दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग १८
अदिती
२०१५ चा काळ मुंबई.
हा आठवडा का जाता जात नाही आहे? काही समजत नाही. की , मलाच तो मोठा वाटतोय? मीच आतुरतेने आठवडा संपायची वाट बघत आहे का? पण आठवडा संपवून देखील काय होणार मॅडम? उद्या गुरुवार आहे आणि मला त्यांना भेटायची वेळ आणि ठिकाण नक्की करून सांगायचं आहे. पण, त्यांना लक्षात तरी असेल ना की आम्हाला भेटायचं आहे ते? विसरले नसतील ना ते?
आज कॉलेजवरून मी जरा लवकरच घरी आले. येऊन थोडा वेळ झोप घेऊन आता मस्त उठून कॉफीचा कप हातात घेऊन गॅलरीत उभी राहून विचार करत आहे. बरं आहे आई मावशीकडे गेली आहे. म्हणून थोडं निवांत आहे.
पण त्यांना नक्की कुठे भेटावं ? हे मला समजत नाही आहे. त्यांनी सरळ सगळं माझ्यावर सोपवून मोकळे झाले. मला माहित देखील नाही ते कुठे राहतात? दोघांना कोणते ठिकाण भेटण्यासाठी बरे पडेल?
विचार करत असतानाच माझ्या फोनचा आवाज आला. त्याच्या स्क्रीनवर मला आकाशचा मेसेज दिसला त्यावर तो मला त्याने फेसबूकवर नवीन अकाऊंट वरून रिक्वेस्ट पाठवली आहे ती एक्सेप्ट करायला सांगत आहे. ह्या मुलाला मी कंटाळली आहे. फेसबुकवर येऊन मला काही महिनेच झाले आहेत. ते जास्त वापरत देखील नाही मी, पण ह्या माणसाला ते कळल्यापासून माझ्या मागेच लागला आहे. काही जबरदस्ती आहे का? इतकं कोण कोणाच्या मागे मागे करतं? समोरून तिरस्कार होत असेल तरी माणसांना समजत नाही. ह्या आधी किती तरी वेळा मी त्याची रिक्वेस्ट इग्नोर केली आहे. पण तरी हा ऐकेल तर खरं!
फेसबुक... हा फेसबुक... कवी वेदांश फेसबुकवर तर असतीलच नक्की. तिथून मला त्यांच्या आवडी निवडी कळतील. जमलंच तर त्यांच्याशी बोलणं देखील होईल. मग, तिथेच त्यांच्याशी भेटण्या विषयी बोलता येईल. प्रयत्न करायला काय हरकत आहे ना?
कॉफी आता पर्यंत संपली होती. कप किचन मध्ये ठेवून मी रूम मध्ये जाऊन कॉम्प्युटर चालू केला. तेवढ्यासाठी मला कॉम्प्युटर चालू करावा लागतोय. लोकं आज काल हे सगळं फोन मध्ये वापरतात. पण, नको बाबांना जास्त खर्च द्यायला नाही आवडत. जेव्हा मी कमविण तेव्हा घेईन छान फोन. विचार करता करता कॉम्प्युटर चालू झाला. तिथे क्रोमवर जाऊन मी फेसबुक वेबसाईट ओपन केली.
तिथे माझे अकाऊंट आधीच लॉगिन होते. आज बऱ्याच दिवसांनी मी ते ओपन केले होते. बरेच नॉटिफिकेशन येऊन पडले होते. ज्यात एक ही काही माझ्या कामाच नव्हते. खरं तर ज्या कामासाठी मी आता फेसबुक ओपन केला आहे त्या शिवाय माझ्यासाठी महत्वाचे असे काहीच काम नव्हते.
मी सगळं दुर्लक्ष करून सर्च ऑप्शनवर क्लिक केलं. तिथे मी वेदांश नाव टाईप करून एंटर केलं. तर तिथे दुनियाभरचे वेदांश समोर आले. आता ह्यात मला हवे असलेले कसे बरे सापडणार?
हा गुरू... वेदांश गुरु त्यांचं पूर्ण नाव त्यांनी मेलमध्ये लिहिले होते. मी पुन्हा त्यांचे पूर्ण नाव टाईप करून सर्च केलं तर, समोर वीस लोकांचे त्या नावाचे प्रोफाइल आले. आता ह्यातून त्यांना कसे बरे ओळखायचे. त्यांच्या प्रोफाईलवर कवी म्हणून उल्लेख नक्कीच असेल. एक एक करून मी सगळे प्रोफाइल उघडून बघू लागले. पण सगळीकडे मला निराशाच मिळाली.
एक एक करून असे मी अठरा प्रोफाइल चेक केले पण, त्यातले त्यांचे असेल असे मला कोणतेच वाटले नाही. मनाला वाटलं ते नसावेत फेसबुकवर किंवा दुसऱ्या कोणत्या तरी नावाने प्रोफाइल असेल. पण ते दुसरे नाव कळायला काही मार्ग नव्हता.
तरी अजून दोन प्रोफाइल चेक करायचे बाकी आहेत. मनाच्या समाधानासाठी ते देखील करून घेते म्हणजे मनात शंका राहायला नको. म्हणून मी पुढच्या प्रोफाईलवर क्लिक केलं. आणि त्या प्रोफाईलवर मला कवी म्हणून उल्लेख दिसला.
" अनोळखी ओळख, तरी वाटते ओळखीची,
मनी लागून आहे सखे, आस तुझ्या सोबतीची."
मनी लागून आहे सखे, आस तुझ्या सोबतीची."
आणि नुकतीच दोन मिनिटांपूर्वी त्यांनी त्यांच्या प्रोफाईलवर ही पहिली कविता पोस्ट केलेली दिसली आणि ते ओळखीचे शब्द वाचून मनाला समाधानाची जाणीव झाली आणि मी लगेच त्यांना रिक्वेस्ट पाठवली.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा