Login

ओळख..

रोशनी आपल्या लहानपणापासून कसा संघर्ष करते. हे ह्या कथेत दाखवला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )

शीर्षक : ओळख..

गावातील एका छोट्याशा घरात पावसाळ्यातल्या एका रात्री एक बाळ जन्मलं. आईच्या चेहऱ्यावर हसू होते; पण वडिलांच्या चेहऱ्यावर काळजी... दाईने बाळाला हातात घेतले आणि थोडा वेळ शांत राहिली.

दाई, "बाई... बाळ थोडं वेगळं आहे. पूर्णपणे मुलगा नाही नि पूर्णपणे मुलगीही नाही."

हे ऐकून घरभर शांतता पसरली होती. वडिलांनी तर कपाळावरच हात मारला.

वडील ( रागाने ), "हे कसलं अपशकुनी लेकरू जन्माला घातलंस? लोक काय म्हणतील आपल्याला?"

तेव्हा आईने मात्र त्या बाळाला जवळ घेतलं. डोळ्यांत पाणी आलं; पण ती हळूच कुजबुजली, "हे माझं बाळ आहे. देवाची देणगी आहे."

वडील संतापले; पण आईने बाळाला घट्ट कवटाळलं. पुढे त्या बाळाचं नाव ठेवलं - रोशनी.


रोशनी मोठी होत गेली तसं लोकांचे प्रश्न, टोमणे वाढत गेले.
लोक म्हणायचे, "हिचं काय होणार? मोठी झाली की किन्नरांच्या टोळीत द्यावं लागेल."

वडिलांचा दबाव वाढत होता. अखेर एक दिवशी त्यांनी रोशनीला गावातल्या एक किन्नर गुरुकडे सोपवलं.

वडील, "आमच्या घरात हिची सावली जरी ठेवली तरी आमचा मान नष्ट होईल. तुम्हीच सांभाळा हिला."

त्यावेळी आई खूप रडत होती; पण वडिलांनी नाहीच ऐकले. गुरुमाईंनी रोशनीचा हात धरला.

गुरुमाई, "आता तू आमच्या टोळीतली! आमचं काम काय आहे माहिती आहे ना? लग्न, बारशात गाणं, आशीर्वाद देणं. आता हाच तुझा संसार."

रोशनीच्या मनाला धक्का बसला होता. तिला कळून चुकलं होतं की आता तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळणार आहे.

गावातल्या शाळेजवळून रोशनी रोज जायची. ती बाहेर उभी राहून आतल्या मुलांना शिकताना बघायची. फळ्यावरचे आकडे, शब्द तिला मोहवायचे.

एकदा तिला बघून शाळेतल्या शिक्षिका सुहासिनी मॅडम बाहेर आल्या.

मॅडम, "काय गं बाळा, रोज इथे उभी राहतेस? शिकायची इच्छा आहे का?"

रोशनी रडत म्हणाली, "मला खूप शिकायचंय मॅडम; पण मला कुणी शाळेत घालत नाही. मी... मी वेगळी आहे ना. म्हणून..."

सुहासिनी मॅडम हळूच तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, "अगं, वेगळी नाही तू. देवाने तुला खास केलंय. चल आत ये, मी शिकवते तुला."

त्यादिवशीपासून रोशनी रोज शाळेत जाऊ लागलेली.

गुरुमाईला कळलं की रोशनी शाळेत जातेय, तेव्हा ती रागाने ओरडली, "आपलं काम नाचणं-गाणं. शिकून काय करशील? हा समाज आपल्याला कधी स्वीकारत नाही."

रोशनी म्हणाली, "मला हा समाज बदलायचा आहे आणि शिकूनच ते करणं शक्य आहे."

गुरुमाईने तिला धमकावलं, "शाळेत गेलीस तर आमचं घर सोडून जा."

त्या रात्री रोशनी एकटीच रडत होती. दुसऱ्या दिवशी तिने धाडसाने ते घर सोडलं आणि सुहासिनी मॅडमकडे जाऊन त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी तिला त्यांच्याकडेच राहण्यासाठी सांगितलं.

ती शाळेत जायला लागली; पण मुलांनी तिची चेष्टा सुरूच ठेवली.

एक मुलगा चिडवून म्हणाला, "ए, तू इथे काय करतेस? आमच्या वर्गात शिकायचं धाडस बरी करतेस?"

यावर संपूर्ण वर्ग हसायला लागला.

रोशनीच्या डोळ्यांतून पाणी आलं; पण ती उभी राहून म्हणाली, "हो, मी वेगळी आहे; पण शिकण्याचा हक्क माझाही आहे."

त्या दिवशी तिला कोणी साथ नाही दिली; पण परीक्षेत ती पहिली आली. यावर शिक्षकही थक्क झाले होते.

मुख्याध्यापक, "ही आपल्या शाळेचा अभिमान आहे."

हळूहळू वर्गातली काही मुलं तिच्याशी बोलू लागली.

दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यावर ती सुहासिनी मॅडमच्या मदतीने शहरातल्या कॉलेजात गेली. तिथेही वसतिगृहात सुरुवातीला कुणीही तिच्यासोबत खोली शेअर करायला तयार नव्हतं.

रोशनीच्या मनाला यामुळे वेदना झाल्या; पण तरी तिने हार मानली नाही. ती दिवसा शिकायची, संध्याकाळी कॅफेमध्ये काम करायची. रात्री किन्नरांच्या कार्यक्रमात जाऊन पैसे कमवायची.

एक दिवस सुहासिनी मॅडम तिला भेटायला आल्या.

मॅडम, "बाळा, थकली नाहीस ना? एवढं सगळं एकटीने पेलतेस."

रोशनी, "थकायला वेळच कुठे आहे मॅडम? मला तुमच्यासारखं शिक्षक व्हायचं आहे."

यावर मॅडमना समाधान वाटलं.

पुढे रोशनीने एम.ए. पूर्ण केलं आणि स्पर्धा परीक्षेला बसली.

आसपासचे लोक पुटपुटत होते, "किन्नर शिक्षिका होणार? असं कधी झालंय का?"

पण निकाल लागला आणि रोशनीचं नाव त्यात आलं.

आईनेही कुठून तरी ते ऐकलं आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ती मनात म्हणाली, 'खरंच तू आमच्या घराचं नाव उज्ज्वल केलं आहेस.'

पहिल्या दिवशी शाळेत गेल्यावर सगळे शिक्षक, विद्यार्थी तिला बघून हसत होते, कुजबुजत होते, "आता हे लोक पण मुलांना शिकवणार."

रोशनी न डगमगता फळयासमोर जाऊन उभी राहिली. तिचा आवाज ठाम होता.

"आजपासून आपण शिकणार आहोत, केवळ धडेच नाही, तर माणुसकीही..."

हळूहळू तिच्या शिकवण्याने सगळ्यांचा दृष्टिकोन बदलू लागला. मुलं तिच्यावर प्रेम करायला लागली. पालकांनीही तिचं कौतुक केलं.

एकेदिवशी गावातल्या तिच्या जुन्या शाळेत तिला बोलावलं गेलं.
जिथे ती कधीकाळी दाराबाहेर उभी राहून धडे शिकायची.
तिचे जुने शिक्षक भावूक झालेले.

ते म्हणाले, "आम्ही कधीच विचार केला नव्हता की तू एवढी मोठी होशील. आम्ही ज्या चुका केल्या, त्या माफी मागण्यासारख्या नाही. तरी माफ कर आम्हाला!"

रोशनी स्टेजवर जाऊन म्हणाली, "माझं अस्तित्व वेगळं नक्कीच असेल; पण माझं स्वप्नं तर तुमच्यासारखंच आहे — शिकणं आणि शिकवणं. लक्षात ठेवा, शेवटी माणूस म्हणून आपली किंमत आपल्याच कर्तृत्वाने ठरते."

तिच्या वडिलांनी पण तिची माफी मागितली.

यावर ती फक्त इतकंच म्हणाली, "बाबा, मी वेगळी असले तरीही तुमचीच आहे."


रोशनीचा हा प्रवास फक्त तिच्यासाठी नव्हता, तर तो संपूर्ण समाजासाठी एक धडा होता. किन्नर समाज हिणवला जातो; पण तेही स्वप्नं पाहतात. शिक्षणाने कोणत्याही प्रकारचा अंधार दूर करता येतो. शेवटी काय तर मानवता हीच खरी ओळख आहे.

रोशनीलाही शिक्षणामुळेच तिची ओळख सापडली.

तिच्यामुळे किन्नर लोक पण आता स्वप्नं बघू लागलेले. रोशनीने समाजाला नवीन दिशा दाखवली होती. किन्नर लोकांनाही शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि हे सगळं रोशनीमुळे झालं. हीच तिची खरी 'ओळख' होती.

समाप्त.
©® निकिता पाठक जोग
0