Login

ओळखीचे शब्द...! | भाग २३

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग २३

सुलेखा

१६५० चा काळ.

आमची शिकवणी अगदी सुरळीत सुरू झाली. साध्या तरी ह्या आठवड्यात मी त्यांच्या फक्त कविताच वाचत होते. कोण जाणे कसे काय? पण त्यांची एक एक कविता माझ्यावर जणू जादूच करत होती. त्यांच्या कविता वाचताना माझा आत्मा माझ्यात राहिलेला नसून तो कुठे तरी दूर बागेत प्रसन्नपणे विहार करत आहे असं मला वाटत होतं. अशी काय जादू होती त्यांच्या लिखाणात देव आणि ते स्वतःच जाणे. पण मी मात्र त्या जादूमध्ये दिवसेंदिवस माझ्या नकळत स्वतःला हरवत चालले होते. आणि स्वतःला थांबवण्याची इच्छा देखील संपत चालली होती.

अजून तरी आमची शिकवणी सुरू होऊन आठवडाभरच झाला होता. मी जास्त काही न करता त्यांच्या कविता वाचून त्यांचा आनंद घेत होते. ते मला त्यांच्या एक एक कवितांचे भाव भावना समजावून सांगत होते. मी त्या मधुर वाणीत स्वतःला नेहमीच हरवून बसत असे.

पण बरेच दिवस झाले ते माझ्या कडून मी लिहिल्या कवितांचे कागद मागत आहेत. जर मी त्यांना ते दिलेत तर त्यांना लगेच समजेल की, त्यांच्यासाठी त्या दोन ओळी लिहिणारी दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे.

पण समजलं तरी काय हरकत आहे ना? असं ही कधी ना कधी त्यांना ते समजणारच आहे. आता हा आठवडाभर तरी ते महाराजांसोबत कार्यक्रमात व्यस्त असतील. आत्ताच त्यांना ते कागद देण्याची योग्य संधी मला आहे. चला राजकुमारी पुढच्या मोहिमेला लागूया.

मी वाकून आज पुन्हा एकदा माझ्या पायात ते पैंजण बांधले. इतके दिवस कवींसमोर मी ते घालायचे टाळत होते. कारण त्यामुळे पण त्यांनी मला लगेच ओळखले असते. ते मला सध्या तरी नको होतं. हे माझं वेडं मन मला कुठे घेऊन चालले आहे?

पैंजण घालून मी दरबारात पडद्यामागे माझ्या नेहमीच्या जागी बसले. कार्यक्रम सुरू झाला. कवी सर्वांसमोर आपल्या कविता सादर करत होते. मला बसल्या जागेवरून ते स्पष्ट दिसत होते. मी त्यांच्या मधुर वाणीत हरवून गेले.

त्यांच्या कवितेचं सादरीकरण संपल्यावर टाळ्या वाजल्या आणि मी भानावर आले. ते आपल्या जागेवर जाऊन थांबले. दरबारात इतर मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले.

मी जागेवरून मुद्दाम माझ्या पैंजणांचा आवाज केला. आणि समोर बघितले तर मला आश्चर्य वाटले. बाहेर इतक्या आवाजात ही माझ्या पैंजणांच्या आवाजाने कवींनी कान टवकारले.

मी पुन्हा ' छम... छम...' असा आवाज केला. ते हा आवाज कोठून येत आहे ह्याचा आजूबाजूला शोध घेऊ लागले. त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मला स्पष्ट दिसत होती. ती बघून मला मनातच हसू आले.

मी हळूच जागेवरून उठून पैंजणांचा आवाज करत माझ्या कक्षाकडे जाण्यासाठी निघाले. मला. नक्की माहीत होते की, कवी तो आवाज ऐकून माझ्या मागे येणार. आणि तसेच झाले. ते आवाजाच्या मागून चालू लागले. पण मी मात्र त्यांच्या नजरे पासून दूर होते. मी नक्कीच त्यांच्या नजरेत पडणार नव्हते. आणि ह्या मार्गातील सगळ्या सैनिकांना देखील मी दरबारात कामाला लावले होते. मी पण शेवटी राजकुमारी आहे. स्वतःशीच बोलून हसले.

चालत चालत मी लगेच माझ्या कक्षात पोहोचले. आणि लगेच पैंजण काढून पुन्हा दरवाजातून बाहेर आले. बाहेर येताच मला कवी समोर उभे दिसले. ते आतुरतेने काही तरी शोधत असल्याचं मला जाणवलं. मला त्यांची अवस्था बघून हसू आले.

मी त्यांना हाक मारून बोलावताच ते भानावर आले. त्यांना काय झाल्याचे विचारल्यास त्यांनी मला माझ्या कवितांच्या कागदांचे खोटे कारण सांगितले. ते ऐकून तर मला आणखीनच हसू आले. मी कक्षात जाऊन माझ्या कवितांचे कागद आणून त्यांच्या हाती दिले. ते घेऊन कवी तिथून निघून गेले. मी तशीच उभी राहून दूर दूर जाणाऱ्या त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागले. अगदी ते नजरे आड जाई पर्यंत...!

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all