दीर्घ कथा लेखन स्पर्धा.
भाग २७
सुलेखा
१६५० चा काळ.
मला आता मनात खरंच कसतरी होते आहे. त्यांनी माझ्या कवितांचे कागद घेऊन बराच काळ झाला. त्यांनी त्या वाचल्या असतीलच ना? वाचल्या असतील तर त्यांना त्या दोन ओळींबद्दल नक्कीच कळले असेल. त्यांना जर ते कळले असेल तर त्यांना काय वाटलं असेल? काही चुकीचा समज तर नाही ना करून घेणार ते? काय काय आणि कसे कसे विचार येत आहेत मनात हे कसे आणि कोणाला सांगू? कळल्यावर ते शिकवणी थांबवणार नाहीत ना? असं नको व्हायला. मला त्यांचा सहवास आवडू लागला आहे.
हो म्हणजे, मला त्यांच्या कविता तर आवडतातच,पण सोबत माझे मन माझ्या नकळत त्यांच्यावर भाळले आहे. कसे हे मला ही ठाऊक नाही. महाराज त्यांना कविता सादरीकरणासाठी समोर घेऊन आले, तेव्हा मी सुद्धा देखील तिथेच होते. त्यांना पाहताच क्षणी मी त्यांना पाहतच राहिले. काही तरी विलक्षण होतं त्यांच्यात. माझं नशीब की, तेव्हा माझ्या आजूबाजूला कोणी नव्हतं.
मी त्यांना पाहत असतानाच. अचानक त्यांची मधुर वाणी पहिल्यांदा माझ्या कानावर पडली. त्या वाणीने मी भानावर आले. महाराजांनी त्यांना कविता सादर करायला सांगितली होती. ते ही अगदी तल्लीन होऊन त्यांची कविता सादर करत होते. त्यांची कविता सरळ माझ्या काळजात रुतत होती. त्यांचे एक एक शब्द जिव्हाळ्याचे वाटत होते. खरंतर त्याच क्षणी मी त्यांची झाले होते.
मग त्या नंतर जेव्हा जेव्हा त्यांचे सादरीकरण होते तेव्हा मी त्यांना ऐकण्याची संधी कधीच सोडत नव्हते. माझ्या मनात काय चाललं होतं, हे त्यांना कधीच समजलं नव्हतं. त्यांना काय ते तर मला देखील समजत नव्हतं. अजून ही समजत नाही आहे. मी ह्या राज्याची राजकुमारी आहे हे मी हळू हळू विसरत चालली आहे.
शय्येवर पडून नुसते विचार करून मला झोपच लागत नाही आहे. मन नुसते बेचैन होत आहे. मी जागेवरून उठून खिडकीत जाऊन उभी राहिले. तिथे उभी राहून माझे मोकळे सोडलेले लांब केस एका बाजूने पुढे घेऊन त्यांच्यावर हळुवारपणे हात फिरवत बाहेर बघू लागले. बाहेर अगदी गार वारा सुटला होता. हा रात्रीचा खिडकीतून येणारा गार वारा अंगावर शहारे आणत होता.
बाहेर बघता बघता माझी नजर माझ्या नेहमीच्या आवडीच्या ठिकाणी गेली. ती म्हणजे महालाच्या मागच्या बाजूला असलेल्या कवींच्या, घराकडे! मी इथून त्यांना नेहमी पाहत असे. पण, हे त्यांना माहीत नव्हते.
त्यांच्या घरचा दिवा अजूनही पेटताना दिसतोय. म्हणजेच ते अजूनही झोपलेले नाहीत. काय करत असावेत ते? माझ्या कविता तर वाचत नसतील ना?
मी विचार करत असताना ते अचानक खिडकीत येऊन बसले. त्यांना बघून माझ्या मनाला आनंद झाला. पण पुढच्याच क्षणी माझी नजर त्यांच्या हातातील कागदावर गेली. मला ओळखून येत होतं की, ते माझ्याच कवितांचे कागद होते. ते त्यातील कविता वाचून हळूच समोर दिसणाऱ्या चंद्राकडे पाहू लागले. कविता वाचून त्यांच्या मनात काय भावना आल्या असाव्यात, समजायला काहीच मार्ग नाही.
विचार करत मी ते पाहत असलेल्या दिशेला चंद्राकडे पाहू लागले. आहा... खरंच किती सुंदर दिसतोय चंद्र. नक्कीच त्याला बघून कवींनी मनात कविता रचली असणार.
" चंद्राच्या साक्षीने सख्या चोरून तुम्हा पाहते,
पाहताना वेडे मन माझे तुमच्यात हरवून जाते."
पाहताना वेडे मन माझे तुमच्यात हरवून जाते."
त्यांना बघताना आपसुक दोन ओळी मुखातून बाहेर पडल्या आणि ओठांवर स्मित उमटले.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा