Login

ओळखीचे शब्द...! | भाग १०

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग १०

अदिती

२०१५ चा काळ मुंबई.

सकाळी लवकरच माझे डोळे उघडले. सकाळची कोवळी किरणे खिडकीतून आत येऊन माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. त्यांचा स्पर्श मला अगदी गोड वाटत होता. मी तशीच शांत पडून विचार करू लागले. त्या पहिल्या किरणांसोबत कोण जाणे का? पण माझ्या डोक्यात कवी वेदांशचा विचार आला. काल त्यांच्या कविता वाचल्या पासून का त्यांचा इतका सारखा विचार येत आहे? काही समजेना झाले आहे. का त्यांच्या कवितेतील ते शब्द मला इतके ओळखीचे वाटत आहेत? मी असं पहिल्याच मेल मध्ये त्यांना भेटायचं बोलून बसले. त्यांनी जर मेल वाचला असेल तर काय विचार केला असेल त्यांनी? मी ना खरंच वेडी आहे. मी त्यांना भेटायचं बोलून काही चूक नाही ना केली? मी अभ्यासाविषयी त्यांना मेल मध्ये पण विचारू शकत होते. पण, मी त्यांना सरळ भेटायचं कसं काय बोलू शकते? मी तर फक्त अभ्यासाविषयी भेटायला बोलली आहे त्यांना.

बघूया तरी आता काय उत्तर आले असेल त्यांचे त्यावर. जास्त उशीर नको करायला आत्ताच मेल बॉक्स ओपन करून बघते नाही तर माझं कशातच मन लागणार नाही. मी लगेच आपल्या जागेवरून उठून कम्प्युटर चालू केला आणि मेल बॉक्स उघडला. मेल उघडताच सर्वात वर मला वेदांश गुरु ह्यांचा मेल आल्याचा दिसला. ते बघून माझ्या काळजात धड धड व्हायला लागलं. काय पाठवलं असेल त्यांनी समजत नव्हतं. त्या मेलवर क्लिक करून मी तो मेल उघडला.

' नमस्कार, मी कवी वेदांश गुरु. सर्वप्रथम माझे कौतुक केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या मेल वरून कळले की, तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी माझी काही मदत हवी आहे. खरं तर मी इतका काही मोठा कवी वगैरे नाही. मी जॉब करत वेळ मिळेल तसं आवड म्हणून लिहित असतो.

पण माझ्याकडून जर तुम्हाला काही मदत होणार असेल तर ती करायला मला नक्की आवडेल. मला शनिवार आणि रविवार सुट्टी असते. पुढच्या शनिवारी किंवा रविवारी आपण भेटू शकतो.

पुढच कसं? कधी? कुठे भेटायचं? ते मग ठरवून सांगा त्या प्रमाणे मग नक्की करू आपण.

वेदांश गुरु.'

त्यांचा आलेला मेल वाचून माझ्या चेहऱ्यावर आपसूक स्मित झळकले. मनात जणू फुलपाखरे उडत असल्याची मला जाणीव होऊ लागली. मी तसंच बसून काही क्षण स्मित करत त्या मेल कडे पाहू लागले.

माझ्या मनात उठणाऱ्या भावना माझ्यासाठी खरंच अनोळखी होत्या. मनात काय सुरू आहे माझे मलाच समजत नव्हते. ह्या आधी असे कधीच झाले नव्हते. मी फक्त त्या भावनांमध्ये वाहत चालले होते.

अचानक कानावर आलेल्या आईच्या हाके मुळे मी भानावर आले. मी तिला उत्तरात ,
" हो आई... उठली आहे येते थांब."
इतकं बोलून मी त्यांना मेलचं उत्तर टाईप करू लागले.

' खूप धन्यवाद तुमचे. मी भेटण्या विषयी तुम्हाला गुरुवार पर्यंत कळवते. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. माझे जे काही प्रश्न असतील ते आधीच तयार करून घेऊन येईन. तुम्ही मला मदत करायला तयार झालात हीच मोठी गोष्ट. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार.

अदिती सावंत.'

बस इतकं जास्त उतावीळ पना दाखवायला नको. नाही तर उगाच त्यांचा काही गैरसमज व्हायचा. पुन्हा एकदा पूर्ण मेल वरून नजर फिरवून मग तो सेंड केला आणि कॉम्प्युटर बंद करून मग उठून रूम बाहेर पडले.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all