Login

ओळखीचे शब्द...! | भाग १४

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग १४

अदिती

२०१५ चा काळ मुंबई.

" काय गं? कसल्या विचारात आहेस? आई काल काही जास्त ओरडली का?"
मी शांत बसून होते म्हणून मीनाक्षीने मला विचारले.

" नाही गं, तिचं ते नेहमीचच असतं. मला सवय झाली आहे त्याची. मी आपल्या प्रोजेक्ट बद्दल विचार करत आहे. मला प्रोजेक्टसाठी एक छान सोर्स भेटला आहे..."
मी मीनाक्षीला म्हणाले.

" म्हणजे ? असा कोणता सोर्स मिळाला आहे मॅडम तुम्हाला? आम्हाला पण, सांगा जरा म्हणजे आम्हाला पण आमच्या प्रोजेक्टसाठी काही तरी मदत होईल की."
मीनाक्षी हसत म्हणाली.

" नाही हा, तो विषय प्रोजेक्टसाठी नक्की केला आहे. तू दुसरा विषय शोध काही तरी, मी तुला सांगणारच नाही. मला त्यात मदतीसाठी कोणी तरी सापडलं आहे. लवकरच मी त्यांना भेटून माहिती घेऊन प्रोजेक्टच्या पुढच्या तयारीला लागणार आहे. तुम्ही बसा विषय शोधत टाईमपास करत."
मी मुद्दाम तिला चिडवत म्हणाली.

" आच्छा, बरं नको सांगूस जा. मी पण बघ तुझ्यापेक्षा भारी विषय घेऊन भारी प्रोजेक्ट करते की, नाही. बस तू एकटीच इथे मी चालली विषय शोधायला."
मीनाक्षी चिडून तिथून उठून कॉलेजच्या दिशेला निघून गेली.

मी एकटीच तिथे कॉलेजच्या कंपाऊंड मध्ये बसून राहिली. कॉलेजच्या आजुबाजूला छान कंपाऊंड आहे. जिथे संपूर्ण गवत उगवले आहे आणि भोवती छान वेगवेगळ्या फुलांची सुंदर झाडे लावली होती. मीनाक्षी गेल्यावर मी एकटीच तिथे बसून त्या सुंदर फुलांकडे एकटक पाहू लागली.

" दिल्यानेच वाढत असते, काही जात नसते वाया,
टिकूनी राहते घट्ट नाते , जिथे असते प्रेम माया."

त्यांना पाहता पाहता माझ्या मनात आपसुक ह्या दोन ओळी उमटल्या आणि मी लगेच माझी कवितांची वही आणि पेन काढून त्या लगेच लिहून घेतल्या.

मला लहानपणापासूनच कवितांची आवड. मला अचानक कधीही काही सुचतं, तसं मी ह्या माझ्या वहीत लिहून ठेवते. ही वही म्हणजे माझ्या फार जवळची जिच्यावरचे शब्द फक्त मीच वाचू शकते. काय माहित की, हे शब्द ओळखणारा मला कधी तरी कोणी तरी भेटेल का ह्या आयुष्यात?

" वाह... अदिती आज गार्डनमध्ये अभ्यास चालला आहे वाटतं?"
मी माझ्या धुंदीत असताना अचानक माझ्या कानावर हा आवाज पडला आणि माझ्या मूडची वाट लागली.

आकाशचा आवाज होता तो. आकाश म्हणजे माझ्या आईच्या मैत्रिणीचा मुलगा. तो माझ्याच कॉलेजमध्ये माझा सिनियर होता. आता त्याचं कॉलेज संपले होते तरी, माझ्यासाठी म्हणून तो कॉलेजमध्ये यायचा. वाईट मुलांसोबत फिरण्याशिवाय त्याच्याकडे आयुष्यात दुसरे काही कामच नव्हते. तो माझ्या मागे पूर्वी पासून लागला होता. काय तर म्हणे लहानपणी आपल्या घरच्यांनी आपलं लग्न ठरवले आहे. आणि आमच्या मातोश्री पण, त्याच्या बाजूने. काय तर म्हणे चांगला पैसे वाला आहे आयुष्य सुधारेल. मग आता कुठे ते बिघडलं आहे? नशीब माझे बाबा तरी समजदार आहेत.

" काय विचार करताय मॅडम? इथे बसून काय अभ्यास चालू आहे बघू जरा."
इतकं बोलून तो माझ्या हातातील वही घेऊ लागला.

तो ती वही घेण्याआधी मी ती बंद करून माझ्या बॅगमध्ये टाकली आणि खांद्याला बॅग लावून जागेवरून उठले.

" माझं लेक्चर आहे आता आकाश मी निघते."
इतकं बोलून मी तिथून निघाले. माझ्या मागून तो काय बोलत आहे काय नाही माझी ऐकण्याची इच्छा देखील झाली नाही.

कारण माझ्या मनाने माझ्या नकळत वेगळेच वळण घेतले होते. ते त्याला स्वतःला देखील कळत नव्हते. ते आता पूर्वीपेक्षा जास्त कवितांकडे ओढले जाऊ लागले होते.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all