Login

ओळखीचे शब्द...! | भाग १९

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग १९

सुलेखा

१६५० चा काळ.

" दिल्यानेच वाढत असते, काही जात नसते वाया,
टिकूनी राहते घट्ट नाते , जिथे असते प्रेम माया."

माझ्या नकळतच ह्या दोन ओळी माझ्या मुखातून बाहेर पडल्या आणि त्या ओळी त्यांच्या कानावर पडताच त्यांची तपश्चर्या भंग झाली. त्यांनी गडबडून मागे वळून पाहिले. आणि ते एकटक माझ्याकडे कालच्या सारखे पाहतच राहिले. ते असे भान हरपून माझ्याकडे का पाहतात? ह्याचा मला काल पासून प्रश्न पडला आहे. खरंच मी इतकी सुंदर आहे? हे त्या कवी मनाला आणि कवी नजरेला बहुतेक चांगलेच कळत असावे.

मी दरवाजातून हळू हळू पाऊले टाकत खिडकी जवळ पोहोचले, तरी त्यांची नजर मात्र माझ्यावरच खिळली होती. ह्या वेळेस मी त्यांची ही तपश्चर्या भंग केली नाही. माझ्या मनाला देखील ते कुठे तरी आवडू लागले होते.

चालत चालत मी खिडकी जवळ पोहोचले आणि बाहेर ते बघत असलेले दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ते बघून मी अवाक झाले. आता समजले ते हे दृश्य बघण्यात का इतके गुंग झाले होते.

मी ते सुंदर दृश्य बघून त्याचे कौतुक करू लागले. माझ्या बोलण्याने बहुतेक ते भानावर आले. त्या सुंदर दृश्यासोबत मी त्यांनी केलेल्या कवितेचे कौतुक केले. पण त्यावर त्यांनी हुशारीने उत्तर देत फिरून ते माझ्याच कवितेचे कौतुक करू लागले. कवीच ते शेवटी, त्यांच्याशी शब्दांमध्ये जिंकणे कठीण होते हे मला माहीत होते पण, आता त्याचा मला खरा अनुभव मिळाला.

त्यांना मी माझ्या कवितेच्या आवडीबद्दल आणखीन स्पष्टपणे सांगितले. त्यांनी ते शांतपणे ऐकून देखील घेतले आणि ती चर्चा चालू असतानाच ते मला कवितांबद्दल समजावून सांगू लागले. त्यांचं ते बोलणं मी अगदी मन लावून ऐकू लागले.

त्यांचं बोलणं अगदी बरोबर होतं. कविता ही सहज मनातून यायला हवी. तरच त्या कवितेचे सौंदर्य उठून दिसते. त्यांचं समजावून सांगणे देखील किती स्पष्ट आणि सोपे होते, जे त्यांच्या मुखातून आणखीनच आकर्षित वाटत होते. त्यांच्या कवितांप्रमाणे त्यांचे हे बोलणे देखील नुसते ऐकत रहावेसे वाटत होते.

सोबतच लहानपणापासूनची माझी थोडीफार कवितेची आवड, जी ते आल्यावर किती वाढली हे देखील मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. पण, मी बोलत असताना मला जाणवले की, ते पुन्हा कशात तरी हरवून गेले असावेत. हे असे काय ते मला समजत नव्हते.

शेवटी मीच त्यांना हाक दिली आणि ते पुन्हा भानावर आले. त्यांनी मला माझ्या लिखाणाबद्दल विचारले आणि समोरच्या आसनावर बसून त्यांच्या लिहिलेल्या कवितांची पाने मला वाचायला दिली.

शीर्षक :- स्पर्श तुझा

सख्या रे ये परतूनी  बघ सांज झाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली ll धृ ll

दूर असलास नेहमी सख्या तू जरी
वाट पाहते तुझी रे होवूनी बावरी
पत्रे तुझी ती रे पुन्हा मी वाचून झाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली || १ ||

वेडावले सख्या बघ ना रे मन माझे
होईल दर्शन कधी नयनांना तुझे?
रूप तुझे ते देखणे अठवूनी झाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली || २ ||

दुरावा तुझा सहन हा होई ना आता
स्पर्श तुझा आठवितो मला येता जाता
त्या गोड स्पर्शाने तुझ्या मी प्रेमात न्हाली
तुझ्या आठवांनी माझ्या गाली लाज आली || ३ ||

(कवी : चेतन सुरेश सकपाळ.)

त्यांची लिहिलेली ही एक कविता पाहून मी अगदी मात्रमुग्द होऊन गेले.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all