Login

ओळखीचे शब्द...! | भाग १७

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग १७

शाश्वतवर्ण

१६५० चा काळ.

शिकवणीचा कक्ष.

मी मागे फिरून बघताच मला राजकुमारी समोर उभ्या दिसल्या. त्यांना बघून मी गोंधळून गेलो. आणि गोंधळून मी काहीक क्षण त्यांना एकटक नसतं पाहत राहिलो. ह्या सुंदर पहाटे हे सुंदर स्वरूप समोर बघणे म्हणजे, स्वर्ग सुखच जणू. मगाशी पाहिलेले ते निसर्गाचे सौंदर्य देखील ह्या सुंदर रूपा पुढे फिके वाटू लागले.

" वाह, कविराज अतिशय सुंदर दृश्य आहे नाही? आणि असे सुंदर दृश्य पाहून एका कविलाच अशा सुंदर ओळी सुचू शकतात."
राजकुमारी माझ्या शेजारी येऊन खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहत मला म्हणाल्या.

त्यांच्या बोलण्याने मी भानावर आलो. त्या दरवाजातून कधी माझ्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या मला समजलेच नाही.

" होय राजकुमारी, काय करणार ? कवी आहोत शेवटी. कोणतीही सुंदर गोष्ट डोळ्यांना दिसताच मन सरळ कविता रचू लागतं."
त्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत म्हणालो.

" वाह... कविराज तुमचे बोलणे देखील अगदी काव्यात्मक आहे, सुंदर!"
माझं बोलणं ऐकून राजकुमारी स्मित करत म्हणाल्या.

" धन्यवाद राजकुमारी, पण तुम्ही देखील माझ्या नंतर छान सुंदर कविता म्हणालात. अगदी माझ्या केलेल्या कवितेला चपलख उत्तर होते. ऐकून अगदी मन प्रसन्न झाले. त्यातूनच तुमची कवितेबद्दल असलेली आवड स्पष्ट होते."
मी राजकुमारींना म्हणालो.

" असं काही नाही कविराज, तुमच्या त्या दोन ओळी कानावर पडल्या आणि माझ्या मुखातून सहज कविता बाहेर पडली. ते कसं कधी झालं माझे मलाच कळले नाही."
राजकुमारींनी मला सांगितले.

" होय मग कविता आणखीन काय असतात राजकुमारी? त्या अश्याच आपल्या मनातून सहज यायला हव्यात. आपल्या मनातील खऱ्या भावना शब्दांच्या रूपात बाहेर येणे म्हणजेच कविता. आणि अशाच कविता तयार होतात. आणि तुमच्याकडून त्या दोन ओळी ऐकून मला तुमच्यातली कवितेची आवड समजली आणि आतल्या कवयित्रीचे दर्शन देखील झाले."
मी जवळ जवळ आमच्या नकळत शिकवणी सुरू देखील केली.

" होय कवीराज, बघा ना काही न करता आपली कवितांची शिकवणी कशी सहज सुरू झाली. अश्याच सहज असाव्यात कविता. मी नक्की प्रयत्न करीन. मला नेहमी नाही सुचत असे काही. कधी तरी मनातून येतात भावना त्या मुखातून माझ्या नकळत काव्यात्मक पद्धतीने व्यक्त होतात. हे आधी कधीच मला समजले नव्हते. पण तुमच्या कविता ऐकायला लागल्या पासून माझ्या आतली कवयित्री मला कुठे तरी माझ्या अंतरी जास्त प्रमाणात सापडू लागली."
राजकुमारी गोड स्मित करत म्हणाल्या.

किती गोड बोलणे होते त्यांचे ते शब्द त्यांच्या मुखातून खूप सुंदर सुरेख वाटत होते. जसे त्यांचे दिसणे सुंदर होते, तसेच त्यांचे बोलणे देखील तितकेच सुंदर होते.

आज पहिल्यांदाच मी त्यांचे बोलणे ऐकत होतो. काल महाराजांसमोर त्यांना मी पाहिलं पण, त्यांचा आवाज ऐकायला मला मिळाला नव्हता. त्या काल फक्त इशाऱ्यानेच बोलत होत्या. बहुतेक महाराज समोर असल्यामुळे असावे ते. कारण आज किती छान आणि मन मोकळ्या बोलत आहेत त्या वाटतं सगळे काही विसरून नुसते ऐकतच रहावे.

" कविराज, कुठे हरवलात? शिकवणी सुरू करायची ना आपण?"
त्यांच्या हाकेने मी भानावर आलो.

" होय राजकुमारी, तुम्ही केलेल्या कविता कुठे लिहून ठेवल्या आहेत का? मला त्या वाचायला नक्की आवडतील."
मी भानावर येऊन त्यांना प्रश्न केला.

" होय पण, मी ते कागद आता माझ्या सोबत आणले नाहीत."
त्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर दिले.

" काही हरकत नाही, आपण नंतर बघू ते. पुढील वेळेस ते नक्की घेऊन या. आता मी माझ्या कवितांचे काही कागद सोबत आणले आहेत. तुम्ही ह्या आसनावर बसून ते अभ्यासून घ्या म्हणजे तुम्हाला देखील कळेल की, कशा प्रकारे भावना कागदावर उतरवल्या जातात."
मी त्यांना समोरच्या आसनाकडे इशारा करत म्हणालो.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all