Login

ओळखीचे शब्द...! | भाग ५

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ५

शाश्वतवर्ण

१६५० चा काळ.

" शब्दांनी तुमच्या होते धुंद माझे मन,
ऐकताना मनास वाटे थांबवावा क्षण."

ह्या ओळी नक्की कोणी लिहिल्या असतील? हस्ताक्षर देखील किती सुंदर आहे आणि लिहिले देखील खूप छान आहे. वाचून मन अगदी प्रसन्न झाले.

किती गोडवा आहे ह्या शब्दांमध्ये खरंच. पण, ह्यावर लिहिणाऱ्याचे नाव असते तर समजले तरी असते की, हे नक्की कोणी लिहिले आहे. हे शब्द लिहिणारा असेल की? कोणी लिहिणारी? कारण तिथे हे वाचताना नक्कीच मला पैंजणांचा आवाज ऐकू आला होता. तो माझा भ्रम मुळीच नव्हता. तिथे कोणी तरी थांबून मी हा कागद उचलायची वाट बघत होते. पण, कोण असावे ते?

मी विचार मग्न असताना अचानक खिडकीतून थंड वाऱ्याची झुळूक आत येऊन मला स्पर्शून गेली आणि त्यामुळे माझी तंद्री भंग झाली. आणि माझं लक्ष समोरच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे गेलं.

वाह, किती सुंदर दिसत आहे तो सूर्य क्षितिजा आड जाताना. खरंच मावळणं देखील किती सुंदर असतं ते ह्या सूर्याकडून शिकावं. मावळताना देखील तो त्याच्या प्रकाशने आसमंत अगदी उजळवून टाकतो. अगदी क्षितिजावर किती तरी रंग पसरवत असतो की, ते रंग पाहताना पाहणारा आपले देह भान विसरून जाईल. माणसांना देखील त्या सूर्याप्रमाणे थोरवी कधी यायची? हे तो देवच जाणे. आता हा अस्ताला जाणारा सूर्य उद्या संपूर्ण जगासाठी नवी आशेची किरणे घेऊन येईल.

मी माझे भान हरपून ते सुंदर दृश्य पाहत असताना अचानक दार वाजल्याचा आवाज आला आणि मी भानावर आलो. हातातील कागद कंबरेतील शेल्यात ठेवून मी दार उघडले.

" प्रणाम कविराज महाराजांनी आत्ताच तुम्हाला त्यांच्या खासगीत बोलावणे धाडले आहे."
महाराजांचा एक जवळचा सेवक त्यांचा संदेश घेऊन आला होता.

" हो तुम्ही चला पुढे मी आलोच."

मी त्याला ते म्हणताच तो तिथून निघून गेला. पण, महाराजांनी ह्या वेळेस माझी आठवण का काढली असावी? कार्यक्रम संपल्याची घोषणा केव्हाच झाली आहे. महाराज देखील आपल्या कक्षात आराम करायला निघून गेल्याचं मगाशीच समजले. बघुया आता तिथे पोहोचून ते कळेलच.

विचार करता करता मी दरबाराच्या मागच्या वाटेने जाऊन महाराजांच्या कक्षा जवळ पोहोचलो. संपूर्ण महाल आता रात्र झाल्यावर दिव्यांनी आणखीच झगमगत होता. आता रात्री महाराजांचा त्यांच्या इतर राजे मित्र परिवारांसोबत खासगीचा कार्यक्रम आधीच ठरला होता.

" महाराजांचा विजय असो, प्रणाम महाराज."
महाराजांच्या कक्षात प्रवेश करून समोर बसलेल्या महाराजांना मी आदर युक्त प्रणाम केला.

" या कवी शाश्वतवर्ण या. बसा."
महाराज अगदी हसत आनंदी होऊन म्हणाले.

त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी त्याच्या समोर असलेल्या आसनावर बसलो.

" आजच्या कविता फारच सुंदर झाल्यात कविराज. तुमचे कौतुक करावे तेवढे कमी. आमचे मित्र देखील तुमचे तोंडभरून कौतुक करत होते."
मी बसल्यावर महाराज पुढे म्हणाले.

" खूप खूप धन्यवाद महाराज सगळी तुमची कृपा. तुमच्यामुळे मला हे नवीन आयुष्य मिळाले. तुमची किर्ती धन्य आहे."
मी स्मित करत महाराजांना म्हणालो.

" कलाकारांचा आदर करणं आम्ही आमचे कर्तव्य मानतो कवी. आणि आम्ही कलेचे पुजारी आहोत हे तुम्हाला चांगलेच माहित आहे. आमच्या सारखीच आमच्या राजकुमारींना देखील कलेची आवड आहे. आणि त्यांना कविता शिकायची इच्छा आहे. म्हणून ह्यासाठीच आम्ही तुम्हाला इथे बोलावणे धाडले."
महाराजांनी मला इथे बोलावून घेण्याचे कारण स्पष्ट केले.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all