Login

ओळखीचे शब्द...! | भाग १२

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग १२

वेदांश

२०१५ चा काळ मुंबई.

आईने बनवलेला मस्त चविष्ट नाष्टा करून झाला. आता चला दोन दिवसाच्या सुट्टी नंतर पुन्हा नेहमीच्या आपल्या कामाला. ह्या गोष्टीला काही पर्याय नाही. आईने नेहमी प्रमाणे डब्बा वगैरे सगळं नीट तयार करून टेबलवर ठेवलं. तयारी आटपून सगळं घेऊन मी जाण्यासाठी निघालो.

" आई येतो गं."
निघताना आईला हाक मारताच आई मला निरोप द्यायला किचनमधून बाहेर आली.

" सांभाळून जा, गाडी सावकाश चालव."
मी बूट घालत असताना दरवाजात उभी राहून आईने नेहमी प्रमाणे सूचना दिल्या.

" हो आई, आणि संध्याकाळी सुटल्यावर फोन करीन काही आणायचं असेल तर तेव्हा सांग मग. काळजी घे, चल येतो मी."
इतकं बोलून मी तिचा निरोप घेऊन पायऱ्या उतरू लागलो.

पायऱ्या उतरून मी पार्किंगमध्ये असलेल्या माझ्या बाईकजवळ गेलो. त्यातील कपडा काढून पुसत असतानाच माझ्या फोनचं नॉटिफिकेशन वाजलं. मी कपडा बाजूला ठेवून मी फोन काढून बघितला तर, त्यावर त्या सकाळच्या मुलीचा माझ्या केलेल्या मेलवर रिप्लाय आला होता. मी तिथेच उभा राहून तो मेल उघडला.

' खूप धन्यवाद तुमचे. मी भेटण्या विषयी तुम्हाला गुरुवार पर्यंत कळवते. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. माझे जे काही प्रश्न असतील ते आधीच तयार करून घेऊन येईन. तुम्ही मला मदत करायला तयार झालात हीच मोठी गोष्ट. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार.

अदिती सावंत.'

आच्छा, चालतंय वाट बघूया आता गुरुवार पर्यंत. असा ही आपला पुढच्या शनिवार रविवारचा काही प्लान ठरलेला नाही. बघू तरी मॅडमना काय मदत हवी. असं ही म्हणतातच ना ज्ञान वाटल्याने वाढते.

विचार करता करता अचानक भानावर आलो आणि घड्याळात वेळ पाहिली तर साडे आठ वाजले होते. ऑफिस मध्ये नऊ वाजता पंच करणं गरजेचं होतं. असं ही माझं ऑफीस काही घरापासून इतकं लांब नाही पंधरा मिनिटांमध्ये पोहोचीन लगेच.

पण, काय माहित ह्या मॅडम मध्ये आणि ह्यांच्या शब्दांमध्ये काय जादू आहे ? वेळ आपसुक थांबल्या सारखा वाटतो. मी माझ्या नकळतच ओढलं जात आहे. कुठे? कसा? काही समजत नाही. हे शब्द अनोळखी असून का इतके ओळखीचे वाटत आहेत? आता मला देखील त्या अनोळखी भेटीची ओढ लागून राहिली आहे.

मनाशी विचार करत मी माझं हेल्मेट घातले आणि बाईकवर बसून किक मारली. बाईक चालू करून मी शेवटी ऑफीस साठी निघालो.

पुढच्या पंधरा मिनिटांत मी ऑफिस मध्ये पोहोचलो. बघता बघता ऑफिसच्या कामाला देखील लागलो. पण, मनाच्या एका कोपऱ्यात सतत त्या मेलचा आणि त्या मेल मधील शब्दांचा विचार फिरत होता. अदिती हे नाव आता माझ्या विचारांमधून जाता जात नव्हते. नक्कीच ह्या नावात तिच्या शब्दांमध्ये काही तरी विलक्षण दडलेले होते. आणि आता ते भेट झाल्याशिवाय कळणार नाही. आता पुढचा भेटीचा मेल कधी येतोय ? काय माहित...! वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all