरकर सखी


शुद्धीत आल्यावर बाळ गेले, म्हणजे ते मेलेलेच जन्मले असे वासंतीला वारंवार सांगण्यात आले. स्वतः च्या शुद्धीत नसलेली वासंती पण तिला त्या लेकरापोटी माया उत्पन्न झाली, पान्हा फुटला, मायेचं दूध वाहू लागलं. 'माझं बाळ दे, माझं बाळ दे 'असं प्रत्येकाला विनवू लागली. या धक्क्यातून वासंती सावरली नाही आणि दोन दिवसांनी रात्री बाळाचा आवाज ऐकून तिने जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. महत्प्रयासाने तिला वाचवलं होतं पण त्यावेळी डोक्याला जबर मार लागला होता.

तिला दवाखान्यात ऍडमिट केलं तेव्हा वडील आले होते. त्यांनाही हे काहीच माहित नव्हतं, ती पाणी भरताना तोल जाऊन पडली असं सांगितलं गेलं.

सुदैव की दुर्दैव पण दीड दिवसानंतर जेव्हा वासंती शुद्धीत आली होती तेव्हा तिची स्मृती गेली होती. तिला तिच्या दहावी अकरावीपर्यंत सगळे आठवत होतं पण बारावीच्या त्या सुट्ट्या ती गावाबाहेरची जत्रा, ही झालेली घटना, त्यानंतरच काढलेल्या वर्षभराचा वेळ,त्या प्रसवेदना काही काही तिच्या लक्षात नव्हतं.

‘ माझ्या लेकराची देवाला काळजी’ असं समजून तिच्या आईने तिला सावरलं.

मग मात्र भाड्याचं घर बदलून वडिलांची जिथे नोकरी तिथेच कुटुंब राहायला गेले. पुढे दोन वर्षे तिचे शिक्षण केलं आणि हे योग्य स्थळ पाहून, सरकारी नोकरीवाला नवरा, जमीन जुमला पाहून तिचं लग्न लावून दिलं. वासंती दिसायला रूपाने खूप गोड होती त्यामुळे नकाराचा प्रश्नच नव्हता.
तिचे लग्न होऊन आता पाच वर्षे झाली होती. वासंतीची आजी जिला या सगळ्या गोष्टी माहित होत्या, ती दोन वर्षांपूर्वी वारली होती. हे रहस्य माहित असणाऱ्या कुटुंबात त्या एकट्याच होत्या. अगोदरचा तिचा इतिहास माहीत असलेल्या त्या आईला तिला लवकर मूल न होण्याचं काहीच वेगळं वाटलं नाही. होईल पुन्हा. . अजून कुठे वय गेलं ! असं वाटलं होतं. पण या दरम्यान मुलीला पडणारी स्वप्नं, तिचं बेशुद्ध होणं आणि चार माणसात समाजात तिला वांझोटी म्हणणं हे सगळं त्यांना आता सहन होत नव्हतं.

बरं हे सगळं बाहेर सांगण्याची काहीच सोय पण नव्हती. कारण हे जर चुकूनही कळालं तर तिच्या सासरच्यांनी तिला कायमचं माहेरी पाठवून दिलं असतं शिवाय त्यांच्या नवऱ्याचा संताप काय करवेल याचा अंदाज नव्ह्ता. मुलगी माहेरी येऊन शापित आयुष्य जगेल आणि समाजात बदनामी होईल ती वेगळीच. सांगता येईना, गिळता येईना अशी अवस्था होती.

आई आता वास्तवात जगत होती पण गर्भवती असलेल्या वासंतीला आता अशी दुस्वप्न का पडताहेत हे कळत नव्हतं. त्यांनी देवाची मनोमन माफी मागितली आणि मनात म्हणाल्या, "एक लेकरू झालं की माझ्या लेकीवरचा वांझोटी हा अपशब्द मिटेल, मग सगळं काही निवळेल. देवा एक लेकरू तिच्या ओटीत घाल."

********

आईचं मागणं काही देवाने ऐकलं नाही. दुर्दैव जणू वासंतीच्या पाठीशीच होतं. तीन महिने होताच एक रात्री आपोआप तिचा गर्भपात झाला आणि सासूबाईंना गोड बातमी कळण्याच्या आधी वाईट बातमी कळली.

आता तर त्यांना खात्री झाली की हिला मूल होणार नाही आणि गर्भपात झाल्यावर त्या डॉक्टर सासूबाईंना स्पष्ट म्हणाल्या की 'वासंतीला दिवस राहिले तरी सुद्धा ते मूल नऊ महिने पोटात वाढणार नाही किंवा वाचणार नाही."त्यामुळे त्यांनी वेगळीच हालचाल सुरू केली. आता हिला सोडून द्यावे आणि मुलाचं दुसरं लग्न करावं की काय या विचारात पडल्या.

वासंतीची आई मात्र लेकीला कुणीतरी झपाटले आहे असे समजून मांत्रिकाकडे, जाणकारांकडे, भविष्य सांगणाऱ्या कडे जात होती. गुप्त रूपाने काय करता येईल याच्यासाठी अडून आडून सल्ला घेत होती.

दहा दिवसांनी वासंतीला पुन्हा चेकअप साठी बोलावलं होतं त्यावेळी नवरा देखील सोबत गेला होता.
त्या स्त्री रोग तज्ञ दोघांना बसवून समजावून सांगत होत्या आणि एकदमच त्या म्हणाल्या की "तुमची सुद्धा पूर्ण तपासणी करायला हवी कारण हिला मूल राहण्यामागे किंवा अशक्त मूल पोटात न वाढण्यामागे तुमच्यात सुद्धा काही कमतरता असू शकते, थोडीशी ट्रीटमेंट घेतली तर एक दोन वर्षात तुम्हाला मूल व्हायला हरकत नाही." हे शब्द ऐकताच तिचा नवरा एकदमच चिडला आणि बाहेर निघून गेला .
त्याला ते मान्य झालं नाही. मूल होत नाही म्हणजे बाईची चूक आहे असा समजणारा जुन्या विचारांचा पुरुष होता. तो घरी आला आणि घरी आई वरती पण चिडचिड करू लागला, त्याला ते सांगण्याची पण लाज वाटू लागली की डॉक्टरांनी त्याला उपचार घ्यायला सांगितलेत. वसंतीने मात्र आल्यावर सगळे व्यवस्थित सांगितले. सासुबाई चिडल्या.

नेमके त्या आठवड्यात वासंतीची आते सासूबाई त्यांच्या घरी आठ दिवस राहण्यासाठी आली. वासंतीला मूल राहत नाही आणि वरचेवर गर्भपात होत आहेत हे ऐकल्यावर त्या आत्याबाईंनी एक गोष्ट त्यांच्या वहिणीला सांगितली ,जी ऐकल्यानंतर वासंतीच्या सासूच्या वागण्यात एकदमच बदल झाला.

गोष्ट अशी होती की त्यांनी सांगितले , " वहिनी हे काही आपल्या घरामध्ये नवीन नाही त्यामुळे मान्य कर. पुरुषांचे शुक्राणू अशक्त असणे किंवा अशा प्रकारची काही समस्या असणे हा आपल्या घरातला आनुवंशिक गुण आहे आणि तुला माहीत नाही पण इतक्या वर्षांनी आज सांगते दादा पण वास्तविक पाहता दत्तक घेतलेला मुलगा आहे. तो माझा सख्खा भाऊ नाही. त्याला दत्तक घेतल्यानंतर पाच वर्षांनी आमच्या वडिलांनी उपचार घेतले आणि मग माझा जन्म झाला."
हे सत्य आताच सासूबाईंच्या पायाखालची जमीन सरकली आता जर ही गोष्ट उघडकीस आणली तर बाहेर आपलीच बदनामी होईल त्यापेक्षा आपणच मन मोठे करायला हवं असं वाटून गेलं.

या गोष्टीची तसूभर कल्पना वासंतीच्या संस्कार किंवा तिच्या नवऱ्याला नव्हती. हे वास्तव ऐकल्यामुळे आता आपल्या मुलाची सासुरवाडीत बदनामी होते की काय, या विचाराने सासू देखील आतेसासू बरोबर चर्चा करून एका निर्णयावर आली.

चर्चेनंतर मग शेवटी कुटुंब या निर्णयावर पोहोचले की वासंतीने अनाथ आश्रमात एखादं मूल दत्तक घ्यावं म्हणजे कदाचित हा तिच्या मनावर असलेला ताण निघून जाईल. सुदैवाने पुढे एखादं त्यांचा स्वतःचा दुसरा मूल झालं तर बरच आहे.

त्यावेळी वासंतीचा ताण वेगळा होता, सासूचा वेगळा आणि आईचा ताण वेगळा होता.


एका अनाथ लेकराला आईची माया दिल्याचे पुण्य मिळेल त्या मायेपोटीही ती भयानक स्वप्न पाहणं देखील बंद होईल, ही आशा वासंतीच्या मनात होती. हे मूल दत्तक घेणं वासंतीच्या आईसाठी एकप्रकारे (अघोरी उपाय केल्या पेक्षा) प्रायश्चित कर्म जास्त होतं.
सहा महिन्यांनंतर वासंतीच्या नवऱ्याने आणि सासूने हा प्रस्ताव मान्य केला पण जर तान्हं बाळ आणलं तर त्याला सांभाळण्याची शक्ती त्यांच्याकडे , सासुबाई कडे नव्हती आणि अनुभव नसल्याने वासंती लहान बाळाचे सगळं करू शकेल की नाही असं वाटलं. थोडं मोठं मूल घ्यावं असा विचार करून ते तिकडे गेले. नेमकं अनाथ आश्रमात गेल्यानंतर वासंती आणि तिच्या नवऱ्याने एक थोडं मोठं सहा सात वर्षांचं मूल दत्तक घेतलं. सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याला घरी घेऊन आले.


दोन दिवसानंतर त्यांनी घरी छोटेखानी कार्यक्रम ठेवला आणि त्या मुलाचं नामकरण करण्याचा कार्यक्रम ठेवला. जवळच्या नातेवाईकांना आमंत्रण केली. वासंतीची आई पण आनंदाने आली. सगळी तयारी झाली होती.

“ आई, याची कपडे तेवढे बदलून घे, मी बाहेरची तयारी बघते,” असं म्हणून वासंतीने आईकडे बाळाचा ड्रेस दिला.
त्या मुलाला आतल्या खोलीत घेऊन गेल्या.

तो सावळासा गोड मुलगा त्यांना कुतूहलाने एक टक पाहत होता. त्याचं ते पाहणं यांना का कुणास ठाऊक खुपत होतं.
तरी त्यांनी दुर्लक्ष करून कपडे बदलण्यासाठी त्याचा शर्ट काढला आणि त्यांचे हात पाय गार पडले.
“आजी हळू घाल ,दुखतंय बरं !” असं तो म्हणाला .

मुलाच्या छातीवर पोटावर अंगावर सगळीकडे खरचटलेले व्रण होते, नखाने बोचकरलेल्या खुणा होत्या .

वासंतीची आई डोळे वासून पहातच राहिली.

समाप्त

©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक ०१.०३.२५
(अष्टपैलू स्पर्धेसाठी कथा)

🎭 Series Post

View all