Login

ओळखीचे शब्द...! | भाग ९

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ९

शाश्वतवर्ण

१६५० चा काळ.

राजा भीमराज ह्यांचा महाल.

राजांनी राजकुमारींना बोलवताच माझ्या कानावर पैंजणाची मधुर छम छम ऐकू आली. काही क्षणात समोर राजकुमारी येऊन उभ्या राहिल्या. मी त्यांच्याकडे बघून स्मित करत प्रणाम केलं. आज मी त्यांना पहिल्यांदाच पाहत होतो. उभा चेहरा, गोरा रंग, लांब मोकळे केस, सुंदर बोलकी नजर, उभारे नाक, गुलाबी गुबरे गाल त्यावर हसताना पडणारी सुंदर खळी आणि ते सुंदर हसणारे गुलाबी ओठ. एका कवीला कवितेसाठी गरजेची असलेली सौंदर्याची मूर्तीच जणू. त्या खरंच राजकुमारी म्हणून शोभून दिसत होत्या. मी त्यांना पाहत असल्याचं बहुतेक त्यांनी जाणले म्हणून मी लगेच महाराजांकडे माझी नजर फिरवली.

महाराजांनी राजकुमारींना मी त्यांना कविता शिकवणार असल्याचं सांगितले. माझी नजर माझ्या नकळत पुन्हा त्यांच्यावर खिळली. ते ऐकून त्या आनंदी झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. जणू त्या केव्हा पासून ह्याचं क्षणासाठी थांबल्या असाव्यात.

हसताना खरंच किती त्या गोड दिसत होत्या. त्यांना हसताना पाहून क्षणभर वाटले माझे काळीज थांबले की काय?

" पाहताना गोड हसू, मन वेडावून जाई,
नकळत मन वेडे हे, लपून तुजला पाही."

अचानक त्यांना पाहताना माझ्या मनात दोन ओळी सहज येऊन गेल्या. मी मनातल्या मनात स्वतःशीच हसलो आणि मग पुढच्या क्षणी स्वतःला सावरले. मी हा काय विचार करत होतो? त्या ह्या राज्याच्या राजकुमारी आहेत आणि मी फक्त त्यांच्या राज्याच्या राजकवी. मला हे शोभा नाही देत.

महाराजांनी मला हे जीवन दान दिले आहे. नाही तर मी आता कोणत्या तरी काळकोटडीत सडत असतो किंवा जिवंतच नसतो. महाराजांच्या सांगण्या प्रमाणे मी राजकुमारींना कविता शिकवण्याचं काम नक्कीच आवडीने करीन.

" मग उद्या पहाटे पासूनच तुमची शिकवणी सुरू करा. काय कविराज?"
महाराजांच्या बोलण्याने माझी तंद्री भंग झाली.

मी त्यांना स्मित करत होकार दिला. सकाळी मी लवकरच दरबारात येईन असे त्यांना कळवले.

आमचे बोलणे सुरू असतानाच दरवाजातून एक सेवक आत आला आणि महाराजांना सेनापती आल्याची वर्दी दिली. महाराजांनी त्यांना आत बोलावण्याची आदेश दिला. मला समजले की, आता तिथे माझे काहीच काम नव्हते. मी दोघांनाही प्रणाम करून सकाळी लवकर येण्याचं सांगून तिथून पाठमोरा बाहेर निघालो.

मी बाहेर निघताना समोरच सेनापती अंगेश मला दिसले त्यांनी माझ्याकडे पाहून स्मित केले. मी देखील स्मित करत त्यांना प्रणाम करून दरवाजाच्या बाहेर निघालो.

तिथून निघून मी थेट माझ्या कक्षात आलो आणि पुन्हा तो कागद बाहेर काढून त्या ओळी वाचून विचारत मग्न झालो.  विचार करताना मला महाराजांच्या खासगीत ऐकू आलेली ती पैंजणाची छम छम आठवली. ही तशीच होती जी मला हा कागद सापडला तिथे ऐकू आली होती. पण आता ऐकू आलेली ती छम छम बहुतेक राजकुमारींच्या पैंजणाची असावी आणि मला कागद सापडला तिथे राजकुमारी कशासाठी येतील ना? तिथे नक्कीच तश्याच पैंजणांचे दुसरे कोणी तरी होते. पण कोण?

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all