Login

ओळखीचे शब्द...! | भाग १३

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग १३

शाश्वतवर्ण

१६५० चा काळ.

आज कोणास ठाऊक का? पण मला लवकर जाग आली. आज राजकुमारींच्या कवितेची शिकवणीला सुरुवात करायची आहे. तिथे जाण्यास उशीर व्हायला नको.

लवकर उठून प्रातःकाळ विधी आटपून मी माझ्या कवितांचे विखुरलेले कागद सगळे जमवू लागलो. जमवून ते नीट संग्रहित करून ठेवले. त्यांना नक्की कसं आणि काय शिकवायचं ह्याचा विचार करू लागलो. कारण ह्या आधी मी कधी कोणाला शिकवलं नव्हतं. मी स्वतः दरबारात कामाला असताना राज कवींकडे बघून ऐकून शिकलो मग, त्यांच्या सोबत राहून त्यांना बघून बघूनच शिकत गेलो.

पण, आता राज्याच्या राजकुमारींना शिकवायच म्हणजे मोठी कामगिरी आहे. मला ती नीट पार पाडायला हवी, नाही तर माझे काही खरं नाही. देवा परमेश्वरा तूच वाचव बाबा ह्यातून मला. त्यांना जर आवडलं नाही माझं शिकवणं तर, महाराज माझी इथून चांगलीच उचल बांगडी करतील.

मी विचार करत असताना दार वाजल्याचा आवाज आला. मी जाऊन दार उघडले.
" कविराज, राजकुमारींनी तुम्हाला शिकवणी कक्षात जाऊन थांबायला सांगितले आहे. त्या काही वेळातच तिथे पोहोचतील."
एक सेवक राजकुमारींची वर्दी घेऊन आला.

मी त्याला होकार देत त्याच्या सोबत तिथूून शिकवणीच्या कक्षाकडे जाण्यासाठी निघालो. सोबत मी आपल्या कवितांचे कागदे देखील घेतले.

पुढच्या काहीक क्षणात मी महालातल्या वरच्या बाजूला असलेल्या राजकुमार आणि राजकुमारींच्या खासगी असलेल्या शिकवणीच्या कक्षात पाऊल ठेवले. राजकुमार सध्या दुसऱ्या राज्यात गेले असल्यामुळे हा कक्ष फक्त राजकुमारींच्या ताब्यात होता. मी देखील आज पहिल्यांदाच इथे  आलो होतो. मला इथे सोडून सेवक राजकुमारींना कळवण्यासाठी निघून गेला.

आत प्रवेश करताच मी सर्वत्र नजर फिरवू लागलो. तो अतिशय प्रशस्त कक्ष होता. आत कोणास ठाऊक का? पण छान प्रसन्न वाटत होते. बाजूला जागोजागी त्यांच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या ग्रंथ मांडून ठेवले होते. मी सहज पूर्ण कक्षातून फिरत फिरत समोरच्या खिडकी जवळ गेलो.

खिडकी जवळ जाऊन मी ती बंद खिडकी उघडली. ती खिडकी पूर्वेच्या दिशेने उघडत होती. म्हणून, खिडकी उघडताच सकाळच्या उन्हाचे कोवळी किरणे लगेच खिडकीतून आत आली. ते बघून माझे मन आणखीन प्रसन्न झाले.

समोरच्या क्षितिजा आडून सूर्य हळूच वर डोकावत होता. त्याने पूर्णपणे दर्शन देण्याआधी त्याच्या किरणांनी संपूर्ण सृष्टी उजळून टाकली होती.

" तेज तुझे तेजस्वी, उजळून टाके काया,
किरणे ही लाख मोलाचे, नको घालवू वाया."

त्या सुंदर सूर्याला बघताना आपसुक माझ्या मुखातून दोन ओळी बाहेर पडल्या आणि मी स्वतःशीच हसलो.

" दिल्यानेच वाढत असते, काही जात नसते वाया,
टिकूनी राहते घट्ट नाते , जिथे असते प्रेम माया."

मी माझ्यातच गुंग असताना मला अचानक माझ्या मागून आवाज आला आणि मी दचकून मागे वळून बघितले.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all