दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग ११
सुलेखा
१६५० चा काळ.
महाराजांनी बोलावल्यावर मी हळू हळू पाऊले टाकत त्या दोघांच्या समोर आले. मी त्यांच्या समोर येताच ते मला अगदी लक्षपूर्वक पाहत होते. आज त्यांनी मला पहिल्यांदाच पाहिले होते. पण, हे काय त्यांची माझ्यावरील नजरच हलत नव्हती. इतके लक्षपूर्वक काय पाहत असतील ते माझ्या चेहऱ्याकडे? आता मला लाजल्या सारखं व्हायला लागलं आहे. महाराज पण इथेच बसले आहेत त्यांनी जर हे बघितलं तर ते काय म्हणतील. उगाच त्यांना शिक्षा करतील. आणि हे मला नाही आवडणार. त्यांना मी आवडली आहे का? माझ्या रूपावर ते पहिल्याच नजरेत भाळलेत का? त्यांच्या नजरेतून असं वाटतंय की, आता इथे महाराज नसते तर त्यांनी नक्कीच त्यांच्या काव्यातून माझ्यासाठी दोन कौतुकाच्या ओळी लिहिल्या असत्या.
शेवटी आमची नजरानजर झाली आणि मी त्यांना पाहत असल्याचं त्यांनी जाणलं आणि त्यांनी लगेच नजर फिरवून महाराजांकडे बघितले. माझ्या बघण्याने बहुतेक ते गडबडले. त्यांना गडबडलेले पाहून मला मनातच हसू आले.
महाराजांनी आणि त्यांनी बोलून उद्या पासूनच कवितेची शिकवणी इथे महालातच सुरू करण्याचे ठरवले. ते माझी शिकवणी घ्यायला तयार झाल्याचे ऐकून मला मनोमन भरपूर आनंद झाला आणि तो आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत होता वाटतं कारण ते पुन्हा माझ्याकडे त्याचं गोड नजरेने पाहत होते.
आमचे बोलणे चालू असतानाच एक सेवक आत सेनापती येत असल्याची वर्दी घेऊन आला. ते ऐकून माझ्या चेहऱ्यावरचे भाव आपसुक बदलले. सेनापती अंगेश म्हणजे अतिशय क्रूर माणूस. मुळात त्याला माणूस म्हणणे पण, चुकीचे ठरेल. तो महाराजांसोबत गोड बोलून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. हे महाराजांना समजत नाही. आणि मी त्यांना बोलून देखील काही फायदा नाही कारण त्यांना त्याच्यावर आंधळा विश्वास होता. कारण त्याने राज्यासाठी तितक्या लढाया लढून तो विश्वास संपादित केला होता. पण, त्याचं मूळ स्वरूप माझ्याशिवाय कोणालाच माहीत नव्हता.
महाराजांनी सेवकाला त्याला आत पाठवण्याचा आदेश दिला. सेवक बाहेर गेल्यावर कवी देखील उद्या येतो म्हणून सांगून आमचा आदेश घेऊन तिथून बाहेर निघून गेले. खरं तर ते तिथे आणखीन थांबले असते तर मला आवडले असते. पण तिथे राज्याविषयी चर्चा होणार हे जाणून ते स्वतःहून बाहेर निघून गेले. त्यांना इथे आणखीन थांबणे योग्य वाटले नाही.
ते बाहेर पडताच त्यांच्या बाजूने सेनापती अंगेश आत आले. आत येताच त्याने महाराजांना प्रणाम केला आणि माझ्याकडे पाहत एक विचित्र स्मित केले. मला ते बघून तिथे थांबण्याची इच्छा राहिली नाही. मी तिथून जाण्या विषयी महाराजांना विचारले पण, महाराजांनी मला थांबून राहायला सांगितले.
माझ्या जवळ मग थांबून राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्यांच्या वेगवेगळ्या विषयी चर्चा चालू होत्या. मी बाजूला बसून उद्या पासून चालू होणाऱ्या माझ्या कवितांच्या शिकवणी विषयी विचार करून मनोमन आनंदी होऊ लागले.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा