Login

ओळखीचे शब्द...! | भाग ७

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग ७

सुलेखा

१६५० चा काळ.

राजा भीमराज ह्यांचा महाल.

नशीब त्यांनी मला बघितलं नाही आणि त्यांनी बघायच्या आधी मी माझ्या कक्षात पळून आले. त्यांनी पैंजणाचा आवाज ऐकला तर असेलच पण, त्यांना थोडीच माहीत की, कोण असेल ते? त्यांनी तर अजून पर्यंत मला बघितलं देखील नाही. पण त्यांना खरंच त्या दोन ओळी आवडल्या असतील का?

काहीच कळायला मार्ग नाही. नशीब तिथे आणखीन कोणी नव्हतं नाही तर तो कागद जर महाराजांच्या हातात पडला असता तर आमची खैर नव्हती.

असो मी माझी पहिली मोहीम अगदी फत्ते केली आहे. आता दुसऱ्या मोहिमेच्या तयारीला लागायला हवं. महाराजांना एकट्यात गाठून मी कविता शिकण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडणार आहे. मी त्यांची एकुलती एक लाडकी राजकुमारी आहे ते मला नक्कीच नाही म्हणणार नाहीत. पण, ते येतील तर खरे. आत्ताच ते त्यांच्या खासगी कक्षात विश्राम करताना मला त्यांच्याशी बोलण्याची योग्य संधी मिळेल. त्या नंतर जर ते एकदा बाहेर पडले की, मग काय ते बोलण्यासाठी सापडायचे नाहीत आणि माझी मोहीम स्थगित व्हायची.

" राजकुमारींचा विजय असो, महाराज नुकतेच त्यांच्या कक्षात दाखल झाले आहेत राजकुमारी."
मी विचार मग्न असताना माझ्या एका खास दासीने मला निरोप दिला, तसा मीच तिला द्यायला सांगितला होता.

मी तिला तिथून जायला सांगून मग स्वतः महाराजांच्या खासगीकडे प्रस्थान केलं. महाराजांसोबत बोलायला आज पहिल्यांदा माझ्या काळजात धडधड होतंय. कोणास ठाऊक का?

मी महाराजाच्या कक्षा जवळ आले. मी आल्याची वर्दी एका सेवकाने महाराजांना दिली. त्यांनी मला आत बोलावून घेतले.  आजच्या झालेल्या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आमच्या भरपूर गप्पा सुरू झाल्या.

महाराज अगदी मनमोकळेपणाने बोलत होते हसत होते. बोलता बोलता ती चर्चा मुद्दाम मी कवी शाश्वतवर्ण ह्यांच्या कवितांकडे वळवली. त्यांचे देखील महाराज भरभरून कौतुक करू लागले.

" महाराज, आम्हाला देखील तुमच्या सारखीच कवितांची खूप आवड आहे. आणि ती आवड पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला कवितांवर अभ्यास करून त्या आणखीन शिकून घेण्याची इच्छा आहे."
त्यांचं बोलून झाल्यावर मी शेवटी एकादमात त्यांना माझ्या मनातले सांगून टाकले.

" वाह राजकुमारी सुलेखा, अवश्य शिका तुम्ही कविता. तुमची शिकवणी, मी कवी शाश्वतवर्ण ह्यांनाच घ्यायला सांगतो. ते एक उत्तम कवी आहेत आणि ते अगदी छान शिकवतील तुम्हाला. मी बोलतो त्यांच्याशी तुम्ही निश्चिंत राहा."
महाराज म्हणाले.

" खूप खूप धन्यवाद महाराज. तुम्ही आत्ताच बोलता का त्यांच्याशी? नंतर मग तुम्ही एकदा राज्याच्या कारभारात गुंतलात की मग हे विसरून जाल."
मी महाराजांपुढे हट्ट धरला.

" बरं, राजकुमारी जशी तुमची इच्छा. कोणी आहे रे तिकडे?"
महाराजांनी हसून माझा हट्ट मान्य केला आणि बाहेर उभा असलेल्या सेवकाला बोलावून घेतले आणि त्याला जाऊन कवींना बोलावून घ्यायला सांगितले.

ते येई पर्यंत मी महाराजांना काही तरी कारण सांगून बाजूला जाऊन थांबले. मला कोणास ठाऊक का? त्यांच्या समोर जायला कसे तरीच वाटत होते.

पुढच्या काही वेळाने कवी, महाराजांजवळ आले. मी त्यांना एका बाजूला उभी राहून पाहत होते. त्यांना बघताच क्षणी त्यांच्या कविता आणि त्यांचा तो मधुर आवाज माझ्या मनात घुमू लागला. मी कसं बसं स्वतःला सावरायचा प्रयत्न केला.

महाराजांनी त्यांना संपूर्ण गोष्ट समजावून सांगितली. त्यांनी लगेच त्यासाठी होकार दिला आणि ते बघून माझ्या मनाला आनंद झाला. त्यांचा होकार मिळताच महाराजांनी मला हाक मारली आणि मी भानावर आले. भानावर येऊन मी हळू हळू चालत त्यांच्यासमोर जाऊ लागले.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all