Login

ओळखीचे शब्द...! | भाग २६

अनोळखी मनांना ओळखीच्या वाटणाऱ्या शब्दांची एक अनोखी प्रेम कथा...!
दीर्घ कथा लेखन स्पर्धा.

भाग २६

अदिती

२०१५ चा काळ मुंबई.

वेदांशसोबत फेसबुकवर बोलून झाल्यावर मी फेसबुक बंद करून अशीच कॉम्प्युटर समोर बसून होते. त्यांच्याशी बोलून खूप छान वाटले. आज पहिल्यांदाच आम्ही इतके बोललो. पण, आज मी त्यांच्याशी पहिल्यांदा बोलते असं अजिबात वाटलं नाही. असं वाटत होतं आमची जुनी अगदी जनोजन्मांची ओळख आहे. का असं होत असेल त्यांच्याच बाबतीत? आता पर्यंत किती तरी मुलांनी मला प्रपोज केला. पण मला कधीच कोणी आवडले नाही. आणि ह्यांना ना मी कधी भेटले, ना पाहिले, ना बोलले. तरी ह्यांच्याबद्दल माझ्या मनात इतकी आपुलकी का? ह्या सगळ्यांची उत्तरे मिळायला अजून एक दिवस वाट बघावी लागेल. त्या शिवाय काही पर्याय देखील नाही. असो बघूया वाट अजून काय करू शकतो आपण मॅडम...!

ते कॅफे नक्की कुठे आहे? कसे आहे? जरा माहिती तरी काढून बघुया आपण. म्हणून मी गुगल ओपन करून रीडर्स बुक कॅफे गोरेगाव म्हणून सर्च केलं.

वाह... किती भारी कॅफे आहे हा. मस्तच चॉईस आहे त्यांची. खरंच दोन साहित्यिक माणसांना भेटायला अगदी परफेक्ट जागा शोधून काढली आहे. मानलं पाहिजे साहेबांना. इतकं सुंदर इंटिरिअर. बघूनच इतकं छान वाटतंय तिथे जाऊन नक्कीच मस्त वाटेल. आता अजून एक दिवस कधी जातोय असं वाटायला लागलंय.

कॅफे बद्दल माहिती वाचून मग मी कॉम्प्युटर बंद करून जेऊन लवकर झोपले. झोपताना देखील मला त्यांचे आदराने बोलणे, त्यांच्या कविता सगळं आठवून मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं. त्यांचा विचार करता करता मला कधी झोप लागली माझे मलाच समजले नाही.

दुसऱ्या दिवशी देखील मी सगळं आवरून कालच्याच वेळेत मुद्दाम कॉम्पुटर चालू करून फेसबुक चालू केलं. आज देखील ते आधी पासूनच ऑनलाईन होते. कोण जाणे का? पण त्यांना ऑनलाईन बघून माझ्या चेहऱ्यावर आपसूक स्मित उमटले.

आज मी त्यांना पहिला मॅसेज केला. पुढच्याच क्षणी लगेच त्यांचा रिप्लाय आला. जणू ते माझ्या मॅसेजची वाटच बघत होते. ते बघून मनाला आणखीन आनंद झाला.

कालच्या सारखेच आज देखील आधी आमची विचारपूस करून झाली. त्यांनी मग मला माझ्या शिक्षणाबद्दल विचारले. मी त्यांना माझ्या शिक्षणाची सविस्तर माहिती दिली. ते सगळं वाचून त्यांनी माझे कौतुक केले. म्हणे आज काल हे सगळं शिकण्यात कोण रस घेते? मला मराठी साहित्याची आवड असल्याची त्यांना सांगितलं. त्यांनी देखील त्यांच्या आवडी निवडी मला सांगितल्या. ते अतिशय शांत एकांतात राहणारे व्यक्तिमत्व असल्याचं मला जाणवले. त्यांना बाहेर कुठे कोणासोबत फिरायला वगैरे आवडत नव्हते. त्यांचे असे कोणी जास्त मित्र देखील नव्हते. नाही नाही म्हणता त्यांनी त्यांच्या नकळत त्यांच्या बद्दल बरंच काही मला सांगितलं.

कोणाशी जास्त न बोलणारी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर मन मोकळ्या पणाने व्यक्त होते तेव्हा छान वाटतं. त्याने आणखीनच जवळीक वाढते. त्यांचा स्वभाव मला आवडला. आणि त्याहून ही जास्त आवडलं ते म्हणजे माझ्या सोबत इतके बिनधास्त मोकळ्या पणाने त्यांचे बोलणे.

बोलता बोलता आईचा आवाज ऐकू आला. मी वेळ पाहिली तर आम्ही चक्क दोन तास बोलत होतो. माझा मलाच विश्वास बसला नाही. ह्या आधी मी इतका उशीर कोणत्याच मुलाशी बोलली नाही आहे. शेवटी उद्या वेळेवर भेटूया म्हणून ठरवून आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि मी कॉम्प्यूटर बंद करून जेवायला निघून गेले.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all