Login

ओळखीचे शब्द...! | भाग ३

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ३

सुलेखा

१६५० चा काळ.

राजा भीमराज ह्यांचा दरबार.

किती मधुर आवाज आहे त्यांचा आणि किती त्या सुरेख कविता. त्यांना ऐकताना अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतं. त्यांच्या मुखातून कविता ऐकताना माझी मीच राहत नाही. आज दरबारात देखील किती छान कविता सादर करत आहेत. खास त्यांच्यासाठीच म्हणून मी इथे त्यांच्या कविता ऐकायला आले आहे.

त्यांच्या कवितांचं सादरीकरण संपलं आणि मन उदास झालं. असं वाटत होते की, ते कधी संपूच नये.
पण, ते देखील मनुष्य आहेत, न थांबता किती बोलू शकतील ते? मी पण ना खरंच वेडीच आहे काही विचार करत असते. पण, ते दरबारात आल्या पासून त्यांना ऐकण्याची मी एक संधी सोडली नाही.

ज्या दिवशी महाराज त्यांना बंदी बनवून घेऊन आलेत तेव्हा मी सुद्धा तिथेच होते. तीच पहिली वेळ ज्या वेळेस मी त्यांची कविता ऐकली आणि मग मी त्यांच्या कवितांच्या प्रेमात पडले. तेव्हा मनोमन मी प्रार्थना करत होते की, त्यांना दरबारात महाराजांनी ठेवून घ्यावं. आणि त्या देवाचे आभार त्यांनी माझे ऐकले आणि महाराजांनी सरळ त्यांना राजकवी म्हणून घोषित केले. माझ्या मनाला किती आनंद झाला हे शब्दात सांगण्यासारखे नाही.

मला देखील कविता खूप आवडतात. म्हणूनच असेल बहुतेक मी त्यांच्याकडे इतकी आकर्षित होत आहे. अचानक टाळ्यांचा कडकडाटात झाला आणि माझी तंद्री भंग झाली. मी त्यांच्या विचारातून बाहेर आले आणि स्वतःशीच हसले. महाराजांनी त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार केला तेव्हा मला देखील खूप आनंद झाला.

बघता बघता कार्यक्रम संपला दरबार बरखास्त झाला. जेवणाचा कार्यक्रम बाहेर सुरू होता. सगळी मंडळी बाहेर होती. आज मी त्यांच्यासाठी लिहिलेल्या दोन ओळी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार हे मी माझ्या मनाशी नक्की केलं होतं.

कधी पासून माझ्या सखींसोबत त्यांच्या मागून फिरून योग्य संधी शोधते आहे पण, काही संधीच मिळत नाही आहे.

तेव्हा अचानक समजले की, ते त्यांच्या कक्षाकडे जात आहे. हे ऐकून मला आनंद झाला. मी पटकन दुसऱ्या वाटेने जाऊन त्यांच्या कक्षाकडे जाणाऱ्या वाटेत त्यांच्यासाठी लिहिलेल्या दोन ओळींचा कागद ठेवला आणि बाजूला लपून त्यांच्या येण्याची वाट बघू लागले.

पुढच्या काही क्षणात ते तिथे आले. त्यांनी तो कागद हातात घेऊन त्या ओळी वाचल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. ते बघून माझ्या मनाला आनंद झाला. तो कागद तिथे कोणी ठेवला हे बघण्यासाठी ते आजूबाजूला पाहू लागले आणि मी त्यांना दिसू नये म्हणून मी वेडी तिथून पळाले. मी तर त्यांना दिसले नसेलच पण त्या शांततेत माझ्या पैजनांचा आवाज त्यांनी नक्कीच ऐकला असणार.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all